पाककृती स्पर्धा क्र १- सारे जहाँँ से अच्छा...तिरंगा हमारा..अर्थात तिरंगी पदार्थ

Submitted by संयोजक on 23 August, 2022 - 17:00

Tirangi Padarth-1-v3.jpg

गणेश- मला नको रोज तेच तेच जेवण,काहीतरी वेगळं बनव ना ग

पार्वती- अरे ,आता थोडेच दिवस उरलेत गणू, नंतर तर मज्जा आहे बुआ तुझी, तरतऱ्हेचे पदार्थ खायला मिळणार तुला

गणेश- वा.! पण कसं, कुठे,केव्हा,कधी,किती...?

पार्वती- विसरलास का? दरवर्षी प्रमाणे मायबोली गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत एक से एक पदार्थ तुझ्याच साठी बनणार आहेत.

गणेश- अरे हो की! यंदाही माझे भरपुर लाड होणार हे नक्की

मग काय मायबोलीकरहो..

ह्या संवादवरून लक्षात येतंय ना, कुणाकुणाला आणि किती किती उत्सुकता असते पाककृती स्पर्धेची!
कारण,
बाकीच्या खेळांनी मन प्रसन्न होते पण मायबोली गणेशोत्सवात खरी रंगत चढते ती पाककृती स्पर्धेने.

चला,पहा बरं काय विषय घेऊन आलोत यंदाच्या ' मायबोली गणेशोत्सव २०२२ '

पाककृती विषय क्र १- सारे जहाँँ से अच्छा...तिरंगा हमारा..

यंदा आपण स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा ह्या मोहिमेचे साक्षीदार होतो, तर हीच मध्यवर्ती कल्पना घेऊन ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे

नियम-
१- एकाच पदार्थात तीनही रंग चालतील किंवा जास्तीत जास्त तीन पदार्थ चालतील अर्थात त्याचा परस्पर संबंध असायलाच हवा

२- गोड, तिखट वगैरे कुठलाही पदार्थ चालेल.

३-साहित्य, पदार्थ बनवताना ची एखादी स्टेप,आणि पूर्ण झालेला पदार्थ अशी किमान 3 प्रकाशचित्रे देणे आवश्यक आहे

४-धाग्याचे नाव पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - मायबोली आयडी - खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.

चला तर मग ,करा पटापट तयारी, बाप्पा कधी पासून वाट बघताहेत !!!

गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकाच पदार्थात तीनही रंग चालतील किंवा जास्तीत जास्त तीन पदार्थ चालतील अर्थात त्याचा परस्पर संबंध असायलाच हवा >> नियम नीट कळला नाहिये. म्हणजे यातला पहिला भाग कळला की तीनही रंग चालतील .. पण जास्तीत जास्त तीन पदार्थ म्हणजे कसे ? उदा. पांढरी इडली,हिरवी चट्णी,आणि केशरी सांबार असे तीन पदार्थ का ?

हो, म्हणजे हिरवी पालेभाजी, केशरी जलेबी आणि पांढऱ्या ईडल्या असे काही नको जे कॉम्बिनेशन एकत्र खाल्ले जात नाही.