स्वातंत्र्याची पहाट

Submitted by निशिकांत on 14 August, 2022 - 10:16

स्वतंत्र्याची पहाट--( स्वातंत्र्य देवतेला नमन करून लिहिलेली रचना)

जोखड सुटले मानेवरचे
नवीन आला काळ असे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारतमाता मंद हसे

स्वातंत्र्याचे पाईक आम्ही
खूप झगडलो फिरंग्यासवे
संग्रामी स्वतःस झोकले
रक्त सांडले तिरंग्यासवे
खडतर सेवा फळास आली
चोहिकडे आनंद दिसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारतमाता मंद हसे

स्वतंत्र क्षितिजा आज पाहण्या
पक्षी उडती स्वैर नभी
स्वप्न पाहिले सदैव जियेचे
स्वातंत्र्य देवता मूर्त उभी
गर्वे फुलल्या सागर लहरी
भारतवर्ष बुलंद दिसे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारतमाता मंद हसे

द्विशतकाची काळी रजनी
लोप पावली तेज पसरले
ध्वज तिरंगा ऊंच पाहुनी
आयुष्याचे दु:ख विसरले
गुलाम असता मनात आमुच्या
धगधगता आक्रोश असे
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारतमाता मंद हसे

स्वातंत्र्याची मशाल देतो
तरुणांनो ती ऊंच धरा
सुखदु:खाच्या वेळी आमच्या
बलिदानाचे स्मरण करा
वरून पाहिन राष्ट्रभक्तिने
जगता होउन धुंद कसे?
स्वातंत्र्याची पहाट झाली
भारतमाता मंद हसे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users