कॉलेजचे ते मोरपिशी दिवस- कविन

Submitted by कविन on 8 September, 2022 - 05:22

खरतर हा लेख कॉलेजचे मोरपिशी दिवस आणि त्या मोरपीसांची पिसं काढणे म्हणून खपेल Lol . आम्ही काही 'चार चौघीत उठून / बसून/ कस का होईना पण दिसते' कॅटेगरीतही मोडत नसल्याने आमच्या वाटेला 'मनाला गुदगुल्या' करणाऱ्या स्वतः बाबतच्या आठवणी तशा फार फार कमीच.

मजेशीर, अतरंगी भाईगिरीच्या आठवणी त्यामानाने जास्त. पिसाऱ्यातून उचलून त्यातली दोन तीन पीसं इथे मांडते नंतर पण हि जी काही इमेज जमा झाली होती 'कविभायची' त्याच्यामुळे कॉलेज संपून काही वर्षांनी जेव्हा सिएसटीला एक मित्र अचानक भेटला तेव्हा त्याने दोन वेळा वळून बघत खात्री करुन घेत मग हाक मारली होती मला. पहिलं वाक्य होतं, "अरे भाय पैचानाच नै रे तुझे पैले. तू तो लडकी बन गयी रे पक्की" Lol (घ्या! पीसं निघायची बोहनीच झाली)

चॉकलेट डे/ रोझ डे अशा सगळ्या 'डेज'ना ना मी कोणावर खर्च केले चार आणे ना माझ्यावर कोणी खर्च केले (त्यामुळे मी गुलकंद कधी करु शकले नाही)

'सिंगल फसली बटूक मुर्ती' असले तरी चॅलेंजला मात्र कधी मागे हटले नाही. 'सिगारेट स्मोकिंगचे' दुष्परिणाम दाखवणारा काही एक प्रोजेक्ट ११ वीत असताना आम्ही विज्ञान प्रदर्शनात मांडल होता. त्यासाठी सुरवातीला बाबांचं सिगारेटच पाकीट मी त्यांच्या खिशातून काढून नेलं होतं पण नेमकं त्यात दोनच सिगरेट्स होत्या. त्या संपल्या आणि आमच्यातल्या कोणाला तरी पान बिडी शॉपवर जाऊन विकत आणायची वेळ आली. अशावेळी गृपमधल्या बाकी गुणी मुलींनी पानबिडी शॉपवर जायला नकार दिला. मित्रवर्गाची मदत घेणार होतो तेव्हाच एका सिनियर मुलाने माझं रॅगिंग म्हणून चॅलेंज दिलं, "तू जाऊन पाकीट घेऊन आलीस स्वतः, तर मी कायमची सिगरेट सोडली अस अभिप्रायाच्या वहीत लिहून देईन आणि माझ्या कडचं हे पाकीट तुमच्या प्रयोगात वापरायला देईन". झालं 'भायचा' जन्म तिथेच झाला बहुतेक. येताना मी कलर्ड पेनही आणलं अभिप्रायाच्या वहित लिहायला, सिगारेट क्या चीज है आणि ते महागडं पाकीटही प्रयोगासाठी मिळवलं Wink

तेरावीत असताना एक्सर्शन कम पिकनिकला असच साप गळ्यात घेऊन दाखवायच चॅलेंज आमच्या गृपच्याच पंटरने दिलं. "भाय रहने दे, तू है आखीर लडकी" अशी वर काडी ओढून दिली आणि मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. त्यावेळी मला सगळ्या प्राण्यांबद्दल प्रचंड फोबिया होता पण मी चॅलेंज पूर्ण केलं तर गृपमधल्या सगळ्या मुलांनी हेच चॅलेंज पूर्ण करायच आणि ते लडकी वालं वाक्य मागे घ्यायचं यावर तोडपाणी झाल्यामुळे मी ते चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण केलं (आणि कायमसाठी 'भाय' हे नामाभिधान कोरुन घेतलं)

किती जरी 'भाय' वाला ॲटीट्यूड दखवत असले तरी आतून तेव्हाही 'मध्यमवर्गीय-मराठी-छोट्या शहरातली-मराठी मिडीयमच्या मुलं मुली दोन ग्रहावर वाल्या' जगातून आलेली व्यक्तीच होते मी. त्यामुळे इंग्रजी सिनेमा बघायला कॉलेज बंक करुन जायच सगळ्यांनी ठरवलं आणि मला त्यात ओढलं तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला तो हा कि सिनेमात 'चुम्माचाटी आणि बरच काही...' आलं तर येणाऱ्या संकोचलेपणाच काय करायचं? Lol
बंक करणेसे डर नही लगता था पर संकोचसे लगता था Lol इतकं टेंशन घेऊन गेल्यावर त्यामानाने तो सिनेमा बराच 'ह्यॅ' निघाला होता. तो मी थिएटरमधे जाऊन पाहिलेला पहिला इंग्रजी सिनेमा असेल.

भायगिरी रक्तात होती पण सोबत शुभंकरोती म्हणा मुलांनो घरातून आल्याच एक अवघडलेपण असतं ते हि होतं (no offense. त्या भायगिरीला आणि त्या शुभंकरोतीलाही thank you च म्हणते. हा ना आता आहे ते आहे.) अजिबात नसलेला फॅशन सेन्स हा त्यावेळचे फोटो आता बघताना कायम जाणवतो पण तेव्हा या सगळ्याबाबत अर्धा पाव टक्क्यानेही मनात विचार नव्हता आला कधी. "जैसे है वैसे सही" हा ॲटीट्यूड ठासून भरला होता. त्यामुळे साईड रोलमधे कायम कास्टिंग झाले तरी त्याबद्दल खंत नव्हती.

माचीस कि तिली/ छोटा बच्चा जान के मुझको ना समझाना रे/ साजूक तुपातली नाजूक जिलबी असले फिशपॉंड आमच्या वाटेला. यातला जिलबीवाला हा अजिबात कौतुक करायच म्हणून दिलेला फिशपॉंड नव्हता बरे. नॉनव्हेज न खाणारी गुळतुप घरातली म्हणून ते साजूक तुपातली आणि सरळ साधी नाही म्हणून जिलबी.

असो तर आत्तापर्यंतच्या झलक वरुन कळलं असेलच कि गुलकंदी आठवणींची बरणी हि माझ्या खात्यात जमा नाही.

पण याचा अर्थ असा नाही हा कि मोरपिशी / गुलकंदी आठवणीच नाहीत त्या काळातल्या. आहेत आहेत, अशाही जमा आहेत फक्त वरती उल्लेख केलाय तसं आमचं कास्टिंग साईड हिरॉईन, पाठराखीण, बॉडीगार्ड मधे झाल्याने त्या आठवणींची 'सोल ओनरशीप' माझी नाही.

पण या जमापुंजीने मला लिखाणात सढळ हस्ते मदत केली. कसं ते सांगतेच थोडं.
'प्रेमाची गोष्ट' लिहीली तेव्हा त्यात वापरलेला हिरोची माहिती गोळा करायचा प्रसंग अलमोस्ट तसाच्या तसा माझ्या बाबतीत घडला होता. म्हणजे मी सेम असच काही जुगाड करुन माहिती शोधून देऊन पुण्य जमा केले होते. यातले अजूनही काही प्रसंग हे बरेचसे माझ्या कॉलेजच्या काळातले आत्ताच्या काळासाठी जरा मॉडीफाय करुन वापरले आहेत.
हितगुज दिवाळी अंकासाठी एक कथा लिहीली होती. नाव आता आठवत नाही (कारण नंतर बरेच एडीट रिएडीट करुन बरच काही बदलून आणि बहुदा नावही बदलून झाले) तर त्या कथेत वापरलेले बरेच कॉलेज रिलेटेड फ्रेशर्सचे किस्से जसं 'मराठी वाड्ग्मय मंडळ आणि त्याच्या कार्यक्रमाची तयारी,तिथली सिनियर जोडी आणि त्यांचे आपापसातले इक्वेशन वगैरे डिट्टो माझ्या त्यावेळच्या आजूबाजूला घडलेल्या, सहाय्यक भुमिकेत असतानाच्या निरिक्षणातून आलेले आहेत.
अजूनही एक दोन कथेत अगदी कथामालिका लिहीली इथे त्यातही या ना त्या कॅरेक्टरच्या प्रसंगात हि पुर्वीची गंगाजळी आत्ताच्या गंगाजळीत मिळून मिसळून वापरता आलेय. यापुढेही वापरता येईल असं पासबुक अपडेट केल्यावर दिसत आहे.

तसं तर सगळ्याच कथांमधे असं कुठे कुठे अनुभवलेलं, नोंदवलं गेलेलं, गोंदवलं गेलेलं वगैरे येतच असत. काल्पनिक असली तरी गोष्टीचा बेस हा खऱ्या जगातूनच आलेला असतो.

त्याअर्थी पीसं काढली तरी इथे तिथे वेळप्रसंगी वापरता येण्याजोगा पिसारा मला त्या दिवसांमधून मिळाला आहे. त्याच्या व्याजावर माझं बरं चाललं आहे. त्या व्याजासाठी तयार होऊ न शकलेला गुलकंद माफ आहे Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हेच की ते मोरपंखी! ते संयोजकांचं मोरपिशी वाचुन मला सारखी पत्त्यांत आलेली पिशी आठवतेय. Proud
बाकी ते हळुवार, नाजुक इज ओव्हररेटेड. हे वाचायला मजा आली कविन. शेवटी व्याजाचे हिशेब करताना हुरहुर का कायशी ही लागली. सो तो पण चेकमार्क! Happy

कविताभाय भारीच.

मला निरागस वाटणारी तू, सिगरेटचं पाकीट मागताना कशी दिसत असशील, भाईगिरी कशी करत असशील, डोळ्यासमोर येत नाहीये. प्रात्यक्षिक दे बायो कधीतरी Lol

बाकी अपने एरियाकी, अपने स्कुल की लडकी है तू. गल्ली की भाय होके कैसे दिखती है, देखनाईच पडेगा.

पहिल्याच वाक्यापासून सिक्सरच एकदम..
मस्तच लिहिलयस..
खूप काही रिलेट झाले - दिसणे, फॅशन सेन्स आणि चॅलेंज घेण्याबद्दल Happy

Pages