वेगळा भाग - २५

Submitted by निशा राकेश on 2 September, 2022 - 22:47

तिचा ओढलेला चेहरा , लग्न होत म्हणून बळजबरीने आईने गळ्यात घालायला एक चैन आणि कानातले दिले होते , फक्त तेवढेच अंगावर , राम काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला.
जयाला देखील काय बोलाव हे कळल नाही ती देखील गांगरल्यासारखी त्याला नुसती पाहत उभी राहिली, रामच्या मागून एक माणूस त्याला जवळपास ढकलत निघून गेला त्याच्या धक्क्याने तो जयाच्या अंगावर पडता पडता सावरला, दोघेही भानावर आले .

“एकटाच आलास “ जयाच्या तोंडून पाहिलं वाक्य निघाल.

रामला काही कळल नाही आणखीन कुणाला आणायला हव होत , झेंडूला कि दादांना,

“दादांना आता जमत नाही जास्त फिरायला , आणि झेंडूच तर लग्न झाल गेल्या वर्षी “ राम काहीशी जया पासून नजर चोरत बोलत होता .

“आणि ती नाही आली “ जया ने त्याच्याकडे एकटक पाहत विचारल , खूप दिवसाने ती रामला पाहत होती , त्याच्यात काही बदल झाला न्हवता .अजूनही तसाच, तिच्या मनात आल देखील लग्न झाल्यावर पुरुषांची पोट सुटतात , ह्याच अजून अस काही नाही , टक्कल देखील नाही अजूनही तसेच आहेत भुरभुरणारे केस.

“ ती कोण “ राम ने तिची तंद्री मोडली.

“आणखीन कोण , बायडा बद्दल बोलतेय मी “ जयाने वाक्य पूर केल.

रामच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, काही वर्षांपूर्वी आपण हेच तर सांगितलं होत विजयला , रामने स्वतःला सावरल.

“हो नाही आणल तिला , म्हटलं येऊ लगेच जाऊन ” राम ने सारवासारव केली.

“कसा आहेस , “ जयाने पुन्हा रामकडे एकटक पाहत विचारल.

“बरा आहे मी , पण तू अशी का दिसतेयस? “

“कशी दिसतेय , जगतेय, जेवतेय , काम करतेय , छानच तर आहे मी “ जया काहीश्या दुखावल्या स्वरात म्हणाली.

“नाही वाटत छान, एक व्यक्ती आयुष्यातून गेली, म्हणून आयुष्य संपत नसत कधी जया “ राम ने काहीतरी बोलण्याचा प्रयन्त केला.

“तुझ संपल का आयुष्य, पुन्हा आलीच ना ती तुझ्या आयुष्यात , कि तू गेलास पुन्हा तिच्याकडे , माझा एकदाही विचार करावासा वाटला नाही , तू संपवलं का ते बायडा सोबतच नात , तीच लग्न होऊन देखील झालात ना पुन्हा एक, दुसर्यांना सांगण फार सोप असत , पण प्रत्यक्षात आपण मात्र ते कधीच करू शकत नाही , तू मला फसवल वैगेरे अस काही मी म्हणणार नाही राम , कारण माझ प्रेम हे सुरुवातीपासून एकतर्फीच होत , तू कधी माझा झालाच नाहीस , मी फक्त एक पर्याय होते तुझ्यासाठी बायडा तुला सोडून गेली होती म्हणून , जेव्हा ती परत आली तेव्हा माझी गरज संपली, काय झाल असेल माझ, साधी चौकशी देखील करावीशी वाटली नाही तुला , जया जिवंत आहे कि मेली काही देण-घेणच नाही” इतक्या वर्षाचा राग जयाच्या तोंडून बाहेर पडत होता , अखेर ती थांबली आणि रडू लागली , आजूबाजूचे लोक तिच्याकडे पाहत होते पण तिला कसलीच पर्वा न्हवती, रामने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या समोर धरला . पण ती तशीच रडत त्याच्या समोरून निघून गेली.

जयाच्या अश्या अवस्थेला तोच जबाबदार होता हे त्याला माहित होत , पण त्याला अजूनही जयाने अस राहू नये लग्न करून सुखी व्हाव अस वाटत होत , जयाला ह्या अश्या जगण्यातून बाहेर काढायचं , तिला पुन्हा कविता करायला लावायच्या , स्वछंदी जगायला शिकवायच , स्वता:वर प्रेम करायला शिकवायचं , पुन्हा तिला पहिल्यासारख बनायला भाग पडायचं, अस त्याने ठरवलं तो लग्नातून बाहेर न पडता विजयला भेटला , रामला बघून विजय प्रचंड खुश झाला मागच सर्व विसरून त्याने रामला कडकडून मिठी मारली ,हेमाला त्याची ओळख करून दिली , सुशीलाबाईना देखील तो भेटला.

ज्या दिवशी जयाने रामवर लिहिलेल्या सर्व कविता फाडून टाकल्या , त्या दिवसापासून आजतागायत तिने एक देखील कविता केली न्हवती , पण त्या दिवशी लग्नात जेव्हा राम दिसला तेव्हा तिला स्वत:च दुख व्यक्त करायला कवितेचा आधार घ्यावासा वाटला. तिने कविता खरडली आणि वही तशीच उशाशी घेऊन ती झोपी गेली,

विजयने रामला घरी येऊन भेटून जायचं निमंत्रण दिल होत, रामला देखील जयाशी बोलायचं होत , साहजिकच रात्री काम संपवल्यावर उशिरा त्याला सवड मिळाली , घरी गेल्यावर त्याला कळल दोघे नवीन लग्न झालेले जोडपे गावी देवदर्शनाला गेलेत , सुशीलाबाई आणि जया दोघीच घरात होत्या , सुशीला बाईनी रामच मनापासून स्वागत केल, पण जया मात्र त्याच्याशी चकार शब्दही न बोलता मागच्या अंगणात निघून गेली.

तो एकटाच रिकामा बसून काय करणार, समोर टीव्ही सुरु होता पण त्याच लक्ष न्हवत , त्याने इकडे तिकडे नजर फिरवली तर त्याला शेजारच्या टेबलावर एक वही दिसली साहजिकच ती जयाची कवितेची वही होती ,
आणि त्यावर तिने त्या दिवशी लिहिलेली कविता ,

बाकी काही नाही करावं लागत

एखाद्याला मनातून साफ उतरवून टाकलं की झालं...
मनाला लागलेली टोचणी सहन केली झालं..
बाकी काही नाही करावं लागत

कशाला हवीत नको ती दुखणी सतत आपल्या ओंजळीत
काळीजच काढून टाकलं की झालं
बाकी काही नाही करावं लागत.

दुःख दडवल की झालं .. पाणी आटवल की झालं ..
स्वतःची प्रतिभा लौकिकदृष्ट्या अढळ ठेवली की झालं..
बाकी काही नाही करावं लागत..

तरीही भीती वाटते .. सहानुभूतीची
प्रेमळ स्पर्शाला लगडलेल्या अविश्वासाची..
दुर्बलता असली तरीही जगत राहिली की झालं..
मुळात स्वतःच स्वतःला फसवत राहील की झालं
बाकी काही नाही करावं लागत...

कविता वाचून त्याने वही बंद केली, त्याला माहित होत जया मागच्या अंगणातच असणार , पण तरीही त्याने सुशीलाबाईना जया कुठेय अस मुद्दाम विचारल , तिच्याशी जाऊन जरा बोलत बसतो अस म्हणून तो मागच्या अंगणात गेला,

जया बाहेर पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात काहीतरी वाचीत बसली होती, तिच्या डोळ्यांना ताण येत होता तरीही ती तशीच अक्षरांवरून नजर फिरवत बसून होती.

“इतका डोळ्यांना ताण देशील तर अजून जाड भिंगांचा चष्मा लागेल” राम तिच्या जवळ बसत म्हणाला.

“चांगल आहे कि , माझ्या कुरूपते मध्ये आणखीन भर “ जया पुस्तकामधून डोकही न उचलता म्हणाली.

“ अस कोण म्हणाल, चष्म्यामुळे माणूस कुरूप दिसतो, उलट काही माणस खूप अभ्यासू आणी विचारी दिसतात”

“ असेल , मला नाही माहित ” जया त्याच प्रत्येक बोलण उडवून लावीत होती.

“ बर राहील , मग काय कस चालू आहे काम , मजा येतेय ना शिकवायला शाळेत” रामने विषय बदलत विचारल .

“दुसर आहे तरी काय आयुष्यात , “ जयाचा सूर काही बदलत न्हवता .

“का , कविता करण बंद केलयस का “

“तू आयुष्यातून गेलास , आणि ........”

“अस काही नसत जया, मी काय बोलतोय हे नीट ऐक” राम तिला मधेच तोडत म्हणाला.
“तू का मला समजावतोयस, मी तुला अडवलं , मला सत्य समजल्यावर कधी तुझ्या समोर तरी आले , तुला तुझ हक्काच माणूस मिळाल ना , मग तुला काय करायचं , मी कविता केल्या काय आणि कशीही राहिले काय, जगू दे मला माझ माझ”
“जया , तुला आता काही नाही वाटणार , पण हे अस आयुष्यभर राहण , म्हणजे स्वतःवर अन्याय करण आहे , आणि ह्याला मी जबाबदार आहे हि गोष्ट मला स्वस्थ बसू देत नाहीये”
“मग नको राहू स्वस्थ , सोडून दे ना त्या बायडाला आणि कर माझ्याशी लग्न , जमणार आहे , शक्य तरी आहे , नाही ना , मग मला तत्वज्ञान शिकवू नकोस”

“जया , तुला का समजत नाहीये”

“कारण मला नाही काही समजून घायचय,” अस म्हणून ती जोरात ओरडली.

त्या आवाजाने सुशीला बाई तिकडे आल्या , “राम, तू जरा आत येतोस का “ त्या शांतपणे म्हणाल्या.

आता ह्यांना काय उत्तर द्याव अस मनाशी विचार करतच तो आत निघून गेला.

“काय झाल , तिला तू लग्नाबद्दल काही समजवत होतास का “ सुशीलाबाई नी राम ला लगेचच प्रश्न विचारला.

राम ला काय बोलाव हे सुचेना त्याने होकार दिला .

“अरे नको बाबा , लग्नाच नाव काढल तरी ती चवताळते, घरातून निघून जाईन अशी धमकी देते काय कराव हे सुचत नाही”

तेवढ्यात जया आत आली , आईला त्याच्याशी बोलताना पाहून तिला आणखीन चीड आली . तिला वाटल राम आणि आई पुन्हा आपल्या लग्नाच्या विषयावरून बोलतायेत म्हणून ती सरळ रामला “ आताच्या आता घरातून चालता हो “ म्हणाली.

सुशीला बाई तिला ओरडल्या , पण ती इतकी चिडली होती कि, राम तिला आणखीन त्रास होऊ नये म्हणून तिथून लगेचच निघून गेला.

काही दिवसाने विजय आणि हेमा गाववरून आले , सुशीलाबाई नी घडलेली सर्व हकीकत त्या दोघांना सांगितली, हेमाने आधी सर्व शांतपणे ऐकून घेतलं , आणि मनोमन जयाशी बोलायचं ठरवलं. पण त्या आधी राम हि व्यक्ती कोण आहे ह्याची विचारपूस तिने विजयकडे आणि तिच्या भावाकडे केली ,
दोघांकडून राम हा एक अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि एक सुस्वभावी मुलगा असल्याच तिला समजल , मग त्याने जया सोबत अस का केल असाव ह्याचा अंदाज तिला लावता येईना,

विजय सोबत बोलून तिने रामच्या घरी जाऊन याव अस सुचवलं , त्यासाठी विजय अजिबात तयार न्हवता,

“काय करायचं त्याच्या घरी जाऊन , त्याची बायको आणि संसार बघायचा, जयाची हालत पाहता मी रामला जरी माफ केल असल तरी त्याचा संसार काही मी पाहू शकणार नाही , काही झाल तरी मला अस वाटत राहील कि हे सगळ माझ्या जयाच झाल असत, तिकडे त्याची बायको वैगेरे भेटेल नकोच ते “

“ तुमच्या भावना मी समजू शकते, पण तुम्हाला वाटत ना जयाताईनी ह्यातून बाहेर पडाव, लग्न कराव , चारचौघी न सारखा संसार करावा मग त्यांच्यासाठी प्लीज तुम्ही नाही म्हणू नका”

“ पण हेमा , रामच्या घरी जायचा आणि जयाच्या लग्नाचा काय संबंध”

“आयुष्यात काही गोष्टी बदल्याच्या असतील तर त्यांच्या मुळाशी जाव लागत ,”

“बरोबर आहे तुझ हेमा , आणि मी गेलो होतो त्याच्या घरी , जेव्हा त्याने नुकतच आमच्याशी संबंध तोडले होते , तो काहीही सांगायला, बोलायला तयार न्हवता , उलट तू जयालाच विचार अस मला म्हणाला, आणि जयाने जेव्हा तो पुन्हा बायडा सोबत राहतोय अस ऐकल तेव्हा ती वेड्यासारखी वागू लागली होती , मी तिला कस सावरल हे माझ मलाच माहित , कवितेची वही काय जाळून टाकली, एकटी राहू लागली, नेहमी हसत खेळत असणारी माझी बहिण हि अशी एकाएकी बदलली, काही दिवसांनी मी पुन्हा त्याच्या घरी जाणार होतो पण जयाने मला शप्पत घातली , आणि जाण्यापासून अडवलं , काय करणार मी , कधी कधी वाटत तिच्यासाठी काय करू जेणे करून हि पुन्हा पहिल्यासारखी होईल, हसेल , घडाघडा बोलेल, “

“ तुम्ही नका चिंता करू , मी जयाताईशी बोलते” हेमाने विजयला आश्वासन दिल.

“बघ निदान तुझ्यासमोर तरी बोलली तर ठीक”
त्या दिवशी जेवण झाली जया आणि हेमा मागची सर्व अवरा-आवर करीत होत्या , जया निमुटपणे भांडी घासत होती एकही शब्द न बोलता , हेमा लग्न होऊन आल्यानंतर जया तिच्याशी देखील कधी हसून बोलली नाही, कि मनसोक्त गप्पा मारल्या नाहीत , हेमाला तिच्या वागण्या मागच कारण माहित होत , पण तिला बोलत कस करायचं , काय कराव म्हणजे ती आपल्याला तिची मैत्रीण समजेल आणि आपल्यासमोर तीच मन मोकळ करेल, बोलायला सुरुवात करायची कशी, ह्या विचारात असतानाच तिला आठवलं विजयने तिला सांगितलं होत जया सुंदर कविता करायची , ह्याच संदर्भात तिने बोलायचं ठरवलं.

हेमा भांडी धुवत असतानाच स्वतः शी हसू लागली , जयाने आधी लक्ष नाही दिल, पण पुढच्या काही क्षणातच ती थोड अजून मोठ्याने हसू लागली, तेव्हा जयाने चमत्कारिक पणे हेमा कडे पाहिलं ,
“ काही नाही , काहीतरी आठवल म्हणून हसले “ अस म्हणून हेमाने तीच हसू दाबल, पण तिला पुन्हा हसू आल,

“आता काय “ जया ने विचारल.

“काय आहे ना जयाताई , आमच्या वर्गात ना एक मुलगा होता , रवी नावाचा , त्याला ना धड मराठी वाचताच यायचं नाही, फार वेगळे शब्द उच्चारून तो कविता वाचायचा , सर्व शिक्षक हसायचे, शिकवण बाजूला राहायचं आणि त्याच्याच शब्दांवर सर्व वर्ग हसत राहायचा , एकदा मराठीच्या तासाला एक नवीन बाई आमच्या वर्गावर आल्या , त्यांना संपूर्ण वर्गात एकटा रवीच सापडावा , कविता होती “एक तुतारी , द्या मज आणुनी “ रवी ने सरुवात केली , आणि सुरवात केली तर काय “ एक मुतारी................” बाप रे सर्व वर्गाची हसून हसून मुरकुंडी उडाली , हे सांगताना हेमा पुन्हा गडगडाटी हसू लागली, जयाला हेमाच्या त्या विनोदवर काही हसू आल नाही पण हेमाला तस हसताना पाहून मात्र तिला देखील हसू आल , ती तोंडावर पदर ठेऊन हसू लागली,
“रवीच कविता वाचन म्हणजे एक मोठा विनोद घडायचा संपूर्ण वर्गात, पण काही काही कविता असतात पण थोड्याश्या हास्यास्पद , नाही का ताई “ हेमाने संभाषणाची साखळी तुटू नये म्हणून काहीतरी म्हटलं.

“कविता , आणि त्या देखील हास्यास्पद , नाही अजिबात नाही , प्रत्येक कवितेला तिची एक भाषा असते , तिची भावना असते , आणि प्रत्येक जण आपापल्या कुवती प्रमाणे तिचा अर्थ लावत असतो ” हेमाने पहिल्यांदा इतक मोठ वाक्य जयाच्या तोंडून ऐकल.

“अरे व्वा , खूप छान बोललात तुम्ही जयाताई , मला ना कविता कधीच समजलीच नाही , म्हणजे कदाचित समजली हि असती पण मला आवडच न्हवती कधी कवितेची , तुम्हाला खूप आवडतात वाटत कविता , तुम्ही केलीये कधी कविता”

जयाने शांतपणे होकार दिला .

“काय , मग ऐकावा ना मला एखादी” हेमा लहानमुलाप्रमाणे सावरून बसली.

“नको , कविता करण बंद केल मी , “ अस ती म्हणल्या नंतर तिच्या नजरेसमोर राम आला , त्याच्यावर केलेल्या कविता जाळून टाकल्या नंतर एकही कविता न करणारी जया तो इतक्या वर्षांनी जेव्हा दिसला तेव्हा मात्र तिने तिच्याही नकळत कविता केली होती,

हेमा काही बोलली नाही , पण जयाला मात्र वाईट वाटल , म्हणून , फक्त तुझ्यासाठी हा हेमा अस म्हणून एक कविता तिने तिथल्या तिथे रचली .

एकांत

हवा मज एकांत
बेबंध, धुंद, आणि शांत

स्व:ताचीच ओळख नव्याने करण्यास,
भूतकाळच्या जखमेवर खपली धरण्यास .

जगापासून अलिप्त होण्यास,
स्वता:च्याच कोशात लुप्त होण्यास.

अंतर्मुख झालेल्या मनाला टोचणी घडलेल्या चुकांची,
समजुतीची झालर फाटक्या दु:खाची.

करून टाकावा निचरा कोरड्यामनाने,
पुन्हा नवीन भवितव्यासाठी.

कविता ऐकून हेमा एकटक जयाकडे पाहत राहिली.

“काय झाल , अशी का पाहतेयस” जया ने हेमाची तंद्री मोडली.

“मग का करत नाही तुम्ही ताई “ हेमाने जयाला अचानक प्रश्न विचारला.

“काय, करत नाही मी “जयाने आश्चर्यचकित होऊन हेमाला विचारल.

“करून टाकावा निचरा कोरड्या मानाने , पुन्हा नवीन भवितव्यासाठी.” हेमाने तिच्याच कवितेची ओळ तिला ऐकवली.

“ मला समजल नाही, कश्याबद्दल बोलतेयस तू “जया अजूनही संभ्रमात होती .

“ ज्याच्या बद्दल इतका राग ठेऊन आहात ना , त्या बद्दल बोलतेय मी “ हेम चा स्वर ठाम होता.

“मी नाहीये कुणावर राग ठेऊन “

“ जया ताई , मी राम बद्दल बोलतेय “

क्रमश :

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागील बरेच भाग वाचायचे राहिलेत. ते वाचून प्रतिसाद देते.
तुम्ही खंड न पाडता लिहीत आहात. कौतुक वाटते.

छान लिहिलय
पण रामने वस्तुस्थिती का नाही सांगितली हा प्रश्न पडला.

छान लिहिलेय . आशा आहे की पुढच्या भागात जया चा रामबद्दलचा गैरसमज दूर होईल . काहीतरी चांगले घडू दे राम च्या आयुष्यात !!

सुंदर
एवढ्या उशिरा सुद्धा एक नवीन पात्र कथानकात हळुवार पणे गुंतवलत.. खूप छान

@आबा
प्रत्यक्ष आयुष्यात ही अशी माणस पाहिलीत आहेत ज्यांनी स्वतःला त्रास करून आपल्या माणसापासून सत्य लपवलं, का तर फक्त त्यांचं आयुष्य गोड व्हावं म्हणून; पण तस करण किती चूक होत हे नंतर कळत.

असो लेखकीने राम पात्र हे सुरुवतीपासूनच तशा प्रकारे घडवलं आहे.

बघुया पुढे काय होत ते