जोशी आणि जोशीण

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

(सायोने आज आठवण करुन दिली यांची किती दिवसांनी! म्हणून मग हलवलं त्यांना तिकडून इकडे :P)

---------------------------------------------------------------------------------

त्यांना भेटून आलं की माझा पुढचा संपूर्ण शिल्लक दिवस migrain चा attack मला आल्याचा भास होतो. कधीकधी तर आजारी असल्याचाही. मी शक्तीहीन झालेली असते. युद्धभूमीवरुन परतलेल्या एखाद्या योद्ध्यासारखी. काहीशी हताशही. कालही काही वेगळ घडल नाही.

जोशी आणि जोशीण.

they bring out the beast in me. इतरवेळी साधारणपणे लोकांशी मी सभ्यपणानेच वागते. माझा चेहरा समोर कुणी ओळखीचे आले की हसरा होतो. मी घालते ते कपडे माझ्यामते व्यवस्थित आणि डीसेंट असतात.
पण जोशी आणि जोशीण समोर आले की माझं otherwise ठिकाणावर असलेल ताळतंत्र बिनसतं.
बहुतेक त्यांचही तसच होत असाव.
पण दोघेही कमालीचे सहनशील आणि संयमी वगैरे आहेत. पण मला कळत की त्यांना माझं काहीच पसंत पडलेल दिसत नाहीय आणि ते तोंडावर दिसू नये म्हणून दोघे आटोकाट प्रयत्न करत आहेत.

जोशींना हे बर्‍यापैकी जमत. जोशीणीला नाही.

अडीच वर्षांपूर्वी मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा दोघांना हाक काय मारायची हा माझ्यापुढे जेन्यूईन प्रश्न होता. जोशी काका आणि जोशी काकू असं नॉर्मल मध्यमवर्गीय घरातील मुलंमुली मध्यमवर्गातीलच मध्यमवयीन मराठी स्त्री पुरुषांना संबोधतात.
मी प्रत्यक्ष भेटण्या आधी जेव्हा श्रीयुत जोशांशी फोनवरुन बोलले तेव्हा माझ्या बाबांच्या परिचितांपैकी एक ह्या इथे परक्या देशात आपल्या बरोबर फोनवरुन बोलत आहेत ह्याचे भान वगैरे ठेवून मी आवाजात नम्रपणा, आणून त्यांना संभाषण संपवताना म्हणाले की ' "ठिक आहे जोशीकाका मी ह्या शनिवारी येते."
माझं वाक्य पुरं व्हायच्या आत जोशी भडकले. "मला काका म्हणू नकोस. तसलं काही म्हणवून घ्यायच माझं वय आहे का?"
अरेच्चा!!
ओके. मी माझ्याजवळच्या पत्त्यावरचं नरेन्द्र जोशी हे नावही वाचून ठेवलं.

जोशीणीचा शुक्रवारी सकाळी फोन आला की शनिवारी त्यांच बाहेर जायचं ठरतय तेव्हा शुक्रवारी संध्याकाळीच जमेल का?
शहर एक होत.अंतरही तस फारस नव्हत पण शुक्रवार संध्याकाळ? मला नाखुषी लपवता आली नाही.

त्यापेक्षा नेक्स्ट वीकेन्ड? मी विचारल!

त्यावर जोशीण... ' का गं? कुठे बाहेर जायचय का शुक्रवारी संध्याकाळी?' टोन टिपिकल म.म.व.भो.

मी म्हंटल (काकू शब्द गाळून),' हो'
आता त्यांची जरा पंचाईत झाली. ' हो कां??' स्वर लांबला.
मी पलीकडे मुद्दाम थंड.

'कुठे गं ऑफिस तुझं? काहीतरी जाहीरातीतचं काम करतेस ना तु?'
जोशीणीनी एकदम track बदलला. मी उत्साहाने जरा माहिती पुरवली.

कामाबद्दल कोणी काही विचारल की उत्साहानेच बोलायचे मी तेव्हा. विशेषत: असे म.मव. असलेकी बहुधा माझ्या पहिल्या काही वाक्यांनंतरच 'हो का? कळल कळल.' असं म्हणून आपल नकळलेपण झाकून टाकायचे घाईघाईने आणि ती मजा घ्यायला मला अगदी आवडायचं. जाहिरातीच कामं म्हणजे त्या बनवणं नाही तर त्यात कामं करण ह्या त्यांच्या मते सर्वमान्य कामापेक्षा हे काय ही भलतं, रुक्ष सांगतेय. असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर आले की मला आवडायचं कारण मग संभाषणाची सूत्र माझ्याकडे आपोआप यायची आणि मला छानपैकी SC यायचा. . .

माझी ही युक्ती जोशीणीने हाणून पाडली. शांतपणे माझं तांत्रीक माहितीने परिपूर्ण लांबलचक वाक्य ऐकून झाल्यावर तिने परत तोच म.मव.भो. टोन लावून वाक्य टाकलं.
'उशीर होत असेलच मग अशी कामं करताना? घरी कोण सोडत गं? आणि बरं त्यानंतरही बाहेर जायचा तुझ्यात उत्साह रहातो?'
ह्या सुरुवातीच्या वाक्यानंतर जोशीण सुरु झाली. बॉस बरा आहे का?, तरुणच आहेत का सगळे तिकडे? भारतीय आहेत की नाही कोणी? मुली किती आहेत?

नॉन्प्लस होणं म्हणजे काय हे मलाच माझ्या reaction वरुन त्यावेळी लक्षात आलं. ..
भेटही झालेली नसताना किती हे सारे प्रश्न बिनदिक्कत विचारणं! खाजगी चौकशाही सहज जाता जाता करणं! आपल्या ठरवलेल्या rightousness norms मधे बसतेय ना समोरची व्यक्ती हे चारी बाजूंनी अगदी चाचपून, तपासून बघत रहाणं!
म.म.मव. गुण जोशीणीमधे अगदू ठासून भरले असल्याचे माझ्या त्वरीत लक्षात आले.

माझ्या अंतर्मनातल्या, पातळ सभ्य पापुद्र्याखाली दडून बसलेल्या त्या beastने सहजच मग आपली कोवळी नखे बाहेर काढून परजायला सुरुवात केल्याचा हाच तो क्षणं!!

म.मव. कशाने शॉक होतात हे मला तोपर्यंत असंख्य अनुभवांवरुन चांगलेच माहिती झालेले होते. त्याचा वापर बाबांच्या परिचितांवर करणं इतरवेळी मी टाळल असत पण जोशी जोशीण म.मवि.भो. पणाचा अर्क होते. त्यांच्याशी वेगळ काही वागण मला शक्यच झाल नाही.

जोशी जोशीणीची आणि माझी ती पहिली भेट वादळी झाली.

मी खास अशा ओकेजन्ससाठी राखून ठेवलेला माझा लखनवी चुडीदार बाजूला ठेवला आणि मग मी घातलेले माझे उंच, निमुळते stileto, माझी स्कीनफ़िटेड LW jeans, माझा किमोनो स्लीव्हजचा स्वेटर, माझे माझ्यामते wind blown, त्यांच्या भाषेत अस्ताव्यस्त केस, माझं जोशींना 'नरेन्द्र' म्हणून हाक मारण (काका म्हणत होते चांगल तर खेकसले.. आता काय करणार? casual आवडत ना तुम्हाला? मग घ्या. सगळच casual इती मी. त्यावेळी. मनात.), माझं पुरणपोळी अजिबात आवडत नाही अस म्हणणं ( हे खरच अर्थात), जेवण करतेस की नाही घरी? ला हो. चहा, नूडल्स, पास्ता, potato sandwich झकास करते असं उत्तर देणं (आणखीही बर्याचशा गोष्टींबरोबर) त्यांना अजिबात आवडल नाही ..

and i was smug.. like the cat that swallowed the canary...

आणि त्यांनी मला बशीतून मक्याचा हलदीराम स्पेशल चिवडा देणं, त्यात मैसूरपाकची वडी ठेवण, काय काय कर्ते, मित्रमैत्रीणी कोण, कधी झोपतेस, घरची आठवण येते की नाही? सणासुदीला काय करतेस, येत जा बर्का मधूनमधून म्हणणे, गेल्याच शनिवारी दुधी हलवा केला होता बघ. नेमका कालच संपला म्हणणं, चहा कोमट असण आणि त्यांना तस सांगीतल्यावर खरच की काय? इतकीच प्रतिक्रीया देऊन भुवया उडवण आणि सर्वात कहर आणि expected म्हणजे .. बघ हा... इथेच रमशील आणि लग्न करुन बसशील, आईबाबांना काळजी छाप उद्गार काढणं, वगैरे अजिबात आवडल नाही. ते मी लपवलही नाही (शिवाय चालेल माझ्या आईबाबांना असं उत्तरही दिलं. त्यावर परत एकदा भुवया उडल्या).

भारताहून आलेल्या, माझ्या आत्तेबहीणी थ्रू त्यांच्याकरता आलेल एक पार्सल त्यांना सोपवण्याच त्यावेळी माझं काम होत.
खरतर त्यांचच काम.

ती bag त्यांच्या हातात सोपवण्याचे माझे प्रमुख कर्तव्य मी पार पाडल्यवर जोशी जोशीणीने आपला म.मव. पणा पूर्णत्वाला नेण्याचे काम यथासांग पार पाडले होते. ते म्हणजे माझ्यासमोरच बिनदिक्कत ती bag उघडून, तपासून बघणे (अर्थातच त्यांच्या हातात email thro आलेली यादी होती).

ह्यानंतरही आमच्या भेटी होत राहिल्या.

जोशीणीने माझे स्थानीक पालकत्व स्वत:हून स्वीकारण्याचे मनोमन ठरवलेच असावे. एकदा दिवाळीच्या सुमाराला जोशीणीने ' ये.. ताजे लाडू करतेय बेसनाचे...' असे म्हणून प्रेमाने बोलावल्यावर मी हरखून रविवारी जायला निघाले तेव्हा येताना तुझ्या इथल्या indian store मधून बेदाणे, काजू, पिठीसाखर तेव्हढी आण ग. साजूक तुप आहे. ते नको आणूस. असे सांगून हताश केले होते.
शिवाय घरी गेल्यावर येतात का लाडू वळता? असं म्हणून मी वळलेले तीन चार लाडू disapprovingly बघून परत वळून घेतले होते. कहर म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवल्यावर खायचे असतात बरका असं सांगून मीच आणलेल्या काजूं पैकी मोजकेच काजू घालून केलेला उपमा मला खायला घालून पाहूणचार केला होता.

मी पण त्यांना इरिटेट करणे सोडले नव्हतेच. बॉलिवुड धाब्याच्या मालकाचा स्वीस केटरींग स्कूल मधून शिकून आलेला मॉन्टी कसा handsome, sofisticated आहे, नाहीतर इथले इतर भारतीय.. सगळे एकजात अ. बा. हे एकदा मोजून पाचवेळा संभाषणात सांगून मी जोशींना त्यांच्या सुटलेल्या पोटाचा complex आणला होता आणि jogging आवडत का नाही म.मव. ना कोण जाणे निदान fortyच्या wrong side ला आल्यावरतरी करावे असा तेव्हाच सल्ला ही देऊन टाकला होता.
मला त्यांचा मस्तीखोर आठ वर्षांचा मुलगा एका शनिवारी सांभाळायला लाऊन आणि स्वत: मै हू ना बघायला जाऊन त्यांनी माझ्या सहनशक्तीचा अखेर कडेलोट केला.

कालंच मी त्यांना त्यांच्या NYच्या भाचीने पाठवलेली काही वस्तू असलेली bag नेऊन दिली.
ह्यावेळी माझा खरच wild असलेला haircut जोशींना चक्क आवडला पण जोशीणीने असंख्य भो. प्रश्न विचारणे, काय गरज आहे चांगली नोकरी सोडून कसलतरी काही शिकण्याची? राहीचस ना तिथेच भावाजवळ वगैरे म्हणण्याची एकही संधी सोडली नाही.

जोशी जोशीण मला चीड आणतात, जेरीस आणतात, मला त्यांच्याशी मुद्दाम nasty वागायला उद्युक्त करतात पण तरी मी अजूनही त्यांच्या त्या तीरकस प्रेमाचा माझ्या वेळोवेळी अंगावर चढणारा खेकडा झिंजाडून देऊ शकलेले नाही.

का???

ते माझ्या बाबांचे परिचीत म्हणून?

बाबा असताना त्यांची एकही गोष्ट न मानणारी मी आता ते गेल्यावरही का हे नको ते संबंध सांभाळत बसले आहे? कदाचित बाबा गेले तेव्हा जोशी जोशीणीने अर्ध्यारात्री येऊन मला कुशीत घेतले तेव्हाची उब आणि त्यानंतर मुंबईहून परत आल्यावर सतत महिनाभर स्वत: घरी अर्ध्या तासाचा रोज प्रवास करुन आणुन दिलेल्या रात्रीच्या, दुसर्‍या दिवशी सकाळीही पुरेल इतक्या टिफ़िनभरुन असलेल्या जेवणाची चव आता मला तसं करुन देत नसेल.

किंवा म.मव.भो. पणा करायचा त्यांचा धर्म ते परदेशात पंधरा वर्षे राहूनही निष्ठेने निभावत आहेत ह्याचे आता मला कौतुकही वाटू लागले आहे कदाचित.

प्रकार: 

नेहेमीप्रमाणेच उत्तम लिहीले आहेस. Happy असतात खरच असे लोक ना? मलाही नात्यातच विशिष्ट शहरात एकदा भेटले होते. Happy नाहीतर ह्हे कायतरीच असे लोक असतेत का अस म्हणल असतं. Happy
शेवटी लिहीलस तेच खर,, बाकी जन्मजात संस्कारांचा दोष !!!

हे सह्हीच आहे आधी वाचलय कुठेतरी... Wink अग तू ब्लॉग लिहिण बंद केलस का?? Sad

*********************

आपण प्रेमात पडतो म्हणजे नक्की कुठे पडतो? Biggrin Wink

Lol
ट्युलिप मस्तच आहे हे!
_______________________________
"शापादपि शरादपि"

पुन्हा तितकाच आवडला. Happy

"या लेखाचा समस्त जोशींकडुन निषेध"
असे लिहिणार होतो पण तेवढ्यात माझ्या एका नातेवाईकानी ऐन कडाक्याच्या थंडीत आम्ही पहाटे घरातुन बाहेर पडत असताना विचारलेला "चहा घेणार का?" हा प्रश्न आठवला Happy

छान लिहिले आहे. शेवट फार आवडला. माणसांवर "चांगला" किंवा "वाईट" असे शिक्के मारता येत नाहीत हेच खर!

"या लेखाचा समस्त जोशींकडुन निषेध"

>>अगदी अगदी Wink lol
मस्त आहे लेख!

धन्यवाद सर्वांना.

जोशी आणि जोशीणीचे वागणे बर्‍यापैकी प्रातिनिधीकच असते हे नंतर अजूनही काही भेटलेल्या नमुन्यांवरुन समजत गेले पण सुरुवातीचा हा अनुभव माझ्या दीर्घकाळ आठवणीत राहीलेला, खास होता हे मात्र खरं.
नंतर नंतर इथे नव्याने शिकायला किंवा एजन्सीत ट्रेनी म्हणुन वगैरे आलेल्या काही ओळखीच्या मुला मुलींना इथल्या वेगळ्या संस्कृतीत वागण्याचे काही चुकीचे अर्थ लावले जाऊ शकतात म्हणून सावध करायची वेळ आली किंवा काळजीपोटी काही चौकशा करायची, मदत करायची वेळ आली की आपल्या वागण्यातूनही जोशी-जोशीणपणा दिसत असेल की काय असंही एकेकदा वाटून गेलं. आणि तसं होऊ नये म्हणून सावधपणा बाळगतानाही मग चित्रविचित्र अनुभव आले. ते वेगळेच अजून : ))))).

इथे प्रतिक्रिया देणार्‍यांपैकी अनेकांना आपल्या आजूबाजूला जोशी-जोशीण भेटलेत पण अगदी कुणालाही आरशात पाहिल्याचा अनुभव आलाच नसेल कां याचंही एक कुतुहल मनात आहे : P.

पराग आणि पूनम .. तिकडची बरीच पोस्ट्स इथे आणायला मलाही आवडेल. आणेन नक्की. आपलंच आयुष्य आपण खूप दिवसांनी परत एकदा जगत असल्याचं एक विचित्र फिलिंग मला हे पोस्ट पुन्हा इथे टाकल्यावर आलं आणि एखाद्या नॉस्टेल्जियासारखंच ते फार सुखद होतं.

>>>>> अनेकांना आपल्या आजूबाजूला जोशी-जोशीण भेटलेत पण अगदी कुणालाही आरशात पाहिल्याचा अनुभव आलाच नसेल कां याचंही एक कुतुहल मनात आहे
विचार करण्याजोगा प्रश्न आहे

जोशी-जोशीण काही आरशात कधी दिसले नाहीत, पण ....

थोडी अशीही कल्पना करुन बघा, की आयुष्य म्हणजे, चाळीतल्या खोलीतील एकान्तवासाच्या शिक्षेप्रमाणे असेल तर?

चौविसचे चौविस तासात, एखाददुसर्‍या क्लाएण्टकडील उण्यापुर्‍या पाचेक मिनिटाच्या भेटीत झालेले कामासन्दर्भातले बोलणे, येवढाच काय तो प्रत्यक्ष सन्वाद होत असेल तर? त्याव्यतिरिक्त तोन्डुन शब्दोच्चारही होण्याची वेळच येत नसेल तर?

किन्वा रस्त्यावरुन जाताना, चुकुन माकुन धक्का लागल्यावर जी काय तूतू मैमै होत असेल तेवढाच सन्वाद?

की नेहेमीच्या पानपट्टीवर गेल्यावर न बोलता हातात मिळालेली सिगारेट वा पान हाच आपण अजुनही माणुस म्हणून ट्रीट केले जात असल्याच्या लक्षणाचा दुवा?

परिस्थितीवश, माणसान्च्या अफाट गर्दीतही तुम्ही एकटेच्या एकटे पडलेले असाल तर?

अन अशा परिस्थितीत देखिल, नशिबाने, आयुष्यात असे जोशी-जोशीण भेटलेलेच नस्तील तर?

तर काय होईल???
पॅपिलॉन पुस्तकाच्या लेखकाने त्याला झालेल्या एक वर्षाच्या एकान्तवासाच्या अन्धारकोठडिचे वर्णन केल्यावर त्याचे उत्तर दिले आहे! माणुस वेडा होईल!
जर तो मनाने कणखर नसेल, जर "स्व" ची भावना शाबुत रहात नसेल, वा शाबुत रहाण्यासाठी इतरान्च्या न मिळू शकणार्‍या "प्रतिक्रियान्ची" आवश्यकता भासत असेल, तर नक्कीच वेडा होईल!
अन अशा वेळेस, अनाहुतपणे, गरज असो वा नसो, कोणीतरी विचारपुस करणारे भेटले तर वाळवण्टातील ओअ‍ॅसिस प्रमाणे वाटेल!
मी पूर्वायुष्यात हे अनुभव (नि अनुभुती) घेतलेली आहे!
त्यामुळे आजही आरशात मला कोणातरी जोशान्ची वाट बघणारा लिम्ब्याच दिस्तो हे!
असो,

ता.क. मायबोलीवर फेमस बनलेल्या, व कदाचित इतरत्रही वापरात असलेल्या "अनुल्लेख" या शस्त्राची धार, या अन्गाने देखिल वार करत अस्ते! Happy

लिहिलय चान्गले! Happy

नंतर नंतर इथे नव्याने शिकायला किंवा एजन्सीत ट्रेनी म्हणुन वगैरे आलेल्या काही ओळखीच्या मुला मुलींना इथल्या वेगळ्या संस्कृतीत वागण्याचे काही चुकीचे अर्थ लावले जाऊ शकतात म्हणून सावध करायची वेळ आली किंवा काळजीपोटी काही चौकशा करायची, मदत करायची वेळ आली की आपल्या वागण्यातूनही जोशी-जोशीणपणा दिसत असेल की काय असंही एकेकदा वाटून गेलं. >>>>

खरंय ट्यु. वयानुसार, अनुभवानुसार माणुस अधिक परिपक्व होत जातो. मागेवळुन बघितले तर वाटते आपल्या आई-वडिलांना आपल्याविषयई वाटणारी काळजी रास्तच होती.
मला देखिल आज भारताबाहेर राहिल्याने आणि वेगवेगळ्या जाती-जमातींच्या, संस्कृतीच्या माणसांमधे राहल्याने एक कळुन चुकले आहे कि आपल्या मनावर आपल्या संस्कारांचा, संस्कृतीचा जबरदस्त पगडा असतो. त्याव्यतिरिक्त एखादी गोष्ट बघितली कि आपल्याला cultural shock बसतो.

आणि कधी अनुभवापोटी, कधी ह्या सांस्कृतीक, संस्कारी फरकामुळे प्रत्येक माणुस जोशी-जोशीणी सारखे प्रश्ण कधी ना कधी दुसर्‍याला विचारत असतो.

साधी गोष्ट सांगते, माझ्या ऑफिसमधे खुप दक्षिण भारतातले लोकं आहेत. त्यांना मी ब्राम्हण असुनही नॉनव्हेज खाते, मीच काय माझे आई-वडील देखिल खातात हे ऐकुन जबरदस्त धक्का बसतो. कसं शक्य आहे असेच त्यांना वाटते. काही काही मुली तर इतक्या orthodox वातावरणातून आलेल्या आहेत कि त्यांना मी ज्या ज्या गोष्टी करते त्याचे खुपच आश्चर्य वाटतं. आणि त्या cultural shock मुळे नकळत त्या मला असेच जोशी-जोशीणींसारखे प्रश्न विचारतात. मला आता सवय झाली ह्या सर्व प्रकाराची.

प्रत्येकजण आपापल्या अनुभव विश्वातूनच आपापली मते मांडत असतो. दुसर्‍याचे वागणे त्यामुळे काहीवेळेला आपल्या योग्य अयोग्य च्या व्याख्येत बसणारे नसेल, चाकोरीत बसणारे नसेल तर मग आपसुकच असे अघोचर प्रश्न विचारले जातात. दोष कोणाचाच नसतो. हे मॅच्युरिटी मुळे नंतर समजते.

शोभा डे चे मधे आत्मचरित्र वाचित होते. त्यात तीने लिहीले आहे कि मी जेव्हा तरुण होते तेव्हा सर्व बंधन झुगारुन, आई-वडीलांशी भांडुन carefree, बिन्धास्त आयुष्य जगले. पण आता माझ्या मुली मोठ्या झाल्यावर मी त्यांना तेच सल्ले देते, त्यांच्यावर मी तीच बंधने घालते जी माझ्या वडीलांनी माझ्यावर घातली. मी त्यांच्याशी नकळत खुप protective आणि orthodox आईसारखीच वागते.
तर असं असतं...

हायला हे वाचलच नव्हतं. आज रॉहूच्या भाषांतरीत कवितेवर तुझा प्रतिसाद बघितला आणि हिने एवढ्यात काही लिहिलं की कसं बघायला तुझ्या पाऊलखुणांमधे आले तेव्हा सापडलं. मस्तच एकदम. मुंबईत असताना आमचे असेच एक परिचीत आठवले Happy

मस्तच लिहिलय...शेवटचा परिच्छेद नी त्या अनुशंगाने प्रतिक्रिया अगदी पटल्या. मी ब्लॉग नाही वाचलाय..कोणता सांगाल काय? (इकडे टाकल्यास छानच)
(cindrella धन्यवाद ग, वाचुन प्र देउन हा लेख वर आणल्याबद्द्ल Happy )

भारतातून आलेल्या तरुण मुलामुलींचे अमेरिकेतील भारतीय म. व. लोकांना भेटणे याचे चांगले वर्णन केले आहे.

पण त्या अमेरिकेतल्या म. व. म. व. लोकांना काय बोलावे असा प्रश्न पडतच असेल, नाहीतर अगदीच न बोलता परत पाठवले तर तेही खटकेलच ना! नि तुमच्या नि त्यांच्या आवडी सारख्या कश्या असणार? कोणते विषय तुम्हा दोघांत कॉमन आहेत, ज्याबद्दल बोलायचे?

माझ्या अनुभवाप्रमाणे एकंदरीतच म. व. लोकांच्या एकाही गोष्टीत तरुणांना इंटरेस्ट नसतो. नुसते नाव विचारले तरी त्यांना तो भोचकपणा वाटतो. तेंव्हा शक्यतो लवकर भेट आटपून परत जावे, नि कारण असल्याखेरीज, फोनसुद्धा करू नये. माझे तसे बरेच तरुण नातेवाईक इथे अमेरिकेत आहेत, मध्यंतरी एकाला पैसे हवे होते, एकाला नोकरी हवी होती तेंव्हा त्यांना माझी आठवण झाली होती, पण ठीक आहे. मीच म्हंटले होते मदत करीन. त्यामुळे निदान दोघांच्यात कडवटपणा तरी आला नाही.

<<किंवा म.मव.भो. पणा करायचा त्यांचा धर्म ते परदेशात पंधरा वर्षे राहूनही निष्ठेने निभावत आहेत >>

पहा, पहा, भारतीय संस्कृति दूर अमेरिकेतहि जपली आहे!
नाहीतर तुम्ही! स्किन टाईट जीन्स काय, विन्ड ब्लोन केस काय, छ्या: अगदीच ताळ सोडला देश सोडल्याबरोबर!!

आता असे करा, पुनः त्यांच्याकडे गेल्यावर, कुणा कान टोचलेला, दाढी वाढवलेला, अंगाला वास येणारा शक्यतो काळा, तरुण घेऊन जा, तुमचा मित्र म्हणून. ते तुम्हाला घरात पण घेणार नाहीत, नि तुमचे पण फावेल.

काहीतरी खरंच चांगलं हवं होतं वाचायला म्हणून रंगीबेरंगी खणत होते..तर हे मिळालं आणि खणती सार्थकी लागली!
मस्तच लिहिलंय अगदी..

या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हाच धडा मिळाला की... काळं किंवा पांढरं असं वर्गिकरण करताच येत नाही. प्रत्येक माणसात चांगले-वाईट असे दोन्ही गुण असतात. एकाच प्रकारचा शिक्का नाही मारता येत कोणावरही..
लेख प्रमाणिक आहे, पण चांगल्यापेक्षा भोचक अनुभवच जास्ती आले का गं तुला? Proud

असो, पुलेशु!!

ट्युलिप, अगं तू ब्लॉग बंद करून इथे आलीस लिहायला हे माहितच नव्हतं मला आणि मी आपली तू देवानंदनंतर काही पोस्ट टाकशील म्हणून वाट पाहातेय..असो..
कसलं भन्नाट लिहिलंस...जाम जाम आवडलं....शुक्रवारीच वाचतेय आणि नेमकी...हे हे...
तुझा तो शब्द "म.मव.भो." म्हणजे जरा जोरात म्हटला तर शिवीसारखा जाईल नाही....ही ही...:)
मला वाटलंच होतं की जेव्हा खूप खुसूखुसू हसवलं जातं तेव्हा त्याचा शेवट थोडा हळवाच होतो...आणि हो शेवटात तू खूप छान दिसलीस....
मला अख्खा लेख प्रचंड प्रचंड आवडला......लेटेस्ट काही असेल किंवा इथलं तिथे जे काही असेल ते टाक नं.....

म मव भो! हाहाहा! भारी लिहिलंय! मला एकदम क्वीन मधला सीन आठवला पंजाबी भो. Proud

Pages