विडिओ आधी बघितला तरी चालेल
Tiger taking bath at pool - Veermata Jijabai Bhosale Udyan, Ranibaag, Byculla Zoo
https://www.youtube.com/watch?v=mPWPhpUR8NI
-----------------------------------------------------
राणीबाग आणि भायखळ्याच्या गल्ल्यांमध्ये खेळण्यात माझे बालपण कसे गेले हे आपण मागील पाणघोड्याच्या भागात पाहिले.
https://www.maayboli.com/node/81192
त्यामुळे राणीबागेशी माझी एक वेगळीच नाळ जुळली आहे. जेव्हा लोकं म्हणायची छ्या राणीबागेत आता काही राहिले नाही तेव्हा फार राग यायचा. जसे काही वाघ सिंह हत्ती घोडे, या नावे ठेवणार्यांच्या दारात झुलतात, जे चार प्राणी बघायला मिळताहेत ते बघावे आणि खुश राहावे तर नावे कसली ठेवत आहात.
पण त्याच वेळी वाईटही वाटायचे. कारण यात तथ्यही होतेच. हरीण, सांबर, नीलगाय, काळवीट, मगरी, माकडं जरी खोर्याने असली, गजराज लांबून दर्शन देत असले, झालंच तर पाणघोडाही अध्येमध्ये पाण्याबाहेर येत असला, कधी मोर पिसारा फुलवत असला, कधी नाग फणा उभारत असला, पक्ष्यांचीही रेलचेल असली तरी ज्या प्राण्यांना खास बघायला आपण प्राणीसंग्रहालयात जातो, ज्यांच्या रुबाबदार शरीयष्टीचे आबालवृद्धांना आकर्षण असते, त्या जंगलच्या राजा म्हणवले जाणार्या वाघसिंहांची कमी होतीच. लहानपणी केव्हातरी भायखळ्याला मामाकडे सुट्टीत राहायला जायचो तेव्हा रात्रीच्या शांततेत वाघाच्या डरकाळीचा आवाज यायचा हिच काय ती त्याची शेवटची आठवण होती.
नाही म्हणायला मध्यंतरी पेंग्विन नामक पक्ष्यांचे आकर्षण आले होते. पण त्यावरूनही लोकांचे चिडवणेच फार झाले. व्यक्तीशः मलाही कधी मुद्दाम जाऊन ते पक्षी बघावे असे वाटले नाहीत. आजवर मी ते पाहिले नाहीत.
मी स्वतःही कैक वेळा लेकीसोबत राणीबागेत गेलो. पण मलाही तिथले ईतर प्राणी बघण्यात फारसा रस नव्हता, ना लेकीला होता. आम्ही आपले दर विकेंडला छान खेळून यायचो. कारण विविध प्रजातीच्या झाडांची रेलचेल असलेले एक उद्यान म्हणून ते तेव्हाही छानच होते. पण मुद्दाम प्राणी बघायला म्हणून आमच्या राणीबागेत या असे कोणाला सांगायचो नाही.
आणि मग एके दिवशी कानावर खबर आली की राणीबागेत वाघांची एक जोडी आली. रॉयल बंगाल टायगर. आणि ईतरही बरेच नवनवीन प्राणी आले. त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि आकर्षक पिंजरे तयार केले गेले. एकूणच राणीबागेचे सुशोभिकरण झाले. राणीबागेत जाणार्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली... आणि रविवार, दिनांक २२ मे २०२२, या दिवशी तब्बल २६ हजार १७३ लोकांनी राणीबागेला भेट देत एक विक्रम रचला.
पण दुर्दैवाने आता आम्ही मुंबईहून शिफ्ट झालो होतो. तिथले घर अजूनही आहे, पण वरचेवर जाणे बंद झाले होते. त्यामुळे आता आपल्याला आपल्याच राणीबागेत जायला मुहुर्त शोधायची गरज होती. नाही म्हणायला लेकीने तिच्या आई आणि मावश्यांसोबत मला टांग देत एक धावती भेट दिली होती. राजालाही ओझरते बघून आलेली. पण ते समाधान होण्यास पुरेसे नव्हते. आणि वर्कलोडमुळे माझाही प्लान नेहमी बनता बनता फिस्कटत होता.
अखेरीस या विकेंडला तो मुहुर्त लागला. मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या संपल्या होत्या. त्यामुळे मे महिन्याची विक्रमी गर्दी आता झेलावी लागणार नव्हती. तसेच पावसापाण्याचे दिवस असल्याने लोकं लांबचा प्रवास करून मुद्दाम राणीबागेत यायची शक्यता कमी होती. याऊलट आम्ही मात्र पावसाळी कबूतरं असल्याने आम्हाला पावसातच जास्त फिरायला आवडते. तरी शनिवारचा सुट्टीचा दिवस, आपल्यासारखेच अजून पावसात बागडणारे जीव संध्याकाळच्या वेळी गर्दी करतील हि शक्यता होतीच. त्यामुळे आम्ही सकाळीच जायचे ठरवले. मुलांनाही ट्रेनने जायची हौस होती. त्यामुळे जितके पहाटे जाऊ तितके ट्रेनच्या गर्दीच्या दृष्टीनेही चांगलेच होते.
गूगल जिंदाबाद. राणीबागेचा टाईम चार साईटवर चेक करून कन्फर्म केला. सकाळी ९.३० वाजता प्रवेशद्वार आमच्यासाठी खुलणार होते. लगोलग एम-ईंडिकेटर अॅपवर वाशीहून ट्रेनचा टाईम बघितला. वाशी ते डॉकयार्ड आणि तिथून १० मिनिटे टॅक्सीचे असा हिशोब करत बरोबर सव्वानऊ वाजता आम्ही पोहोचणार होतो. कोण म्हणते मुंबई लोकल पावसात ऊशीरा धावते, वा मुंबईत वेळेवर टॅक्सी मिळत नाही. बरोब्बर सव्वानऊ वाजता मी माझ्या दोन पोरांसह राणीबागेच्या प्रवेशद्वाराशी हजर होतो.
साडेनऊ वाजता जेव्हा मेन गेट खुलले तेव्हा आमच्या सोबत कॉलेजच्या सहासात मुलामुलींचा ग्रूप, एक दहापंधरा साडी नेसलेल्या बायकांचे भगिनीमंडळ आणि एक चौकोनी कुटुंब ईतकेच जण होते. ते सारे आमच्यासोबतच आत आले आणि विखुरले गेले. पण तिकीटघर कुठे आहे हे फक्त मलाच ठाऊक असल्याने मीच एकटा योग्य दिशेने गेलो. आज किती हजारांचा आकडा गाठणार होता कल्पना नाही, पण त्यात पहिले तिकीट काढून पहिले आत प्रवेश करायचा मान आम्हीच पटकावला. कसलं प्राऊड फिलींग झाले. पोरांनाही कौतुकाने सांगितले, बघा तुमचा बाप तुम्हाला सर्वात पहिले राणीबागेत घेऊन आला. पण त्यांना त्याचे काही पडले नव्हते.... असो 
पण आत जाताच ... आहाहा, गर्द झाडी, मोकळे रस्ते, वातावरणात गारवा, आणि आमच्या स्वागताला नुकताच सुरू झालेला रिमझिम पाऊस. योग्य मुहुर्त साधला आहे याची मनोमन खात्री पटली.
थोडं पावसात भिजून घेतले. त्या तयारीनेच गेलो होतो म्हणा. म्हणजे छत्री रेनकोट काही न नेता. दहा मिनिटात राणीबागेसह आम्हाला भिजवून तो पसार झाला आणि पुन्हा ढगांमागून सुर्यकिरण डोकावू लागले. बागेतला पहिला फोटो मी तिथे काढला...
१) आहाहा वाटावे असे उघडझाप करणारे पावसाळी वातावरण

गेटवरच्या मामांकडे आतली खबर काढली होती. वाघ कधी बघायला मिळेल विचारले तर दहा साडेदहा पर्यत ऊठून पब्लिकचे मनोरंजन करायला बाहेर येतो म्हणाले. त्यामुळे थेट तिथे न जाता काचेच्या तावदानांतले कासव आणि सर्प बघत पाणपक्ष्यांकडे मोर्चा वळवला.
२) पाणपक्ष्यांकडे मोर्चा

तसे हे पक्षी आधीही होतेच. पण पिंजर्यातले ते पक्षी कितीही छान वाटले तरी सतत बघून बोअरच व्हायचे. आता मात्र तिथे कायापालटच केला आहे. त्या पिंजर्यालाच ईतके मोठे केलेय की त्या आत एक छोटेसे जंगल वसवले आहे. आता त्या पिंजर्यात आपल्यालाही प्रवेश मिळतो. त्यात असलेल्या लकडी पुलावरून ईथून तिथे छान रमत गमत पक्षी बघत जाता येते. आम्ही अगदी सकाळची वेळ पकडल्याने आणखी भारी वाटत होते. पावसानेही आवरते घेतल्याने छान उजाडले होते. गर्दी तर दूरची गोष्ट, त्या पिंजर्यात आम्ही आणि पक्ष्यांशिवाय कोणीच नव्हते. त्यामुळे पक्षीही मनसोक्त बागडत होते. तिथला सिक्युरीटी गार्ड गाईडचे काम करत आम्हाला झाडाझुडपात लपलेले एकेक पक्षी आणि त्यांची घरटी दाखवत होता. त्यामुळे एखाद्या विशेष अतिथी सारखे पक्ष्यांच्या घरात जाऊन पाहुणचार घेतल्यासारखे वाटत होते.
३-४-५-६) पाणपक्ष्यांच्या राज्यात

.
.
.
आमच्या अंदाजापेक्षा बरेच जास्त वेळ आम्ही तिथे रमलो. त्यामुळे मग ईथेतिथे जास्त वेळ न दवडता थेट राजाच्या दरबारात हजेरी लावायचे ठरवले. वाटेत गजराजांचे दर्शन तेवढे घेतले. तसेच गोरील्लाच्या मांडीवर बसून फोटोही काढला. तो नकली असल्याने काही बोलला नाही.
एव्हाना दहा वाजले होते, तरी लोकांची वर्दळ काही वाढली नव्हती. प्रभात फेरी जिंदाबाद.
७) चिटपाखराची मागसूस नसलेले शांत शांत रस्ते

८) तोफेच्या तोंडी द्यायलाही एखादी शिकार गवसत नव्हती

अरे हो, जाता जाता वाटेत, Sloth Bear अस्वलाला त्याच्या घरच्या जंगलात दुरूनच आणि पाठमोरे पाहिले. त्याच्या पलटायची मग फारशी वाट न बघता, तो एका वेळच्या जेवणाला ४ हजार ते १० हजार वाळव्या (termites) खातो ही माहिती वाचून तिथून निघालो.. ते थेट वाघाच्या जंगलाकडे!
९) Sloth Bear अस्वलाचे घर

१०) पाठमोरा अस्वल स्पॉटेड

आता सकाळचे साडेदहा वाजले होते. सर्व राणीबागेतली तुरळक गर्दी एकीकडे आणि वाघाच्या ईलाक्यातील गर्दी एकीकडे. त्याला 'जंगलाचा राजा' का म्हणतात हे त्याच्या दर्शनाला जमलेली गर्दी बघूनच समजले. आणि हो, तो तश्याच थाटात फेर्या घालत होता. रुबाबात चालत होता. जिथे जिथे तो जात होता, सर्व कॅमेरे त्या दिशेने वळत होते. आम्ही तर त्याच्या जोडीनेच पळत होतो. एक क्षण नजर हलू नये ईतके देखणे जनावर. मग लक्षात आले की या आठवणी कैद करायला हव्यात, आणि कॅमेर्याची आठवण झाली.
ईतक्यात त्याला पोहायची हुक्की आली. कदाचित त्याच्या आंघोळीची वेळ झाली असावी. आणि बघता बघता तो पाण्यात ऊतरला. चक्क पोहू लागला. काचेजवळ येऊन पोहता पोहताच लोकांना हाय हेल्लो करू लागला. फोटो काढायचे थांबवून मी विडिओ मोड ऑन केला आणि सभ्यतेचे सारे निकष धाब्यावर बसवून त्याची आंघोळ शूट करू लागलो. एखाद मिनिटाची घटना पण राणीबागेत यायचे सार्थक झाल्यासारखे वाटले. पोरांनाही काहीतरी स्पेशल दाखवले याचे समाधान मिळाले.
(वाघाच्या आंघोळीचा आणि एकूणच विडिओ लेखाच्या सुरुवातीच्या वा शेवटच्या लिंकमध्ये बघू शकता. जाताना तो आम्हाला शेपटी ऊंचावून बाय करूनही गेला
)
११-१२) राजा आपल्या रुबाबदार चालीत आंघोळीसाठी जाताना...

.
१३) वाघासोबत आमच्या घरच्या वाघीणीचा फोटो टिपायचा एक प्रयत्न. जो हाणून कसा पाडता येईल याची काळजी उपस्थितांची गर्दी घेत होती.

एकदा वाघ बघून मन तृप्त झाल्यावर मग एक बिबट्या तेवढा पाहूया म्हटले आणि ईतर प्राण्यांची भेट मग पुढच्या वेळीसाठी राखूया म्हटले. तसेही आता येणेजाणे होतच राहील.
१४) हे कोल्हेबुवांचे घर - पण दर्शन देण्याच्या मूडमध्ये नव्हते. आम्हीही मग त्यांना जास्त भाव न देता पुढे निघालो.

१५) हा बिबट्याचा ईलाका - ईथून तरसही दिसतो. पण दोघांनाही बघायला गर्दी वाघाच्या तुलनेत कमीच. बिचारे तरसतच राहतात.

तरी बिबट्याचे दर्शन वाघाच्याच विडिओत घेता येईल.
१६) साडे नऊला सुरू झालेली भेट साडे अकरापर्यंत आवरली. तरी या एका प्राईम लोकेशनला तसा शुकशुकाटच होता 

पण तुम्ही जर वेळ काढून एकदाच येणार असाल आणि सर्व प्राण्यांशी एकाच भेटीत ओळख करायची असेल तर खालचा नकाशा जरूर नजरेखालून घाला 
१७) बागेचा नकाशा

अवांतर - एक विनोद त्या दिवसापासून आमच्या घरात फार फेमस झालाय. त्याचे झाले काय, माझ्या लेकीने त्याच्या धाकट्या भावाला सांगितले आपण उद्या 'राणीच्या बागेत' जाणार आहोत. तेव्हापासून तो कुठे फिरायला गेला होता असे विचारताच म्हणतो, राणीच्या मागे गेलो होतो 
अरे हो, विडिओची लिंक पुन्हा एकदा देतो,
Tiger taking bath at pool - Veermata Jijabai Bhosale Udyan, Ranibaag, Byculla Zoo
https://www.youtube.com/watch?v=mPWPhpUR8NI
धन्यवाद,
ऋन्मेष
निकु, अगदी चालत जायचे नसले
निकु, अगदी चालत जायचे नसले तरी मुंबईत फार काही लांब असे नसते. लालबाग परेळ टॅक्सीने गेलात तरी पाच ते पंधरा मिनिटात पोहोचाल. दादर वा सीएसटीला ट्रेनने दहा मिनिटात जाता येते. समोरच भायखळा रेल्वे स्टेशन आहे.
मी तर म्हणतो गेट वे आणि मरीन ड्राईव्हलाही फिरून या. हा एक मुंबई खादाडीचा धागाही आहे आपलाच
https://www.maayboli.com/node/82547
बाकी दिवसा राणीबाग करून संध्याकाळचे मरीनड्राईव्हला जाल तर तिथली हवा खाऊनच पोट भरेल
बाई दवे,
बाई दवे,

या धाग्यातील पोहणार्या वाघाच्या विडिओचे युट्यूबवर २४ हजार व्यू झालेत
लाईक्सचे शतक, सबस्क्राईबर ८०+
बापरे. हे कधी चेकच केले नव्हते... मायबोलीकरांचे धन्यवाद
वाह ईथे दोन दिवसात व्यू
वाह ईथे दोन दिवसात व्यू चोवीसचे पंचवीस हजार झाले..
यावर एक स्वतंत्र लेख काढायला हवा. राणीबाग हिट आहे. बहुधा लोकं २६ जानेवारीला फिरायला गेली असावीत ईथे..
राणीबाग हिट आहे. बहुधा लोकं
राणीबाग हिट आहे. बहुधा लोकं २६ जानेवारीला फिरायला गेली असावीत ईथे.. >> हो काल सकाळी लवकर आम्ही पोहोचलो, निघेपर्यंत टिकीटांची रांग पार गेट जवळ पोहोचलेली. खुप गर्दी. आम्ही लवकर पोहोचलो याचा आम्हाला ही गर्दी पाहून आनंद झाला
खादाडीची नावे पाहून गेलेलो, बरीच नावे ऐकलेलीही आहेत अनेकवेळा, पण तिथला उत्तम पदार्थ विसरला जातो आणि मग आम्ही नेहमी प्रमाणे परत आलो
एक गटग मुंबईच्या खादाडी साठी व्हायलाच हवे!
अरे देवा.. मी २६ जानेवारीला
अरे देवा.. मी २६ जानेवारीला मत्स्यालय बघायला गेलेलो. कानाला खडा. पुन्हा कधी त्या नादाला नाही. फार गर्दी होती. रिनोवेशन होऊन नुकतेच उघडलेले आणि सोशल मिडीयावर फेक फोटो फिरत होते. बहुधा सगळी गर्दी त्यानेच जमवली असावी. पण पुन्हा या दिवशी कधी असे फिरायला गेलो नाही.
राणीबागेत मात्र बेस्ट टाईम सकाळी सव्वानऊ साडेनऊ जेव्हा उघडते तोच. वाघाची आंघोळही निवांत बघता आली. नंतर आपली जनता आंघोळपांघोळ करून गर्दी करून राहिली की त्याच्याही जीवाला ऊबग येत असेल.
बाई दवे,
फोटो शेअर करा की
छानच मजा आली.
छानच मजा आली.
अरे वाह.. धन्यवाद साशा.. आज
अरे वाह.. धन्यवाद साशा.. आज सकाळीच मी हा धागा वर काढायचा विचार करत होतो.
कारण कालच पुन्हा एकदा राणीबागेत जाऊन आलो. पुन्हा पोहणारा वाघ बघून आलो
व्हॉटसप स्टेटसला फोटो टाकताना विचार आलेला मनात की एखादा फोटो ईथेही टाकावा
. .
जंगलाचा राजा येतोय....
.
.
.
काल राणीबागेत एक चक्कर
काल राणीबागेत एक चक्कर टाकलेली तिथे हा वाघ गवत खाताना दिसला. त्याचा सुद्धा श्रावण चालू असावा
https://www.instagram.com/reel/DcqNpvtI18h/?igsi=a2Y3ZjkyeTlxeTNi
पण लोकं त्याला फार शिव्या घालत होते. कित्येकांचा सूर असा होता की वाघाने गवत खाऊन आपली लाज काढली
काहींनी याला राणीबाग प्रशासनाला जबाबदार धरले होते. त्याला पुरेसा मांसाहार दिला जात नसल्याने त्याच्यावर पोट भरायला शाकाहार करायची गरज आली म्हणत होते
मी म्हटले अरे त्याचा श्रावण चालू असेल तसे सगळे हसायला लागले
मग मी घरी आल्यावर गुगल करून वाघ कुठल्या वनस्पती खातो आणि का खातो याची chatgpt वरून सविस्तर माहिती घेतली.
स्वतः शिकार करून खायला प्राणी
स्वतः शिकार करून खायला प्राणी उपलब्ध नसल्याने गवतावरच्या कीटकांची शिकार करत असेल.
Chat gpt उत्तर असे आले.
Chat gpt उत्तर असे आले.
हो — वाघ गवत खातो हे अगदी शक्य आणि सामान्य वर्तन आहे. तुम्ही काल राणीबागेत जे पाहिलं ते विचित्र वाटत असलं तरी वाघ शाकाहारी झाला आहे असं अजिबात नाही.
वाघ हा obligate carnivore म्हणजे त्याचा मुख्य आहार मांसाचाच असतो. पण वाघ कधी-कधी गवत, बांबूची पाने किंवा काही वनस्पती चघळताना दिसतो.
मग वाघ गवत का खातो?
1. पचनसंस्थेसाठी / पोट साफ करण्यासाठी
गवत खाल्ल्याने पचनसंस्थेला काही प्रमाणात फायबर मिळते. काही वेळा मोठ्या मांसाहारी प्राण्यांमध्ये गवत खाणे हे पचनाशी संबंधित नैसर्गिक वर्तन मानले जाते.
2. नैसर्गिक आहाराची नक्कल
जंगलात वाघ आपले शिकार केलेले प्राणी खाताना त्यांच्या पोटातील अंशतः पचलेली वनस्पतीसुद्धा खातो. त्यामुळे वनस्पती खाण्याची काही प्रवृत्ती त्यांच्या नैसर्गिक feeding behaviour चा भाग असू शकते.
3. Zoo enrichment / नैसर्गिक वर्तन
प्राणीसंग्रहालयात गवत, झाडे, नैसर्गिक जमीन आणि vegetation असणे वाघांसाठी चांगले enrichment मानले जाते. भारतीय zoos मधील अभ्यासातही जास्त grass/tree cover असलेल्या enclosures मध्ये वाघांमध्ये काही repetitive/stereotypic behaviours कमी असल्याचे आढळले आहे.
4. कधीकधी फक्त आवड/चघळण्याची सवय
प्रत्येक वेळी त्यामागे आजार किंवा पोटाचा त्रास असतोच असे नाही. वाघ एखाद्या विशिष्ट पानाचा/गवताचा वास, texture किंवा चव यामुळेही ते चघळू शकतो.
पण एक महत्त्वाची गोष्ट
लोकप्रिय समज आहे की "वाघ गवत खातो म्हणजे त्याला पोट बिघडलं आहे आणि तो उलटी करण्यासाठी गवत खात आहे." हे प्रत्येक वेळी खरं मानता येत नाही. गवत खाणे हे अनेकदा नैसर्गिक वर्तन असू शकते; त्यामुळे फक्त तुम्ही राणीबागेत ते पाहिलं म्हणून वाघ आजारी आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही.
भारताच्या Central Zoo Authority च्या 2025 Zoo Year Book मध्येही वाघांच्या behavioural observations मध्ये "Eating the grass" हे स्वतंत्रपणे नोंदवलेले behaviour आहे. म्हणजे zoo staff सुद्धा हे वाघांचे निरीक्षण करण्यासारखे सामान्य वर्तन मानतात.
म्हणून तुम्ही काल जे पाहिलंत ते अगदी शक्यतो normal tiger behaviour होतं.
तुम्ही राणीबागेत नेमका कोणता वाघ (नाव/केज/पांढरा वाघ की Royal Bengal Tiger) गवत किंवा झाडाची पाने खाताना पाहिला हे सांगितलं तर, त्याच्या त्या वर्तनाचा संदर्भ मी अजून specific करून सांगू शकतो.
माझा कुत्राही गवत खातो. गवत
माझा कुत्राही गवत खातो. गवत म्हणजे त्यांची बडिशेप आहे असं म्हणा. बडिशेप सगळ्यांनाच चालते. पण ते अन्न नाही.
कुत्रा तर पाळीव प्राणी आहे.
कुत्रा तर पाळीव प्राणी आहे. त्याला जे खाऊ घालाल ते खातो. शुद्ध शाकाहारी लोकं आपल्या कुत्र्यालाही शुद्ध शाकाहारी बनवत.असावेत. निदान आमच्या शेजारचे तरी त्यांच्या कुत्र्याला जवळपास रोज डाळभात आणि टमाटर खाऊ घालायचे.
पण वाघ सिंहाचे माझ्यासाठी नवीन होते. कालच्या घटनेमुळे ज्ञानात भर पडली.
Pages