जाहला अतिरेक आहे

Submitted by निशिकांत on 24 July, 2022 - 10:13

जीवनी नाना कळांचा जाहला अतिरेक आहे
ठसठशीला थांबवाया, वेदनांचा शेक आहे

श्रीगणेशालाच अश्रू दु:ख येता का गळावे?
भोगले तो खेळ नाही, फक्त नाणेफेक आहे

सभ्यतेच्या मुखवट्याला सोडता सारे म्हणाले
आज जो पदभ्रष्ट दिसतो, कालचा तो नेक आहे

आगतिकता माणसाला कुरतडोनी षंढ करते
मी जरी स्थितप्रज्ञ दिसतो, अंतरी उद्रेक आहे

काय म्हणतिल लोक याची काळजी मी सोडल्याने
कोंडलेला श्वास आता मोकळा एकेक आहे

पीक का आश्वासनांचे पाच सालाबाद येते?
कार्यवाहीची न चर्चा, फक्त फेकाफेक आहे

पाहिले लाखो लुटारू अन् लुटारूंचे लुटारू
पक्ष त्यांचे वेगळे पण ध्येय "चरणे" एक आहे

माय ल्योकाची शिजेना दाळ हल्ली फारशी अन्
राजकारण सावराया येत घरची लेक आहे***

चीड "निशिकांता"स आहे राज्यकर्त्या श्वापदांची
लाळघोट्यांचा तयांना रोजचा अभिषेक आहे

***हा शेर सध्याची राजकीय परिस्थिती सांगणारा आहे.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र.९८९०७ ९९०२३
वृत्त--व्योमगंगा
लगावली--गालगागाX४  

Group content visibility: 
Public - accessible to all site users