मर्मबंधातील एखादे नाते - भरत.

Submitted by भरत. on 12 September, 2022 - 05:07

गझलनवाज जगजीत सिंग गेल्यावर त्यां चं एक चित्रपट गीत वारंवार कानावर पडली.
चिठ्ठी न कोई संदेस
जाने वो कौनसा देस
जहाँ तुम चले गए
ते गेल्यानंतरच्या त्यांच्या चाहत्यांच्या भावना त्यांच्याच सुरातून पाझरत होत्या. नंतर कधीतरी हे गाणं ऐकताना माझ्याही भावनांचा बांध काचेचं एखादं भांडं हातातच फुटावं तसा फुटला. असेच निरोप न घेता दूर निघून गेलेल्या माझ्या शाळेतल्या दोन वर्गमित्रांची आठवण अचानक घेरून आली.
शाळेतली बहुतेक मुलं शाळा होती त्याच कॉलनीतली. उरलेली बरीच त्याच भागात राहणारी .माझ्यासारखे थोडे दुरून बसने येणारे. कॉलनीत राहणारी बहुतेक मधल्या सुटीत घरी जात. तो मात्र त्याच कॉलनीत राहत असूनही घरी जात नसे. त्यामुळे मधल्या सुटीतला वेळ एकत्र घालवत असू. आमचं एक त्रिकुट होतं इथे तिथे फिरत असू. . कधी कॉलनीच्या जवळच असलेल्या गणपतीच्या देवळाकडे जाऊन येत असू. सातवीत त्रिकुटातला एक मुलगा दुसर्‍या तुकडीत गेला. दहावीत पोचेपर्यंत मैत्री घट्ट झाली. त्याच्या घरी जाणंही होत असे. आमच्या वेळी प्रोजेक्ट्सचं फार प्रस्थ नव्हतं. पण जे होते ते एकत्रच करत असू. त्याच्या आईशीही चांगली ओळख झाली. शालान्त परीक्षेनंतरच्या सुटीत मी एकदा त्याला भेटायला गेलो तर तो म्हणाला की मला तुझी खूप आठवण येत होती पण घरी यायचं तर तुझा पत्ता माहीत नव्हता. मग तुला पत्र पाठवून तुझा पत्ता विचारावा असंही वाटलं. त्याची मोठी बहीणही आमच्या बॅचला दुसर्‍या तुकडीत होती. शाळेत मार्कांसाठीची आणि नंबरासाठीची चुरस मुलगे वि मुली अशी असे. तीही अटीतटीची त्यामुळे एकमेकांच्या गुणा-नंबराबद्दल आम्हांला सारखंच बरंवाईट वाटे. दहावीनंतर तो रुपारेलला गेला. नव्या जगात जुनी मैत्री जरा मागे ढकलली गेली. तेव्हा सगळ्यांच्या घरी फोन नसत त्यामुळे तोही संपर्क नव्हता. पुढे कधीतरी तो आय आय टी कानपूरला गेल्याचं आणि मेटॅलर्जी शिकत असल्याचं कळलं. मग काही वर्षांनी स्टेशनला संध्याकाळी भेटला तर एम एन दस्तूर मध्ये आहे असं म्हणाला. बस ! तीच शेवटची ओझरती भेट.

पुढे काही वर्षे मी मुंबईबाहेर होतो . शाळेतल्या कोणाशीच तेव्हा आणि त्यानंतर संपर्क राहिला नाही. माझी मामी शाळा असलेल्या कॉलनीतच राहत असे आणि मामेबहीणही आमच्याच बॅचला. त्यामुळे तिला कॉलनीत राहणार्‍या मुलांबद्दल माहिती असे. तो आता या जगात नाही, हे तिच्याकडून कळलं.
मग थ्रीजी , स्मार्ट फोन आणि व्हॉट्स अ‍ॅप आल्यावर शाळेच्या बॅचचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनला . तेव्हा असंच आणखी एका मुलाबद्दल कळलं. शाळा सुटल्यावर घरी आम्ही एकाच रस्त्याने एकत्र येत असू. काल सकाळी ऑफिसला जाताना भेटलो आणि आज तो हार्ट अ‍ॅटॅकने गेल्याची बातमी आली, असं जाणं. तो खूप तणावाखाली असे असं त्याच्या जवळपास राहणार्‍या एकाने सांगितलं.
मग रियुनियनची टुम निघाली. . आपल्या बॅचचे आणखी कोण कोण आहेत हे आठवून आठवून त्यांचे संपर्क शोधून ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं जात होतं. तेव्हा अपरिहार्यपणे या दोघांचीही आठवण निघाली. पण तो अचानक कसा गेला हे कोणाला माहीत नव्हतं किंवा त्याबद्दल कोणी बोलत नव्हतं. बरीच मुलं अजूनही त्याच कॉलनीत राहत होती किंवा त्यांचे आईवडील तरी तिथे होते.
रियुनियन झालं -शाळेतच. . २५ एप्रिल २०१५ . याच दिवशी नेपाळमध्ये भयंकर भूकंप झाला होता त्यामुळे ती तारीख लक्षात राहते. दोघे परदेशस्थ बॅचमेट्स भारतात आल्यावर त्यांच्यासाठी म्हणून आणखी एक मिनि रियुनियन झालं. तोवर आणखीही काही जणांची ग्रुपवर भर पडली होती.
मग कधीतरी त्या पहिल्या मित्राची बहीण ग्रुपमध्ये आली. तिला रियुनियनचं कळल्यावर साहजिकच पहिला प्रश्न "मला का नाही कळवलं?" असा होता. ती मुंबईत नसली तरी तिचे आईवडील अजूनही त्याच कॉलनीत होते. दोन बॅचमेट्स अगदी त्यांच्याच मजल्यावर सख्खे शेजारी. तरीही तिला कळवावं, बोलवावं हे कोणालाही सुचलं नव्हतं. मग तिनेच कधीतरी भावा बद्दल सांगितलं. त्याला शिझोफ्रेनिया होता.

ती मुंबईत आल्यावर तिने इतरांना भेटायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आमच्या मधल्या सुटी त्रिकुटातले आम्ही दोघे तिला त्याच गणपतीच्या देवळात भेटायला गेलो.

चिठ्ठी न कोई संदेस गाणं वाजताना त्या दिवशी अचानक या दोघांची तीव्रतेने आठवण आली. मी इथे असतो, तर त्यांच्यासाठी काही करू शकलो असतो का? असं उगाच वाटून गेलं.
एक आह भरी होगी
हमने ना सुनी होगी
जाते जाते तुमने
आवाज तो दी होगी
हर वक्त यही है गम
उस वक्त कहाँ थे हम
कहाँ तुम चले गए
या ओळींचा अर्थ फेर धरून नाचू लागला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

भारतात शाळा कॉलेजेस नातलग कलीग्जच्या अशा सगळ्याच व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवर आता राजकारणाच्या चर्चांमुळे वातावरण तापण्याचे प्रकार सार्वत्रिक व्हायला लागले. भावाला अँटिनॅशनल म्हणताना काही वाटेनासं झालं. आमच्या शाळेच्या ग्रुपवरही हेच झालं. शाळेत मी कायम पहिल्या बाकावर बसत असे आणि माध्यमिक शाळेतल्या सहा वर्षांत माझे दोनच बेंचमेट्स होते आणि त्यामुळे अर्थातच जवळचे मित्र म्हणावेत असे होते. गंमत म्हणजे माझ्या वेगळ्या सोशो पोलिटिकल मतांमुळे या दोघांनी चक्क माझं नाव टाकलं आणि माझ्याशी अबोला धरला! माझीही नॉस्टॅल्जियाची हौस फिटली होती. खर तर रियुनियन झाल्याने ग्रुपचा एक मोठा उद्देश पूर्ण झाला. आणखी काही उद्दिष्ट राहिलं नव्हतं, त्यामुळे एका राजकीय रणधुमाळीनंतर मी ग्रुपला टाटा बाय बाय केलं.
मोजक्याच जणांशी संपर्क ठेवला. तोही वाढदिवसाच्या, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ख्यालीखुशाली विचारण्यापुरता. एकाला त्याच्या वाढदिवशी दर वर्षी फोन करीत असे. गेल्या वर्षी त्याला फोन न करता मेसेज केला तर तो बघताच क्षणी त्याचा फोन आला. हे काही रेशीमबंध अजूनही उसवले गेले नाहीत.
----------------
आपलं मन मोकळं करायला , गोंधळ दूर करायला इतर कोणाशी बोलायची गरज मला पडत नाही. तशी वेळ येते. पण ते सगळं स्वतःशीच सॉर्ट आउट करायची सवय आहे. पण एकदा कोणाशीतरी मनातलं टोचणारं , डागणारं काही बोलायची खूप गरज वाटली. तेव्हा कॉलेजातल्या सगळ्यात जवळच्या मित्राची आठवण झाली. अकरावी ला अ‍ॅडमिशनच्या वेळी फी भरताना आमचे नंबर एकापुढे एक होते. तसंच एकाच उपनगारात राहणं. वाचन साहित्य यांची सारखीच आवड. पुढे त्याच्याशीही संपर्क सुटलाच होता. लिन्क्ड इन वरून कधीतरी त्याला शोधलं होतं आणि अधूनमधून बोलणं होत असे.
तर त्याला मेसेज करून हे बोलत असताना मला अचानक तो मित्राच्या ऐवजी समुपदेशकासारखा बोलतोय असं वाटू लागलं आणि माझं बोलणं खुंटलं. त्यानेही पुढे काही विचारलं नाही. पुढे त्याच्याशी स्वतःहून बोलावंसं वाटेना. मला वाटतं वर्ष- दीड वर्षं संपर्काशिवाय गेलं असावं. मग असाच काही प्रसंग आला आणि त्याने मला फोन केला. आणि मध्ये काही झालंच नसावं तसं आमचं बोलणं चालत राहिलं. तरीही 'त्या' मुद्द्याबद्दल आम्ही कधीच बोलत नाही. पण एकमेकांबद्दलची आस्था, काळजी कायम आहे, याची पोच मिळत असते.

मायबोली गणेशोत्सवानिमित्त शाळाकॉलेजातल्या या मैत्रीच्या धाग्यांच्या आठवणी मांडता आल्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
आजच्या सोशल मिडीया माध्यमातून फोफावलेल्या राजकारणाने कित्येक जुन्या मैत्रीची वाट लावली आहे.. किंवा मैत्रीची परीक्षा घेतली आहे असेही बोलू शकतो. पण दलदल आहे ही.. नकळत मित्र फसत जातात यात Sad

छान लिहिलेय!
किंवा मैत्रीची परीक्षा घेतली आहे असेही बोलू शकतो. पण दलदल आहे ही.. नकळत मित्र फसत जातात यात Sad >> +११

छान लिहिलंय भरत. गूढ तरी मनातलं.
उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए ह्या ओळी आणि हे सगळंच गाणं सकाळी वाचल्यापासून डोक्यात घोळतय.

खूप सुंदर लिहिलंय.

>>>
जाते जाते तुमने आवाज तो दी होगी
हर वक्त यही है गम उस वक्त कहाँ थे हम
<<<

Sad

बाकी ऋणानुबंध कोणत्याही कारणाने तुटणं दुर्दैवी खरंच, पण काही भ्रमनिरासदेखील इतके दारुण असतात की ते झाल्यावर सहजगत्या फर्गिव्ह अ‍ॅन्ड फर्गेट नाही करता येत हेही खरं.
तत्त्वं आणि नातेसंबंध यात निवड करायची वेळ येऊ नये, पण येते. तोडावं तर आपण स्वतःला एको चेम्बरमध्ये कैद करत चाललो आहोत की काय अशी भीतीही वाटते. असो.

आवडला लेख...मनापासून आणि तरल लिहिलं आहे.
आयआयटी शिक्षण आणि नंतर स्किझोफ्रेनिया हे वाचून ब्युटीफुल माईंड आठवला.