मैत्रीण.

Submitted by केशवकूल on 2 September, 2022 - 01:09

बऱ्याच दिवसांनी तिला मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते.
इतकं पाणी कि महापूर. त्या पाणलोटात पूल वाहून गेला होता.
किती वर्षं झाली असतील? तिनं कधी पूल ओलांडला नव्हता. पूल ओलांडायची गरज नव्हती. तिची जिवाभावाची मैत्रीण! ती कायम तिच्याबरोबर असायची. शाळेत कॉलेजात. मनसोक्त गप्पा. लोक म्हणायचे, “हिला वेड लागलेय. स्वतःशी बडबडत असते.”
गप्पांचा विषय एकच. कविता. क़्वचित कथा. तिनच तिला ती डायरी वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती.
“आता लिही कविता. या डायरीत. अगदी मनसोक्त लिही. तुझ्यामधील लेखकरुपी पक्ष्याला, घेऊ दे साहित्यगगनामध्ये भरारी. मुक्त कर त्याला पिंजऱ्यातून.”
अशी ती वेड्यासारखी लिहित सुटली. मैत्रिणीला कथा ऐकवत राहिली.
“ए, तू ह्या कवितांचा संग्रह प्रसिध्द कर ना.”
“नाही ग बाई. ह्या फक्त तुझ्यामाझ्यासाठी.”
आणि मग तो भेटला. ती हरखून गेली. त्याच्या सहवासात तिने स्वतःला झोकून दिले. अनोख्या परीकथेत.
स्वतःला हरवून बसली.
तिची मैत्रीण कधी सोडून गेली समजलच नाही. पुलाच्या पल्याड.
मग लग्न झाले. त्याच्याशीच. त्याच्या शिवाय जगणे अशक्य होते. तेव्हा.
मुलगा झाला.
अशी ती गुरफटत गेली. गुरफटण्याचे दिवसही सरले.
मुलगा नोकरीला लागला.
नवरा मोठा ऑफिसर झाला होता.
आता ती निखळ एकटी झाली होती.
काहीतरी हरवले होते. काय हरवले होते ते समजल्या शिवाय शोधणार कसं? कुठल्या कप्प्यात दडून बसलं होतं?
आणि आता तिची मैत्रीण परत आली होती.
अस्तित्वात नसलेला पूल ओलांडून.
“ओळखलस का मला? ही तुझी डायरी बघ. हीच शोधात होतीस ना? आठवलं काही?”
आधी ओळखलं नाही पण त्या कवितांच्या वहीनं आठवण करून दिली.
हरवले होते ते गवसले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबा. पल्लू
आभार
मला खरतर कथा शंभरी लिहायची होती. पण लक्षात आल्रंं कि शंभर शब्द अपुरे पडणार आहेत मग काय
"तुझ्यामधील लेखकरुपी पक्ष्याला, घेऊ दे साहित्यगगनामध्ये भरारी. मुक्त कर त्याला पिंजऱ्यातून."
अशी कथा झाली.

रिलेट झाली कथा ..
छान लिहिलीयं ...
लग्नाआधी काही डायऱ्यां मध्ये कथा लेख लिहिलेले होते ... आईने , बहिणीने सगळ्या एकजागी कपाटात डायऱ्या जपून ठेवलेल्या ... माहेरी गेली असता आणल्या सगळ्या उचलून मोठ्या कौतुकाने .. आता माझ्या घरी कुठे लपल्यात काय माहित ... शोधायला लागतील ..!

एकंदरीत डायरीच सोबतीला....
भयाण एकांत शेवटी....मुलांना त्यांची उमेद बोलावते ते वृद्धांसाठी घरी बसून शकत नाहीत. ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी अलगद, नकळत जाते.