कॉलेजचे मोरपिशी दिवस - भरत.

Submitted by भरत. on 9 September, 2022 - 04:44

खरं तर कॉलेजच्या दिवसांबद्दल लिहिण्यासारखं माझ्याकडे काही आहे असं वाटत नव्हतं. पण फारेण्ड यांचा लेख वाचला आणि मन एकदम....... ( फारेण्ड यांच्याच त्या ठोकळेबाज उपमावाल्या लेखातून वाक्य पूर्ण करा).
तर फारेण्ड-लेख वाचताना मला एकदम कॉलेजातल्या आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आठवल्या. पदवीच्या पहिल्या वर्षाला गेल्यावर म वा मंच्या कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली. एकदा कधीतरी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव दिलं. बोलायचा नंबर लागायच्या दोन तीन मिनिटे आधी विषयाची चिठी उचलून शेजारच्या रिकाम्या वर्गात जाऊन विचार करायला वेळ दिला होता.
समूहासमोर बोलायची करायची ही बहुतेक तिसरी किंवा चौथी वेळ. शाळेत एकदा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा हाफ पँटीत पाय थरथर कापत होते हे आठवतंय. मग दहावीत निरोप समारंभाला आधी न ठरवता आणि कोणी न सांगता मनोगत व्यक्त केलं होतं.
तर या उत्स्फूर्त भाषणातलं लक्षात राहिलं ते हे की टेन्शनमुळे का भरभर बोलण्यामुळे माहीत नाही, पण तोंडातून थुंकी उडत होती. ती फार लांब उडत नसावी आणि फक्त मलाच दिसत असावी. परीक्षक पहिल्याच बाकावर बसले होते. भाषणात ' स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच तेव्हा' या गा ण्याच्या दोन ओळी समर्पक वाटल्याने वापरलेल्या. परीक्षकांपैकी एक आमच्याच कॉलेजची माजी विद्यार्थिनी आणि आता स्वतः दुसरीकडे लेक्चरर आणि व्यावसायिक कथाकथनकार . तिने शेवटी परीक्षकांचं मनोगत सांगताना भाषणात स्वतःचीच मते मांडावीत, कवींच्या ओळी नको, असं काहीतरी सांगितल्याचं लक्षात आहे.
तिसर्‍या वर्षात मी आमच्या वर्गातल्या अन्य काही मुलांमुलींसमवेत म वा मं मध्ये सामील झालो होतो. त्या म वा मं प्रमुख प्राध्यापकही बदलल्याने नेहमीपेक्षा वेगळ्या स्पर्धा होत्या. सृजनशील लेखनाची स्पर्धा तीही गटवार. पाच जणांच्या गटातील प्रत्येकाने एकेक वाक्य रचून दहा वाक्यांत कथा पूर्ण करणे - याला STY म्हणतात हे तेव्हा माहीत नव्हते. आमच्या गटाला' एकदा देव पृथ्वीवर आला ...' असं काहीतरी वाक्य होतं आणि शेवटचं वाक्य माझ्यावर आलं होतं . पृथ्वीतलावरची परिस्थिती पाहून देव अंतर्धान पावला असं काहीतरी वाक्य रचल्यावर हंशा आणि टाळ्या मिळाल्याचं आठवतंय.
आता आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा म्हणजे इंटर कॉलेजियेट.
व्ही जे टी आयच्या फेस्टसाठी आमचा चमू जाणार होता. तिथेही मराठी क्रिएटिव्ह रायटिंगची स्पर्धा होती. पण त्या चमूत माझा समावेश नव्हता.
कट्ट्यावर बसून मस्त वन लायनर्स टाकणार्‍या एका मुलाला घेतलं होतं. पण हे वेगळं आणि स्पर्धेसाठी लिहिणं वेगळं हे स्पर्धा झाल्यानंतर कळलं
असं त्या चमूतल्या माझ्या जवळच्या मित्राने नंतर मला सांगितलं.
व्हॉट्स द गुड वर्ड या टीव्हीवरच्या तेव्हाच्या लोकप्रिय कार्यक्रमा सारखा मराठी शब्दवेध खेळ होता. हा उशिरा होता म्हणून की अन्य काही कारणाने , मी बाकीच्या मुलां सोबत न जाता नंतर एकटाच गेलो होतो आणि जवळजवळ पाउण तास व्हीजेटीआय शोधत होतो. चकवा लागल्यासारखा व्हीजेटीआयपासून दोन मिनिटांवर जात त्याच त्याच भागात फिरलो होतो. तेव्हा स्मार्ट फोन, गुगल मॅप नव्हते. पण ते असूनही मी रस्ता चुकवू शकतो Wink
त्यात मी आणि माझा तो जवळचा मित्र अशी टीम होती. पहिली लेखी फेरी आणि फायनल तोंडी . फायनलमध्ये मित्राने मला हळूच एकदोन शब्द सांगितलेले आणि हे मला रुचले नव्हते हे अजून आठवतंय.
तिथे अंधेरीच्या एस पी कॉलेजची मुलं होती आणि त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या फेस्टला या म्हणून आग्रहाचं आमंत्रण दिलं. तिथे दोन्ही टीम्सना विभागून समोरासमोर बसवलं होतं. इथेही व्हीजेटीआयसारखंच विजेतेपद मिळाल्याने व्हिजेटीआयमधला फक्त मलाच दिसलेला डाग धुतला गेल्याचं समाधान लाभलं.
व्हीजेटीआयचं फेस्ट आमच्या कॉलेजच्या गायिकांनी गाजवलं होतं. अंताक्षरी सुरू असलेला वर्ग फुल पॅक होता आणि आम्ही बाहेर उभं राहून तो कार्यक्रम ऐकत होतो आणि आमच्या कॉलेजातल्या दोन मुली कोणालाही ऐकत नव्हत्या.
यावरून आठवलं - संगीतात रस असलेले एक सर (जे आमच्या कॉलेजचेच माजी विद्यार्थी होते) आम्हाला ऑडिटचा एक पिरियड घ्यायचे. त्यांनी त्या वर्षीच्या त्यांच्या पहिल्याच पिरियडला वर्गातल्या गायिकांकडून गाणी म्हणून घेतली होती. आता ते दुसरीकडे प्राचार्य होऊन निवृत्तही झालेत. पण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना सूत्रसंचालन, गायकांच्या मुलाखती असं काय काय करत असतात.
गायन, अभिनय आणि वक्तृत्व यांत पुढेमागे नाव कमावलेले बरेच जण कॉलेजात आमच्या पुढेमागे होते.
आम्हांला सिनियर विद्यार्थ्यांचा एक गट कथाकथनाचे कार्यक्रम करीत असे. त्यातला एक शैलेश दातार. विद्या चितळे ही आम्हांला बरीच सिनियर. ती नाना पाटेकर सोबत आई शप्पथ या नाटकात होती. पुष्कर श्रोत्री मला एक की दोन वर्षे ज्युनियर.
गाणार्‍या मुलींपैकी सुहासिनी चितळे ही पुढे सुहासिनी नांदगावकर झाली. बाकीच्या गोड गळ्याच्या मुलींनी पुढे काय केलं ते कळलं नाही.

या लेखाच्या निमित्ताने त्या दिवसांत फिरून येता आलं. आणखी बरंच काय काय आठवतंय, पण थांबतो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान आठवणी..
अजून वाचायला आवडतील तुमच्या शब्दांत..!

छान लिहिलंय.
'व्हॉट्स द गुड वर्ड' कधी बघितला नाही, पण ताई/ दादांनी बघितल्याने सगळी भावंडं जमलो की आम्ही चिठ्ठ्या उचलून तो खेळत असू. फार मजा येत असे. Happy

छान !

छान

छान लिहिलंय!

मी कॉलेजला असताना पुणे विद्यापीठाची एक वक्तृत्व स्पर्धा होती तिथे मी मराठी आणि अजून एक मुलगी इंग्रजी विभागातून स्पर्धेत भाग घ्यायला गेलो होतो. पाचसहा विषय आधीच दिलेले होते, त्यापैकी एक ऐनवेळेस चिठी उचलून निवडायचा होता. मी शाळेत असताना बऱ्याच वेळा भाग घेतला होता वक्तृत्व स्पर्धेत, पण ते केवळ दुसरं कुणी तयार नसायचं म्हणून. माझं वक्तृत्व फार काही चांगलं नव्हतं. तिथे आर्ट्स शाखेतली भली भली अनुभवी मंडळी जमलेली होती, आमचा निभाव लागणं शक्य नव्हतंच. जेमतेम भाषणं केली आणि परत आलो. पण त्या निमित्ताने त्या विश्वाची एक झलक बघायला मिळाली. बाकी आमचं कॉलेज नवीन म्हणून म्हणा किंवा पुण्याबाहेरचे विद्यार्थी बरेच असल्याने म्हणा, पुरुषोत्तम, फिरोदिया वगैरे स्पर्धा बघायलाही कधी गेले नाही. जायला हवं होतं असं आता वाटतं.

आवडले! एकदम सहजसोप्या पद्धतीने लिहीलेल्या आठवणी! "मलाच दिसलेला डाग" याच्याशी पण रिलेट करता आले.

व्हॉट्स द गुड वर्ड असा एक कार्यक्रम होता हे लक्षात आहे पण नक्की कसा होता ते नाही. असा एखादा उपक्रम माबोवर तुम्ही राबवू शकलात तर आवडेल भाग घ्यायला.

ते व्यावसायिक कथाकथनकार म्हणजे वपु तर नव्हेत? Happy

एसपी कॉलेजच्या कोणीही कोणालाही कसलेतरी आमंत्रण दिले हे वाचून अडखळलो. पण नंतर लक्षात आले की हे मुंबईचे एसपी कॉलेज Happy

छान आठवणी आहेत,
विजेटीआय नाव जितके वेळा वाचले गुदगुल्या झाल्या Happy

>>>> जवळजवळ पाउण तास व्हीजेटीआय शोधत होतो. चकवा लागल्यासारखा व्हीजेटीआयपासून दोन मिनिटांवर जात त्याच त्याच भागात फिरलो होतो. >>>> पहिल्यांदा हे होऊ शकते असे तिकडच्या गल्यांमध्ये Happy

मस्त लिहिलेय. तुमचे व माझे कॉलेज एकच.. पण माझा कॉलेजातील साहित्यिक जगाशी कधीही संबंध आला नाही. ततिकडे सगळी आढ्यताखोर मंडळी भरलेली आहेत हा एक समज (जो गैरही असु शकतो) आणि तिथे उभे राहायचीही आपली लायकी नाही याची खात्री यामुळे मवामंचे कार्यक्रम फक्त हजेरी लावुन पाहिल्याचे आठवतेय. बाजुच्याच शिवानंद का कुठल्याशा सोसायटीत बिक्रम गोखले राहात असल्याने एकदा तो पाहुणा म्हणुन आलेला आठवतेय. खुप उत्सुकतेने गेले होते कार्यक्रमाला पण त्याने थोडी निराशा केली होती.

विद्या चितळेचा तुम्ही उल्लेख केला म्हणुन आठवली. तेव्हा ती खुप फेमस होती. सुहासिनी प्रतिलता म्हणुन फेमस होती तर अजुन एक मुलगी प्रतिआशा म्हणुन फेमस होती. तिचेही नाव आता आठवत नाही. गाण्याच्या स्पर्धेत बाकी सगळे विना वादक गायचे तेव्हा ही पेटीवाला सोबत घेऊन गायची. मी अकरावीत होते तेव्हा साधना सरगम, साधना घाणेकर होती आणि बहुतेक शेवटच्या वर्षाला होती. ती दुरदर्शनवर आरोहीत गायला यायची तेव्हा कॉलेजात तसा बोर्ड लावला जाई. गणित शिकवणार्‍या गोल्ड मेडलिस्ट मॅडम दुरदर्शनवर निवेदिका म्हणुनही काम करायच्या. लग्नाआधी साडीत येणार्‍या त्या लग्नानंतर ड्रेस घालुन यायला लागल्या तेव्हा ‘चांगला नवरा मिळाला‘ म्हणुन चर्चाही केली होती. त्या पुढे अमेरिकेत गेल्या.

बाकी अभ्यासाच्या भयाण आठवणी आहेत Happy . स्टॅट्स शिकवणार्‍या मॅडमना हिटलर म्हणायचो, जॉमेट्री शिकवणार्‍या मॅडमच्या डोक्यावर पन्खा पडल्याची बातमी ऐकुन ‘उद्या सुट्टी!!’ म्हणुन झालेला आनंद त्याना काहीही लागलेले नाही हे कळल्यावर दु:खात परिवर्तीत झालेला आठवतोय. इकॉनॉमिक्स शिकवायला प्रा. नलिनी पंडीत सारख्या विदुषी असुनही केन्शियन थियरी केन्सने लिहिली म्हणुन नाव केन्शियन हे एक आणि केन्स नावाचा इकॉनॉमिस्ट होता हे दुसरे ह्या दोन्ही गोष्टी कळायला कित्येक वर्षे जावी लागली. त्या आंत्रप्रनर म्हणायच्या ते काय असते हे तर कधीही कळले नाही. पुस्तकात entrepreneur छापलेले असायचे त्याला मी काय करणार? मला फक्त अकाऊन्ट्समधे गती होती. आणि मराठीत. मी परिक्षेला लिहिलेला निबंध मॅडमनी वर्गात वाचुन दाखवल्याची गोड आठवण तेवढी आहे. शेवटच्या वर्षाला विद्यापिठाने पहिल्यांदाच कॉम्प्युटर विषय ठेवलेला. बहुतेक थोडीशी सि लँग्वेज पण अभ्यासायला होती. सगळा अभ्यास पुस्तकावरुन केला. एकदाच कॉम्प्युटर कॉलेजात आणलेला, आम्हाला दाखवयला. वर्गाच्या दरवाजाला दोरी बांधुन दरवाज्यातच आत तो दिव्य कॉम्प्युटर , त्याचे दोन चालक व मॅडम आणि दरवाजाच्या बाहेर दोरीपासुन थोडेसे दुर आम्ही सगळे विद्यार्थी असे कॉम्प्युटरचे आयुष्यातील पहिले दर्शन घडले. आता म्युझियममध्येही दिसणार नाही असे ते जुने २८६ वाले मॉडेल आणि तेव्हाचे टिवि बिघडल्यावर कशा लायनी दिसत तशा लायनी दाखवणारा मॉनिटर… कॉम्प्युटर काहीतरी भयंकर चिज आहे आणि आपला परत याच्याशी काहीही संबंध यायची गरज व शक्यता शुन्य आहे ही चर्चाही तेव्हा झालेली आठवतेय. असो.

सॉरी, तुमचा धागा थोडा हाइजॅक झाला. पण जे आठवले ते लिहावेसे वाटले.

मस्त लिहीले आहे. साधनाचा प्रतिसादही मूळ लेखास, चार चंद्र लावणारा आहे. प्रत्येकाचे कॉलेजवयीन रुपडे पहाताना, वेगळीच ओळख होते आहे.