निमूट

Submitted by गंधकुटी on 22 August, 2022 - 00:38

निमूट

जेव्हा तुटते कुठले नाते
तेव्हा नक्की तुटते काय ?
सारं तर तसेच आहे ,
का मनी  उमटते हाय !

श्वास होतो जड का
का हॊते मन कातर कातर
का जाणवत राहते तुझ्या
असण्या नसण्यातले अंतर

गुंफलेले हात घट्ट बघ
क्षणात निसटुनी जाती
वाळू जणू ओघळुनी
ही मूठ रिकामी उरती

डोळ्यात दाटती आसवं
दिसते सारे धूसर धूसर
घशात दाटतो आवंढा
वाटे सारे निरर्थक, नश्वर

तक्रार करायची कुठे
कशाची आणि कुणी
जे हरपलं तुझ्यामाझ्यातलं
त्याचे ना मोल जाणितो कुणी

चेहरा ठेऊन कोरा हा
दाह सोसायचां निमूट
पोळलेल्या सुन्न मनाला
सांत्ववायचे तेहि निमूट

गंधकुटी

Group content visibility: 
Use group defaults