नवलाई

Submitted by गंधकुटी on 22 August, 2022 - 00:42

नवलाई

धुक्याच्या पदराआडून
पाहतसे धरा लाजरी
हासत येई सहस्र रश्मी
उधळीत कीरणे साजिरी

गगनमंडपी सजुनी
नववधू ही आली
क्षितिजावर बघ उषा
रांगोळी सुंदर घाली

हिरवे शालू शेले तिचे
पाचूसम चमचमती
किरणांचे फेटे पटके
भरजरी लखलखती

पूर्व दिशा लालीमा
सोनेरी बघ ल्याली
सूर्य रथानेच जणू
धूळ रंगीत उडाली

रोजचेच हे भेटणे पण
कीती त्याची अपूर्वाई
सोहळा हा रोजचाच
रोज नवी नवलाई

पक्षी गाती मंगलगीते
उजळल्या दिशा दाही
नव्या दिसाची, नव्या
आशेची फिरली द्वाही

गंधकुटी

Group content visibility: 
Use group defaults