कोंडून घेण्याचा जपानी प्रकार

Submitted by कुमार१ on 16 June, 2022 - 00:45

विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यात अग्रेसर असलेले राष्ट्र म्हणून जपानला आपण ओळखतो. प्रचंड मेहनत, वक्तशीरपणा आणि काटेकोर शिस्त हे तिथल्या नागरिकांचे गुण कौतुकास्पद आहेत. दुसऱ्या बाजूस तिथल्या औद्योगिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेले ताणतणाव हेही प्रचंड आहेत. त्यातूनच निरनिराळ्या मानसिक समस्यांचे प्रमाण तिथे खूप आहे. या लेखात अशाच एका मानसिक समस्येचा आढावा घेत आहे.

1970 ते 80 च्या दशकात जपानमधील पौगंडावस्थेतील मुले आणि तरुण यांच्यात एका मनोवृत्तीची लागण होऊ लागली. ही मुले शाळा-कॉलेजला विनाकारण वारंवार दांड्या मारू लागली आणि स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागली. हळूहळू याचे प्रमाण वाढू लागले. 1990 च्या दशकापर्यंत या प्रकारच्या मनोवृत्तीची खूप माणसे दिसू लागली. समाजापासून स्वतःला तोडून घेऊन एकाकीपणे जगण्याचे प्रकार देशभर जाणवू लागले. अशा तरुणांना एकाकीपणात सुरुवातीस टेलिव्हिजन आणि नंतर आंतरजालाची सोबत मिळाली. आंतरजालावरील विविध मनोरंजक खेळ तासन्तास खेळत घरात बसणे हा या तरुणांचा उद्योग झाला. असे हे एकाकीपण काही महिन्यांपर्यंत देखील टिकू लागले. जेव्हा या प्रश्नाचा बराच बोलबाला झाला तेव्हा जागतिक आरोग्य संघटना यात उतरली. 2002-06 च्या दरम्यान या संघटनेने जपानमध्ये १५-४९ या वयोगटाचे एक मोठे सर्वेक्षण केले. त्यातून असा निष्कर्ष निघाला, की या गटाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 1.2% लोकांना या मानसिक समस्येने ग्रासलेले आहे. मग या समस्येला Hikikomori असे जपानी नाव दिले गेले. त्याचा अर्थ, जनसंपर्क तोडून टाकून स्वतःला घरात कोंडून घेणे असा आहे.

आतापर्यंत असे वाटत होते की जपानच्या एकंदरीत सांस्कृतिक व सामाजिक परिस्थितीतून निर्माण झालेली ही समस्या आहे. परंतु त्या पुढील काळात ही समस्या जगातील अन्य देशांतही आढळू लागली. या संदर्भात बरीच चर्चा झाल्यानंतर 2010 मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशाने hikikomori या शब्दाचा नव्याने समावेश केला आणि त्याची रीतसर व्याख्या दिली. ती देताना सुरवातीच्या कंसात ‘जपान संदर्भात’ असा उल्लेख केलाय.
Hikikomori,person.jpg

आता वैद्यकीय दृष्टिकोनातून Hikikomori कडे पाहू. या विवेचनात तिचे हिमो असे लघुरूप वापरतो. या अवस्थेची व्याख्या करण्यासाठी खालील निकष असतात :
१. एखाद्या व्यक्तीने जनसंपर्क तोडून स्वतःला किमान सहा महिने घरात कोंडून घेणे. काही वेळेस हे लोक अत्यावश्यक कामापुरते थोड्या वेळासाठी बाहेर पडतात परंतु फारसा जनसंपर्क होणार नाही याची काळजी घेतात (उदा. रात्री दुकान बंद व्हायच्या वेळेस तिथे पटकन जाऊन येणे).
२. या अवस्थेची सुरुवात साधारणतः वयाच्या २५-३० दरम्यान होते.
३. या एकलकोंडेपणामुळे संबंधित व्यक्ती त्रासलेली दिसते आणि तिच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो.
४. या अवस्थेचे स्पष्टीकरण प्रस्थापित मनोविकारांच्याद्वारे देता येत नाही.

(अलीकडे काही अभ्यासकांनी संबंधिताच्या ३ महिन्यांच्या एकटेपणाकडेही गांभीर्याने बघावे असे सुचवले आहे. या स्थितीला हिमो-पूर्व अवस्था असे म्हणता येईल).

हिमोला मनोविकार म्हणायचे की नाही यावर संशोधकांमध्ये बराच खल झालेला आहे. या संदर्भात जपानमध्ये मोठे सर्वेक्षण केले गेले. त्यातून असे आढळले की हिमो अवस्थेतील काहीजणांना मानसिक सहव्याधी असू शकतात. अशा व्याधींमध्ये छिन्नमनस्कता, अतिलहरीपणा, चिंताग्रस्तता आणि व्यक्तिमत्त्वाच्या आजारांचा समावेश आहे.

आता या अवस्थेची जपानमधील व्याप्ती कालानुक्रमे पाहू.
१. वर उल्लेख केल्याप्रमाणे 2002 ते 06 दरम्यान 15 ते 49 या वयोगटाचे जे सर्वेक्षण झाले त्यात 1.2 टक्के लोक हिमोग्रस्त होते.
२. 2016 मध्ये वरील वयोगट 15 ते 39 असा मर्यादित करून सर्वेक्षण झाले. त्यानुसार हिमोंची संख्या 5.4 लाख होती. त्यामध्ये पुरुष व स्त्री यांचे प्रमाण ३:१ असे होते.

३. पुढे असे लक्षात आले की ग्रासलेल्या लोकांत ही अवस्था अनेक वर्षांपर्यंत टिकत आहे. त्यामुळे हळूहळू देशात वाढत्या वयाची हिमो मंडळी अधिक प्रमाणात दिसू लागली.
४. 2019 मध्ये 40 ते 65 या वयोगटांमध्ये 6.1 लाख लोक हिमोग्रस्त होते.

५. आजच्या घडीला सर्व वयोगट मिळून अंदाजे 10 लाख लोक या समस्येने ग्रासलेले आहेत. त्यापैकी काहीजण तर तब्बल २० वर्षे एकाकीपणे जगलेले आहेत.

जागतिक व्याप्ती
जपानमध्ये हिमोचा बराच अभ्यास झाल्यानंतर इतर देशांमध्ये या संबंधात निरीक्षण व अभ्यास चालू झाले. सन 2000 मध्ये व ओमान व स्पेनमध्ये अशा प्रकारची माणसे बऱ्यापैकी दिसू लागली. 2010 मध्ये भारत व अमेरिकेसह ९ देशांमध्ये यासंदर्भात एक सर्वेक्षण केले गेले. अर्थात ही सर्वेक्षणे लहान स्वरूपाची होती. हिमो किंवा हिमोसारखी अवस्था असणाऱ्या व्यक्ती आता अनेक देशांमध्ये आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे हिमो, मानसिक स्वास्थ्य आणि मनोविकार या सगळ्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न चालू आहे.

कारणमीमांसा
या संदर्भात हिमो आणि जपानी समाजजीवन यांचा बराच अभ्यास झालेला आहे. त्या संस्कृतीतील काही वैशिष्ट्ये आणि त्यांचा हिमोशी संबंध असा असावा:
१. जन-लाज : जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगाने लज्जित किंवा ओशाळी होते तेव्हा त्यावरील प्रतिक्रिया म्हणून ती स्वतःला काही काळ लोकांपासून दूर ठेवते. हा जपानी परंपरेतील एक सद्गुण मानला जातो. याची पाळेमुळे एका देवतेने स्वतःला अज्ञातवासात बंदिस्त केले होते, या पौराणिक घटनेशी जाऊन पोचतात. या धारणेतून हिमो प्रकार आला असावा असे दिसते. तसेच अशा एकलकोंडेपणामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढते आहे असे काही अभ्यासकांना वाटते.

२. अति परावलंबित्व : जपानी संस्कृतीत शालेय वयातील मुले पालकांवर जरा जास्तच अवलंबून असल्याचे दिसते. आपण काहीही चुकीचे केले तरी शेवटी आपले पालक आपल्याला क्षमा करतील अशी धारणा त्यामागे आहे. पुढे प्रौढ झाल्यानंतर सुद्धा हे अवलंबित्व बरेच टिकून राहते. जेव्हा एखाद्या मुलाच्या आयुष्यात ताणतणावाचा प्रसंग येतो त्यातून त्याची ही मूळ प्रवृत्ती जागृत होते. आपण बराच काळ घरीच बसून राहिलो तरीही आपले आई-वडील आपल्याला गोंजारतील अशी भावना त्यामागे असते. किंबहुना पालकांकडूनही मुलांच्या या प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते. पालकांच्या या ‘सुरक्षा कवचासाठी’ मुलांची हिमोकडे झुकण्याची प्रवृत्ती होते. तसेच औद्योगीकरणानंतर आलेल्या उच्च मध्यमवर्गीयांच्या सुबत्तेने या प्रकाराला खतपाणी घातले गेले.

जेव्हा हिमोग्रस्त तरुण पन्नाशीत पोचतात तेव्हा त्यांचे पालक ऐंशीच्या घरात असतात. या अवस्थेतही मुलांचे पालकांवरील अवलंबित्व संपलेले नसते. या विचित्र अवस्थेला “जपानची ८०-५० ची समस्या” असे म्हटले गेले आहे.

३. सामाजिक परिस्थिती : हिमोला एक प्रकारचे ‘आधुनिक काळातील नैराश्य’ मानले जाते. या प्रकारात एखादा माणूस जेव्हा एखाद्या प्रसंगाने खूप दुखावला जातो, तेव्हा तो त्याचा मुकाबला करण्याऐवजी स्वतःला बंद करून घेणे अधिक पसंत करतो. तसे केल्याने त्याची मानसिक अवस्था तात्पुरती सुधारते असे दिसते. परंतु हीच अवस्था जर दीर्घकालीन होत राहिली तर त्याचे हिमोत रूपांतर होते. 1990 नंतर एकंदरीत तरुणाईचे निरीक्षण करता काही मुद्दे स्पष्ट दिसतात. या तरुणांमध्ये आत्मकेंद्रितता, आत्मरती आणि हळवेपणा हे गुण प्रकर्षाने वाढताना दिसतात. प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता कमी पडताना दिसते.

४. जागतिकीकरण व मानसिक पर्यावरण : “खाउजा” या आंतरराष्ट्रीय धोरणाचा मानसिकतेवर दीर्घकालीन परिणाम झालेला दिसतो. आंतरजालाचा वाढता वापर, प्रत्यक्ष भेटीपेक्षा सतत अप्रत्यक्ष संवादावर भर यातून तरुणांच्या व्यक्तिमत्त्वात काही मूलभूत बदल होत गेले. पौगंडावस्थेतील मुले मैदानावर खेळण्यापेक्षा आंतरजालावरचे खेळ अधिक खेळू लागली. त्यातून एकलकोंडेपणा वाढीस लागला. विविध आंतरजालीय माध्यमातून होणाऱ्या संवादातून क्षणिक करमणूक जरी होत असली, तरी त्यातून भक्कम मानसिक आधार वाटावा अशी नाती काही निर्माण होऊ शकली नाहीत.

५. कमालीचे स्पर्धात्मक वातावरण : या प्रकाराला अगदी प्राथमिक शालेय जीवनापासूनच सुरुवात होते. उत्तम शाळेत प्रवेश मिळणे आणि सतत गुणवत्ता यादीत राहण्यासाठी पालकांचा कायम दबाव असतो. पुढे मोठेपणी औद्योगिक क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे मनावर सतत एक प्रकारचा ताण असतो. काही अभ्यासकांनी या प्रकारच्या शैक्षणिक वातावरणाला प्रेशर कुकरची उपमा दिलेली आहे ! मनाजोगते यश न मिळाल्यास त्याचा परिणाम प्रेशर कुकरच्या शिट्टी प्रमाणे होतो आणि मग मनात कोंडलेली वाफ भसकन बाहेर पडते. त्यातून हिमो सारख्या समस्या उद्भवतात. हिमो बाधितांमध्ये मध्यम व उच्च मध्यम वर्गातील पुरुषांचे प्रमाण जास्त असून बर्‍याचदा भावंडांपैकी सर्वात मोठा मुलगा या समस्येने ग्रासलेला असतो.

६. जैवरासायनिक बदल : वरील सर्व कारणांचा परिणाम म्हणून मेंदूपेशींमध्ये काही रासायनिक बदल होत असावेत असे एक गृहीतक आहे. पेशींमधील एंटीऑक्सीडेंट घटकांचे (उदा. यूरिक ॲसिड) प्रमाण कमी होते. त्यातून त्यांचा दाह होतो. परिणामी विशिष्ट पेशींचे उद्दीपन होते. तसेच पेशींतील काही अमिनो आम्ले, मेदाम्ले आणि एन्झाइम्सच्या पातळीचा हिमोशी संबंध असण्याची शक्यता आहे. अर्थात हा विषय गहन असून त्यावर दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे.

७. हिमोसदृश अवस्था : काही शारीरिक आजारांमध्ये संबंधिताची घरीच राहण्याची प्रवृत्ती निर्माण होते. उदाहरणार्थ:
a. हालता किंवा चालता न येणारा आजार
b. चेहरा किंवा शरीराच्या दर्शनी भागावर मोठ्या प्रमाणात पुरळ येणे किंवा नकोसा त्वचाविकार असणे
c. वारंवार शौचास जावे लागणारे पचनसंस्थेचे आजार.
वरील प्रकारचे आजार जर दीर्घकालीन होत राहिले तर त्यातून संबंधिताच्या मनोवस्थेवरही परिणाम होतो. त्यातून जनसंपर्क नकोसा वाटतो.
(कोविड महासाथीच्या पहिल्या वर्षी कित्येक सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांची, आजाराच्या भीतीने अजिबात घराबाहेर न पडण्याची प्रवृत्ती झाली होती. टाळेबंदी उठवल्यानंतर सुद्धा ती टिकून होती. त्याला ‘हिमो-सदृश’ अवस्था म्हणता येईल).

अवस्थेची लक्षणे आणि टप्पे
समजा, एखादी हिमो अवस्थेतील व्यक्ती कुटुंबात राहत आहे. या हिमोच्या तीव्रतेनुसार तिचे तीन टप्पे असतात :
१. यामध्ये ती व्यक्ती आठवड्यातून २-३ दिवस घराबाहेर पडून बाहेरच्यांची किरकोळ संवाद साधते.
२. घरातून जवळजवळ बाहेर पडणे नसते किंवा फारतर आठवड्यातून एखादा दिवस. पण घरातल्या व्यक्तींशी किरकोळ संवाद होत राहतो ( हो/नाही स्वरूपाचा)
३. घरात असून देखील स्वतःच्या खोलीतच जवळजवळ कोंडून घेतल्यासारखे राहणे. हळूहळू कुटुंबियांशीही संवाद होत नाही.

एकटे राहणाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या घराबाहेर पडण्यावरूनच हिमो-तीव्रता ओळखावी लागते.

उपचार

हिमो-बाधित लोकांवर उपचार करणे आव्हानात्मक असते. किंबहुना त्या अवस्थेत काही वर्षे गेलेल्या अशा लोकांशी संवाद साधणे हेही सोपे नसते. या संदर्भात जपानमध्ये स्वतंत्र हिमो उपचार आणि मार्गदर्शन केंद्रे स्थापन केली आहेत. त्यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे स्वरूप साधारणपणे असे असते :
1. कौटुंबिक आधार
2. व्यक्तिगत उपचार
3. सामूहिक उपचार आणि
4. बाधिताला समाजात सामावून घेणे.

कौटुंबिक आधार
बाधित व्यक्ती स्वतःहून उपचारांचे नाव काढत नाही. तसेच स्वतःच्या पालकांशी देखील तिचा विसंवाद होतो. समुपदेशन करण्यासाठी हा सर्वात मोठा अडथळा असतो. पालकांच्याही मनात अनेक पूर्वग्रह असतात. “आपण आपल्या पाल्यावर उपचार चालू केले असता शेजारपाजारचे काय म्हणतील?” असे विचार त्यांना उपचारकांपासून परावृत्त करतात.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन मानसिक कल्याण केंद्रांनी पालकांसाठी अभ्यासवर्गांची योजना केलेली आहे. यामध्ये पालकांना आपल्या पाल्यावर मानसिक प्रथमोपचार देण्यास सक्षम केले जाते. पालकांच्या या प्रशिक्षणात त्यांना खालील मुद्द्यांबाबत तयार केले जाते:
· पाल्याचे समंजसपणे ऐकून घेणे
· त्यावर कुठलेही मत व्यक्त न करता मदतीचा हात देणे
· या समस्येबाबत शास्त्रीय माहिती समजावून सांगणे आणि समुपदेशकांचा सल्ला घेण्याबाबत बाधिताचे परिवर्तन करणे
याच्या जोडीला त्यांच्यासाठी काही प्रात्यक्षिक वर्गही घेतले जातात. त्यामध्ये हिमोच्या भूमिकेतील एखादी निरोगी व्यक्ती आणि समुपदेशक यांचा प्रत्यक्ष संवाद ऐकवला जातो. अशा सक्रीय सहभागातून पालकांचा आत्मविश्वास वाढतो.

व्यक्तिगत उपचार

हिमो बाधित व्यक्ती बऱ्याचदा स्वतःहून उपचारांसाठी घराबाहेर जायला तयार नसते. अशा वेळेस मनोसमुपदेशक, नर्स, डॉक्टर किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपैकी कोणी ना कोणी अशा व्यक्तीच्या घरी जाऊन भेटणे उपयुक्त ठरते. या निमित्ताने बाधिताशी संवाद वाढल्यानंतर गरजेनुसार त्याला समुपदेशकाकडे बोलावले जाते. त्यांच्या तपासणीदरम्यान बाधिताला कुठला प्रस्थापित मनोविकार आहे की नाही याची खात्री केली जाते. उपचारांचा प्राथमिक भाग म्हणून काही शारीरिक व्यायामप्रकार करण्यास सांगितले जाते.

उपचारांच्या आधुनिक पद्धतीमध्ये पाळीव प्राणी किंवा या प्राण्यांसारखे दिसणारे रोबो यांचाही वापर केला जातो. सुरुवातीस बाधित व्यक्ती दुसऱ्या माणसाशी संवाद साधण्यास फारशी उत्सुक नसते. अशा वेळेस या कृत्रिम साधनांच्या मदतीने तिचा एकटेपणा कमी करता येतो. तसेच एकटे राहणाऱ्या बाधितासाठीही हे उपचार फायदेशीर ठरतात. अलीकडे काही ऑनलाइन खेळांचे उपचार-प्रयोग झालेले आहेत. अशा विविध पद्धती वापरून संबंधिताचे मानसिक समुपदेशन केले जाते. गरजेनुसार मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार करता येतात.

मानसिक अस्वस्थता आणि मनोविकार यांच्या सीमारेषेवर असलेली हिमो ही एक मोठी समस्या. जपानमधील त्याच्या व्यापकतेमुळे ती जगासमोर आली. एकंदरीत जगभरातील बदलत्या कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीतून एकटेपणाच्या विविध समस्या सर्वत्र उद्भवताना दिसतात. समुपदेशन आणि अन्य पूरक साधनांच्या मदतीने त्यांचा प्रतिबंध आणि उपचार करणे महत्वाचे आहे.
………………………………………………………………………………………………………………

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन माहिती... सुंदर लेख
मोबाईल मुळेही असले आजार बळावू शकतील असं वाटतं. हिमो हा प्रकार स्वमग्नताच की....
काही लोकांना न थांबता दुस-याशी तासनतास बोलावेसे वाटते ते एक प्रकारे कोंडमारा झाल्याचे लक्षण आहे का?

छान लेख.
ह्या विषयावर खूप पूर्वी एक कादंबरी वाचली होती (आता नाव आठवत नाही).
मुलांकडून अती अपेक्षा ही समस्या जपानमध्येही आहे तर..
हिमो ची बाधा मला वाटतं आपल्याकडे वृद्धलोकांमध्ये दिसते.. त्याला बाहेरची गर्दी.. ट्रॅफिक.. पडण्याची भीती.. ही देखील कारणं असतीलच..

एखाद्याला आपले काम इतके आवडते की बाकी काही न करता तो दिवस रात्र फक्त त्या च्या कामाविषयीच विचार करतो आणि त्यामुळे खोली बाहेर किंवा घराबाहेरही फारसा पडत नाही, आवडते लोक असतील तरच मोकळे संवाद होतात नाहीतर नाही हे सगळे हिमो चेच प्रकार का ?

हल्ली नेट, टिव्ही यामुळे हे प्रकार खुपच दिसतात असे वाटते.

सर्व प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !
चर्चेसाठी चांगले मुद्दे आलेत.
....
१. न थांबता दुस-याशी तासनतास बोलावेसे वाटते ते एक प्रकारे कोंडमारा झाल्याचे लक्षण आहे का?
होय, शक्य आहे.

मागे एकदा माझ्या माहितीतील एक भारतीय कार्यकर्ते त्यांच्या काही कार्यक्रमांसाठी अमेरिकेत गेले होते. तिथे एकट्याने राहणारा एक भारतीय तरुण होता. जेव्हा त्याला ते गृहस्थ तिकडे आल्याची बातमी मिळाली तेव्हा त्याने त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. सुरुवातीस तो म्हणाला की मला पोटभर तुमच्याशी बोलायचे आहे, तुम्ही फक्त ऐकून घ्याल का ?

त्यानंतर खरंच तो तरुण तासभर त्यांच्याशी भडभडा बोलत होता.

. मुलांकडून अती अपेक्षा ही समस्या जपानमध्येही >>> समस्या जागतिकच असावी !
...
३. एखाद्याला आपले काम इतके आवडते की बाकी काही न करता तो.... >>>

याला कामात गढून घेणे किंवा स्वकेंद्रित असे म्हणता येईल. हिमोमध्ये लोकांबद्दल अगदी तिटकारा असतो. कोणालाच भेटायला नको अशी टोकाची अवस्था असते आणि लेखात दिल्याप्रमाणे ती काही महिने टिकून राहते.

उत्तम माहिती.
जपानमध्ये याची सुरुवात का झाली असावी?
मुलांकडून पालकांना अपेक्षा असणे, अतिपरावलंबित्व ही कारणं दिलेली आहेतच.
तरीही, जपान का, असा मला प्रश्न पडलाय.

सुरुवातीची चित्रं काय दर्शवतात?

सर्व नवीन प्रतिसादकांचे अभिप्रायाबद्दल आभार !
...
तरीही, जपान का, असा मला प्रश्न पडलाय.
>>
१. Amae हे त्यांचे एक संस्कृतिक वैशिष्ट्य आहे (https://en.wikipedia.org/wiki/The_Anatomy_of_Dependence)
२. पर्वतावरील एकांतवासाची धार्मिक परंपरा.
..
सुरुवातीची चित्रं >>> जपानी प्रतीक इतकेच. मलाही ठाऊक नाही . Happy

नेहमी प्रमाणे एक चांगला लेख!
अशा विकारांनी त्रस्त असलेल्या लोकांबाबत वाईट वाटते. त्यांनाही त्रास होत असतोच.पण त्यांच्या नेहमी सहवासात असणारे लोक जास्त भोगतात.

नेहमीप्रमाणे एक चांगला लेख!
>>>मानसिक अस्वस्थता आणि मनोविकार यांच्या सीमारेषेवर असलेली हिमो ही एक मोठी समस्या>>>>
हे महत्वाचे.

नेहमीप्रमाणे एक चांगला लेख!
>>>मानसिक अस्वस्थता आणि मनोविकार यांच्या सीमारेषेवर असलेली हिमो ही एक मोठी समस्या>>>>
हे महत्वाचे.

माहितीपूर्ण लेख. भयानक आहे ही मनोवस्था. मला वाचताना सारखा ऐश्वर्या आणि अजय यांचा रेनकोट चित्रपट आठवत होता. एका अंधाऱ्या घरात कित्येक वर्षे स्वतःला कोंडून घेणारी त्यातली ऐश्वर्या ही हिमोबाधित असावी. तिच्या घराच्या अवस्थेचं आणि तिच्या मनोवस्थेचं वर्णन गुलजार ह्यांनी अगदी चपखल शब्दांत केलं आहे. -

किसी मौसम का झोंका था....
जो इस दीवार पर लटकी हुई तस्वीर तिरछी कर गया है
गए सावन में ये दीवारें यूँ सिली नहीं थी
न जाने इस दफा क्यूँ इनमे सीलन आ गयी है ,
दरारे पड़ गयी हैं
और सीलन इस तरह बहती है जैसे खुश्क रुखसारों पे गीले आंसू चलते हैं
-------
पुढे ते म्हणतात,
------
दुपहरें ऐसी लगती हैं बिना मुहरों के खाली खाने रखे हैं
न कोई खेलने वाला है बाज़ी और न कोई चाल चलता है
ना दिन होता है अब न रात होती है
सभी कुछ रुक गया है
वो क्या मौसम का झोंका था जो इस दीवार पर लटकी हुई तस्वीर तिरछी कर गया है
-------

( अवांतराबद्दल क्षमस्व)

सर्व नवीन प्रतिसादकांचे अभिप्रायाबद्दल आभार !
....
१. सहवासात असणारे लोक जास्त भोगतात.>>>+११
बरोबर. एक प्रकारे ते संपूर्ण कुटुंबाचेच दुखणे झालेले असते.
....
२. ऐश्वर्या आणि अजय यांचा रेनकोट चित्रपट आठवत होता.>>>+११
चांगला चित्रपट आहे. यावर अन्य संदर्भातही पूर्वी चर्चा झालेली आहे.

३.गुलजार ह्यांनी अगदी चपखल शब्दांत केलं आहे. ->>> +११ सुंदर !

>>>>दुपहरें ऐसी लगती हैं बिना मुहरों के खाली खाने रखे हैं
न कोई खेलने वाला है बाज़ी और न कोई चाल चलता है>>>> क्या बात है ! मस्तच.

कुमार१,

कोंडेश्वर आणि त्यांच्यावरची माहिती छान.

हरचंद पालव यांनी गुलजारच्या ओळी बेस्ट कोट केल्यात. ग्रेट.

सर्व नवीन प्रतिसादकांचे अभिप्रायाबद्दल आभार !

कोंडेश्वर
>>> नाव आवडले.
...
रेनकोट हा हिंदी चित्रपट >>>
हा The Gift of the Magi या कथेवर आधारित आहे.
त्यातील डेला मात्र 'अशी' नाही.
https://www.maayboli.com/node/79468

अच्छा! ही कथा वाचून पाहतो. ओ हेनरीच्या कथा हृदयस्पर्शीच असतात. धाग्याच्या दुव्याबद्दल तुम्हाला दुवा देतो!

असे हे एकाकीपण काही महिन्यांपर्यंत देखील टिकू लागले. >> बापरे !
काहीजण तर तब्बल २० वर्षे एकाकीपणे जगलेले आहेत.>> फारच भयानक आहे हे.

नेहेमीप्रमाणेच सविस्तर शास्त्रीय माहिती देणारा लेख, कुमार सर !
Nim's Islandमधील Alexandra आठवली. अर्थात तेव्हा, (१२-१३ वर्षांपूर्वी ) हा काय विचित्रपणा ? अशीच प्रतिक्रिया होती. तुमचे काही लेख वाचून मात्र मानसिक अस्वस्थता आणि मनोविकार यांबद्दल जरा awareness येत आहे. (असे जाणवते.)

सर्व नवीन प्रतिसादकांचे अभिप्रायाबद्दल आभार !

Nim's Islandमधील Alexandra >>>
या माहितीबद्दल धन्यवाद !
संबंधित पुस्तकावर आधारित चित्रपटही निघालेला दिसतो आहे.

हो, चित्रपटही बघितला आहे. Jodie Foster ने Alexandra छान साकारली आहे. पण, बुक सिरीज (fantastically written for elementary schoolers) अर्थातच जास्त आवडली. Happy

Hikikomori ने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवण्याचा एक अभिनव मार्ग जपानमध्ये काढला आहे. त्यांनी esports या प्रकारच्या नव्या शाळांची निर्मिती केली आहे.

या शाळांमध्ये नेहमीच्या शिक्षणाच्या जोडीने व्हिडिओ गेम्सचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. यातून पुढे व्यावसायिक व्हिडिओ गेम्स निर्माते व्हावेत अशी संकल्पना आहे.
पूर्वी .Hikikomori मुळे पारंपरिक शाळा बंद केलेले विद्यार्थी गेम्सच्या आकर्षणामुळे या नव्या शाळांकडे येत आहेत.

https://www.japantimes.co.jp/life/2023/03/04/lifestyle/school-esports-dr...