कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 September, 2022 - 21:50

IMG_20220911_041355.jpg

तरी निव्वळ रोमान्स म्हणजेच मोरपिशी दिवस असतील तर आमचे लांडोरपिशी गोड मानून घ्या Happy

----------------------------------

कॉलेजचे ते मोरपिशी दिवस !!

हा विषय वाचल्यापासून मनात एकच विचार. आजवर ईतके यावर लिहीले आहे. आता आणखी काय लिहीणार...

कॉलेज जीवनातले कैक छोटेमोठे किस्से मीठमसाला लावून आणि तुमचा अभिषेक हा आजही कॉलेजवयीनच वाटावा म्हणून त्यावर ऋन्मेष ईमेजचा लिंबू पिळून सर्व्ह करत आलोय.

फसलेली प्रेमप्रकरणे, गंडलेले प्रपोज, चॉकलेट डे आणि रोज डे ला झालेले पोपट, अंगाशी आलेली भाईगिरी, स्टडी नाईट्सच्या नावावर शैक्षणिक वर्षाला बांबू लावणारी किडेगिरी, कॉपी करणे, डमी बसणे, तर जेव्हा आपली चूक नसेल तेव्हा शिक्षकांशीही घातलेले राडे, व्यसने, जुगार, चोर्‍यामार्‍या आणि पहिली सिगार, पहिली बीअर, ते कॅरम खेळत जिममध्येच पडीक राहणे, "विजेटीआयच्या सव्वाशे वर्षांच्या ईतिहासात हे घडले नव्हते" असे खुद्द प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये ऐकायला लागावे असे केलेले कांड.... सारेच काही कुठल्या ना कुठल्या आयडीने सांगून झालेय ईथे..

काय म्हणता? आम्ही सगळेच नाही वाचले. मग वाचा ना.. लेखाच्या शेवटी लिंका देतो मी त्या सर्व धाग्यांच्या.

कमॉन गाईज, गंमत केली. नाही देत लिंका Happy

पण मग आता काय लिहावे??
तर असे काही जे कदाचित मी आजवर स्वतःलाही सांगायचे टाळले असावे.
ते कुठल्या तरी चित्रपटात एक डायलॉग होता ना.. पिछे से झाडू घुसा डालूंगा, तो मोर बन जायेगा ..
कॉलेजचे दिवस म्हटले की अश्याच रुतलेल्या आठवणी पहिले आठवतात. बाकी मोरपिशी वगैरे नंतर..

तर सुरुवात तिथून करूया जो क्षण मी माझ्या कॉलेज आयुष्यातील एक माईलस्टोन समजतो. एक क्षण जो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि आपण म्हणतो, बस्स यार, अब ईस से बुरा क्या होगा. जो होगा सो देखा जायेगा..

----------------------------------

स्थळ - दक्षिण मुंबई !
वेळ - रात्री साडेदहाची !
चाळीतले एक मराठमोळे मध्यमवर्गीय कुटुंब एकत्र जेवायला बसले आहे. आई बाप आणि त्यांचा एकुलता एक मुलगा.

मुलगा बारावीला आहे. दुसर्‍या दिवशी त्याचा निकाल आहे. बारावी देखील साधीसुधी नाही. तर बारावीच्या पहिल्या वर्षी मनासारखा अभ्यास झाला नाही म्हणून एक वर्ष गॅप देऊन, दोन वर्षे अभ्यास करून, पुर्ण तयारीनिशी तो मैदानात उतरला आहे.

बर्र मुलगाही साधासुधा नाही. ईयत्ता चौथीची प्राथमिक आणि सातवीची माध्यमिक अश्या दोन्ही स्कॉलरशिप परीक्षांमध्ये मुंबई विभागातून मेरीटमध्ये येत वृत्तपत्रात फोटो वगैरे छापून आलेला, घराण्यातील, चाळीतील, आणि वडिलांच्या मते जगाच्या पंचक्रोशीतील हुश्शार पोरगा आहे.

तर जेवणाच्या ताटावर काय संभाषण चालू असावे बापलेकांमध्ये.... ??

"उद्या पीसीएम मध्ये ९० टक्यांपेक्षा जास्त मार्क्स येतील ना नक्की?"
"हो भाऊ" - मुलाने पुन्हा एकदा खात्री दिली.

म्हणजे काय! दोन वर्षांचा अभ्यास होता. वडिलांनाही खात्री होती. त्यामुळे हा प्रश्न केवळ औपचारीकता होती. खरे संभाषण तर त्यापुढे होते.

"हे बघ, नव्वद टक्के नाही आले तरी नाराज होऊ नकोस. ऐंशी टक्क्यांनाही ईंजिनीअरींगच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळते. फक्त चांगले कॉलेज मिळणार नाही ईतकेच. आणि नाही मिळाले चांगले कॉलेज तरी बिघडत नाही. पुढे अभ्यास करून आपण चांगली डिग्री मिळवू शकतो. ईंजिनीअर होऊ शकतो. त्यामुळे जे काही मार्क्स पडतील ते घेऊन सरळ घरी ये. आत्महत्येचा विचार करू नकोस. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस हे कायम लक्षात ठेव. आजकाल असे फार घडते म्हणून स्पष्टच बोलतोय.. काय ग्ग? तू पण बोल काहीतरी..." हे शेवटचे वाक्य आईसाठी होते. तिनेही आपला मुलगा असे काही करणार नाही म्हणत विश्वासाने मान डोलावली.

ईथे मुलाच्या हातातला घास हातात राहिला होता आणि तोंडातला गिळणे अवघड झाले होते. कानात एकच वाक्य अडकून राहिले होते. ऐंशी टक्क्यांनाही ईंजिनीअरींगच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळते. पण हे त्या तिघांंमध्ये फक्त त्यालाच माहीत होते की उद्या तो त्याच्याही निम्मे टक्के घेऊन येणार होता. आणि तसेच झाले. पीसीएम म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये तब्बल ४३ टक्के गुण घेऊन तो घरी आला.

त्या दिवशी सकाळी घरातून बाहेर पडताना माझी मन:स्थिती काय होती हे ईतक्या वर्षांनीही आज लख्ख आठवतेय. वडिलांनी तर माझ्या स्वागताला बँड बूक करायचे शिल्लक ठेवले होते. म्हणून मी रिझल्ट हातात पडल्यावर थेट घरी न जाता दिवसभर रानोमाळ भटकत होतो. संध्याकाळ होताच सिद्धीविनायक गाठले. तेव्हा देवावर फार विश्वास होता. त्यामुळे आधारही वाटला. पण मूळ हेतू हा होता की घरी उशीरात उशीरा जावे जेणेकरून फार काही चांगले मार्क्स आले नाहीत हे घरच्यांना न सांगता कळावे. पण त्यांच्या कमी मार्कांच्या अपेक्षाही मला मिळालेल्या गुणांच्या दुप्पट होत्या हे धडकी भरवणारे होते.

घरी आलो. किती टक्के आले हे स्वतःच्या तोंडाने कसे सांगणार म्हणून मग रिझल्ट आईच्या हातात ठेवला. नक्कीच तिला गरगरले असावे. तिने काही न बोलता ती मार्कशीट वडिलांच्या हातात ठेवली. ते चित्रपटात नाही का दाखवत, एखादे कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारे पत्र याच्या त्याच्या हातात फिरत राहते. आणि प्रत्येक कॅरेक्टर ते वाचताना त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव कॅमेरा क्लोजअपमध्ये टिपतो. अगदी तसेच झाले. फक्त आमच्या त्रिकोणी कुटुंबामध्ये दोघांमध्येच हा पत्रव्यवहार संपला आणि मी शरमेने मान खाली घातली असल्याने त्या क्षणी त्यांच्या चेहर्‍यावर आलेले भाव टिपू शकलो नाही. किंबहुना त्या संपुर्ण रात्री माझी मान शरमेने खालीच राहिली.

पण आता खरी लढाई सुरू झाली होती. एकीकडे नातेवाईकांचे फोनकॉल सुरू झाले होते. तर दुसरीकडे शेजारीपाजारी दारावर घिरट्या घालत होते. खिडकीतना डोकावत होते. वेंटीलेटरच्या झडपा वर करून किती मार्क्स पडले विचारायचे तेवढे शिल्लक होते. शेवटी चाळच ती. सर्वांची घरे एकमेकांशी केवळ एका भिंतीने जोडली गेलेली असतात. आणि चाळीच्या भिंतीना कानच नाही, तर कान, नाक, तोंड, डोळे, सारीच ईंद्रिये असतात. फक्त मिळालेली खबर दडवायला पोट तेवढे नसते. त्यामुळे ४३ चा आकडा फुटताच वणव्यासारखा पसरणार याची कल्पना होती.

म्हणून मग आमचे ठरले! ४३ चे ७५ करायचे! कोणी बारावीचे मार्क्स विचारले तरी ७५ टक्के सांगायचे. कोणी सुशिक्षित जाणकार व्यक्तीने पीसीएमचे विचारले तरी ७५ च सांगायचे. आणि तसेच केले. आजतागायत आमच्या चाळीतले लोकं आणि माझे सारे नातेवाईक मला बारावीला ७५ टक्के पडले असेच समजत आहेत.

त्या दिवशी वडिलांनी माझी लाज राखली की त्यांना लोकांना तोंड कसे द्यावे याची चिंता भेडसावत होती हे माहीत नाही. पण त्या दिवशी ते मला एका शब्दाने ओरडले नाहीत. जे झाले ते कसे झाले, वर्षभर मी काय केले, हे एका प्रश्नाने विचारले नाही. तर दुसर्‍या दिवशीपासूनच आता पुढे काय करायचे याच्या तयारीला लागले. मला आहे त्या टक्यांमध्ये कुठले बरे कॉलेज मिळेल हे स्वतः शोधू लागले. यातच त्यांना एका मित्राने कल्पना दिली की बारावीची जी वर्षे गेली ती गेली. आता पुन्हा दहावीच्या बेसवर डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घ्या. आणि मी विजेटीआय कॉलेजला सिविल डिप्लोमाला प्रवेश मिळवला.

पण खरेच मी काय केले त्या अकरावी बारावीच्या तीन वर्षात....
ना अभ्यास केला, ना वाया गेलो..
ना पोरी पटवल्या, ना व्यसने केली..
ना मोरपिसे जमवली, ना ती उडवली..

खरे तर मी दहावीलाच अभ्यासाचा बट्ट्याबोळ केला होता. त्यामुळे जेव्हा ईतर बहुतांश मित्र रुईया रुपारेलला गेले, तेव्हा मी खालसा कॉलेजच्या रांगेत उभा होतो. पण अचानक ट्विस्ट आला आणि दूरच्या नात्यातली एक बाई मला त्या रांगेतून ओढून किर्ती कॉलेजला घेऊन गेली. तिथे ती कामाला होती. त्यामुळे अ‍ॅडमिशनच्या फीजमध्ये कन्सेशन मिळवून देते म्हणाली. पोरगा माझ्या डोळ्यासमोरच राहील ताई, असे माझ्या आईला म्हणाली. आणि मी किर्तीवंत झालो.

कॉलेज ते ही वाईट नव्हते. आपला सचिन तेंडुलकर त्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी होता असे म्हणतात. पण प्रॉब्लेम असा होता की तेव्हा ना सचिन त्या कॉलेजला होता, ना माझे कोणतेही मित्र होते. म्हणून मग मी देखील माझे कॉलेज सोडून टाईमपास करायला जुन्या मित्रांच्या कॉलेजला जाऊ लागलो.

मी सकाळी घरून निघायचो ते किर्ती कॉलेजला जातोय म्हणून. पण तिथे न जाता मी दादरच्या गल्यांमध्ये वेड्यासारखा फिरत राहायचो. होय, पायीच. अक्षरशः वेड्यासारखा मी 'अकेले है तो क्या गम है' म्हणत दोन ते तीन तास चालायचो. ऊन असो वा पाऊस, वा कुठलाही ऋतुरंग, माझ्या या पदयात्रेत काही खंड पडला नाही. आज कोणी मला म्हणते की तू कितीही खाल्लेस तरी तुझ्या अंगाला लागतच नाही, म्हणून तुझी फिगर मेनटेन राहते. तर याचे रहस्य त्या दोन वर्षातील या पायपिटीत लपले आहे. आयुष्यभराच्या कॅलरीज मी तेव्हाच जाळल्या होत्या.

त्यानंतर दुपारी पार्कात, म्हणजे आपल्या शिवाजी पार्कात कुठेतरी कट्ट्यावर बसून डबा खायचो. तिथून मग खालसा कॉलेजला जायचो. दुपारी तिथून माझ्यासारखेच काही रिकामटेकडे मित्र पकडायचो आणि रिकामटेकड्यांची पुढची बॅच भरायला आम्ही रुईया कॉलेजला जायचो. तिथे कोणी भेटलेच तर ठिक, अन्यथा रुईया-पोद्दारच्या मुली तेवढ्या छान बघायला मिळायच्या. पण मी त्याही बघायचो नाही. कारण माझे मन तेव्हाही दहावीतल्या पहिल्या प्रेमातच अडकले होते. माझे ठरलेले. मला तिच्याशीच लग्न करायचे होते. फक्त प्रॉब्लेम ईतकाच होता की तिला हे माहीत नव्हते. आज ती कुठेतरी परदेशात आपल्या पोराबाळांसोबत नांदतेय. आजही तिला हे माहीत नाही.

असो, तर रुईयाला फुल्ल झालेली आम्हा रिकामटेकड्यांची टोळी, आता पुढची दुपार कुठे घालवायची याची प्लानिंग करायची. पिक्चर बघावे तर ईतके पैसे कोणाच्या खिश्यात खुळखुळत नसायचे. त्यामुळे बहुतांशवेळा क्रिकेट खेळायला जायचो. काँट्रीब्युशन काढून खायचीप्यायची सोय मात्र करायचो. कधी खालसाची फ्रँकी, तर कधी किर्तीचा वडापाव, कधी आयडीयल जवळचा बटाटावडा, तर कधी रुईयाजवळच्या मनी'स चा वडासांबर. हे सारेच तेव्हा फेमस होते. मजबूरी का नाम शेअरींग ईज केअरींग म्हणत थोडे थोडे चाखले जायचे.

संध्याकाळी मात्र न चुकता मी दादर प्लाझाजवळ असलेल्या अकरावीच्या क्लासला जायचो. कारण ते दहावीतले प्रेम त्याच क्लासला सोबत होते. पण पुढे बारावीला तिने क्लास बदलला तसे मी आमच्या बारावीच्या क्लासलाही जाणे सोडून दिले. बारावीची बोंब तर लागणारच होती.

पुढे तर काय आणखी कल्याण होणार होते. वर्षभर अभ्यास झाला नाही म्हणून बारावी पुढच्या वर्षी देतो म्हटले. घरची भाबडी माणसं लगेच तयार झाली.

आता ना कॉलेज होते. ना क्लास होता. क्लासच्या नोटसवरून अभ्यास करतो म्हणून वर्षभर घरीच होतो. दुपारी रिकाम्या घरात चाळीतील भुतांचा अड्डा जमवायचो. संध्याकाळी आईवडील ऑफिसहून आले की दप्तर उचलायचो आणि माझगावचा डोंगर गाठायचो. पुढचा अड्डा तिथे भरायचा. संध्याकाळी डोंगरावर येणारी रंगीबेरंगी फुलपाखरे बघितली जायची. रात्री शेकोटी पेटवून पत्त्यांचे डाव रंगायचे, चायनीज हादडले जायचे, गप्पाटप्पा व्हायच्या. काही व्हायचे नाही, तर तो अभ्यास. (हे तुम्ही दामिनीच्या सनी देओल स्टाईलमध्येही वाचू शकता, तारीख पे तारीख मिलती है योरऑनर, अगर कुछ नही मिलता है तो वो ईन्साफ / आय मीन अभ्यास!)

असो, तर मी आजवर न लिहिलेला, तरीही माबोवर फेमस असलेला माझा डोंगर जाळायचा किस्साही तिथेच त्याच दिवसात घडला. डोंगर तर काही पुर्ण जळाला नाही, पण त्यात माझ्या बारावीच्या आणखी एका वर्षाची आहुती मात्र पडली.

----------------------------------

तो एका पिक्चरमध्ये डायलॉग होता ना, थप्पडसे डर नही लगता साहबजी,,, प्यार से लगता है!
त्या बारावी निकालाच्या दिवशी घरच्यांना पुर्ण हक्क होता मला थोबडवायचा. पोत्यात कोंबून मला बुकलवायचा. पण त्यांनी मारले नाही. किंबहुना ओरडलेही नाही. मला प्रेमानेच समजावले. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर अशी वेळ येऊ द्यायची नाही हे मी तेव्हाच ठरवले. कारण पुन्हा त्यांना दुखवायची हिंमत माझ्यात उरली नव्हती.

----------------------------------

डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतले आणि योगायोग बघा. वर उल्लेख केलेल्या रिकामटेकड्या टोळक्यातील एक मेंबर. जो माझा शाळेपासूनचा खास मित्र, किंबहुना माझ्याच बेंचवर बसणारा मित्र होता. ज्यानेही माझ्यासारखीच अकरावी बारावी आणि अजून एका वर्षाची राखरांगोळी केली होती. तो माझ्यासोबत विजेटीआयमध्ये माझ्याच क्लासला, पुन्हा एकदा माझ्यासोबत बेंच शेअर करायला आला होता. एकमेकांना भेटेपर्यंत आम्हाला याची बिलकुल कल्पना नव्हती. पण माझ्या कॉलेजजीवनातील खरे मोरपिशी दिवस ईथून सुरू झाले.

आठवड्याभरातच आम्हा लालबाग-परळ ते शिवडी-वडाळा येथील मराठमोळ्या मुलांचा एक छानसा ग्रूप बनला. अगदी चित्रपट मालिकांमधील बहुरंगी बहुढंगी व्यक्तीमत्वाच्या मुलांचा ग्रूप असावा तसे देवानेच जणू एकेक नमुने निवडून आमच्या ग्रूपमध्ये भरती केले होते. कुठलीही दोन मुले निवडा आणि दिवसभर त्यांच्यासोबत टाईमपास करा. चोवीस तास हमखास मनोरंजनाची खात्री. पण दुर्दैवाने दुसर्‍याच आठवड्यात नेमके माझ्या त्या मित्राचीच काही सिनिअर मुलांनी रॅगिंग घेतली.

हे दुर्दैव त्या सिनिअर मुलांचे होते. सकाळी वर्कशॉपमध्ये रॅगिंग झाली आणि दुपारी कॉलेजच्या गेटबाहेर त्यांना फटके द्यायचा कार्यक्रम पार पडला.

या घटनेचे महत्व फार होते. कारण डिप्लोमा फर्स्ट ईयरच्या पोरांनी डिग्री थर्ड ईयरच्या मुलांना मारले होते. संध्याकाळपर्यंत डिग्रीच्या पोरांनी आम्हाला घेरले होते. पण मार नाही पडला. मांडवली झाली. आमच्या डोक्यावर त्या डिग्रीच्या मुलांचा हात आला. आमचा मित्र भाई झाला. मांडवली बादशाह म्हणून ओळखला जाऊ लागला.

पुढे फ्रेंडशिप डे, रोज डे, वॅलेंटाईन डे, वगैरे सारेच दणक्यात साजरे होऊ लागले. पण जितके सहज एखाद्या मुलीच्या प्रेमात पडायचो तेवढेच सहज त्यात गुंतून न राहता बाहेरही पडायचो. कारण मन रमवायला मित्रच पुरेसे होते.

किंवा असेही म्हणू शकता की जशी आमच्या ग्रूपची ईमेज होती ते पाहता आमच्यातल्या एकालाही सुंदर अन संस्कारी मुलगी पटणे अवघड होते. तरीही आमची मदत लागली तर आमच्यापैकी कोणाला सैय्या बनवण्यापेक्षा भैय्या बनवणे त्यांना सोयीचे होते Happy

सकाळी आम्ही जिम उघडायला जायचो. तिथे कॅरम आणि टीटीचे डाव रंगायचे. दुपारचे जेवण म्हणजे पंधरावीस जणांचा ग्रूप. कोण कोणाच्या डब्यात खातेय कोणाला पत्ता नाही. दुपारचे प्रॅक्टीकल्स तेवढे अटेंड केले जायचे. पण बाकी लेक्चर प्रॉक्सी मारून चालायचे. मास बंक करून फाईव्ह गार्डनला क्रिकेट खेळायला पळायचो. अंधार पडला की कॉलेजमागच्या चहा-सिगारेटच्या कट्ट्यावर सारे जमायचो. कोणालाही घरी जायची घाई नसायची. भूक लागली की जायचो. अन्यथा रोज कितीही धमाल करा मन भरायचेच नाही.

यातून मला एक कळले. कॉलेजचे दिवस धमाल करायचे असतील तर तुम्हाला तितकाच धमाल ग्रूप मिळणे फार गरजचे असते. भले गर्लफ्रेंड नाही भेटली तरी चालेल. एकतर्फी प्रेमातूनही तुम्हाला कॉलेजचे दिवस मोरपिशी करता येतात. फक्त तिच्यावरून चिडवणारे मित्र तेवढे भेटायला हवेत.

पण या सर्व मौजमस्तीला तेव्हाच अर्थ होता जेव्हा सोबत अभ्यासही केला जायचा. जवळपास दर सोमवारी टेस्ट असायची. त्यासाठी रविवारी रात्री लास्ट नाईट स्टडी व्हायची. ती देखील कॉलेजलाच एकत्र व्हायची. सारे सबमिशन एकत्र व्हायचे. हॉस्टेलरूमवर जमून एकत्रच जीटी मारली जायची. फायनल परीक्षेच्या आधी वीस पंचवीस दिवसांची सुट्टी असायची. तेव्हा तर दिनक्रमच बदलून जायचा. अभ्यासासोबत खाणे पिणे, क्रिकेट खेळणे, झोप आली की झोपणे, सारे काही कॉलेज आणि हॉस्टेललाच व्हायचे. घरी आंघोळ करायला तेवढे जायचो. किंवा कधी ती सुद्धा हॉस्टेललाच करून पुन्हा तेच कपडे अंगावर चढवायचो.

परीक्षा संपल्या रे संपल्या किंवा पावसाळा सुरू झाला रे झाला, की दर रविवारी संडे टाईम्स यावा तशी पिकनिक ठरलेलीच असायची. कसलीही फोनाफोनी न करता ठरलेल्या वेळी सारे दादर स्टेशनबाहेर जमायचो आणि समुद्रकिनारे वा धबधब्यांचा आनंद लुटायला निघायचो. दिवस मोरपिशीच नाही तर ईंद्रधनुष्यी होते तेव्हा.

एक अकरा-बारावीचा काळ होता जेव्हा मी कॉलेजच्या नावावर घरातून बाहेर पडायचो आणि तिथे जायचोच नाही. जावेसे वाटायचेच नाही.
पुढची सात वर्षे आयुष्यात अशी आली की मी शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही कॉलेज वा हॉस्टेलवरच पडीक असायचो. कॉलेज बाहेरच्या जगात मन रमायचेच नाही.

----------------------------------

पण हे मौजमस्तीचे दिवस ईथेच संपले नाही. पुढे मी डिग्रीसाठी सांगलीच्या वालचंद कॉलेजला गेलो. तिथे स्वतःच हॉस्टेलला राहिलो. सोबत आमच्या विजेटीआय डिप्लोमा ग्रूपची काही मुले होतीच. तिथेही आम्ही तसेच गाजवून सोडले. तिथेही माझे एका मुलीच्या प्रेमात पडून झाले. ते ही अगदी लग्न करायचे प्रेम होते. सर्वांनी मित्रधर्म निभावत मला या प्रेमप्रकरणात मदत करून झाली. ती सोलापूरची असल्याने तिच्यासाठी सोलापूरच्या मुलांशी राडाही करून झाला. पण नुसते तिच्यामागे फिरतानाच नाही, तर सकाळचा कांदेपोहे-मिसळीचा नाश्ता, दुपारचे मेसचे जेवण, संध्याकाळचे अंडापॅटीस आणि भुर्जीपाव, विकेंडला सायकलवर टांग मारून रात्रीचा शेवटचा शो, आल्यावर पहाटेपर्यंत सबमिशन, या सगळ्यात मित्र कायमच सोबत होते.

पुढे वालचंदला टॉप करून आम्ही सारेच युनिव्हर्सिटी ट्रान्सफर मिळवून पुढच्याच वर्षी विजेटीआयला म्हणजे पुन्हा एकदा आमच्याच कॉलेजला डिग्रीसाठी म्हणून परतलो. पण वालचंदहून निघताना पुन्हा स्वगृही जातोय याच्या आनंदापेक्षा वालचंद, सांगली सुटतेय या दु:खाने डोळ्यात पाणी होते. ज्या ट्रान्सफरसाठी आम्हीच अर्ज केला होता ते आम्हालाच आता नको होते. आमच्या निरोपाची तिथल्या मित्रांनी पार्टी दिलेली तेव्हा सर्वांचेच पाणावलेले डोळे आम्ही तिथे केलेल्या धमालीची साक्ष देत होते.

पुढे विजेटीआयला डिग्रीला काही मित्र आधीचे होते, तर काही नव्याने जोडले गेले. काही डिप्लोमाचे मित्र अजूनही डिप्लोमाच करत होते, तर काही कामधंद्याला लागले होते. ते सुद्धा अधूनमधून आमच्यातच असायचे. सगळी धमाल मागच्या पानावरून पुढे सुरू झाली होती. वालचंदच्या प्रेमप्रकरणातून बाहेर काढायला देवाने मला सहजपणे आणखी एका मुलीच्या प्रेमात पाडले होते. मी देखील "ये दिल मांगे मोर पिशी" म्हणत चटकन तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि हे प्रेम देखील दरवेळीप्रमाणे आधीच्यापेक्षा सॉल्लिड सिरीअस होते Happy

येस्स येस्स येस्स.. मोरपिशी मोरपिशी मोरपिशी..
दिवस दिवस दिवस... पुन्हा एकदा सुरू झाले होते.
मी सिविलचा, ती प्रॉडक्शनची.. मी सावळा, ती गोरी.. मी मध्यमवर्गीय, ती श्रीमंताघरची..
पण तरीही माझ्याकडे बघून हसायला लागली होती Happy

मग काय, तिच्यामागे दिवस दिवस फिरणे. ईतक्या वर्षात कधी विजेटीआयची लायब्ररी आतून कशी दिसते ते ही बघितले नव्हते, तिथे "ती" दिसते म्हणून तासनतास बसणे होऊ लागले. संध्याकाळचा नेहमीचा मागच्या गेटबाहेर भरणारा चहापानाचा कट्टाही मित्रांनी माझ्यासाठी कँटीनमध्ये शिफ्ट केला होता. त्या वर्षभरात आलेले सारेच डे'ज मग तिलाच डोळ्यासमोर ठेवून सेलिब्रेट होऊ लागले.

पण यावेळी एक मात्र वेगळे होते. ते म्हणजे दरवेळी मी मित्रांना सोबत घेऊन फिरायचो. यावेळी एक मैत्रीण मिळाली होती. ती देखील ईतकी खास झाली की पुढे माझ्या ईतर मित्रांना संशय येऊ लागला की यांचेच तर नाही ना जुळत आहे. तिला बहिण मानणारे तिचे गाववाले तर चक्क मला मारायच्या तयारीत होते. कारण तो एका चित्रपटात डायलॉग होता ना, "एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते.." तेव्हाची जनता अजूनही त्यातच अडकली होती. पण ती मात्र अखेर पर्यंत माझी मैत्रीणच राहिली. तसेच ती प्रॉडक्शनवालीही अखेरपर्यंत एकतर्फी प्रेमच राहिली.

आज विचार करताना जाणवते की मला तेव्हा कोणाशी माझे जुळवायचेच नव्हते. मी नेहमी माझ्या एकतर्फी प्रेमातच खुश होतो. मला फक्त ते सतत कोणाच्यातरी प्रेमात आकंठ बुडालेले असणे पुरेसे होते. आणि हे जे झाले ते छानच झाले. कारण एकदा का यातल्या कुठल्याही मुलीशी माझे जुळले असते तर माझे उर्वरीत कॉलेजजीवन कदाचित तिच्याभोवतीच रेंगाळले असते. कदाचित मित्रांसोबत जी मजा केली ती तितकी झाली नसती.

आता तुम्ही याला कोल्ह्याला द्राक्षे आंबट असेही म्हणू शकता Happy

----------------------------------

पण हा जो काही माझ्या आयुष्यातील लाखो आनंददायी अनुभवांचा काळ होता, तो आयुष्यात कधी येईल असे बारावीच्या निकालानंतर वाटले नव्हते. ते कदाचित केवळ ब्रह्मदेवालाच ठाऊक असावे. पण आज मागे वळून पाहताना पुन्हा एकदा याची प्रकर्षाने जाणीव झाली की हे सगळे शक्य झाले ते माझ्या वडिलांच्या धोरणामुळेच. त्यांच्या सपोर्टमुळेच. नाहीतर माझी गाडी रुळावर कधी आलीच नसती. जेव्हा तो मर्मबंधातील नात्याबद्दल लिहायचा विषय वाचला तेव्हा मला सर्वप्रथम माझे वडीलच आठवले. आणि तो वरचा निकालाचा किस्साच आठवला. एक हा प्रसंग आणि दुसरा माझ्या आंतरजातीय तसेच पत्रिकेत मृत्युयोग असलेल्या विवाहाच्या वेळचा प्रसंग. या दोन्ही वेळी, "मै तुम्हारे लिये जमाने से लड जाऊंगा", म्हणत माझे वडील माझ्या सोबत उभे आहेत असेच वाटले.

आज मी माझ्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवत नाव, पैसा, प्रसिद्धी कमावली आहे, असे बिलकुल बिलकुल नाही. माझ्यासारख्या महत्वाकांक्षेचा अभाव असलेल्या आळशी मुलाबाबत ते शक्यही नव्हते. पण माझ्या रुळावरून घसरलेल्या, किंबहुना कधी रुळावरच न चढलेल्या गाडीसाठी त्यांनीच वेळोवेळी नव्याने रुळ टाकले होते. त्या बारावीच्या अपयशानंतर आयुष्यात कधी कुठल्या विषयात केटी लागली नाही, वा कुठल्या बारीकसारीक परीक्षेतही नापास झालो नाही. पुन्हा कधी मी चुकीच्या दिशेला गेलो नाही. अन्यथा आज ईथे ईतर मायबोलीकर आपल्या कॉलेजजीवनाच्या धमाल आठवणी लिहीत असताना मला केवळ आयुष्यात घडलेल्या ट्रॅजेडी आठवून कुढत बसावे लागले असते. कदाचित आज माझे आयुष्यच वेगळे असते आणि ते फार बकाल असते. म्हणून आज मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, जे खूप आनंदाने आणि आवडीने जगतोय ते माझ्या वडिलांचेच ऋण आहेत _/\_

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलयंस! सिमिलर गोष्ट परिचितांतील एका मुलाची प्रत्यक्ष पाहिली आहे (म्हणजे हुशाल मुलगा, ११, वी, १२ वी करून परत डिप्लोमाला अ‍ॅडमीशन वगैरे) सो रो रिलेट झाले खुप!

आई वडिल ग्रेटच असतात नेहमी.. पण त्यांचा ग्रेटनेस नेहमी कळतोच असे नाही कधी कधी खुप उशीरा कळतो !

धन्यवाद, कविन , निकू

हो, असे बारावीनंतर डिप्लोमा करणारे खूप असतात. आमच्याच सिविल क्लासमध्ये ६० पैकी आठ-दहा जण तरी बारावीनंतर आलेलो.

माझी अकरावीपासून वाट लागण्यात माझ्या अलौकिक ईंग्लिशचाही हात होता. क्लासमधले सारे ईंग्लिश लेक्चर बाऊन्सर जायचे आणि अभ्यास करणार्‍या मित्रांचा ग्रूप बनला नाहीच. त्यामुळे ईंग्लिशमधील अभ्यासक्रम कसा करायचा हे कधी झेपलेच नाही.

मी डिप्लोमाला गेलो तेव्हा हाच प्रॉब्लेम मी काही दहावी करून आलेल्या मराठी मिडीयम मुलांचा पाहिला. आणि जे माझ्याशी अकरावीला घडले ते त्यांच्याशी डिप्लोमाला होऊ नये याची काळजी घेतली. एक अल्टीमेट किस्सा याचाही आहे. त्यात मी कौतुकाच्या बाजूला आहे. शेअर करेन तो ही कधीतरी, वा लवकरच..

मस्त लिहिलेय !

आज विचार करताना जाणवते की मला तेव्हा कोणाशी माझे जुळवायचेच नव्हते. मी नेहमी माझ्या एकतर्फी प्रेमातच खुश होतो.
You were not in love, you were in love with the idea of love.

फा च्या पोस्टला अनुमोदन. तुझे सुदैव कि तुझ्या वडलांनी तू सेकंड लास्ट पॅरा मधे लिहिले आहेस ते केले.

You were not in love, you were in love with the idea of love. >> विकू हाच विचार वाचताना माझ्या मनात आला होता. दुर्दैवाने सध्या ह्या वाक्यातले कर्ता नि कर्म दोन्ही एकच झाले आहेत.

खूप मस्त लिहीले आहे तुम्ही. तुमच्या आई वडीलांना सलाम. एकुलत्या एक हुशार मुलाचे आयुष्यातल्या टर्निंग पाॅइंटला आलेले अपयश पचवणे सोपे नसेल त्यांच्यासाठी. खूप मॅच्युरीटी दाखवली त्यांनी.

खूपच मनमोकळं व छान लिहिलेय , केलेल्या चुकांची जाणीव व बाबांबद्दलची कृतज्ञता या दोन्ही गोष्टी पोचल्या. Happy

धन्यवाद सर्वांचे Happy

You were not in love, you were in love with the idea of love.
>>>>

हो विकु, हे खरेय.
मला हे फार नंतर कळाले. पण त्या वयात हे कळायची मॅच्युरीटी कुठे सर्वांमध्ये असते Happy

@ असामी, हो. ते ही खरे असावे Happy

मस्त लिहीलंयस, ऋन्मेष. मनापासून आवडलं. आणि खरंय, मोरपिशी वगैरे असायला रोमान्सच कशाला असायला हवा कॉलेज लाईफ मधे? लेख वाचायला मजा आली.

तुझ्या बाबांना सलाम! वास्तविक तू बारावीला गॅप घेतलीस तेव्हाच तुला मार कसा पडला नाही असंच डोक्यात येऊन गेलं Happy

धन्यवाद, निलिमा, रमड, आणि फेरफटका Happy

रमड हो, वर्षभर मी अभ्यास केला नाही हे त्यांना सांगितले तेव्हाच खरे तर वादळ यायला हवे होते. पण तरी जे झाले ते झाले म्हणत तयार झालेले. आणि मी त्यांना तोंडघशी पाडलेले.

स्वतः ची चिरफाड केलीय. आणि कधी कधी ती चांगली असते. रोगाचे मूळ उमगते. अर्थात ते उमगूनही औषधोपचार केले नाहीत तर सर्व वायाच.
लेख खूपच आवडला.

धन्यवाद हीरा Happy
भूतकाळाची चीरफाड करणे तशी सोपे असते. जर वर्तमानात त्याचे फार अंश राहिले नसतील तर ..

भूतकाळाची चीरफाड करणे तशी सोपे असते. जर वर्तमानात त्याचे फार अंश राहिले नसतील तर >> लाख टके की बात! Happy

भूतकाळाची चीरफाड करणे तशी सोपे असते. जर वर्तमानात त्याचे फार अंश राहिले नसतील तर ..
>>>>जबरीच प्रतिसाद.

You are a multi talented person.
Excellent write up.
Keep rocking and entertaining us !

भूतकाळाची चीरफाड करणे तशी सोपे असते. जर वर्तमानात त्याचे फार अंश राहिले नसतील तर >> सही बोलताय.+1

धन्यवाद असुफ Happy

आणि सर्वांना ईंजिनीअर डे च्या शुभेच्छा !

व्हॉटसपला स्टेटस लाऊन आम्हीही ईंजिनीअरींग केलीय हे सर्वांना सांगण्याचा दिवस आलाय.
याचसाठी केला होता अट्टाहास Proud

मस्त लिहिले आहेस अभिषेक . वडिलांबद्दल छान लिहिले आहेस.
प्रांजळपणे लिहिलेले आवडले.
इंजिनिअर्स डे च्या शुभेच्छा !!!

बघ असं आहे मायबोलीकरांचे... एरवी असं घडलं का तसं घडलं का म्हणून आरोप-प्रत्यारोप होतील पण ऋन्मेषला खरंच ४३% पडले का? तिथे सर्वांचे एकमत. चल जाऊ दे, "का उगा लेख चांगला व्हावा म्हणून असं लिहायचं स्वतःबद्दल??" लिहून तुला काँप्लीमेंट देते.

चांगले लिहिले आहे. वडिलांचे फार कौतुक वाटले.
त्यांनी बहुधा शाहरूखचे ते गाणे ऐकले असावे 'वो तो है अलबेला हजारो मे अकेला....' आणि त्यांनी त्या गाण्यातल्या वडिलांसारखे आपण न वागता आपल्या घरातल्या शाहरूखला समजून घ्यायचे असे ठरवले असेल. Happy

लेखात एवढ्या सगळ्या हीरोंचे डायलॉग वापरले पण शाहरूखचा एकही नाही... नाही म्हणायला 'ये दिल मांगे मोर' आला आहे म्हणा.

लोना , मला पण अगदी सेम टू सेम वाटतय.

अर्थात हे घडलं नसेल तर ऋ च्या कल्पना शक्तीचे अधिकच कौतुक आहे. घडलं असेल तर ह्यातून सही सलामत बाहेर पडला म्हणून कौतुकच आहे. एकूण काय तर ह्या लेखाबद्दल ऋ चे खूप खूप कौतुक.

क्या सी, धाग्याची सेंच्युरी मारायचा पिलान है क्या Wink

@ ममोताई, दोन्हीकडच्या कौतुकाबद्दल धन्यवाद. पण हे खरे घडलेय. माझे वा माझ्या नसलेल्या गर्लफ्रेंडचे किस्से असते तर त्यात फेकाफेकी वा किमान मीठमसाला अलाऊड असतो. पण हे सारे वडिलांशी जोडले गेले असल्याने त्यातला शब्द न शब्द खरा आहे.

आता हे असे कसे घडले, वा कसे घडते एखाद्या मुलाशी, हा खरे तर आणखी स्वतंत्र लेखाचा विषय आहे. हा लेख त्या ट्रॅकवर जाऊ नये म्हणून मी गरजेच्याच संदर्भाने लिहिले. पण तश्या विषयावरही धागा हवी, चर्चा व्हायला हवी, लोकांनी आपले अनुभव शेअर करायला हवेत.

अश्विनी धन्यवाद, आणि हो ना, मला तर पहिले डायलॉग शाहरूखचेच आठवतात. पण लेख हायजॅक होऊन भलत्याच वळणावर जाऊ नये म्हणून कंट्रोल केले Happy
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा.. गाणे माझ्याही आवडीचे आणि ईतके रिलेट होणारे की एखादे स्लॅमबूक भरताना मी अश्या कॉलममध्ये तेच लिहायचो Happy
पण जगात हुनर बघणारी लोकंही आहेत. हे जग त्यांच्यावरच चालू आहे. माझेही Happy

मलाही हे गाणंच आठवलं होतं.
पण हे गाणं 'अति कौतुक' करतं मुलाचं. म्हणजे रागवू नये हे बरोबर आहे पण एवढंही कौतुक करू नये असं वाटायला लागतं ते गाणं बघताना.
त्यामुळे तुझ्या वडिलांनी केलं तेच बरोबर.

Pages