जीर्ण जाहली पाने आता

Submitted by निशिकांत on 25 August, 2022 - 09:18

जीर्ण जाहली पाने आता

आठवणीच्या डायरीस मी
चाळतोय नेमाने आता
माझ्या सार्‍या त्या कवितांची
जीर्ण जहली पाने आता

नभांगणातिल लक्ष तारका
शब्दबध्द मी केल्या होत्या
तारुण्यातिल सुखदु:खांच्या
भाव भावना विणल्या होत्या
जगा नकोसे चलनातुन जे
बाद जाहले नाणे आता
माझ्या सार्‍या त्या कवितांची
जीर्ण जहली पाने आता

आर्घ्य द्यावया पाणी नाही
पाण्याचे दुर्भिक्ष्य एवढे!
श्रावणधारांच्या कवितांचे
तरी न तेथे कुणा वावडे
हास्य फुलवण्या आभासाचे
जरूर आहे लिहिणे आता
माझ्या सार्‍या त्या कवितांची
जीर्ण जहली पाने आता

मी सुरकुतलो पण कवितांची
जुनी झळाळी कायम आहे
आयुष्याची सांज तरीही
कळ्या फुलांचा मोसम आहे
सरेन कवितांच्या दरबारी
परतुन नाही जाणे आता
माझ्या सार्‍या त्या कवितांची
जीर्ण जहली पाने आता

आज अचानक पूर्व दिशेला
दिसू लगली केशर लाली
मळभ संपले, रात्र संपली
प्रभात किरणे हसली गाली
नव्या युगाचे सळसळणारे
लिहीन म्हणतो गाणे आता
माझ्या सार्‍या त्या कवितांची
जीर्ण जहली पाने आता

निशिकांत देशपांडे, पुणे.  
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान