तक्रार कशाला?

Submitted by निशिकांत on 21 August, 2022 - 12:23

काट्यांशी जर असेल मैत्री रुतण्याची तक्रार कशाला?
जीवन खडतर तरी गुलाबी स्वप्नांशी व्यवहार कशाला?

अंथरुणाचे माप घेउनी पसरायाला पाय शिकावे
पगार आहे कमी म्हणोनी पैशांचा अपहार कशाला?

नाते गायत्री मंत्राशी तुटले, संध्या ठाउक नाही
व्यर्थ जानवे घालुन करता मौंजीचे संस्कार कशाला?

जिवंत असता किंमत नव्हती, मृतात्म्यास आश्चर्य वाटते
तसवीरीला हार घालुनी होतो हा सत्कार कशाला?

जनतेला का षंढ समजता? ताळ्यावर या सत्तांधांनो
रान पेटता नका विचारू "पुकारला एल्गार कशाला?"

ऐषारामी जीवन जगलो सुखे भोगली, अता विसरलो
जवाएवढे दु:ख भेटता जीवनभर चित्कार कशाला?

कुणी निघाले पुण्य कमवण्या, कुणी निघाले पाप जाळण्या
सत्कर्माने इष्ट साधते देवाचा आधार कशाला?

हात जयांचे बरबटलेले, तेच कायदे तयार करती
आम आदमी टाहो फोडी "दिल्लीचा दरबार कशाला?"

"निशिकांता"ची प्रिया लाजरी व्यक्त जाहली नजरेमधुनी
जरी अबोली, तुला पाहिजे शब्दांतुन होकार कशाला?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र.९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users