तमिळनाडूचा इतिहास भाग-८

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 15 September, 2022 - 14:03

घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती.

गांधी मद्रासला आले तेव्हा पेरियार यांचे नाव ई.व्ही. रामास्वामी नायकर असे होते. ते एका श्रीमंत व्यापारी कुटुंबातील होते. त्यांच्या घरी ब्राह्मण नियमित येत असत. त्यांच्याशी शिवा-अशिवी सारखा प्रकार होत नव्हता. सुरुवातीला त्यांची टीका खोडी काढण्यापासून ते प्रामाणिक कुतूहलापर्यंत होती. खरे तर धर्मावर सकारात्मक टीका ही भारताची प्राचीन परंपरा होती. चार्वाक पासून ते संत कबीर दास ह्यांच्या पर्यंत.

एखाद्या सिनेमात शोभावा अश्या किस्स्याने मी सुरूवात करतो. कौटुंबिक लग्नाच्या निमित्ताने ते असंच मित्रांसोबत विधींची टिंगल करत बसले होते. तेव्हा एका लाजाळू दिसणार्‍या धार्मिक तरुणीने त्यांना धर्माची टिंगल करू नये म्हणून अडवले. नजर भिडल्यावर रामास्वामी लगेच तिच्या प्रेमात पडले. त्यांनी लवकरच लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला.

नागम्मल नावाची ती तरुणी कोणत्याही तमिळ स्त्रीप्रमाणे मंदिरात आणि पूजाअर्चांमध्ये व्यस्त असायची. रामास्वामीही तीला थांबवायचे नाहीत, ते कधी कधी प्रेमाने टोमणे मारायचे की तुझा देव तूला साथ देणार नाही, मीच आयुष्यभर साथ देनार आहे. एके दिवशी नागम्मल मंदिरातून परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांनी तिची छेड काढली.

त्यावेळी एका वीराच्या शैलीत रामास्वामी (पेरियार) आले आणि संरक्षण करत म्हणाले - "बघ! तू देवाला भेटायला येते, आणि मंदिराबाहेर काय चाललंय ते.

यातील गंमत म्हणजे पेरियार यांचे मित्रच गुंडांच्या वेशात होते आणि ही त्यांचीच योजना होती!

त्या काळात सर्वसामान्य भारतीय तरुणांप्रमाणेच रामास्वामी यांच्यातही राष्ट्रवाद ऊचंबळत होता. काँग्रेस तामिळ ब्राह्मण बहुसंख्य असतानाही ते चांगलं काम करत असल्याने पेरीयार यांचा काॅंग्रेसवर विश्वास होता. त्या दिवसांत एक ब्राह्मण वकील नियमितपणे इरोडला येऊन पेरीयार यांना भेटत. आणि लवकरच दोघे घट्ट मित्र बनले. त्यांचे नाव सी. राजगोपालाचारी होते. ते गांधींना भेटून आले होते.

"हा गांधी असा कसा? धोतर घालतो, थर्ड क्लासमध्ये फिरतो असं ऐकलंय? तुमच्या काँग्रेसच्या 'टी पार्टी'मध्ये हा बसणार का?

“मला त्याच्या डोळ्यात बदल करण्याची धमक दिसत होती. पण, तो काहीसी संदिग्ध वाटला. तो इंग्रजांचे गुणगान गात होता, समाजात बदल करण्याबद्दल बोलत होता.
"एकदम बरोबर बोलले ते. जोपर्यंत समाज बदलत नाही, तोपर्यंत ब्रिटीश राहीले किंवा गेले, काय फरक पडतो? काँग्रेसलाच बघा ना.”

"काळजी करू नकोस. आता काँग्रेस ब्राह्मणांच्या 'टी-पार्टी' मधून जनआंदोलनात बदलेल, ज्यामध्ये प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे, प्रत्येक वर्गाचे लोक असतील. तुम्ही सुरुवात करा. आमच्यात सामील व्हा."

1917 मध्ये जेव्हा माॅंटागू भारतात आले आणि निवडणूक सुधारणांची चर्चा सुरू झाली, तेव्हा मद्रास प्रेसिडेन्सीचे काँग्रेसजन व्हाईसरॉयला भेटायला गेले. त्यांनी रामास्वामींकडे बोट दाखवून सांगीतले की आमच्याकडेही ब्राह्मणेतर समाजाचे लोक आहेत, आणि इतरही अनेकजण आम्हाला सामील होत आहेत. तर जस्टिस पार्टी (दक्षिण भारत लिबरेशन फेडरेशन) ने काँग्रेस हा फक्त ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा आरोप केलाय.

एकीकडे नव्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होत होती आणि काँग्रेस जनतेत विस्तार करत होती तेव्हाच दुसरीकडे जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये झाले. रामास्वामी हे काहीसे गरम रक्ताचे होते, त्यांनी इरोड महापालिकेचे अध्यक्षपद तर सोडलेच, पण इतर २९ पदेही सोडली. खादी-धोतर घालून ते असहकार चळवळीत सहभागी झाले. त्यावेळी त्यांच्या पत्नीनेही तिच्या सर्व रेशमी साड्या एका नाटक मंडळाला दिल्या आणि त्याही सुती कपड्यात आल्या.

महापालिकेचे अध्यक्ष असलेले रामास्वामी जेव्हा खादीचे कपडे पिशवीत घेऊन लोकांचे दरवाजे ठोठावून विकू लागले तेव्हा ते विकले जाणारच होते. राजगोपालाचारी यांनी त्यांना खादी प्रचाराचे नेतृत्व दिले. त्या वेळी गांधी दारूबंदी, मद्रासमधील ताडी केंद्रे बंद करण्याचे आवाहन करत होते. रामास्वामी यांच्याकडे स्वतःचा संपूर्ण बगीचा होता जिथून ताडी काढली जात होती. त्यांनी ती सर्व झाडे एका झटक्यात तोडून टाकली.

मात्र, निवडणुका झाल्या. काँग्रेसने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि त्यात भाग घेतला नाही. त्यामुळे जस्टिस पार्टीने आरामात विजय मिळवला. खादीत फिरणाऱ्या रामास्वामींनी त्यांना देशद्रोही म्हटले.

एवढा निष्ठावान काँग्रेसी काँग्रेसचा कट्टर शत्रू कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला त्रावणकोर राज्यातील एक गाव- वायकोम या गावात जावे लागेल.

काँग्रेसची बीजे मद्रासमध्येच रोवली गेली असे आपण वाचले असले तरी सामान्य मद्रासी काँग्रेसमध्ये औषधालाही नव्हते. भारतात आल्यानंतर गांधींनी तामिळ प्रदेश जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जे काही मिळेल, त्यात भर घालत गेले.

चिदंबरम पिल्लई त्यांच्या आठवणींमध्ये लिहितात की, गांधी जेव्हा रेल्वेने मद्रासला पोहोचले तेव्हा त्यांनी गांधींना एक पत्र लिहिले, “तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला स्टेशनवर भेटायचे होते. मी गर्दीच्या मागे उभा होतो. मला एकदा भेटून बोलायचे आहे.”

गांधींनी लगेच लिहिले, "शुक्रवारी सहा वाजता भेटू."

पिल्लई यांनी उत्तर दिले, "माझी ट्राम साडेपाच वाजता निघते, साडेसातच्या आधी पोहोचू शकत नाही".

गांधींनी लिहिले, "मी वाट पाहीन"

1918 मध्ये गांधींनी मद्रासमध्ये हिंदी प्रचारिणी सभा सुरू केली आणि तेथे त्यांचा मुलगा रामदास गांधी यांना हिंदीच्या प्रचारात गुंतवले. हळुहळु का होईना हिंदी ही संपर्कभाषा म्हणून इंग्रजीची जागा घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उत्तरेत विदेशी कपड्यांवर बहिष्कार चालू होते, राष्ट्रवादी वातावरण होते, खादी-चरखे चालत होते, पण हे सगळं दक्षिणेत फार कमी पोहोचत होतं, हे गांधींना माहीत होते.

मदुराईच्या भेटीदरम्यान त्यांनी एका तामिळ प्रवाशाला विचारले की, "तुम्ही खादी का घालत नाही?"

ते म्हणाले, “खादी कुर्ते खूप महाग आहेत”

गांधींनी ठरवले की ते कुर्ता सोडून फक्त धोतर घालतील. 1921 मध्ये मदुराईमध्ये, त्यांनी त्यांचा नवा अवतार धारण केला. सी. राजगोपालाचारी हे गांधींचे अविभाज्य मित्र राहिले, ज्यांच्याशी त्यांनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात सल्लामसलत केली. त्यांच्या घरीच असहकार आंदोलनाची योजना बनवण्यात आली होती. त्यांचा मुलगा देवदास गांधी यांचा विवाह राजाजींच्या मुलीशी झाला होता.

गांधींनी दक्षिणेचे प्रतिनिधी म्हणून राजाजींऐवजी पेरियार यांची निवड केली असती तर इतिहास वेगळा असता का?

पेरियार एकनिष्ठ गांधीवादी झाले होते, सहकुटुंब खादीत फिरत होते, असहकार आंदोलनासाठी तुरुंगात गेले. ते दक्षिण भारतातील पहिले प्रमुख गांधीवादी सत्याग्रहाचे प्रणेते होते आणि त्यांना दोनदा तुरुंगवास भोगावा लागला होता. पण, तो सत्याग्रह पेरियारांचा पहीला नी शेवटचा ठरला. त्यानंतर गांधींच्या अथक प्रयत्नानंतरही तमिळ प्रदेशाला हिंदी पट्ट्याशी जोडण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. हे का घडले?

इतिहासाच्या या महत्त्वाच्या 'टर्निंग पॉइंट'वर चर्चा होणे आवश्यक आहे. त्याचे केंद्र केरळमधील वायकोम येथे असलेले शिवालय होते.

पेरियार यांच्या संकलित भाषणापासूनच सुरूवात करतो,

"मित्रांनो! मी वाराणसीला गेलो. तिथल्या मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला जाताना जात विचारली जात नाही. पण केरळमध्ये एक शिवमंदिर आहे, तिथे वेगळा कायदा आहे. मंदिराभोवती एक रस्ता आहे, ज्यावर सवर्ण हिंदू चालू शकतात, मुस्लिम चालतात, ख्रिश्चन चालतात, कुत्रे, मांजर आणि उंदीर चालू शकतात. पण, आपल्यातील एका मोठ्या वर्गाला हिंदूंना चालण्यास मनाई आहे. तो वर्ग प्राण्यांपेक्षा कनिष्ठ आहे का?

महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरुद्ध सत्याग्रह केला. हा सत्याग्रह आपल्या देशात शक्य नाही का? हा भेद आपल्या समाजाला दूर करता येत नाही का?

1924 मध्ये एक दुपारची वेळ होती. नारायण गुरु त्या रस्त्यावरून जात होते. मंदिराच्या आजूबाजूच्या कोणत्याही रस्त्यावरून केवळ मुख्य दरवाजाच नाही तर ईतरही बाजूंनी त्यांच्या एझवा जातीतील लोकांना जायला मनाई आहे हा नियम त्यांना माहीत नव्हता. त्यांना थांबवण्यात आले आणि त्यांना परतावे लागले. नारायण गुरू असे संत होते, ज्यांच्याबद्दल रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की जगात त्यांच्याइतका ज्ञानी संत भेटणे कठीण आहे (पहा - 'रिनैशां' पुस्तक). ते फक्त संस्कृतमध्येच संवाद साधायचे आणि शिवाचे उपासक होते. केवळ जातीच्या आधारावर त्यांना काही मूर्खांनी मार्ग बदलण्यास भाग पाडले.

ही बाब त्यांच्या शिष्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी काँग्रेसकडे अर्ज केला आणि सत्याग्रहाचा प्रस्ताव ठेवला. मंदिरात प्रवेश नसला तरी चालेल पण रस्ते खुले करावेत, अशी त्यांची मागणी होती. गांधींनी असहकार चळवळीनंतर सत्याग्रह संपुष्टात आणले होते, त्यामुळे त्यांनी त्यात फारसा रस दाखवला नाही. गांधींसाठी हे सवर्ण-अस्पृश्य प्रकरण असे मोहोळ होते, जे छेडण्यापुर्वी ते खूप विचार करायचे. आंबेडकरांना रस होता हे करण्यात, पण ते त्यावेळी खुप लहान होते आणि लंडनमध्ये अर्थशास्त्राची पदवी घेत होते.
मोठे नेते मिळत नव्हते तेव्हा जवळपासचा स्थानिक नेता शोधला जाऊ लागला. समोर शतकानुशतकांची परंपरा, त्रावणकोरचे महाराज, धर्म, उच्चवर्णीयांची लॉबी असे सर्व असताना कोणता काॅंग्रेसी आपले हात पोळून घेणार होता? कोणी बळीचा बकरा मिळतोय का हे शोधलं जाऊ लागलं. असा बकरा जो पहिला चेंडू खेळून आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये जाईल. त्यावेळी मद्रास राज्यातील रामस्वामी नायकर “पेरीयार” त्रावणकोरच्या एझवा नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी मैदानावर आले आणि त्यानी पीचवर पाय रोवले. आणी असे रोवले की शेवटच्या षटकात खेळ संपवण्यासाठी गांधींनाच मैदानात ऊतरून वायकमला यावे लागले.

गांधींशिवाय सुरू केलेला हा सत्याग्रह होता, पण मॉडेल एकच होते. 'गांधी' चित्रपटातील सत्याग्रहींनी पास जाळल्याचे दृश्य केरळमध्ये चित्रित केले असते तर ते असे काहीसे दिसले असते.

२८ फेब्रुवारी १९२४ रोजी केरळ काँग्रेसचे काही नेते वायकोमला पोहोचले. तेथे त्यांनी प्रशासनाला विनंती केली की, मंदिराभोवती असलेले असे फलक काढून टाकावेत, जे कोणत्याही जातीला चालण्यास मनाई करतात. परवानगी नाकारल्यावर त्यांनी मंदिराच्या पश्चिम दरवाजापासून काही अंतरावर मंडप टाकून सत्याग्रह आश्रम बांधला. आश्रमाच्या अगदी समोरच्या रस्त्यावर एक बोर्ड होता.

“हा मार्ग एझाव आणि खालच्या जातींसाठी प्रतिबंधीत आहे”

30 मार्चच्या सकाळी, एक पुलाया, एक एझावा आणि एक नायर जातीचे तरुण उभे राहिले आणि मंदिराच्या तीन मार्गाकडे निघाले. ते तिघेही खादी आणि गांधी टोप्या घालून 'महात्मा गांधी की जय' म्हणत पुढे जात होते. मंदीराच्या काही अंतरावर पोलिसांनी त्यांना त्यांचा जात विचारली. त्यांच्या जातीमुळे त्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली. त्यांनी पुढे जाऊन आपली अटक करवून घेतली. हा क्रम आलटून पालटून चालूच राहिला.
त्रावणकोरचे महाराज हे परंपरावादी होते आणि ते मंदिराचे नियम मोडण्याच्या बाजूने नव्हते. त्यांनी आपले दूत गांधींकडे पाठवले आणी कळवले की हे मंदिर खाजगी मालमत्ता आहे, त्यामुळे त्यावर असे नियम बनवता येतील.

गांधींनी सुचवले, “उच्च जातीने स्वतः ह्याविरोधात सत्याग्रह करावा. त्यांनी या नीच जातींच्या समर्थनार्थ वायकोम ते त्रिवेंद्रम अशी पदयात्रा काढावी. याला लढ्याचे स्वरूप देऊ नका, हिंदूंनी स्वतःचे प्रश्न स्वत: सोडवले पाहिजेत.

त्या वेळी राजाजींनी मदुराई येथील पेरियार यांना पत्र पाठवले की त्यांनी वायकोम येथे जाऊन गांधींचे शब्द लोकांपर्यंत पोहोचवावेत. पेरियार तमिळ आणि मल्याळम अशा दोन्ही भाषा चांगल्या बोलू शकत होते. स्थानीक भाषेतून संवाद साधला असता तर जनतेला ते आवडले असते.

पेरियार ताबडतोब पत्नीसह वायकोमला पोहोचले. पेरियार यांनी गावोगावी भाषणे सुरू केली, तर त्यांच्या पत्नीने महिलांची टीम तयार करण्यास सुरुवात केली.

पेरियार एका गावात म्हणाले, “या गावातील ख्रिश्चन आणि मुस्लिम अरबस्तानातून आले आहेत का? की जेरूसलेमहून आले आहेत? ते कोण आहेत ते शोधून काढा. या सर्वांचा जन्म या जमीनीवर झालाय. ते सर्व हिंदू होते. मग ते ख्रिश्चन का झाले? ख्रिश्चन बनूनही या रस्त्यावरून चालता येईल असे त्यांना वाटले असेल. परंतु अस्पृश्य धर्म बदलूनही अस्पृश्यच राहिले.

सवर्णांसाठी जर अवर्ण अस्पृश्य असेल तर इंग्रजांसाठी उच्चवर्णीयही अस्पृश्य आहेत हे लक्षात ठेवा. जर तुम्ही त्यांच्याविरुद्ध लढत आहात तर स्वकीयांशीही लढा.”

उच्चवर्णीयांचा एक गट प्रेरित होऊन पदयात्रेला निघाला, पण तिथले नंबूदिरी पुजारी आजिबात मागे हटले नाहीत. त्यांच्यासाठी मंदिराच्या आवारात अस्पृश्यांचा प्रवेश हे असे पाप होते, ज्याने संपूर्ण समाज संकटात सापडला असता. त्रावणकोरच्या राजाने पेरियार यांच्या निवारणासाठी जुलै महिन्यात ‘शत्रू नरसंहार यज्ञ’ आयोजित केला होता. या यज्ञानंतर पेरियार मरण पावले नाहीत, परंतु पुढच्याच महिन्यात, राजा मूलम तिरुनाल यांचे स्वतःचे निधन झाले. या मृत्यूला पेरियार यांची काळी छाया जबाबदार धरण्यात आली.

पेरियार त्यावेळी तुरुंगात होते. त्यांना सोडण्यात आले आणि मद्रासला जाण्यास सांगितले. काही दिवसांनी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. पेरियार यांच्या लक्षात यायला लागले की काँग्रेसचे उच्चवर्णीय काहीतरी 'डबल गेम' खेळत आहेत. गांधीही उघडपणे काही बोलत नव्हते. उलट, एका संवादानंतर त्यांनी लिहून टाकले की नारायण गुरू लोकांना जबरदस्तीने मंदिरात प्रवेश करण्यास प्रवृत्त करत आहेत.

एका तामिळ मित्राने पेरियार यांना सूनावले, “तुम्ही सगळे काँग्रेसवाले मगरीचे अश्रू काढत आहात. तुमच्या काँग्रेसने तुमच्या राज्यात आपल्या सर्वांच्या देणगीतून गुरुकुल उघडले आहे. तिथे कधीतरी जाऊन बघा. तिथे ब्राह्मण विद्यार्थ्यांना इतर जातीच्या मुलांसोबत बसून जेवायला मनाई आहे. मुलाने लहानपणापासून हे पाहिले तर तो पुढे काय करेल?”
हे ऐकून पेरियार यांना धक्का बसला. हे गुरुकुल राजाजींच्या मित्राचे होते, ज्याची स्थापना गांधीवादी आदर्शांवर करायची होती. पेरियार यांनी स्वतः ब्राह्मणेतरांकडून देणग्या मिळवून दिल्या होत्या. त्या शाळेतही अस्पृश्यता होत असल्याचे त्यांना माहीत नव्हते.

हीच त्यांच्या काँग्रेसबद्दलच्या मोहभंगाची सुरुवात होती. गांधींबद्दलचा भ्रमनिरास होण्यास काही महिने उरले होते.
(क्रमशः)
मूळ लेखक- प्रविण झा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ही लेखमाला हळू हळू आवडू लागली आहे. दक्षिण भारतातल्या स्वातंत्र्य आणि सामाजिक चळवळींचे तपशील माहीत नव्हते. त्या
दृष्टीने वाचनच घडले नव्हते. स्थूल मानाने वायकोम प्रकरण ठाउक होते.
विषयाच्या तुलनात्मक नावीन्यामुळेही लेख आवडत आहेत.

धन्यवाद हीरा. खरं तर चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने (लोकांना आवडत नाहीये ह्या समजातून) मी बंद करायचा विचार करतोय. लोकाना वाटतंय की मी गुगल ट्रान्सलेट वापरून भाषांतर करतोय पण शब्दन शब्द तपासून मला भाषांतर करावं लागतंय. तीन चार तास सहज जातात एक मोठा लेख भाषांतरीत करायला.

मला प्रश्न पडलाय.
लोकांना तमिळनाडूत इंटरेस्ट नाही का?? तो भारताचा भाग नाही का? की फक्त हिंदीभाषीक गोबरपट्ट्यालाच देशबांधव आपला मानतात?

बंद करू नका.

ही लेखमाला हळू हळू आवडू लागली आहे. दक्षिण भारतातल्या स्वातंत्र्य आणि सामाजिक चळवळींचे तपशील माहीत नव्हते.>> +१११

काही गोष्ट क्लिअर होत आहेत.लेखमाला चालू ठेवा.
भारतातील राजकीय पक्षांनी समाजात उपजत च असलेल्या भेदभाव ना खत पाणी खालून स्वतःची पोळी भाजून घेतली हे मात्र सत्य आहे.
काँग्रेस असू किंवा आणि कोणी सर्वांनी तेच केले.
दलित नेते पण काही वेगळे चांगले काम करत नाहीत.
मळलेल्या वाटेवरून च त्यांची वाटचाल चालू आहे.
मुळात च भारतीय समाज चिकिस्तक नाही.
स्व बुध्दी चा नाही.
त्याला कोणी ही उल्लू बनवू शकतो.
आणि राजकीय पक्ष,विचारवंत रोज त्यांना मूर्ख बनवत असतात

तमिळनाडूचा इतिहास म्हणुन सहज डोकावले.. नवीन माहीती आहे त्यामुळे वाचायला आवडेल. मालिका बंद करु नये. इतरही भाग वाचून काढेन आता

प्रतिसाद देत नसलो तरीही आवर्जून वाचत आहे. लेख-मालिका छान चालू आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे. लेखमाला चालुच ठेवावी.
Negative प्रतिसाद इग्नोर करा.

चांगल्या धाग्यावर वा, छान याव्यतिरिक्त अजुन काही प्रतिक्रिया देणे शक्य नसते न त्यामुळे लेख वाचला तरी प्रतिक्रिया मिळत नाहीत.

लेखमाला चांगली आहे. सुरवातीला खुप तुटक होती.

भारतातील चार राज्यांविषयी माहिती तशीही कमीच आहे. त्यामुळे तिथल्या स्वातन्त्र्ययोद्ध्यांबद्दलही कमी माहिती आहे.

चांगली माहिती , ह्या विषय बद्दल फार काहीच वाचण्यात आले नव्हते केवळ दक्षिणे कडची काही राजकीय बातमी असली कि फक्त उल्लेख यायचा त्यांचा.

उत्तर आणि दक्षिण भारताची संस्कृती खूप वेगळी आहे.
लोकांची विचार करण्याची पद्धत,वागणूक पण खूप वेगळी आहे.
फक्त भारत ह्या देशात हे दोन्ही भाग येतात ह्या पलीकडे काही संबंध नाही.
पेरियार उत्तर भारत किंवा अगदी महाराष्ट्र मध्ये लोकांना माहीत नाहीत.
पेरियार ह्यांचा हेतू पण भारत देशात सामाजिक बदल घडवून आणावा हा नक्कीच नव्हता.
फक्त तामिळनाडू मध्येच त्यांना सामाजिक बदल करायचा असावा.

प्रतिसाद नसल्याने मी लेखमाला बंद करायचा विचार करतोय.
इतर राज्यांची तरी कुणाला किती माहिती आहे?
तंजोरच्या (एकोजी,व्यंकोजी) भोसल्यांबद्दल किती माहिती आहे?
'हे वाचून मला उपयोग काय' याच्या पलिकडे जाणे बऱ्याच जणांना परवडत नाही.

असे काही नाही. छोटी छोटी वर्तुळे तोडत मग मोठ्या अवकाशाला गवसणी घालतात महामानव. आपण महात्मा फुले, महर्षी कर्वे अगदी शाहू छत्रपती ह्यांचा विचार केला तर त्यांचेही कार्यक्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्र हेच राहिले आहे. मात्र त्यांचे विचार फार व्यापक होते.

बंद करा लेख माला .
इंटरेस्ट कमी लोकांना आहे
दक्षिण भारतीय राज्य ही नेहमीच आघाडीवर होती आहेत.
त्यांची तुलना उत्तर भारताशी,?
आपण जेव्हा कोणत्या ही प्रदेशाचा इतिहास बघतो.तेव्हा त्याचा संबंध त्या काळाशी नसतो.
भविष्यात येणाऱ्या गंभीर संकट शी असतो.
तमिळ nadu च इतिहास चा संबंध पण आता दक्षिण भारताला जाणवणाऱ्या समस्या शी आहे .
विचारवंत हे नेहमीच भविष्याचा विचार करतात.
आणि पेरियार हे विचारवंत च होते
कोणत्याही महान नेत्याच्या विचाराचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते विचार त्या काळाशी जोडायचे नसतात .पुढील 100, वर्षात काय स्थिती येईल त्याच्या शी जोडायचे असतात.
लेखक ते करत नाही.
म्हणून लेख कंटाळवाणा वाटत आहे
.

लेखमाला चालू ठेवा. नकारात्मक कमेंट्स कडे लक्ष देऊ नका. राजकीय, सामाजिक लेखमालांना वाचकप्रतिसादक कमीच असतात. - जोपर्यंत त्यात काही विवादास्पद लिहिले जात नाही - तोपर्यंत. कविता तर बिचारी तशीच पुढच्या पानावर जाते.
लिहीत राहा. हाताच्या बोटावर मावतील एव्हढेच प्रतिसाद आले तरी लिहीत राहा. निदान हा लेख तरी कंटाळवाणा झालेला नाही.

मला एवढंच विचारायचं/ म्हणायचं आहे की तुम्ही भारतात कामानिमित्त फिरता तेव्हा तमिळनाडूत काय जाणवले तेही टिपण देत चला.

म्हणून लेख कंटाळवाणा वाटत आहे<< वाचण्याचा आग्रह नाही
विचारवंत हे नेहमीच भविष्याचा विचार करतात.<< विचार केला तेव्हा परिस्थिती काय होती हा या लेखाचा उद्देश असणार
पुढील 100, वर्षात काय स्थिती येईल त्याच्या शी जोडायचे असतात.>>तुमचे स्वागत आहे, या विषयावर लेखन करू शकता नविन धागा काढुन.

तमिळनाडूत काय जाणवले तेही टिपण देत चला.<<<++१

मतभेद असतात तेव्हा विरोध होतों अन्याय होतो तेव्हा विरोध होतो.
आर्य ,द्रविड हे भावनिक पॉइंट आहेत लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून.
पण वेगळी संस्कृती,वेगळी विचार सरणी,वेगळी आर्थिक स्थिती,वेगळी नीतिमत्ता ह्या मुळे मतभेद असतात.
पॉइंट बदलेले असेल पण मतभेद आणि विरोध आज पण आहे.
कारखाने ह्यांचं राज्यात नोकरी करणारे ते.
सर्वात जास्त टॅक्स ह्यांनी द्यायचा हिस्सा सर्वात जास्त त्यांना.
मिडी ड्रेस स्त्री नी परिधान करणे काही विशेष
नाही
तिथे डोळे फिरतात.
स्थिती आहे तशीच आहे .
उत्तर आणि दक्षिण ह्या मधील अंतर कमी आज पण नाही आणि पुढे पण होणे अशक्य च वाटत आहे

प्रतिसाद देत नसलो तरीही आवर्जून वाचत आहे. लेख-मालिका छान चालू आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे. लेखमाला चालुच ठेवावी.
Negative प्रतिसाद इग्नोर करा.>>>>++++१११