शेरदिल : द पीलीभीत सागा- नरो वा शार्दुलो वा- वाघ का माणूस

Submitted by अस्मिता. on 23 August, 2022 - 20:35

(#स्पॉयलर्स असतील)

न सके तो सुन मन गुंज
हो अलख जगा मन
स्वयं स्वयं में

मन मुस्कावे जिव भूलकावे
पीको प्रेम ज़रे
लाज ना लागी हां जो जागी
बदली जे ही घडी

मोह में बांधे
सधे ना साधे
चुलबुल चित धरे

माया खेला है अलबेला
खुल खुल खेल करे

मन अंतर तू जा ढूंढ
सुन सके तो सुन मन गुंज
हो अलख जगा मन
स्वयं स्वयं में

https://youtu.be/GuuOrsKoJWY

अरे मुठ्ठी मुठ्ठी बोइदे
मुठ्ठी मुठ्ठी बोइदे
अरे मुठ्ठी मुठ्ठी बोइदे बीजा
अरे माटी मांगे बूटा
बोइदे रे भैया
अरे बूटा बूटा बोइदे उगाइदे
रे भैया

बूटा बूटा उगने दे रे
बूटा बूटा उगने दे
भूमि अपनी मांगे रे
मांगे उसके गहने रे

पत्ता पत्ता बूटा बूटा
जंगल जंगल रहने दे
जंगल मांगे धुप पानी
धुप पानी बहने दे.

https://youtu.be/f0JfvWsY7k0

आताच शेरदिल :द पीलीभीत सागा बघितला नेटफ्लिक्सवर. तुकड्यातुकड्यांतल्या विचारांचा वर्षाव झाला. दिशाहीन भरकटीतून योग्य मार्ग जरी सापडला नाही तरी निदान अयोग्य मार्गाची जाणीव होते असा काहीसा प्रवास हा सिनेमा बघताना होतो. कथाबीज सत्यघटनांवर आधारित आहे. गरीब शेतकरी, विषमता, गरिबीला कंटाळून केलेल्या आत्महत्या हा विषय काही आपल्याला नवीन नाही. उलट अशा दुर्दैवी घटना वारंवार कानावर पडण्याने आपल्या पांढरपेशा मनाने एक षंढकवच निर्माण केलेय, त्यामुळे 'मुव्ह ऑन' व्हायला, पुस्तकाचे पान उलटण्याइतकाच वेळ लागतो. हे लक्षात आल्याने की काय दिग्दर्शकाने( श्रीजीत मुखर्जी) त्याचा फोकस जनजागृती न ठेवता, 'माझ्याकडे एक कथा आहे आणि माझ्याकडे 'पंकज त्रिपाठी' सुद्धा आहे, बघा जमलं तर !' टाईप अप्रोच ठेवलाय.

सिनेमात तीनच पात्रं महत्वाची आहेत: जंगल, गंगाराम आणि प्रतिक्षा. 'गंगाराम' हा झुंडवा गावाचा सरपंच पंकज त्रिपाठीने अचूक पकडलाय. त्याची गावाची गरीबी घालवण्याची कळकळ खरी वाटते, पण तो स्वतःही त्यांच्यापैकीच एक आहे. गावातली तरूण मुलं विषारी बोरी खाऊन जीव देत असताना, आपण यांचा नेता म्हणून काय करू शकतो या विचारांनी तो अस्वस्थ आहे. त्याचं व्यक्ती म्हणून महान कार्य करून लोकांच्या कायमचं स्मरणात रहायचं देखिल स्वप्न आहे. तरीही त्याचा गंगाराम म्हणून वावर कुठेही आत्मविश्वासू, साहसी, नेतृत्वगुण असलेला वगैरे वाटत नाही त्यामुळे सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हे बघताना त्याची कणव वाटते पण काळजी वाटत नाही. कुठेतरी आपणही त्याच्या आयुष्यातल्या अडचणींचा स्वीकार करून टाकतो. त्यामुळे आपण पटकन गुंतत जातो.

सुरवातीला तो सरकारी हापिसात गावाची परिस्थिती सांगतानाचे दृश्य आहे. त्याचे म्हणणे समजून घेणं दूर राहीलं पण कुणी ऐकायलाही तयार नसते. एकुण छोट्या गावातल्या तथाकथित नेत्याला मोठ्या शहरात कुणी कुत्रंही विचारत नाही हे गंगारामच्या लक्षात येते. त्याच ऑफिसच्या भिंतीवर एक घोषणाही दिसते. जो कुणी अभयारण्याच्या आसपास वाघाचे भक्ष्य होईल त्याच्या गावाला सरकार दहा लाख रोख मदत म्हणून देईल. ह्या दहा लाखासाठी तो स्वतः हुतात्मा व्हायला तयार होतो. हे घरच्यांना पटवून देण्यासाठी , खास करून बायकोला पटवून द्यायला (सयानी गुप्ता) कर्करोगाची कहाणी रचतो. 'नाहीतरी मी तीन महिन्यात मरणारच आहे मगं गावासाठी भगत सिंह होऊन का नको' हे समजावून बायकोच्या विरोधाला न जुमानता हा निर्णय घेतो. गावातील ज्येष्ठांशी रोज चर्चा करून एक योजनाही बनवतो. सयानी गुप्ताने छान काम केलेय, तिचा त्रागा हतबलतेतून न आलेला वाटता, नवऱ्याच्या लहरीपणामुळे व खोटं बोलण्यातून आलेला आहे हे व्यवस्थित कळते.

आठदिवसांची शिदोरी घेऊन (त्याच्यामते वाघाने खाईपर्यंत जिवंत रहायला) तो आईला नमस्कार करून, गावातल्यांचा निरोप घेऊन वाघाच्या शोधात जंगलात निघतो. हे जंगल अतिशय रम्य आहे, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा, नदीच्या पाण्याचा, वन्यप्राण्यांच्या पदरवांचा पार्श्वसंगीत म्हणून केलेला वापर ऐकायला सुखद आहे. ह्या प्रवासात त्याला तरसापासून वाचवताना एक शिकारी-पोचर(मराठी शब्द?) भेटतो, जो निष्णात शिकारी आहे व जंगलावर त्याचे मनापासून प्रेम आहे. ही 'जिम अहमद'ची भूमिका नीरज काबी या अभिनेत्याने फारच सुरेख साकारली आहेत. गमतीदार योगायोग म्हणजे त्याने 'शेरणी' सिनेमात , विद्या बालनच्या मेन्टॉरचे काम केलेले आहे. त्यात तो वनसंवर्धन अधिकारी असूनही आपल्या मूल्यांना कुठेतरी हरवून बसलाय, इथे बेकायदेशीरपणे शिकार करून वाघाच्या अवयवांना चीनमधे विकण्याचा व्यवहार करतोय पण जंगलावर अतोनात प्रेमही करतोयं.

समानध्येयाने प्रेरित होऊन ही दोघे एकमेकांशी बोलत एक योजना ठरवतात. ह्या सिनेमाचा crux किंवा गाभा ज्याला म्हणता येईल तो या कथेतला यांचा वाघाच्या शोधातली भटकंती , त्या सहवासातील गप्पा , त्यातून कळत जाणारे त्यांचे विचार व जंगल ह्या गोष्टी आहेत. इथे हलकाफुलका वाटणारा सिनेमा अचानक प्रोफाऊन्ड व्हायला लागतो. ह्यात ते आपापल्या कामांपासून, धर्मं, श्रद्धास्थानं ते जिमची बेपर्वाई व गंगारामच्या (हळूहळू दूर होत जाणाऱ्या) अंधश्रद्धा .... या आणि अशा अनेक विषयांवर बोलतात. यावेळेपर्यंत घरच्यांना कर्करोगाच्या थापेबद्दल कळतं, तोपर्यंत 'गंगाराम' हे पात्र धमक नसलेलेचं वाटल्यानं माझाही ह्या थापेवर विश्वास बसलेला होता. पण हे ऐकल्यावर तो खरंच 'शेरदिल' आहे ही जाणीव प्रेक्षकांना होते. गाणी अतिशय वेगळी पण चपखल आहेत. कबीरांच्या भजनाला लोकगीतांसारखे गायलेय. गाण्यामुळे कथा प्रवाही वाटते, चित्रपट मधेमधे संथ वाटतो पण तरीही खिळवून ठेवतो. सिनेमांबाबत माझा अटेन्शन स्पॅन पाच वर्षाच्या मुलीचा आहे, म्हणजे बघा. Wink

गंगाराम व जिम T22 च्या मागावर असताना त्यांच्या मरायच्या व मारायच्या ध्येयाप्रत पोचतात, त्याच सुमारास पोलिसांना गंगारामला शोधायचे काम व जिमच्या पोचिंगचा शेवट करायची संधी मिळते. मगं थोडा कोर्टरूम ड्रामा व गंगारामच्या निकडीतून दाखवलेल्या शौर्याची चर्चा समाजमाध्यमांमधून बाहेर पडते. इथे सिनेमा किंचित प्रिची होतो, चालायचंच.. कथाबीज विषमतेतून आलेल्या दैन्यातले असल्याने हे दाखवणे भागंच होते. तरीही पंकज त्रिपाठीचे कॉमिक टायमिंग एकाच वेळी spontaneous आणि subtle असल्याने सिनेमा कुठेही कंटाळवाणा होत नाही. शिवाय नैराश्याचीही छटा नाही. शेवट अद्भुत करायच्या नादात अचाट केलाय असं आपलं मला वाटलं. बाकी सिनेमा मला आवडला, वेगळा वाटला, काहीही पूर्वकल्पना नसताना लावला व शेवटपर्यंत बघितला. शेवटंही असा आहे की जीवाला किंमत देताना 'वाघ निवडावा का माणूस' हा प्रश्न पडतो. शीर्षकातून दोन्ही अर्थ ध्वनित व्हावेत म्हणूनच लेखाचे शीर्षक 'नरो वा शार्दुलो वा' लिहिलेय.

आभार Happy
©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, काय छान लिहिलस. बघावाच लागणार चित्रपट.
तुझी शैली नेहमीच आवडते. थोडं कळेलसं थोडं उत्सुकता लागून राहिल असं अन बरचसं गाभ्याला हात घालणारं लिहितेस. जियो!

इतकं छान लिहिल्या मुळे आता बघावाच लागणार !
Netflix चालू केलं की रोज शेरदील चे सजेशन येत होते , पण दुर्लक्ष करत होतो .

मस्त परिचय. कथा तर सांगितली आहे पण उत्सुकताही कायम ठेवली आहे. चित्रपटातले माणूस विरुद्ध जनावर - विरुद्ध समाज - विरुद्ध नोकरशाही असे सगळे ताणेबाणे थोडक्यात पण स्पष्ट दिसतील असे लिहिले आहेत.
पाहाणार.

सुंदर लिहीले आहे! आवडले. पिक्चर बघायचा आहेच.

बाय द वे त्या गावाचा उच्चार पिलभित असा ऐकला आहे. नक्की माहीत नाही.

मस्त परिचय. गाणे ऐकले, आवडले. चित्रपट बघेनच.

फारेंड, उच्चार पिलिभित असा आहे.
पंचवीसेक वर्षांपूर्वी तिथे काही वेळा गेलो आहे, स्थानिक उच्चार पिलीभित आणि पाट्यांवर पीलिभित लिहीलेले पाहिले.

छान लिहिलंय.

एक छोटी दुरुस्ती सुचवतो :- ती जागा 'पीलीभीत' आहे, आधी मेनका गांधी आणि नंतर वरुण गांधी त्या लोकसभा मतदारसंघातून अनेक वर्ष निवडून येत आहेत.

मस्तच लिहिलंय.. पंकज त्रिपाठी आहे म्हणून बघायचाच असं ठरवलं होतं.. आता तर नक्कीच बघणार.
माझ्याकडे एक कथा आहे आणि माझ्याकडे 'पंकज त्रिपाठी' सुद्धा आहे, बघा जमलं तर >> हा हा.. बेस्ट... पंकज त्रिपाठी कडे मिडास टच आहे... कुठलिही भुमिका असो...सोनं करतो..

मस्त लिहिलं आहे
पंकज त्रिपाठी बघूनच नेटफलिक्स वर बघण्याचा यादीत टाकला होता, विषय माहिती नव्हता तरी
आता तर आवर्जून बघणारच

छान लिहिलंय. यावर रीव्ह्यु यायचीच वाट पाहत होते. बघेन आता.
नवीन काही बघायचं असलं की आधी माबोवर काही लेख आहे का त्याचा हे पहायची सवयच लागली आहे. माबो इफेक्ट Happy .

अवल +१
सुंदर लिहिले आहेस अस्मिता. हे वाचून नक्की बघावा वाटतोय.

नवीन काही बघायचं असलं की आधी माबोवर काही लेख आहे का त्याचा हे पहायची सवयच लागली आहे.
>>>

+७८६
एकतर चित्रपटच ईथून कळतो वा दुसरीकडून कळला तर आधी चिकवा धाग्यावर कोणी काही लिहिलेय का शोधले जाते. नसेल लिहिले तर विचारले जाते.
आंतरजालावर शंभर रिव्यू सापडतील. पण ईथे रिव्यू देणाऱ्या व्यक्तीची मते आणि आवडी माहीती असल्याने तो चित्रपट आपल्या टाईपचा असेल का नाही हे कळते.

ह्या चित्रपटाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार. नक्कीच बघणार आता. नरो वा शार्दुलो वा - चपखल आणि कल्पक शीर्षक!

शार्दूल मधला 'दू' दीर्घ आहे , 'शार्दुलो वा' लिहिताना उपांत्य म्हणून ऱ्हस्व होईल, खात्री नव्हती पण हर्पांचे वाचून मी चूक सुधारली.
[सं.] शार्दूल—पु. १ वाघ; व्याघ्र. २ राक्षस.
(तसं सिंह किंवा वाघ कुठल्याही अर्थाने कथेच्या आशयात फरक पडणार नाही.)

फारेन्ड, अनिंद्य व मानवदादा यांच्या प्रतिसादांची सरासरी काढून शीर्षकात 'पीलिभित' केले. Happy

चांगली ओळख. सरासरी नको. अनिंद्य यांना बक्षीस दे - https://pilibhit.nic.in/ सरकारी नाव "पीलीभीत" असेच आहे. भित्यापाठी ब्रह्मराक्षस नि पीलीभित्यापाठी मुद्राराक्षस ....

शार्दुल म्हणजे मला पण सिंह वाटायचं.

मला पण. पुलंच्या साहित्यात शार्दूलविक्रिडितावरचा एक विनोद आहे, ते विक्रिडीत आयाळ कुरतडलेल्या शार्दुलाने केलेले वाटते असा काहिसा.

Pages