आठवांचा त्रास आहे

Submitted by निशिकांत on 2 August, 2022 - 09:48

मोगर्‍याला वास आहे
आठवांचा त्रास आहे

पूजिल्याने देव भेटे
अंध हा विश्वास आहे

का उगा गुलमोहरावे?
ऊन का मधुमास आहे?

टाळसी का? मानतो मी
लग्न कारावास आहे

दूध जे पीता तुम्ही तो
वासरांचा घास आहे

"लोक म्हणती काय?" याने
कोंडलेला श्वास आहे

नाळ तुटली सौंगड्यांशी
ऑनलाइन क्लास आहे

मातृभाषा नावडे पण
इंग्रजी फर्मास आहे

शांतता असते टिकाऊ
वादळा! इतिहास आहे

अपयशातच ईश्वराची
नित्य धरली कास आहे

का असा "निशिकांत" तुजला
मृगजळाचा ध्यास आहे?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मनोरमा
लगावली--( गालगागा)X२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली. गझल का नाही?
उबो Happy मलाही कधी कधी आठवात वगैरे शब्द खटकतात, कधी नाही.