वेगळा भाग - २६

Submitted by निशा राकेश on 6 September, 2022 - 08:11

हेमाच्या तोंडून रामच नाव निघताच जया उठू लागली. हेमाने तिला हाताला घट्ट धरून बसवलं .

“जरा थांबा , थोडा शांतपणे विचार करा , सर्व गोष्टी घडण्यामागे, प्रत्येक माणसाच्या कृतीमागे काहीतरी कारण असत , कोणी कोणला उगीच नाही त्रास देणार आणि ते देखील राम सारखी व्यक्ती तर अजिबातच नाही , तुम्ही स्वतःहून रामच्या अश्या वेगळ्या वागण्याचा विचार केलात का कधी ,कि एक गोष्ट समजली आणि तुम्ही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केल,कधी स्वत: हून त्याची भेट घेतली, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केलात , रागाच्या भरात फक्त स्वत”वर सूड उगवत राहिलात तुम्ही जयाताई ”

“म्हणजे तुला काय म्हणायचं , सर्व माहित असून देखील मी त्याच्या पुढे पुढे करायला हव होत , तिच्या सोबत राहू नकोस , मला सोडून देऊ नकोस अस म्हणून भिक मागायला हवी होती “

“अजिबात नाही , पण स्वतःला इतका त्रास करून घेण्यावेक्षा , निदान त्याच्याशी एकदा समोरासमोर बोलायला हव होत”

हे ऐकून जया शांत झाली कारण तिने इतकी वर्ष फक्त धुसफूस आणि आदळआपट केली होती , आणि त्या दिवशी तिच्या वागण्याचा कडेलोट होऊन तिने रामला चक्क घरातून हाकलून दिल होत .

हेमाच्या त्या बोलण्यानंतर जयाला तिच्या वागण्याचा खूप दिवसाने का होईना पश्याताप झाला ,

जया शांत झालेली पाहून , हेमा अजून थोडा धीर करून जयाला म्हणाली. “ एकदा जाऊन भेटायचं का रामला “

“अ .....” जयाला काय बोलाव हे सुचेना .

“जाऊन भेट घ्या त्याची एकदा , उद्याच जा हव तर “ हेमाने पुन्हा जयाला सांगून पाहिलं.

जया काही न बोलता उठून आत निघून गेली,

जयाला भेटून आल्यावर , तिच वागण पाहता राम कमालीचा अस्वस्थ होता , आपण मनाशी केलेला निश्चय , आपण त्यात जयाचा बळी दिला , आपण तिच्यावर अन्याय केला , अस त्याला राहून राहून सारख वाटत होत.

आई आणि चंदू गेल्यावर सुरुवातीच्या काही वर्षात म्हणजे झेंडूच्या लग्ना आधी पितृपक्षात त्यांची श्राद्ध घरात जेवण वैगेरे बनवून, कावळ्याला घास ठेवून अश्या नेहमीच्या पद्धतीने होत असत , पण झेंडूच लग्न झाल्यावर मात्र राम अश्या प्रकारे श्राद्ध न करता , दत्त मंदिरात दत्त जयंती निम्मित जेव्हा भिक्षेकरी रांगा लाऊन जेवणाची वाट पाहत बसायचे तेव्हा तो त्या भिक्षेकार्याना आई आणि चंदूच्या स्मृतीप्रित्यर्थ लाडू आणि चादर वाटप करी.

त्या दिवशी दत्त मंदिरात जरा जास्तच भिक्षेकरी होते , रामची नाही म्हटलं तरी लाडू आणि चादर वाटप करताना तारांबळ उडत होती ,अशोक होताच मदतीला , पण तरीही त्यांचे चार हात कमी पडत होते , हळू हळू सर्व भिक्षेकरी एक एक करुन जाऊ लागले , पण एक म्हातारबा मात्र लाडू आणि चादर घेऊन देखील तिथेच बसून होते , आधी काही वेळ रामने लक्ष दिल नाही , पण खूप वेळ हा इसम हालत का नाहीये , ह्याला काही होतंय का , म्हणून राम त्याच्या जवळ जाऊन त्याची चौकशी करायला वाकला तर पाहतो तर ते आबा होते , बायडाचे वडील , राम त्यांना काही क्षण पाहतच राहिला, ठिकठिकाणी कपडे फाटलेले, तोंड सुकून गेल होत, खूप दिवस ते अन्न-पाण्यावाचून असावेत अस वाटत होत.

“आबा, तुम्ही इथे , काय हि अवस्था” रामला त्याचं खूप वाईट वाटल.

आबा शून्यात नजर लाऊन बसलेले , रामचा आवाज ऐकताच त्याच्या कुडीत जणू प्राण आले , दोन क्षण त्यांना रामला ओळखण्यात गेले.

कोण , बाब्या , कसा हैस लेकरा “ आबा डोळे बारीक करून त्याला पाहत म्हणाले.

“आबा , तुम्ही अशा अवस्थेत इथे कसे काय , शंकर्या आणि दत्तू कुठे आहेत”

आबा विषन्न हसले , आणि थकल्या अंतकरणाने सांगाव तस ते राम शी बोलू लागले.

“बायडीच लग्न लाऊन दिल , घरात कामिवणारी एकटी माझी पोर , जिच्या संग एक सुखाचा सबूत बी नाय कधी बोल्लो म्या ,
ती घरातून गेली आन आमी भिकला लागलो, शंकर्या कामाला जात न्हवता , दत्त्या ल्हान , मला बी बसून खायची सय लागलेली , पण येळ पडली तवा मला कुठ काम करण बी झेपणा , शेवटी घर इकल, शंकर्या ने सारा पैका दारू आन जुगारात उडीवला, माझ काय बी पण ऐकल नाय , मागल्या वर्षी रेल्वे गाडीतून पडून मेला तो , लय कर्ज झाल होत त्याला , दत्तूला मावशी कड ठिवलाय , मला ना घर राहील, ना कोणी जवळच माणूस , म्हणून मग मिळल ते खातो , नशिबाच भोग, माझ्या बायडीचा तळतळाट लागला असल मला , तुमच्या दोघांचा बी गुन्हेगार हाय मी “ अस म्हणून आबा लहानमुला सारखे रडू लागले,

“बायडा कुठंय आता “ राम ने सर्व ऐकून त्यांना एकच प्रश्न विचारला.

“ माहित नाय , जीत्ती हाय का मेली ते बी माहित नाय, लय भाजली होती पोर, यकायकी तिचा नवरा तिला दवाखान्यातून घेऊन गेला, माजी भेट बी न्हाय होऊ दिली, तिच्या सासरी गेल्तो तर तिचा नवरा , तिला आणि पोराला घेऊन बेपत्ता झाल्ता, तिच्या सासरच्यांना बी त्या दोगांचा काय पत्ता नाय , तिच्या सासरच्यांनी मला आन बायडीला लय शिव्या घातल्या ,काय झाल ह्व्त काय माहित ,मला कधी बायडी न सांगितलं बी नाय , कुठ शोधू मी तिला , म्हटलं जाऊदे असेल तिथ सुखी असुदे देवा ” अस म्हणून त्यांनी वर आभाळाकडे हात जोडले.

रामला आता बायडीचा शोध घेण जवळपास अशक्य वाटू लागल, तिच्या सासरी देखील माहित नाही ते नवरा बायको कुठेत , ह्याची त्याला कमाल वाटली.

त्याने आबांना त्याच्या सोबत यायची विनंती केली, पण आबा अजिबात तयार न्हवते , आता माझ जे काही होईल ते इथच निळ्या आभाळाच्या खाली , पण राम ने त्याचं काहीही ऐकून घेतलं नाही , त्याने त्यांना बायडा ची शप्पत घातली तेव्हा ते उठले , राम ने आबांची सोय एका वृद्धाश्रमात केली, रामच्या मते बायडाच्या बाबतीत जे काही नकळत पणे त्याच्या हातून झाल , त्याच थोडफार प्रयचीत्त म्हणून तरी आंपण आबांकडे लक्ष दिल पाहिजे.

हेमाने थोड समजावल्यामुळे असेल किंवा काहीतरी आंतरिक ओढिनी असेल जया रामला भेटायला त्याच्या घरी गेली.

रामच सुंदर सजवलेलं घर ती पाहतच राहिली, प्रत्येक वस्तू नीट आणि जागच्या जागी लावलेली, जयाला नाही म्हंटल तरी थोडा हेवा वाटला , कारण इतक सुंदर घर तिला कधीच आवरता आल नसत.

दरवेळे प्रमाणे राम घरी न्हवता , पण घरात दादान्व्यातिरिक्त देखील आणखीन कोणीही नाही ह्याच तिला आश्चर्य वाटल,

खूप वर्षांनी ती दादांना भेटत होती तिने दादांना स्वतःची ओळख करून दिली , ते जास्त तिला ओळखत जरी नसेल तरी तिला पाहून त्यांना आनंद झाला, राम सतत कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना त्याच्याशी मन मोकळ करून बोलता यायचं नाही, त्यांना काही वेळेसाठी का होईना बोलायला एक माणूस मिळाल होत.

“चहा पिणार तू , थांब लगेच आणतो बनवून “ अस म्हणून दादा आत जायला वळले.

“नको दादा , खरच काही नको , मला सांगा घरातले बाकीचे कुठे गेले “

“ बाकीच कोण “

“म्हणजे राम आणि................ त्याची बायको “

“अग लग्नच केल न्हाय तर बायको कुठून येईल”

“तो नक्की इथच राहतो न तुमच्या सोबत “

“व्हय, इथच राहतो , आणखीन कुठ राहील”

जयाला कळत न्हवत , ह्याने जर बायडाशी लग्न केलंच नाही तर माझ्याशी हा खोट का बोलला, काय असेल कारण , जया मनातल्या मनात सर्व विचार करत असतानाच राम घरी आला.

“तू इथे “ राम ने काहीस घाबरूनच जयाला विचारल.

जया त्यांच्याकडे साशंक नजरेने पाहत होती

दादांसमोर त्याला काही बोलता हि येईना तो तिच्याकडे पाहतच आत निघून गेला , जया देखील त्याच्या पाठी गेली,

“तुला आवडलं नाही का मी इथे आलेलं. “ जया थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

“अग, अस का म्हणतेस , मला खूप बर वाटल तुला बघून” राम अजूनही तिच्याकडे पहायचं टाळत होता.

“अजूनही खोटच बोलणार आहेस का ?”

“खोट , काहीही काय बोलतेयस जया “

“ तुझ लग्न बिग्न काही झालेले नाहीये ना , मला दादांकडून कळल.”

राम काहीही न बोलता फक्त जमिनी कडे पाहत राहिला. .

“का बोललास खोट , अरे तुला मी नको होते तर सांगायचं ना , हे अस खोट बोलायची काय गरज होती , तुला माहित आहे राम , इतकी वर्ष मी फक्त स्वतःला दोष देत राहिले मला वाटल कि मी कुठेतरी कमी पडले, माझच प्रेम कुठेतरी कमी पडल असेल, माझ्यापेक्षा तीच प्रेम सरस म्हणून ती जिंकली , किती नशीबवान आहे ती , तीच प्रेम माझ्यापेक्षा खर निघाल, मी कुठे कमी पडले हेच मी इतकी वर्ष शोधतेय ,पण हाती काही लागल नाही , का केलस अस माझ्या सोबत , का खोट बोललास राम, सांग ना “

“कारण मला स्वतःला शिक्षा करून द्यायची होती , खूप चुकीच घडलय माझ्या हातून “ अस म्हणून राम खाली बसला आणि पाय पोटात घेऊन रडू लागला .

“म्हणजे , “

“मी फार चुकीचा वागलो बायडाशी , मला शिक्षा व्हायलाच हवी “

“काय बोलतोयस , काय झालंय बायडाला “

राम तरीही हि शांतच होता ,

“बोल राम , निदान आता तरी बोल , “ अस म्हणून जयाने त्याच्या खांद्याला धरून गदागदा हलवलं.

तसा तो भानावर आला, आणि कुठेतरी हरवून गेल्या सारखा बोलू लागला.

“ बारावीची परीक्षा संपली , सुट्या सुरु झाल्या , तू आत्याकडे गेली होतीस , त्याचवेळी दादा खूप आजारी पडले , जगतील की नाही इतके बरे न्हवते ते , डॉक्टरांनी हॉस्पिटल मध्ये दाखल करायला सांगितलं. मी वेड्यासारखा तिथेच बसूं राहायचो , खाण-पिण कश्यातच लक्ष नाही लागायचं , फक्त दादा बरे व्हावे, आई गेली , चंदू गेला, आता दादांना काही झाल तर मी अगदी मोडून पडलो असतो , ते माझा आणि झेंडूचा एकमेव आधार होते , त्यावेळेसच बायडाला तिथे आणल गेल , तिने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता , कशी बशी ती वाचली होती , मी भेटलो तीला जया , बोललो तिच्याशी , तिने कदाचित ना, मी तिला झिडकारल म्हणूनच जाळून घेतलं असेल , तिला बोलता आल नाही जास्त, पण मला सगळ समजत होत तिच्याकडे बघून , मी त्या दिवशी दत्त मंदिरात गेलो तिच्यासाठी प्रार्थना केली, डोळे बंद करून जेव्हा देवा पुढे उभा होतो तेव्हा सतत बायडाचा काळा ठिक्कर पडलेला चेहरा डोळ्यासमोर येत होता , तिच्या ह्या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत , तीच फार काही बर न्हवत तिच्या सासरी , तिची इच्छा होती मी तिच्याशी लग्न कराव, तिच्या मुलाला माझ नाव द्याव , ती सुखी न्हवती सुहास सोबत , आणि तिच्या बाजूने बोलणार देखील कोणीही न्हवत , त्यावेळी तिला माझाच आधार वाटणार ना , मी तिला समजून घ्यायला कमी पडलो , आणि मग तिने हा मार्ग निवडला , मीच आहे जबाबदार ह्या सगळ्याला म्हणून मग त्या दिवशी दत्त मंदिरातच निश्चय केला , आजन्म लग्न करणार नाही , बायडाला इतक दु:ख मी दिल मग मला सुखी राहायचा काहीही अधिकार नाही”

“अरे पण , तू स्वतःला जबाबदार का ठरवतोयस, हे बघ राम , माझ्याकडे बघ , तू काहीही केलेल नाहीयेस , तिने आत्महत्तेचा प्रयत्न केला , पण त्याला तिचा नवरा आणि तिच्या घरचे जबाबदार आहेत तू नाहीस” जया त्याला कळकळीने सांगू पाहत होती.

“नाही जया , ती माझ्याकडे आली होती , मी झिडकारल होत तिला , त्या दिवशी माझ्यासोबत शरीराने पण एकरूप व्हायचं होत तिला , मी तिला त्यावेळी दूर ढकल , आणि त्याच क्षणी तुझ नाव निघाल होत माझ्या तोंडून , ह्याच गोष्टीचा, हो बरोबर ह्याच गोष्टीचा त्रास झाला असणार तिला, म्हणूनच मग तिने ......”

रामला कस समजवावं हे जयाला समजत न्हवत ,

“ ठीक आहे , आपण शोधू तिला दोघ मिळून शोधू मग तर झाल”

राम ने स्वतःला सावरल , जयाकडे खिन्न पणे पाहत तो म्हणाला.

“तुला काय वाटत , मी नसेल हे केल , दादा जेव्हा बरे झाले तेव्हा त्यांना घेऊन घरी जाण्याआधी मी गेलो होतो तिच्या वार्ड मध्ये तेव्हा ती न्हवती तिथे , तिचा नवरा घेऊन गेला होता तिला , ती पूर्ण बरी देखील झाली न्हवती , तरीही तिला तो घेऊन गेला , दुसर्या दिवशी तिच्या घरी गेलो , तर त्यांनी घर विकल होत आणि काही दिवसांपूर्वी मला तिचे वडील भेटले , भिक मागत होते मंदिरा बाहेर ,आता माझी माफी मागतायेत, आता काय फायदा , तेव्हा तर हलकलून दिल होत , आणि त्यांना देखील त्यांची सख्खी मुलगी कुठंय हे माहित नाही , तिचा नवरा तिला आणि मुलाला घेऊन बेपत्ता झाला , तिच्या सासरी देखील दोघांचा काही तपास नाही ,”

“अरे मग झाल तर , तू नकोस इतका विचार करू , नको स्वतः ला अशी उगाच शिक्षा करून घेऊस, असेल ती बरी आणि तिच्या नवर्यासोबतच आहे ना , हे बघ राम तब्बल दहा वर्षांनी आपण कर्मधर्म संयोगाने पुन्हा भेटलो ह्या मागे देखील काहीतरी कारण असेलच ना , इतकी वर्ष झाली तरीही मला तुला विसरता आलेलं नाही , मी कोण्या दुसर्या माणसाचा विचार देखील करू शकत नाही”

“अस करू नकोस जया , तुझ्यापुढे तुझ अख्ख आयुष्य आहे , हे माझे भोग आहेत आणि मलाच भोगायला हवेत , कृपा कर माझ्यावर आणि निघून जा इथून “ राम चक्क तिच्यासमोर हात जोडून म्हणाला.

“ठीक आहे राम , तुझी हीच इच्छा असेल तर आता जाते मी , एक सांगायचं होत काही महिन्यापुर्वी माझ्या लग्नासाठी सतत घरातून बोलणी चालू होती , म्हणून मी संस्थेला अर्ज करून माझी पुण्याला बदली मागून घेतली होती ,दोन दिवसापूर्वी त्याचं मला उत्तर आलंय, आता माझा हा शेवटचा प्रयत्न , पुन्हा नाही मी कधीच काही करणार , तुझ्याकडे फक्त चार दिवस आहेत , चार दिवसात काय ते ठरव, नाहीतर मी एकदा तिकडे गेले कि पुन्हा तुझ तोंडही आयुष्यात पाहणार नाही ,आणि तुझ्याच प्रमाणे मी देखील आयुष्यभर अविवाहित राहील. “

अस म्हणून जया उठली आणि सरळ घराबाहेर पडली. तिला गेलेलं बघून दादा आतल्या खोलीत आले , राम तसाच बसून होता ,

“बाब्या ,” दादांनी रामला हाक मारली.

राम ने लगेच स्वतःला सावरल ,

“दादा , काही नाही थोड भांडण झाल आमच , पण सगळ ठीक आहे तुम्ही उगीच काळजी करू नका”

“ऐकलं मी सगळ तुमच बोलन , तुझ्या आणि तिच्या बी आविष्याचा विचार कर बाबा, सुखी व्हाल दोघ “

ह्यावर राम काहीही बोलला नाही ,

तीन दिवस गेले , आता उद्याचा शेवटचा दिवस उद्या जर राम आला नाही तर .......जयाला विचार देखील करवेना,

हेमा , विजयदादा तिला धीर देत होते , सुशीलाबाईना हि आता सर्व काही समजल होत , पण जयाच्या निश्चयापुढे त्या हतबल होत्या ,

चौथा दिवस उजाडला , संध्याकाळ होऊन रात्र देखील झाली , पण राम नाही आला ,जड मानाने उठून जया सामान बांधू लागली.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users