तुझीच होती ...

Submitted by काव्यधुंद on 29 June, 2022 - 09:39

त्या गुलाबी ताटव्यातून शुभ्र कळी जी भासली तुझीच होती.
जी चालताना पावलांशी थबकली ती सावली तुझीच होती.

तिमिर नाशूनी एक समई, मंद मंद तेवत होती
एक एक ज्योत विझता, जी शेवटी राहिली तुझीच होती.

लोक झाले घोळके, कोण आपले कोण परके
हात सुटता पाय हलता, जी एक साद ऐकली तुझीच होती.

गोंधळून फिरता फिरता, मन बधीर होऊन गेले
त्या कर्कश ओळींमधूनी, जी धून कानी गुंजली तुझीच होती.

एकांत मिळावा वाटे ऐसे, क्षण नाहीत जमले फार
मी मलाच शोधत असता, जी साथ मिळाली तुझीच होती.

पायांनी नेले तिकडे जात, मी शोधत तुलाच होतो
पायपीट रोजची नशिबी, ज्या जागी येऊन संपली तुझीच होती.

उगाच भलती खोड मनी, हे कसले वेडे साहस
ती आतुर हुरहूर मनीची ज्या मिठीत विरूनी गेली तुझीच होती.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults