उजेड झाला मला नकोसा

Submitted by निशिकांत on 12 June, 2022 - 12:33

अर्ध्यामध्ये साथ सोडली
तू जाता हरवला कवडसा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

अनुभवले मी क्षणभर मृगजळ
रोमांचांची घेत अनुभुती
आठवणींच्या कळा भोगणे
प्रेमाची का हीच फलश्रुती?
आयुष्याची तर्‍हा वेगळी
कधी हुंदका कधी उसासा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

क्षणेक सहवासाचा दरवळ
अजून श्वासामधे नांदतो
सोनेरी क्षण धुंद होउनी
ह्रदयावरती पुन्हा गोंदतो
तगमगतो पण तुझा राबता
स्वप्नी वाटे हवाहवासा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

फुलला होता अवकाळी जो
हिरवा चाफा जळून गेला
बहर चुकोनी आला जेंव्हा
फुलण्याआधी गळून गेला
वसंत इकडे कधी न आला
दुरून जातो जराजरासा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

नको वाट अवसे पुनवेची
ग्रहण योग तर रोजच असतो
"वेध लागणे" जुना रोग हा
माझ्यासोबत जाइल दिसतो
प्राक्तनातल्या दुर्दैवाचे
कारण कुठले? नको मिमांसा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

आठवणींच्या नभांगणातिल
शुक्रतारका तुझी आठवण
शिंपल्यातल्या मोत्यासम मी
मनात केली खोल साठवण
कधी घेतला तुझ्यासवे जो
श्वास जाहला मला पुरेसा
घे अंधारा कवेत मजला
उजेड झाला मला नकोसा

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users