त्राण जराही उरले नाही

Submitted by निशिकांत on 26 June, 2022 - 22:27

पेलत आलो तुझे जीवना ओझे, जगणे जमले नाही
मजा घ्यावया घाम गाळुनी, त्राण जराही उरले नाही

भळभळणार्‍या घावांचेही दु:ख कमी झाले असते पण
गर्दीमधल्या एकानेही जखमांना फुंकरले नाही

पारध होणे हेच प्राक्तनी लिहिले आहे, त्या महिलांनी
सभ्य श्वापदांच्या बुरख्यांना फाडुन का नागवले नाही?

"लोक काय म्हणतील" रोग हा असा ज्यावरी औषध नाही
मुक्त जगावे मनासारखे, जरी वाटले, पटले नाही

शिक्षण घेता कैक दालने नोकर्‍यातली दिसू लागली
सभ्य माणसे बनवायाचे तंत्र पुस्तकी दिसले नाही

खाकीचा खाक्याच निराळा, गरीब ललना भेदरलेल्या
कौरवासवे साटेलोटे, द्रौपदीस वाचवले नाही

जुळ्यातल्या स्त्रीभ्रुणास नसतो गर्भपात हा कधीच धोका
दिवा जगवुनी ज्योत विझवणे, डॉक्टरासही जमले नाही

इमानदारीच्या तुटपुंज्या पुंजीवर मानाने जगलो
एक दाखवा अमीर ज्याने कधी स्वतःला विकले नाही
 
बुलंद कर "निशिकांत" इरादे, पुन्हा नव्याने जगावयाचे
कोरी पाटी नवा खडू घे, शीक कधी जे शिकले नाही

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users