मन माझे

Submitted by गंधकुटी on 22 August, 2022 - 00:44

मन माझे

मन अवखळ वारा
मन झळाळता पारा
मन हाती गवसेना
मनाचा पार लागेना

मन वासरू वासरू
धावे वाभरे दूरदूर
कधी निश्चिंत शांत
कधी आळवी हुरहूर

मन उडे पतंगावानी
बघ फिरे आसमंत
दोरी भूवरी, त्याला
साद घालीते दिगंत

मन तलम रेशमी
वस्त्र लेवुनी भरजरी
कुणी सुंदरी जणू
नक्षीचा पदर सावरी

मन कधी दुःखात बुडे
विटुनी एकांती कुढे
विचारांच्या वावटळीत
ते कधी होतसे बापुडे

मन सांडुनी कोतेपण
कधी होत असे विराट
घेऊनी अवघी सृष्टी कवेत
खेळे असीमाशी सारीपाट.

विद्या गोरक्षकर

Group content visibility: 
Use group defaults