पाउस आला--(वीक एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 23 July, 2022 - 09:54

नेमेची येतो मग पावसाळा हे मी लहानपणी वाचलेले आहे. खूप आवडायची मला ही कविता. सहजपणे पावसाचे वर्णन केलेले आहे. पाउस तसा सर्वांनाच प्रीय. लहान मुले, मोठी माणसे, ढग बघून नाचणारा मोर, गार शिडकाव्यांनी थरथरणारी धरती, हिरवाईने नटलेला निसर्ग, हे सारे पावसामुळे दरसाल घडते.  डोळ्याचे पारणे फेडणारा आणि मने प्रफुल्लित करणारा हा मोसम. नाना प्रकारच्या उपमा दिल्या जातात.एखादा कवी लिहितो की श्रावणाच्या स्वागताला धरती हिरवा शालू नेसून बसली आहे तर प्रेमिकांच्या मनात प्रेम भावनांची हिरवळ फुटते. लहानपणी पावसात कागदी नावा कोणी सोडलेल्या नसतात! आणि ती सोबतीण अजून मनात रेंगाळत असते. हे सारे पावसाचे वरदान आहे असे मी मानतो.

या वरुण राजाचे स्वागत करण्यास अख्खी कवी मंडळी सज्ज असते. मला नाही वाटत की एकही कवि असा असेल ज्याने पावसावर, श्रावणावर कविता लिहिली नसेल. लेखणी अगदी स्फुरण पावते. माझे स्वतःचे मत असे आहे की प्रत्येक कवी हा पहिल्या कवितेत आई आणि पाउस या दोन विषयांना आपल्या काव्यात जागा हमखास देतोच. इतके घट्ट नाते आहे कवी आणि या विषयांचे. एकदा आकाशवाणीवर मी एक  कार्यक्रम ऐकला होता. हा कार्यक्रम प्रसिध्द गायिका सुमन कल्याणपूर यांनी कंडक्ट केला होता. त्यावेळेस त्यांनी एक आठवण सांगितली. एकदा माहाराष्ट्रात खूप भीषण दुष्काळ पडला होता. हा भयाण कोरडा दुष्काळ होता, सुमनबाईंना गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी पाचारण केले होत. त्यांना आश्चर्य वाटले की त्या रेकॉर्डिंग संपवून बाहेर आल्या तेंव्हा बाहेर धो धो पाऊस पडत होता. त्यांना आश्चर्यमिश्रित आनंद झाला होता. कारण त्या दिवशी त्यांचे रेकॉर्ड झालेले गाणे "झर झर झडती श्रावण धारा धरतीच्या कलशात " हे होते.  हे सहज आठवले म्हणून!
वर सांगितल्या प्रमाणे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पावसावरच्या कवितांचा अक्षरशः पाउस पडतो. रसिक लोक पावसात कमी पण कवितेत भरपूर गटांगळ्या घेऊन आनंद लुटतात.  अशा या पावसावर मलाही एक कविता सुचली जी खाली देतोय. वेगळी बाजू दाखवायचा प्रयत्न केलाय . बघा कांही गारवा मिळतोय का ते!

पाउस आला

धरेस हिरवा शालू देण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

ओला उत्सव सुरू जाहला, तन मन भिजले
रोमांचाने गवताचे पाते थरथरले
मनामनातिल प्रीत फुलवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

तरुणाईच्या मनी जागली प्रीत नव्याने
धुंद होउनी ओठी येती नवे तराने
मल्हाराचा सूर छेडण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

खळखळणार्‍या ओढ्यांनाही प्यास लागली
मिठीत घ्यावे सरितेने ही आस जागली
भिजलेल्यांना पुन्हा भिजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

खूप दिसानी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरती
हास्य पाहिले सचैल जेंव्हा भिजली धरती
नवी उभारी मनी रुजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

रंग उडोनी चारी भिंती भकास माझ्या
रागरंगही वस्तीमधला उदास माझ्या
नवीन स्वप्ने मनी रुजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users