मायबोली गणेशोत्सव २०२२: आमचा बाप्पा

Submitted by छन्दिफन्दि on 6 September, 2022 - 14:47
#ganpati #littlemoments #ganpati2022

परवा गणपतीसाठी चांदीची,तांब्या-पितळेची भांडी उजळवत होते. माझ्या अत्यंत आवडीचा उद्योग! हळू हळू सगळी पुटं जाऊन लखलखीत झालेली भांडी देव्हाऱ्याचा नूरच पालटतात. ती उजळवत असताना मन पस्तीस एक वर्ष मागे गेलं.
आमचं गाव डहाणू जवळचं. आम्ही हरतालिकेच्या आदल्या दिवशी धडकायचो. स्टेशन पासून बसने अर्ध्या तासात घरी पोहोचायच. विहिरीवर हात पाय धुवायला गेल्यावर दिसायच्या कठड्यावर वाळायला ठेवलेल्या लखलखीत केलेल्या समया, तांबे.
माजघरात गणपतीचं एक कपाट आहे (दचकलात ?) काळं भोर, शिसवी, नक्षीदार. कपाट उघडलं की आत मखर तयार, सुबक नक्षीदार कमानीसह(अगदी ECO Friendly आणि Recyclable नाही तर Reusable ). पाट, टेबल , बाकड्याची मांडामांड झाली की गणपतीची आरास तयार! मग मात्र सगळ्यात आवडतं काम, आजी बरोबर चांदीची भांडी बाहेर काढायची. ताटं, पेले, वाटया, पूजेची भांडी, सगळं साडीच्या कापडात छान गुंडाळून ठेवलेलं. एकही काळा डाग नसलेली ती लखलखीत भांडी मात्र कधी उजाळायला लागली नाहीत. मग इतरही वस्तू आम्ही उगाच बाहेर काढायचो. जरीचं नाजुक नक्षीकाम केलेले बटवे, उदबत्तीचे डबे, ‌‌मोराची अत्तरदाणी , खूळखुळा , बडीशेपेची डबी , चिनी मातीची छोटी खेळणी आणि मग आजी त्या सगळ्या गोष्टी परत आत ठेवताना प्रत्येक वस्तू मागची गोष्ट सांगायची. कुणी दिली, कधी दिली, का दिली, किती जुनी आहे, तिच्या सासूबाईंची की आजेसासू बाईंची वगैरे वगैरे. दरवर्षी त्याच गोष्टी तितक्याच तन्मयतेने ऐकायचो.
हरताळीकेला आळीमधे एक घर होतं तिकडे आजूबाजूच्या बायका पूजेला यायच्या. आई बरोबर आम्ही पण जायचो. सकाळी खूप लवकर असायची पूजा. पण आम्ही लवकर उठून पटापट अंघोळ करून तयार व्हायचो. झापलीत एक प्राजक्ताच झाड होतं , त्याचा पांढरा शुभ्र सडा पडलेला असायचा, त्याचा मंद सुवास ओल्या गवताच्या वासात मिसळून जायचा. शक्यतो चिखलाचा एकही डाग नवीन फ्रॉक वर पडणार नाही ह्या बेताने चालत पूजेला जायचो, पूजा झाल्यावर त्या काकूंकडे रवा- बेसनाचा लाडू असायचा, तो मला प्रचंड आवडायचा. तसा आई-आजीला का बर जमत नाही असा विचार करत घरी यायचे. मोदकाचे सारण , खोबऱ्याच्या वड्या, अळू वड्या सारवून त्यांचे उंडे बनविणे ह्या कामात आजी, आई, काकू बिझी आणि त्यात आमची लुडबुड. ४-५ वाजता खाडीजवळ गणपती आणायला जायचं . दरवर्षी तशीच मूर्ती, फारतर शेल्याचा रंग वेगळा!
गुरुजी सकाळी म्हणजे पहाटे साडेपाचलाच यायचे , आम्ही मुली अर्धवट झोपेत पहिली आरती जेमतेम करायचो. सकाळचा पहिला नैवेद्य गोडाचा शिरा . सकाळीं आठ वाजल्यापासूनच कोणी ना कोणी दर्शनाला येई, कोणाकडे दर्शनाला जायला ओळख पाहिजेच असं नाही. सकाळी बऱ्याचदा जवळच्या शाळेमधली मुलं येत. ती घोळक्याने एकेका घरामध्ये दर्शन घेत फिरत असत. गांधी सदन मध्ये गावाचा सार्व जनिक गणपती येई. तो पाच दिवसांचा. नऊ दहा वाजता तो आणायला जायचं . घरी आलो की हात पाय धुवून मोदक वळायला बसायचं. आम्हाला खूप छान नाही जमायचे पण एक-दोन तरी वळायचो. विहिरीवरून केळीची पाने आणली की आजी नैवेद्य वाढायला घ्यायची. चकचकीत चांदीच्या ताटात एकवीस मोदकांची रास , पिवळाधम्मक वरणभात , लिंबू , अळूवड्या , बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर , नारळाची चटणी. लिहिताना सुध्दा तोंडाला पाणी सुटलंय. अंधाऱ्या माजघरातल्या समईचा मंद प्रकाश, आरती-उदबत्तीचा सुवास, त्यात मिसळलेला नैवेद्याचा घमघमाट आणि समोर गणपतीची सुबक,स्नेहल मूर्ती म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिकतेचा जणू मिलाफचं! आमच्या त्या भागात असा एक विश्वास की गणपतीला गोड गोड मोदक खाऊन कंटाळा येऊ नये म्हणून अळूवड्या पाहिजेतच. आता हा रुची पालट गणपती साठी कि स्वतः साठी ह्यात नको पडायला. पण आम्ही मात्र अळूवड्यांवरच ताव मारायचो. सगळी जेवण वगैरे आटपून माजघराचा दरवाजा पुढे करून बायका मंडळी कलंडतायत तेवढ्यात झापली वाजलीच म्हणून समजा . कोणीतरी गावातल्या भाविक बाई दर्शनाला आलेल्या असायच्या. त्यांचा म्हणे २१ गणपती दर्शनाचा नेम असल्यामुळे त्या खूप लवकर निघायच्या. इकडे आम्ही चहाला उठतच होतो म्हणत सारवा सारावी केली जायची. मग मात्र सगळं पटापट आवरायचं. लोक दर्शनाला यायला सुरुवात झालीच. आम्ही पण तयार होऊन जवळपासच्या घरात दर्शनाला जायचो . एखादा अपवाद वगळता सगळ्यांकडे दरवर्षी तीच आरास, तोच प्रसाद. आरतीची पण मोठी गम्मत असे. आळीतल्या साऱ्यांनी ऐकका घरी जमायचं सगळ्या आरत्या म्हणायच्या, प्रसाद , कॉफी जे असेल ते घ्यायचे पूढच्या घरी आरतीला जायचे, असा साधारण दोन तीन तासांचा कार्यक्रम चालायचा.
दुसऱ्या दिवशी गुरुजी अजूनच लवकर यायचे (चार-साडेचारला ) कारण आमच्या कडे सहस्त्र दुर्वावाहण्याचा नेम होता. आदल्या दिवशी गडी माणसांनी एक हजार दुर्वा काढून पाण्यात घालून ठेवलेल्या असायच्या. गणपतीचं एकेक नाम घेऊन (माझ्या माहिती प्रमाणे) एक सहस्त्र दुर्वा वाहायच्या. ह्याला किमान दीड दोन तास लागत. त्या दिवशी सकाळचा प्रसाद केळ्याचे तुकडे आणि जेवायला कणकीचे तळलेले मोदक. त्यात बदल नाही. आरती प्रसाद करून जेवणं होतात न होतात तोच गुरुजी उत्तरपूजेला हजर. केळीच्या पानात करंजी आणि दही पोह्यांची शिदोरी बांधली जायची गणपती बरोबर द्यायला. आठवणीने गणपतीच्या गळ्यातली सोन्याची चेन काढून घेतली जायची, मग मागे एकदा आजी कशी चेन काढून घ्यायला विसरली आणि ती गणपतीबरोबर विसर्जित झाली ही गोष्ट repeat व्हायची. तोपर्यंत झांजाचा आवाज यायला लागे . अरे मंडळी जवळ आली की. गावातून विसर्जनाची मिरवणूक येत असे. पुढे गणपती मागे मंडळी टाळ्या, झांजा, भजन म्हणत वाजत गाजत समुद्रावर जात . डान्स, गुलाल, बँड , ताशे काही नाही, रिक्षा आणि गाड्यांची गर्दी नाही. अगदी नैसर्गिक भाविकतेने मंडळी जात असत. सगळे गणपती एका रांगेत बसत आणि समुद्रावर परत आरती होई. मग मात्र बाप्पाना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला जाई. इकडे किनाऱ्यावर खोबरे, साखर फुटाणे , पपनस असा एकेकाचा प्रसाद वाटला जाई . त्यातील पपनस - खोबरं माझा आवडीचा प्रसाद होता. आई आणि आजी काही विसर्जनासाठी येत नसत कारण गणपती गेल्यावर घर नाही बंद करायचं. त्यामुळे खूप वर्षांनी शहरात जेव्हा गौरी-गणपतीना घरात ठेवून कुलुप लावून ऑफिस ला जाताना बघितलं तर खूपच आश्चर्य वाटलं.
दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी रात्री गांधी सदन मध्ये गणपतीसमोर कार्यक्रम असायचे . गावातल्या हौशी मंडळींनी बसवलेलं नाटक, कथाकथन, एकपात्री प्रयोग , छोट्या संस्थांची नाटकं ह्यातलं काही असे. हौशी मंडळींच्या नाटकांमध्ये prompter चा आवाज अगदी दुसऱ्या लाईनत पण ऐकू येई. कुणाला विचारावे "अरे तू तर नाटकात नाही दिसलास मग प्रॅक्टिसला का जायचास?" "अरे, मी प्रॉम्पटिंगला होतो" अशा बारीक गमती जमती चालत.
दीड दिवसांच्या गणपतीनंतर गौरींची तयारी. आमच्याकडे लाकडी स्टॅन्डवर , पितळेचे मुखवटे बसवलेल्या गौरी असत. त्यांना नाक डोळे काढायचे, साड्या नेसवायच्या , दागिने घालायचे, भारी मजा येई. शिवाय खड्यांच्या गौरी पण असत. त्यासाठी सकाळी आम्ही बहिणी सात गोटे/खडे गोळा करीत असू . ते म्हणे आजींच्या सासूबाईंनी की आजेसासूबाईंनी नवासात मागितले होते. म्हणून दोन प्रकारच्या गौरी. संध्याकाळी विहिरीवरून झांजा वाजवत गौरी आणायच्या. त्या आधी तोंडात पाण्याची गुळणी पकडायची (गौरी ना आणताना भांडण होऊ नये म्हणून असेल कदाचित कारण गौरी आणणाऱ्या दुर्गेच्या उपासक Happy ).
गौरीचं काही जास्त सोपस्कार नसत. इकडे गौरी विसर्जना बरोबर आमचीही परत जायची गडबड सुरु असे. त्या हव्या हव्याशा सहा-सात दिवसांना मागे टाकून आम्ही शाळा एक शाळा करायला परतीला लागत असू.
आता हे मी जरी भूतकाळात लिहिलं असलं तरी हे सगळं वर्तमानात अजूनही असचं चालू आहे. मध्यंतरी थोडं मोठ झाल्यावर आम्ही थोडा हट्ट करून बघितला नवीन मखर करूया, मूर्ती मोठी आणूया, तोच तोच काय प्रसाद दरवर्षी etc.etc. पण आजीपुढे काही डाळ शिजली नाही. कधी कधी गमतीने "रविवारच्या कहाणी " सारखं म्हणावसं वाटतं आमच्या (गणपती मधल्या) प्रत्येक गोष्टीला फार जुनी परंपरा आहे.
गेली सत्तर एक वर्ष तेच मखर (कपाटातील), तसाच गणपती (फक्त गेल्या वर्षीपासून Covid/ Lockdown मुळे काय फरक पडला असेल तो खरा, जसं धातूची मूर्ती )तेच प्रसाद आणि त्याच क्रमाने शिरा, मोदक- अळूवडी , नारळाची वडी , केळं , खोबरं-साखर . गौरींच्या त्याच साड्या , तेच दागिने, तसेच नाकडोळे रंगवणं जसाच्या तसं. घरात दहा माणस असू देत नाही तर दोघचं पण कुठल्याही गोष्टीत फरक नाही. दरवर्षी जिथं कुठं असेन तिकडून गणपती नंतर माझा पण तोच प्रश्न "झालं ना सगळं व्यवस्थित ??"
"गणपती बाप्पा मोरया!"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हा धागा सर्वांनी मिस केलाय.
>>>>>दुसऱ्या दिवशी गुरुजी अजूनच लवकर यायचे (चार-साडेचारला ) कारण आमच्या कडे सहस्त्र दुर्वावाहण्याचा नेम होता. आदल्या दिवशी गडी माणसांनी एक हजार दुर्वा काढून पाण्यात घालून ठेवलेल्या असायच्या. गणपतीचं एकेक नाम घेऊन (माझ्या माहिती प्रमाणे) एक सहस्त्र दुर्वा वाहायच्या
किती सुंदर.

हा धागा सगळ्यांनीच कसा मिस केला? किती सुंदर लिहिलं आहे.

असं बालपण आणि अशा आठवणी मिळालेल्या लोकांबद्दल मला किंचित असुया वाटते. मला यातील काहीच माहित नव्हतं. पण मला आजोळ असणं, सुटी/सण कोकण /गावामध्ये एन्जॉय करण या गोष्टी भलत्याच fascinating वाटतात. माबो वरील वेगवेगळ्या लेख/प्रतिसादात वाचुन मी मानसिक समाधान मिळवते. हे असे जुन्या आठवणींचे लेख मला अति आवडतात.

छान लिहिलाय हा लेख. अगदी मनाने त्या काळात आणि जागी पोचून. हा लेख दोनदा आलाय. आधी ललितलेखनात , मग गणेशोत्सवात. दुसर्‍या लेखावर काही प्रतिसाद आहेत. मी तेव्हा वाचला होता आणि मला हा लेख आवडलाही होता. प्रतिसाद द्यायचा राहून गेला.

शेवटी शेवटी आलेलं etc etc किंचित चव बिघडवून गेलं.

+१

धाग्यांच्या गुंत्यातून हरवलेला धागा वर काढल्याबद्दल आभार, किशोर.

किशोर मुंढे धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद!

तो एक मनातला हळवा कोपरा आहे, वाचताना मन, एक हळूच त्या काळातील गावची चक्कर मारून येत ( virtual reality) अगदी सगळे प्रसंग, माजघर, कोनाडे, माणसं, त्यांची बोलण्याची शैली, नैवेद्य , घमघमाट काही क्षणात परत अनुभवून येत.

शेवटी शेवटी आलेलं etc etc किंचित चव बिघडवून गेलं>>>>. लक्षात ठेवीन पुढील लिखाणासाठी.. लक्षात आणून देण्यासाठी धन्यवाद !

मीरा, हर्पेन, भरत, मनीमोहोर, हरचंद पालव सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

. हा लेख दोनदा आलाय. आधी ललितलेखनात , मग गणेशोत्सवात. >>> हो मला गणेशोत्सवात टाकायला सांगितलेला, म्हणून दोनदा आलाय.

आजोळ असणं, सुटी/सण कोकण /गावामध्ये एन्जॉय करण या गोष्टी भलत्याच fascinating वाटतात. माबो वरील वेगवेगळ्या लेख/प्रतिसादात वाचुन मी मानसिक समाधान मिळवते.>>>
हो धमाल यायची खरं.
उन्हाळ्यात अजून वेगळी गंमत असायची. काही लांबचे नातेवाईक ज्यांना गाव नाही ते पण यायचे कधी मधी. ते पण आठवण काढतात.

गणपती बाप्पा मोरया"
Submitted by किशोर मुंढे on 25 May, 2023 - 05:07 >>>>> किशोर मुंढे, धन्यवाद धागा वर काढल्या बद्दल!

सामो आणि हरचंद पालव धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल