रसरशीत पान्हा

Submitted by अवल on 16 August, 2022 - 23:02

लोथलच्या त्या जोडप्याचा सांगाडा पाहून
नाभीत खोलवर जाणवलेली संवेदना
अन सरसरून आलेली ममत्वाची भावना
हेच माझे पूर्वज, मीच त्यांची वंशज!
तिच्या अस्थिपंजर स्तनातून पाझरला पान्हा
थेट पोहोचलेला माझ्यापर्यंत, रसरशीत उष्ण....

तेव्हा ना मनात आले, की
कोणता होता धर्म त्यांचा
कोणती जात, कोणतं रुप, कोणता दर्जा
ना काळाचा बंध आडवा आला
ना भूप्रदेशाचा, ना भाषेचा, ना लिपीचा.
कोणत्याही संवादाशिवाय थेट जोडले गेलो
ते अन मी; त्या सशक्त पान्ह्याने!

कधीतरी एकदा पोहोचलेले थेट दक्षिणेला.
कन्याकुमारी तेव्हा झोपलेली, तिची झोपेची वेळ
पण मग फिरून देऊळ पहाताना पुन्हा भिजले!
त्या अनेक काळ-योजने दूर असलेल्या शिल्पकाराच्या
कोरिव, ठाशीव कलेच्या पान्हात, चिंब भिजले.
एक एक मूर्ती जोडत गेली त्याच्याशी मला
हाच तर तो माझ्या जीवनाचा कर्ताकरविता!

पण पुन्हा इथेही नव्हताच माहित त्याचा धर्म,
लिपी, भाषा, संस्कृती सगळच मला अगम्य.
पण तरी काहीच आडवं आलं नाही आमच्यात;
थेट पोहोचलाच दिडदा दिडदा नाद
त्याच्या दगडी सुरेल खांबांमधून निघालेला
अन जुळलाच की अगदी माझ्या हृदयस्पंदनांशी

अन मग कधीतरी शिरले टागोरांच्या निकेतनात
तिथला शांत, गंभीर, आश्वासक भवताल.
सभोवतालचा हिरवा निसर्ग, त्यातला गारवा;
कृष्णवडाच्या पानापानांतून वाहणारे नवनीत...
हजारो पारंब्यातून माझ्यापर्यंत थेट पोहोचलच.
त्या प्रचंड पसाऱ्यात मीही एक, समावून जात!

तेव्हाही लक्षात आलं, यांचा धर्म, लिपी, भाषा
काही काही आडवं आलंच नाही एकदाही.
आत्म्याशी आत्म्याचा संवाद थेट, विना शब्दभाषा
प्रत्येक पारंबी नवनीताच्या स्निग्धतेने सहज
पोसत गेली प्रत्येक पिढीला, थेट माझ्यापर्यंत.

अन मग कधीतरी पोहोचले अनंतनागच्या
त्या अतिप्राचीन ढासळलेल्या सुरेख मंदीरात.
मंदीर नव्हतच उभं आता, पण तरीही नाद होता.
बाजुच्या भिंती माझ्याशी बोलायला आसुसलेल्या
ढासळलेली प्रत्येक मूर्ती बोलत होती माझ्याशी
तिचा नव्हता आक्रोश, पाडल्याचा, नष्ट केल्याचा.
नव्हता द्वेष वा आक्रमक आरोप वा विष:ण्णता
जे झालं ते स्विकारलेलं तिनं, दु:खाने पण शांतपणे!

अन मला सांगत होती, काळाचा महिमा आहे हा
जुनं संपतंच कधी न कधी, शत्रू नसतं कोणी.
असते तो काळाचा महिमा, काळाची गरज.
पण तू त्यापलिकडे ये, इथे माझ्याजवळ पोहोच
राग, द्वेष, संघर्ष, पतन सगळं सोसून ती सांगत होती.
हे सगळं सोड, नवीन उभं कर, जे जोडेल
तुला माझ्यापर्यंत, धर्माशिवाय, जातीशिवाय,
भाषेशिवाय, लिपीशिवाय,...थेट संवाद- स्नेह संवाद!
म्हणाली माझ्या, त्या लोथलच्या बाईच्या,
त्या कन्याकुमारीच्या, बंगप्रदेशातल्या कृष्णाच्या माईच्या...
अगदी सगळ्यांच्या पान्हाची शपथ आहे तुला!
काळालाही जिंकलय आम्ही, पोहोचलाय आमचा पान्हा
अगदी थेट, थेट तुझ्यापर्यंत, आता तुझी पाळी
आमचा काळ नको, तुझा काळ तू जग
तुझा कान्हा तू प्रसव, तुझा पान्हा तुझा तुला फुटो.
तो पान्हा सकस बनव, रसरशीत बनव
नवीन नवनीत घडव, धर्म, जात, भाषा, लिपी,...
कशाचेच बंधन नको, तरच पान्हा होईल सकस
हे भान ठेव फक्त, लक्षात ठेव, तूही एक माध्यम.
आपल्या सगळ्या पिढ्यांचे पुढच्या पिढीशी साधायचे
संवादाचे माध्यम फक्त! एक निरंतर, अविनाशी संवाद!
---

लोथलचा सांगाडा - सिंधु संस्कृतीतील एका जोडप्याचा सांगाडा लोथल येथील संग्रहालयात जतन केला आहे.
दगडी सुरेल खांब - मिनाक्षी मंदीराबाहेर हे खांब आहेत त्यावर आघात केला की संगीतातील सगळे सूर निनादतात. पोएटिक लिबर्टी घेतलीय जरा, कन्याकुमारी अन मिनाक्षी मंदीरं खरंतर वेगवेगळी आहेत.
कृष्णवडातील नवनीत - कलकत्यात वडाच्या झाडाचा हा एक प्रकार. याची पानं कोनासारखी वळलेली असतात, ज्यातून कृष्ण लोणी खातो असे मानले जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सुरेख, उत्कट, गहन!'
+११.
आवडलंच. खूप मोठा span बाळमुठीत मावलाय. ह्या कवितेतून.

धन्यवाद भरत, हिरा
सध्या इतिहासाचा जसा "वापर" केला जातोय; ज्या पद्धतीने त्याचा अन्वयार्थ लावला जातो, बघून फार वाईट वाटत रहातं.
कर्मधर्म संयोगाने सिंधु (नदी) ते सिंधू (समुद्र) अन गुजराथ ते बंगाल अशा चहू बाजुंना कधीन कधी भेट दिलेली (अगदी अनंतनागलाही). त्या त्या ठिकाणी गेल्यावर मनात उठलेले हुंकार पुन्हा जाणवले अन त्यातून हे लिहिलं गेलं.
हिरा, बाळमुठी वाचून हसू आलं बरं का Wink

स्पष्टीकरण. : ही मूठ म्हणजे कवीची असे अभिप्रेत नव्हते. कान्हा, पान्हा ह्या संदर्भ शब्दांमुळे संस्कृती नामक एक माता, भविष्याला जन्म देणारी; आणि जन्म घेणाऱ्या त्या बाळाच्या मागे केव्हढा मोठा वारसा आहे, त्याच्या जन्मापर्यंत किती मोठा पल्ला त्याच्या मातेने गाठला आहे असे narrative( कथन?) मला कवितेतून जाणवले. म्हणून ती बाळमूठ.