मोरपिशी दिवस - सिम्बायोसिस - मेधा

Submitted by मेधा on 9 September, 2022 - 16:13

सारी डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे असलं काही नव्हतं त्या काळात कॉलेज मधे होते मी . किंग चार्लसचं लग्न सुद्धा झालं नव्हतं तेंव्हाची गोष्ट !

टीवायबीएससीच्या वर्षात बॉटनी घेणारं पब्लिक एकदम कमी होतं त्यावर्षी. झूलॉजीचे त्याहूनही कमी. झूलॉजी घेणार्‍या विद्यार्थ्यांना वेस्ट्मधल्या कॉलेजात जावं लागलं होतं. माझ्या सुदैवाने इतर कॉलेजातून एक दोन मुलं आमच्या कॉलेजात आली आणि जेमतेम कोटा पूर्ण झाला होता.

एच ओ डी च्या केबिन बाहेर पार्टिशन टाकून प्रॅक्टिकल लॅब मधले दोन बाक आणि दोन्ही बाजूला सहा स्टूलं असा वर्ग असायचा . खिडकीकडे पाठ करुन एक ओळ आणि दाराकडे पाठ करुन दुसरी ओळ. पूर्णवेळ स्टूल हलवून नाहीतर मान वेळावून प्रोफेसराकडे आणि फळ्याकडे पहावे लागे.

नव्या वनस्पती शिकत असू त्यांचे जर्नल आणि स्पेसिमेन ठेवावे लागत असे. कॉलेज सुरु व्ह्यायच्या आधीच्या उन्हाळ्यात ब्रिटिश काउंसिल लायब्ररीची मेम्बरशिप मिळाली होती ( तेंव्हा वेटिंग लिस्ट असायची). तिथनं रेफरंस पुस्तकं आणून मी जर्नलमधे माहिती लिहित असे. स्पेसिमेन मिळवणे, ते प्रीझर्व करणे हे उद्योग चौथी पाचवी पासून जमत होते त्यामुळे त्याची चिंता नव्हती. पण चित्रांचं काय ? पहिल्याच स्पेसिमेनचं चित्रं काढताना इतकी खाडाखोड झाली की जर्नलचा कागद फाटला. वैतागून समोरच्या मुलाने जर्नल ओढून घेतलं पुढ्यात आणि माझ्या चित्रकलेची पीसं काढत पाचेक मिनिटात सगळी चित्रं काढून दिली.

तिथून आमचं सिम्बायोसिस सुरु झालं - रेफरंस टेक्स्ट आणि स्पेसिमेन मी करणार आणि चित्रं तो काढणार ! एफ वाय आणि एस वाय पासून शिकवणार्‍या प्रोफ्रेसरांना आणि एच ओ डींना सुद्धा माझी चित्रकला चांगलीच ठाउक होती आणि मित्राचा अभ्यासातला इंटरेस्ट देखील. पण आमच्या एकमेका सहाय्य करु बाण्याला त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही.

वर्ष संपत आलं, प्रीलिम्स पण झाल्या आणि आम्ही लायब्ररीत अभ्यासासाठी जायला लागलो. पहिल्याच आठवड्यात मित्राने सांगितलं त्याच्या किती केट्या आहेत आणि तो जर पास नाही झाला तर घरी काय रामायण होईल. एका मैत्रीणीने आठवडाभर केमिस्ट्रीची शिकवणी घेतली, दुसरीने काही दिवस झूलॉजी आणि फाउंडेशन कोर्स घासून घेतले! ( मुलांना छ्ळायला आणि कुठलाही विषय शिकवायला जमत नाही अशा प्रोफेसरांच्या पोटापाण्याची सोय करायला ठेवलेला विषय ) . आता हाताशी जेमतेम आठ दहा दिवस उरलेले आणि टी वायच्या पेपर्सच्या अधे मधे एक दोन दिवस.

रोजच्या रोज वेळापत्रक बनवून टी वाय च्या सहा विषयांचा अभ्यास करुन घेतला त्याच्याकडून. इतकं छळलंय की बस. लायब्ररीतून घरी जाताना सुद्धा त्याला उद्यापर्यंत काय वाच ते सांगून ठेवत असे. माझ्या गिचमिड अक्षरातल्या नोटस विनातक्रार वाचणारा तो एकटाच.

परिक्षा संपली, इंस्टिट्युट ऑफ सायंस मधे एम एस सी करणार हे नक्की ठरलेले होतं एफ वाय ला असल्या पासून त्यामुळे मी निवांत होते. तिथे अ‍ॅडमिशन मिळेल याची खात्री होतीच. तरी सुट्टी चालू असताना अजून एका मित्राचं ऐकून दोन तीन ठिकाणी एम बी ए साठी परिक्षा दिली. अ‍ॅडमिशन मिळाल्यावर घरचे म्हणाले एम एस सी पेक्षा हे बरं राहील म्हणून मुंबई बाहेरच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन पण घेतली.

तिथलं कॉलेज सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी बीएससी चे निकाल जाहीर झाले. त्यादिवशी हॉस्टेलवर दोन टेलीग्रॅम आले माझ्या नावाने. एक वडिलांचा, 'यू हॅव सेक्युर्ड फर्स्टक्लास ' म्हणून. आणि दुसरा मित्राचा ' क्लीअर्ड ऑल केटी. फर्स्ट क्लास इन टी वाय'. कुठल्या टेलीग्रामचा जास्त आनंद झाला ते सांगायला नकोच.

निकाल लागल्यानंतर दोन तीन आठवड्यांनी मी घरी गेले तेंव्हा मित्र पेढे घेऊन आलेला घरी. म्हणे ' आधी तुला पेढे, मग घरच्यांना आणि बा़कीच्यांना' . खरोखर तोपर्यंत त्यांने त्याच्या घरच्यांना पण पेढे आणू दिले नव्हते .

मोरपिशी नसली तरी आवडती आठवण आहे. तेंव्हाचे मित्र मैत्रिणी भेटलो की अजूनही माझ्या चित्रकलेच्या आणि लायब्ररीमधल्या मॅरॅथॉन स्टडी सेशनच्या आठवणी निघतातच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा! कसलं लिहिलंयस तू!!
अंगावर रोमांच, मोरपीस का काय म्हणतात तसलं झालं एकदम! आवडलं Happy

आठवण छान आहे.
आधी 'सिम्बायोसिस' वाचून पुण्यातल्या कॉलेजमधली आठवण आहे, असं वाटलं. नंतर ' वेस्टमधील कॉलेज' वाचून हे पाणी मुंबईतलं असणार हे लक्षात आलं. इस्ट-वेस्ट संस्कृती फक्त तिथेच!