बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय!
"मेरी, हे बघ! बऱ्याच जणी नवीन दिसतायत."
"खरंच की! मागच्या वेळी आपण मोजल्या तेव्हा किती होत्या बरं? आपल्याला भेटूनसुद्धा वर्षे झाली असतील आता."
"हो. २००६मध्ये मी इथे आले. तेव्हा प्रथेप्रमाणे तू माझं स्वागत केलं होतंस. पण मेरी, तू आर्टेमिसच्या प्रवाश्यांबद्दल ऐकलंस? ती जी कोणी असेल, मी सुपर एक्साइटेड आहे तिला पाहायला!"
"मीसुद्धा! पण कल्पना, मला काळजीसुद्धा वाटते. तुझं...."
"डोन्ट वरी! अपघात कधीतरीच होतात. ती सुखरूप परतणारच. तिच्या पाऊलखुणांचा दागिना आपण नेहमी मिरवणारच."
*************
टीप:
हे संभाषण मेरी एडेला ब्लॅग (Mary Adela Blagg) आणि कल्पना चावला या दोघींमधलं आहे. ब्लॅग आणि चावला या दोघींच्या नावाने चंद्रावर विवरे आहेत. चावला विवराचा जन्म २००६चा.
आर्टेमिस (Artemis) हा नासाचा चंद्रावर (परत) माणूस पाठवण्याचा प्रकल्प आहे. या मिशनमध्ये ते एका महिला astronautला पाठवणार आहेत.
२०व्या शतकाच्या सुरुवातीला चंद्राच्या पृष्ठभागाच्या विविध घटकांना (दऱ्या, विवरे, खड्डे, डोंगर, इ.) नावे देण्याच्या ३ मुख्य पद्धती वापरात होत्या. त्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचे महाकिचकट काम दोन खगोल अभ्यासकांनी केले - मेरी एडेल ब्लॅग आणि Samuel A. Saunder. १९१३ साली त्या दोघांचे पुस्तक Collated List of Lunar Formations प्रकाशित झाले. त्यात चंद्रासाठीच्या तीन नामकरण पद्धतीमधल्या ४०००० (हा टायपो नाही) घटकांची तुलना होती. या तुलनेचा उपयोग घटकांच्या नावात एकवाक्यता आणण्यासाठी झाला. १९१९ साली इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियन (IAU)ची स्थापना झाली. सूर्यमालेतल्या विविध गोष्टींना नावे देण्यात एकसूत्रता आणण्याचे काम त्यांनी सुरू केले. १९२८मध्ये ब्लॅगने चंद्रावरील नावाबाबत संदिग्धता असलेल्या नवीन भागांची एक यादीच युनियनसमोर सादर केली. ती पाहून चंद्राच्या जमिनीच्या भागांच्या नावांची एक स्पष्ट आणि एकसूत्र यादी करण्याचे काम युनियनने ती आणि कार्ल म्युलर या दोघांवर सोपवले. चार वर्षानी दोघांनी यादी सादर केली - Named Lunar Formations. यात ६००० चांद्रघटकांची नावे होती त्यांच्या ठावठिकाणा व आकारमानासकट! ती यादी युनियनने स्वीकारली. चंद्राच्या जमिनीच्या नामकरणाची ही पहिली आंतरराष्ट्रीय प्रमाणित यादी होय. ब्लॅग आणि म्युलर दोघेही हौशी खगोल अभ्यासक. हे सगळं काम त्यांनी एकही पैसा ना घेता केलं. कामाची पोचपावती म्हणून युनियनने असा प्रस्ताव मांडला की विवरांना त्यांची नावे द्यावी. त्याला दोघांनी ठाम नकार दिला. युनियनने ते जुमानले नाही. १९३५ साली युनियनने जेव्हा चंद्राच्या भागांच्या नावांची यादी प्रकाशित केली तेव्हा त्यात ब्लॅग आणि म्युलर यांची नावे असलेली विवरेसुद्धा होती.
२०१९ साली प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात असे दिसले की व्यक्तिंवरून नावे दिलेली विवरांची एकूण संख्या होती १५८६. त्यात स्त्रियांच्या नावाने ओळखली जाणारी विवरे होती २८ फक्त. २०२१ साली ही संख्या होती ३३.
(संदर्भ - https://doi.org/10.1093/oso/9780198844419.001.0001)
टिपेतली माहिती इंटरेस्टींग
टिपेतली माहिती इंटरेस्टींग आहे. टिपेमुळेच अर्थात कथा समजली.