२५ वर्षे जुना कॅरम स्ट्राईकर !

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 May, 2022 - 06:58

२५ वर्षे जुना कॅरम स्ट्राईकर !

तसा तो बावीसेक वर्षांपूर्वी आम्ही विकत घेतला होता. मुंबईच्या चोरबाजारात मिळाला होता. तेव्हाही तितकाच जुना दिसत होता जेवढे की आज. त्यामुळे त्याचे खरे वय कोणालाच ठाऊक नाही. प्रत्यक्षात माझ्या वयापेक्षाही जास्त असल्यास नवल वाटायला नको Happy

परवा लेकीसोबत खेळताना आमचा नेहमीचा स्ट्राईकर सापडत नव्हता. म्हणून तिनेच माझ्या कपाटातून त्याला बाहेर काढला. सोबत माझ्या आठवणीही बाहेर आल्या.

कॅरमची पहिली आठवण अशी काही विशेष नाही. चारचौघांसारखेच आधी खेळण्यातल्या प्लास्टीकच्या कॅरमवर, घर-घर खेळावे तसे कॅरम कॅरम खेळून झाले. मग छोट्याश्या लाकडी कॅरमसमोर मांडी घालून बसायचे आणि पैसे पैसे खेळायचे दिवस आले. थोडे मोठे झालो, तसे कॅरमही किंचित मोठ्या आकाराचा झाला. आणि पैसे पैसे च्या जागी गेम गेम खेळण्यात मोठेपणा वाटू लागला. बालपण यातच संपले.

मग साधारण आठवीत असताना मामाकडे गेलेलो. तसे दर मे महिन्याच्या सुट्टीत तिथेच जायचो. त्यांच्या घरासमोरच्या मैदानात क्रिकेट खेळण्यातच सुट्टी संपायची. पण त्या वर्षी जून महिना संपेपर्यंत मुक्काम लांबला आणि क्रिकेट बंद होत तिथे कॅरमचा सीजन सुरू झाला. स्टँडवर लागलेल्या मोठ्या आकाराच्या मास्टर बोर्डवर , लटकलेल्या बल्बच्या साक्षीने, खुर्चीत बसून कॅरम खेळायची ती माझी पहिलीच वेळ. एवढ्या लांबवर दिसणार्‍या त्या सूक्ष्म भोकात आपली सोंगटी जाणे तर दूर, पण जवळपास तरी पोहोचेल का अशी शंका मनात घेऊन मी सुरू तर झालो. पण असा सुरू झालो की गेम संपवूनच ऊठू लागलो.

हे म्हणजे माझ्याबाबत अगदी क्रिकेटसारखे झाले. लहानपणी जोपर्यंत आम्ही एका सरळसोट गल्लीत क्रिकेट खेळत होतो, तोपर्यंत मी गल्ली क्रिकेटचा एक सामान्य खेळाडू होतो. ईतरांसारखे ताकदीच्या जीवावर फक्त समोर फटके मारून चौके छक्के वसूल करायची कुवत माझ्यात फार नव्हती. पण जेव्हा खुल्या मैदानात खेळायला उतरलो तेव्हा जाणवले की चौफेर खेळताना आपले पदलालित्य आणि हँड आय कॉर्डीनेशन जबरी आहे. गल्लीत खेळताना ज्या फटक्यांना बॉल पत्र्यावर गेल्याने बाद दिले जायचे, ते आता मी दोन क्षेत्ररक्षकांच्या गॅपमध्ये लीलया मारून चौके वसूल करू लागलो. एकेकाळी बिल्डींगच्या संघात केवळ एक जागा भरणारा खेळाडू होतो. ते थेट ओपनर जावे आणि पंधरा ओवर एकट्यानेच नाबाद खेळून यावे ईतके प्रमोशन झाले.

तर हेच कॅरमबाबतही झाले. तोपर्यंत कॅरम म्हणजे केवळ जोरजोरात मारून सोंगट्या फोडायचा धसमुसळा खेळ माहीत होता. पण पावडर टाकलेल्या आणि बल्बच्या ऊष्णतेने तापून सुळसुळीत झालेल्या कॅरम बोर्डवर अलगद टिचक्या मारून सोंगटीला तिचा रस्ता दाखवायचे कौशल्य आपल्यात फार आहे याचा शोध तेव्हा लागला.

तर मामाच्या वाडीत दोन बोर्ड होते. एक जुना लिंबूटिंबू पोरांचा, दुसरा तेथील मोठ्या एक्स्पर्ट खेळाडूंचा. लवकरच माझे प्रमोशन मोठ्या बोर्डवर झाले आणि त्या महिन्याभराच्या वास्तव्यात मी ज्युनिअर चॅम्पियन म्हणून तिथे नावलौकीक मिळवला.

सुट्टी संपली. घरी आलो आणि पुन्हा बिल्डींगच्या पोरांसोबत पहिलेच दळण सुरू झाले. पुन्हा माझ्यातले कॅरम गुण लपून सुप्त झाले.

यातच दहावी झाली. शाळा संपली. पण शाळेत कधी कॅरमच्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचे आठवत नाही. आठवी-नववीत बुद्धीबळ स्पर्धेत भाग घेतलेला. आणि नववीच्या वर्षाला चक्क दुसर्‍या क्रमांकाचे बक्षीसही मिळालेले. सर्व तुकड्या मिळून जवळपास ४००+ मुले, ज्यात पन्नास साठ मुलांनी स्पर्धेत भाग घेतलेला. त्यामध्ये वर्षभर बुद्धीबळाचे तोंडही न बघणार्‍या मुलाने दुसरा नंबर पटकावणे ही नक्कीच कौतुकास्पद कामगिरी होती. पण कॅरम स्पर्धात मात्र पाचवीत असताना एकदाच भाग घेतलेला. तेव्हा माझा खेळ शून्य होता. पहिल्याच राऊंडला हरून बाहेर पडलो. ते पुन्हा त्या वाटेला गेलो नव्हतो.

दहावीनंतर मात्र आमच्या बिल्डींगच्या मुलांनाही अचानक कॅरमप्रेमाचे भरते आले. तसे आमच्या जुन्या मुंबईत तेव्हा दर दुसर्‍या गल्लीत कॅरमचा खेळ रंगलेला बघायला मिळायचा. चार लोकं खेळायचे आणि चौदा लोकं कोंडाळे करून त्यांचा गेम बघायचे. काही ठिकाणी प्रत्येक बोर्डमागे पैसे देऊन खेळता यायचे, तर काही जागी पैश्याची बेट लावूनच खेळले जायचे. आमच्याकडची काही पोरं मोठी झाली तसे बाहेर जाऊन अश्या कॅरमच्या अड्ड्यांवर खेळून आली होती. आणि त्यांना आपलाही स्वतःचा कॅरम असायला हवा असे वाटू लागले.

पैश्यांची जुळवाजुळव सुरू झाली. तसे समजले, हे क्रिकेटच्या खेळापेक्षा महागडे प्रकरण आहे. एका मुलाने ओळखीतून खबर काढली, की एके ठिकाणी बरेपैकी नवाकोरा कॅरम बोर्ड काही कारणास्तव विकायला काढत होते. आणि तो केवळ दोन हजारात मिळत होता. त्यावेळचे दोन हजार. ते देखील सेकंडहँड कॅरमला. आमच्यासारख्या न कमावत्या मुलांनी जमवणे ही फार मोठी गोष्ट होती. पण आमचे ठरलेले आणि आम्ही ते पैसे स्वतःच हातपाय झाडून, स्पॉन्सर न मिळवता जमवले.

रोख पैसे देत कॅरम ताब्यात घेतला. सोबत स्टँडही आला. दादरावर कॅरमची जागा नक्की झाली. दादरावरच्याच लाईटचे कनेक्शन घेतले गेले. बल्ब त्याच्या फोकससह कॅरमच्या सेंटरला लटकला गेला. कॅरमभोवती चार खुर्च्या मांडल्या गेल्या. चाळ आमची ऐसपैस असल्याने कॉमन पॅसेजमध्ये जागेची कमतरता नव्हती. त्यामुळे खुर्च्यांभोवती बघ्यांचीही गर्दी झाली. त्या दिवशी, ज्या क्षणी तो कॅरम बोर्ड स्थानापन्न झाला आणि लाईट लागत पहिल्या बोर्डचा पहिला ब्रेक झाला. त्यावेळच्या भावना गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणपतीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अश्याच होत्या. फक्त फूल तांदूळ तेवढे त्याला वाहिले नव्हते. असा कॅरम आणायचे आपल्याला का सुचले नाही असे आमच्याईथल्या मोठ्यांनाही वाटले. पुढे कैक वर्षे मग तो कॅरम आमच्या दादराची शोभा वाढवत होता.

आमचे घर म्हणजे चाळीतल्या पोरांचा अड्डा असल्याने, आमच्या घरात कधीही ये जा करण्यास कोणालाही मज्जाव नसल्याने, ज्या दादरावर कॅरम खेळला जायचा ते आमच्याच ईथले असल्याने आणि पुर्ण चाळीत रात्री सर्वाधिक उशीरापर्यंत जागणारे आमचेच घर असल्याने खेळून झाल्यावर कॅरम आमच्यात घरात ठेवला जायचा. त्यामुळे ईतर कोणापेक्षाही मला त्या कॅरमबद्दल एक विशेष जिव्हाळा होता. आजकाल लोकं गाडी घेतली की पहिल्याच दिवशी फेसबूक स्टेटसला बळेच लिहीतात, न्यू मेंबर ईन फॅमिली. पण तो कॅरम हळूहळू खरेच मला फॅमिली मेंबरसारखा वाटू लागला होता.

मी एकुलता एक होतो. आजी आजोबाही मी बारावीला जाईस्तोवर अनंतात विलीन झाले होते. आईवडील ऑफिसला जायचे. सुट्ट्या पडल्या की दुपारी मला घर मोकळे मिळायचे. त्याचा फायदा ऊचलत मी घरीच कॅरमचा स्टँड आणि बल्ब लाऊन एक सेट अप तयार केला होता. बरेचदा मग घर मोकळे असताना दुपारचा कॅरम अड्डा माझ्याच घरी भरायचा.

हा जो शीर्षकातील स्ट्राईकर आहे ना, तो तेव्हाच सुरुवातीच्या दिवसात घेतला होता. चोरबाजारात अगदी नगण्य किंमतीत हा हिरा मिळाला होता. कदाचित विकणार्‍याला याची कल्पना नसावी, की तो हस्तीदंताचा स्ट्राईकर होता. म्हटले तर एक बारकुटली चकती. पण हातात घेताच तिचे वजन जाणवावे आणि हलकीशी टिचकी मारताच समोरच्या काळापांढर्‍या सोंगट्याना जो त्याचा तडाखा तडाखा, तेव्हा कळावे ही काय चीज आहे. ईतक्या वर्षात ईतके वेडेवाकडे वापरले त्याला, पण ना एक ओरखडा न आणखी काही. आजही तो हातात घेता असे वाटते तिथेच बसावे आणि कॅरमचा खेळ सुरू करावा.

तोच स्ट्राईकर आणि माझे कॅरमचे कौशल्य घेऊन मी व्हिजेटीआय कॉलेजला गेलो. ते मोठे सरोवर होते. तिथे माझ्यापेक्षा बाप खेळाडू भरले होते. मी त्यांच्याशी चुकूनही स्पर्धा करायला गेलो नाही. तर बरेच काही शिकलोच. थोड्याफार क्लृप्त्या मलाही माहीत होत्या. पण त्या फार बेसिक होत्या. तिथे विविध प्रकारचे डबलशॉट शिकलो. ते वापरू लागलो तसे माझा खेळ आणखी ऊंचावर गेला. कॅरम मी बुद्धीबळासारखे एंजॉय करू लागलो. नुसते सरळसोट सोंगट्या मारणे हे तिथे बालिश ठरायचे. एक सोंगटी मारताना ती अशी मारावी की स्ट्राईकर आणखी कुठेतरी आदळून पुढची चाल तयार झाली पाहिजे. आपला गेम संपवतानाच समोरच्याचाही गेम अडकवता आला पाहिजे. जितके खात्रीपुर्वक आपण समोरच्या सोंगट्यांना कट मारतो तितक्याच खात्रीने थर्ड आणि रिबाऊंडच्या सोंगट्या जायलाच हव्यात. हे बेसिक शॉट चुकायलाच नकोत. एकदा मैदान मोकळे झाले की समोरच्याला संधी न देता बोर्ड रिकामा झालाच पाहिजे.

कॅरम हा खेळ असा आहे की तुम्ही जितके चांगल्या खेळाडूंसोबत खेळाल तसे तुमचाही खेळ आपसूक ऊंचावत जातो. आधीपासून आमच्या बिल्डींगमध्ये कॅरमबाबत माझी फार ख्याती होती. समोर सरळसरळ जाणार्‍या सोंगट्या असल्या आणि मामाच्या हातात स्ट्राईकर गेला की गेम संपलाच म्हणून समजा. त्यातही सेंटरला क्वीन आली की मी ती हमखास मारणारच. दुसरा चान्स नाही. आधी मी यातच खुश होतो. पण आता चाळीतली लोकंही माझे वेगवेगळे शॉट एंजॉय करू लागले होते. अगदी आज मुलीशी खेळतानाही छोट्याश्या कॅरमवर का होईना मी तेच एंजॉय करत खेळतो. तिला शॉट मारण्याआधीच सांगावे, बघ, ईथे या सोंगटीला असे मारले की तिकडची सोंगटी देखील तिथे जाणार, वा तिला मी माझ्या हाताशी खेचणार. मग तसेच व्हावे आणि तिच्या नजरेत आपला बाप काय बापमाणूस आहे हे बघावे.

असो,
तर या व्हिजेटीआय कॉलेजच्या खूप चांगल्या आठवणी कॅरमशी जोडल्या गेल्या आहेत. कारण कॉलेजमधील खूप काळ जिमखान्यात घालवला आहे. स्पेशली डिप्लोमाला.
नऊ वाजताचे कॉलेज होते. साडेनऊला जिम उघडायची. आम्ही नऊ वीस पर्यंत जिमच्या दरवाज्यात हजर असायचो. जिमचा केअरटेकर येताच त्याच्या हातातून चावी घेत स्वतःच दरवाजा उघडायचो. त्याला सारे कॅरम लाऊन द्यायला मदत करायचो. आदल्या दिवशीची पावडर झाडून साफ करायचो. नवीन टाकायचो. हे सारे सोपस्कार पार पाडले की त्याला आयडी कार्ड देत आवडीचे स्ट्राईकर घ्यायचो, आणि सुरू व्हायचो. माझ्याकडे माझा स्वतःचा स्ट्राईकर असायचा. मी नेहमी तोच मिरवायचो.

कधी मूड लागला की सकाळ ते संध्याकाळ जिममध्येच पडीक असायचो. बरेचदा तिथेच डबाही खायचो. ज्या क्लासचा एखादा पिरीअड ऑफ असायचा त्यांची त्या त्या वेळेत जिममध्ये गर्दी व्हायची. दुपारच्या सुट्टीत मात्र पाय ठेवायलाही जागा नसायची. तरी आम्ही मात्र आमच्या खुर्चीत मांड्या रोवून बसलेलो असायचो. कारण कॅरमवर क्लेम लागायचे. जे हरणार ते उठणार, जे जिंकणार ते खेळतच राहणार. आणि आम्ही चांगलेच खेळायचो.

व्हिजेटीआयमध्ये कॅरमचा एक फार मोठा अध्याय संपल्यावर मग तिथून पुढील शिक्षणासाठी वालचंद कॉलेजला गेलो. पण तिथली जिम काही भारी नव्हती. म्हणजे मला तर वाटते आम्ही मुंबईकरांनीच जाऊन तिथल्या कॅरमवरची धूळ झटकली. पण ते बोर्ड फारसे चांगल्या अवस्थेत नसल्याने आणि आमचा बेंचमार्क बरेपैकी वरचा सेट झाला असल्याने पुन्हा त्या वाटेला गेलो नाही.

अर्थात त्या पिरीअडमध्ये जिमची फारशी गरजही भासली नाही. कारण हॉस्टेल लाईफ पहिल्यांदा एंजॉय करत होतो. रोजचा बाहेर नाश्ता, मेसचे जेवण, संध्याकाळचे क्रिकेट, रात्रीच्या मित्रांसोबत कट्ट्यावरच्या गप्पा, मूड आला की सायकलवर टांग मारून भटकंती, विकेंड टू विकेंट थिएटरात पिक्चर अश्या बरेच धमाल होत्या. हे ही कमी म्हणून एका मुलीच्या प्रेमातही पडलो होतो. थोडक्यात दिवस कसा सुरू व्हायचा आणि रात्र कशी संपायची हे कळतही नव्हते.

पण आम्ही कॅरम काही काळ विसरलो तरी कॅरम आम्हाला विसरला नव्हता. तो आमचा शोध घेत आमच्या दारी आलाच. काही दिवसांसाठी का होईना एका मित्राच्या रूमवर कॅरमची सोय झाली. त्याचे झाले असे, त्या मित्राचा घरमालक सहकुटुंब काही कामासाठी परगावी गेलेला. बाकी घरादाराला टाळे लावले तरी कॅरम मित्राच्या ताब्यात आलेला. मग काय, ते आठदहा दिवस दर रात्री आमचा मुक्काम त्याच मित्राच्या रूमवर. मेसवर जेवण ऊरकून एकत्रच तिथे जायचो. तिथेच रात्र जागवायचो. पहाटे डोळा लागेल तेव्हा तिथेच झोपायचो. सकाळचे लेक्चर बुडवून दुपारी थेट मेसचे जेवून कॉलेजला जायचो. त्या दिवसात हेच आमचे रूटीन होते. आजही आम्ही चार टाळकी भेटलो की त्या दिवसांचीच आठवण काढतोच. कॅरम प्रेम म्हणतात ते हेच Happy

मग दुसर्‍या सेमीस्टरला तिथे स्पर्धा सुरू झाल्या. त्यात एक कॅरम स्पर्धाही होती. मोठ्या ऊत्साहाने, किंबहुना फाजील आत्मविश्वासाने, आम्ही मुंबईकरांनीही त्यात भाग घेतला. पण ऐनवेळी समजले की ईथले नियम आपल्यापेक्षा वेगळे आहेत. जसे की हाताखालची सोंगटी मारायची नाही. ती फोडून मग समोरच्या पॉकेटला मारायची. मारली तरी मग समोरचा प्रतिस्पर्धी अजून एक मुद्दाम आपल्या हाताखाली आणून सोडणार. अश्या नियमात खेळायची सवय नव्हती. यासाठी थोडेफार वेगळे कौशल्य आणि वेगळे डावपेच गरजेचे होते. पण ते अंगीकारायच्या आधीच मी धक्कादायक पद्धतीने स्पर्धेतून बाहेर पडलो Happy

हॉस्टेलच्या आयुष्यात जितके सारे धंदे करता येतील तितके करूनही तिथे मी टॉपर आलो. आणि शिवाजी युनिव्हर्सिटी ते मुंबई युनिव्हर्सिटी ट्रान्सफर मिळवत, केवळ एकच वर्ष वालचंद सांगलीचा मुक्काम घेत, तिथले माझे प्रेम अर्धवट सोडत, पुन्हा मुंबईत आलो. त्यात मी पुन्हा विजेटीआयलाच आलो. पुन्हा त्याच जिमच्या छत्रछायेखाली आलो. जिमचा केअरटेकर आजही तोच होता. मला आठवतेय की कॉलेज सुटून सहा सात वर्षांनी एकदा तिथे जाणे झाले होते. ते देखील शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी. हॉस्टेल भागात फिरत होतो. आता ईथे आपल्या कोणीही ओळखीचे नसणार हे गृहीत धरूनच होतो. पण अचानक लांबून एक दचकवणारा आवाज आला, ऐयऽऽ ऋन्मेऽऽष.... तो त्याचाच होता Happy

पण डिग्रीला मात्र जिमचा रस्ता धरला नाही. आता मित्र बदलले होते. डिग्रीचा अभ्यास वाढला होता. त्यात युनिव्हर्सिटी बदलल्याने काही पेपर पुन्हा द्यावे लागणार असल्याने अभ्यासही डबल झाला होता. आणि हे ही काय कमी म्हणून पुन्हा नव्याने एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. मग काय, जिमला टांग देत तिच्यामागे लायब्ररी, कँटीन याच जागा फिरणे होऊ लागले. ती डिप्लोमाला केलेली जिमची मजा पुन्हा आता त्याच कॉलेजात असूनही आयुष्यात येणार नव्हती.

फायनल ईयर संपता संपता मात्र प्रेमभंग झाल्याने देवदास होत शेवटच्या काही दिवसात जिमचा रस्ता धरलेला. एकदा कॉलेज संपले की आपले कॅरमही संपले असे तेव्हा वाटायचे. नाही म्हणायला बिल्डींगमध्ये कॅरम खेळणे होत होते. पण ते पुरेसे नव्हते.

कॉलेज संपले आणि कॅम्पसमधून पहिलाच जॉब लागला तो कांदिवलीच्या एका कंपनीत. तिथे पहिल्याच दिवशी सर्वात मोठी खुशखबर मिळाली की तिथे कॅरम होता. एक सोडून दोन होते. आणि ते रोज लंचटाईंमला खेळलेही जायचे. अर्थात, तिथेही गेल्यागेल्या मी नावलौकिक कमावला. शंभरेक स्टाफ असलेल्या कंपनीत दोन कॅरम आणि दोन चेस बोर्ड ईतकीच स्पोर्टशी निगडीत संपत्ती असलेली स्पोर्ट्ससमिती सांभाळायची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. आणि लगेच मी माझ्या अधिकाराचा फायदा ऊचलत त्या कंपनीच्या ईतिहासातील पहिलीवहिली कॅरम स्पर्धा आयोजित केली.

त्या स्पर्धेत मी भाग नाही घेतला. पण अंपायर म्हणून जातीने स्वतः बसायचो. तेवढेच महिनाभर रोज मला कामातून कन्सेशन मिळायचे. फ्रेशर असल्याने कंपनीला ते चालूनही जायचे. पण या स्पर्धेने एक झाले. त्याआधी दर दुपारी लंच झाल्यावर ठराविक टाळकीच कॅरमचा लुफ्त ऊठवत तिथे पडीक असायचे. पण स्पर्धेमुळे बायका पोरींनाही कॅरमची गोडी लागली आणि त्यापश्चात दर दुपारी कॅरम बोर्डावर कौंटुंबिक माहौल होऊ लागला. ते पाहून कंपनीला मी दोनाचे चार कॅरम करायची विनंती केली आणि ती मान्यही झाली. तिथेही व्हिजेटीआय कॉलेज जिमची पॉलिसी राबवत मी एक कॅरम महिलांसाठी आरक्षित करून घेतला. ज्यामुळे कॅरमबोर्ड म्हणजे टवाळखोरांचाच अड्डा असे समजून संकोचणार्‍या बायकाही तिथे हजेरी लाऊ लागल्या.

आज जेव्हा दहा बारा वर्षांनी त्या कंपनीच्या व्हॉटसपग्रूपवर बायका कौतुकाने सांगतात, की तुझ्यामुळे आम्हाला कॅरमची आवड लागली, आणि खेळायची संधीही मिळाली, तेव्हा वाटते हिच आपली कमाई Happy

ती कंपनी दोन वर्षाने सोडली. जिने कॅरमच नाही तर ईतरही भरभरून आनंद दिला. जो त्यानंतर पुढच्या कुठल्या कंपनीत तितका आला नाही. आणखी तीन ठिकाणी काम करून झाले. पण तिथे कॅरमचा क सुद्धा कधी ऐकाबघायला मिळाला नाही.

त्यानंतर काही वर्षांनी जुनी बिल्डींगही राहिली नाही. त्या जागी नवा टॉवर ऊभा राहिला. कॅरमची टीमही फुटली आणि विखुरली गेली. या काळात कॅरम दान केला. सागाच्या फार सुंदर सोंगट्या होत्या. त्या कोणीतरी ढापल्या. स्ट्राईकर मात्र मी आजवर जपला आहे. किंवा तो मी ढापला आहे असेही म्हणू शकता Happy

फोटोशिवाय लेख कसा पुर्ण होणार असेही म्हणता,
चला तर मग तो ही चिकटवूया Happy

IMG_20220521_160400.jpg

धन्यवाद
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्म्या, एकदम झकास! कॅरमचं व्यसन लागतं, आणि पावसाळ्यात तर सगळ्या व्यसनग्रस्तांचा अड्डा बसायचा. नॉस्टॅल्जिक केलंस रे...

ओह राज, हा पावसाळ्याचा उल्लेख कसा विसरलो मी..
खाण्यामध्ये जसे पावसाळा आणि कांदाभजी हे समीकरण तसे खेळामध्ये कॅरम. अर्थात पावसाळ्यात फूटबॉल खेळणेही एक धमाल असते. पण ओवरऑल मैदानी खेळ बंद होतात तेव्हा कॅरमच सर्वात मोठा सहारा असतो. बाहेर पावसाचे दमट ओलसर अंधारलेले वातावरण आणि आत शेडमध्ये कॅरम बल्बच्या प्रकाशात उजळलेले उबदार वातावरण. परफेक्ट कॉम्बिनेशन Happy

@ रानभुली ईथे बघा
https://youtu.be/VV_tf2JDljA

पहिल्या शॉटमध्ये एकाच वेळी दोन पीस गेल्यात
तसेच शेवटचा तिसरा शॉटही बघा. पर्रफेक्ट सिंपल ऊदाहरण. समोर एकीकडे पॉकेटवर जाणारीच पीस आहे. ती सरळ मारूनही घालवता येते. पण तसे न घालवता स्ट्राईकर एका न जाणाऱ्या सोंगटीवर आदळून तिथे पाठवला. जेणे करून त्या अवघड सोंगट्याही फुटल्या.
या शॉटमध्ये स्ट्राईकर आधी ईतर सोंगट्यांना मारून जाणाऱ्या सोंगटीवर सोडलेला. याच्या उलटे म्हणजे घालवायची सोंगटी हाताशी असेल तर ती सरळ न मारता कट मारून अशी घालवायची की स्ट्राईकर नंतर जाऊन ईतर अवघड सोंगट्यांवर आदळेल.

आणि असे शॉट सोपे असतात. थोड्याश्या सरावाने अंदाज येऊ लागताच जमतात लगेच. फक्त खेळताना डोक्यात विचार तसे हवेत Happy

अहो रानभुली विडिओ माझा नाही. यूट्यूबवरून आणलाय. तशी आयड्या छान सुचवलीत स्वत:चे विडिओ बनवायची. पण तुर्तास तसाच कॅरम नाही हाताशी..

कॅरमच्या लेखात क्रिकेट, जीम, अभ्यास, डिप्लोमा, डिग्री, मुलगी या सर्व विषयात कशी गती होती हे सर्वच आलं आहे. असे सर्वगुणसंपन्न असल्यावर कॅरमचा व्हिडीओ स्वतःचा नसावा हे काय बरं नाही केलंत मालक ! कुणाकडे तरी असेलच की कॅरम ! क्रिकेटचा पण येऊ द्या एक व्हिडीओ. पाहीजे तर नवीन धागा काढा. हाकानाका.

24x24 म्लहणजे हा बोर्ड लहान आहे का? अॅमेझाॅनवर 30 inches चे कॅरम बोर्डस् दिसले स्टॅन्डर्ड साईज म्हणून.

मेधावि, हो वरच्या फोटोतील कॅरम मुलीसाठी घेतला आहे. त्यामुळे छोटा आहे.

याची पण एक गंमत झाली. हा कॅरम तिच्या आई आणि मावश्यांनी नेहमीसारखे तिला गिफ्ट घ्यावे तसे घेऊन टाकला. मी खरे तर चिडलोच. कारण तो मला सिलेक्ट करून घ्यायचा होता. मी त्यांना किंमत विचारली तर मला हजार रुपये म्हणाले. खरी खोटी माहीत नाही. ते मला नेहमी कमी किंमत सांगतात कारण मी नेहमी कश्याला ईतक्या महागड्या गिफ्ट पोरांना देता म्हणून आरडाओरडा करतो. पण यावेळी उलट झाले, मी म्हणालो अजून महागातला आणि अजून चांगला घेतला असता तरी चालले असते. ते ऐकून बायकोला शॉक बसला. आपला नवरा चक्क एका गोष्टीसाठी अजून पैसे खर्च करायला सांगतोय... त्यानंतर मग मी तिला हे माझे कॅरमपुराण ऐकवले. ज्याची तिला फारशी कल्पना नव्हती Happy

छानच लिहिलंय. आमच्या जुन्या कंपनीत कॅरम स्पर्धा होतात. मला कधीही जमला नाही मात्रं कॅरम.
आणि वाचता वाचता लक्षात आलं माझा नवराही विजेटीआयचा. आणि तुमच्या ओरिजिनल नावाचा namesake.

अरे वाह, तुमचा ही अभिषेक Happy
आणि व्हिजेटीआयसुद्धा.. ग्रेट !

बाकी कॅरम हा बैठा खेळ असला आणि यासाठी लागणाऱ्या कौशल्यात मुलगा-मुलगी असा भेद नसला तरी मुलांईतका तो मुलींमध्ये लोकप्रिय नाही असे एक निरीक्षण आहे.

फारच छान !
कॅरम माझाही खूप आवडता खेळ. स्वत:च्या स्ट्राईकरशी जें नातं जुळतं त्याला तोड नाहीं. ( आतां हस्तिदंती स्ट्राईकरवर बंदी आल्याने जपून ठेवलेले जुने स्ट्राईकर अधिकच भुरळ घालतात ! )

खरे आहे भाऊ
हस्तीदंती स्ट्राईकरवर बंदी येऊनही बराच काळ लोटला आहे आता.
पण त्याने खेळल्यानंतर मग ईतर कसली मजा वाटत नाही. कॉलेजला वा ऑफिसलाही चांगले महागातले स्ट्राईकर असायचे. किंवा कॅरम एक्स्पर्ट मित्रही त्यांचे स्वत:चे आणायचे. तरी जो फिल हा स्ट्राईकर देतो त्यासमोर ईतर सारे नकली कचकड्याचेच वाटतात मला..

लहानपणी घरगुती कॅरम भरपूर खेळलो आहे.

आता एक घ्यायचाय बोर्ड.

मार्गदर्शन करा.

कोणता घ्यायचा, size, पुण्यात कुठे मिळेल, used championship चा घ्यावा का, तो कुठे मिळेल?

फलक से जुदा, नवीन धागा काढा. सर्वांच्या फायद्याचा. मलाही पुढे मागे नवा मोठा घेताना चौकशी करावीच लागेल. अर्थात कॅरम जाणकार मित्रांचे सल्ले तेव्हा घेईनच. मायबोलीवरही धागा काढेनच. तुम्हाला आता घ्यायचा असल्यास आता काढा.

कॅरमच्या गोड आठवणी. एप्रील-मे महिन्यात फिरायला नाही गेलो कुठे आणि घरीच असलो कि, दुपारी बाहेर जायला बंदी. आई-बाबा नोकरीला. आजी-आजोबा घरात लक्ष ठेवून मग कॅरम नाहितर बुद्धीबळ ज्यास्त खेळायचो.
नाहितर नवा व्यापार होताच. आजीच्या विचांरामुळे, पत्ते विशेष खेळायले दिले जायचे नाहीत, ते फक्त आई-बाबा घरी असतानाच, मोजकेच खेळ ५३२ , राजा भिकारी वगैरे.
कॅरम मध्ये, एक चुलतमामा खुप हुशार. फक्त ४-५ वर्षाने मोठा असेल, काय स्रटाईक मारायचा. ते हि डाव्या हाताने. कधीच जमले नाही मला.
तो हस्तिदंताचा स्ट्राईकर वापरायचा आणि कोणालाच द्यायचा नाही.त्यावरून बरीच मारामारी केली त्याच्याशी. 

Pages