कथाशंभरी - २ - साथ - पाचू

Submitted by पाचू on 9 September, 2022 - 10:55

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि… त्याचा बांध फुटला.

काही वर्षांपूर्वी राधाचं कुटुंब शेजारी राहायला आलं, आणि हळूहळू या दोघांचं प्रेम फुलत गेलं. तिच्या अत्यंत आवडत्या पारिजातकाच्या फुलांसारखं मंद स्वर्गीय सुगंध देणारं. पण गेल्यावर्षी राधा आजारी पडली, ती हळूहळू संपतच गेली. रघू खूप दुःखी व्हायचा, तेव्हा ती म्हणायची, “रघू, काहीही झालंतरी मी नेहेमी तुझ्या सोबतच असेन. पण तू स्वतःचं आयुष्य आनंदाने जगशील असं मला वचन दे.”

ती गेल्यावर रोज भकास वाटणाऱ्या त्या अंगणात आज मात्र वेगळं घडलं होतं. राधाने लावलेल्या प्राजक्ताच्या झाडाला आज पहिल्यांदाच ४-५ फुलं आली होती. त्याच्या राधाची सुगंधी साथ घेऊन…

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान, हळूवार.
बरंय, कोणीतरी त्या रघूला हळूवार नायकी रंगात रंगवलं आहे.