वाहवा का धर्मग्रंथाची?

Submitted by निशिकांत on 11 August, 2022 - 12:19

नको चर्चा कुणाचा धर्म आहे चांगला याची
छळोनी माणसांना वाहवा का धर्मग्रंथाची?

उगा गुरुमंत्र का घ्यावा? कशाला दक्षिणा द्यावी?
तुझे तू भाग्य बनवाया छनी घे शिल्पकाराची

नको काशी, नको काबा, कशाला चर्चला जावे?
धरावे पाय आईचे, खरी ती खाण पुण्याची

विकावी लागली शेती जरी दुष्काळ पडल्याने
उसासे देत प्रत बघतो जुनेर्‍या सात-बार्‍याची

कधी व्रत मौन पाळावे, कधी जोरात भुंकावे
प्रतिक्षा खासदारांना, वरिष्ठांच्या इशार्‍याची

चला गोमास बंदी जाहली हे चांगले झाले!
कशा गाई अता जगवू? समस्या तिव्र चार्‍याची

त्वरेने घ्यावया निर्णय कि टाळायास तो बसला?
मनी हा केवढा संभ्रम! तर्‍हा बघुनी लवादाची

कुणी रडते, कुणी हसते, असू दे दु:ख वाट्याला
खरे तर जीवनी असते समस्या ही सरावाची

असे "निशिकांत"ला का वाटले वाचून घटनेला?
तुतारी बंद करतिल राज्यकर्ते रामराज्याची

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--लगागागा X४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नको चर्चा कुणाचा धर्म आहे चांगला याची >> वा वा ! क्या बात आहे

छळोनी माणसांना वाहवा का धर्मग्रंथाची? >> एक नंबर

हे आठवले.
जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा.
कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या निशेने धुंदली भारी
जो पर्यंत जगातून धर्म आणि राष्ट्र प्रेम ह्या संंकल्पना नष्ट होत नाहीत तो पर्यंत मानव जातीला सुख आराम और चैन कहा.