कथाशंभरी - लहानगे देव - मुग्धमानसी

Submitted by मुग्धमानसी on 7 September, 2022 - 03:01

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले….
"अरे हे काय... डोकं मागून फाटून गेलंय तुझं!"
"हो ना. तूच माझी टोपी दे ना नीट बसवून..."
"कुठून देऊ? माझाच हात तुटलाय बघ."
"आणि हे काय? तोंड काय रंगित करून ठेवलंय? केसांचं पार वाळकं गवत झालंय."
"या घरात आपण आलो तेंव्हा काय सुंदर दिसत होतो!"
"मी गोंडस गुबगुबीत, तू गोरीपान सडपातळ…. आणि आता..."
"आपल्या नशिबी असेच हाल. लहानग्या देवांना खेळवायचं, हसवायचं हेच आपलं सार्थक!"

"शूSSSS. मुलं आली.” - कपाटावरचा मानमोडका टेडी म्हणाला. सगळे एकदम निमूट.

Group content visibility: 
Use group defaults

एकदम मस्त!

मी मघा माझ्या लेकीच्या खेळण्यांचा फोटो टाकला तिकडे रंगाच्या धाग्यावर तेच इथे बोलत आहेत असे वाटले मला! Happy