बोलू आपण

Submitted by निशिकांत on 17 May, 2022 - 10:39

अबोल्यासवे आपुल्यातल्या बोलू आपण
संशय वेली का धुमारल्या? बोलू आपण

दु:ख, उसासे, तरी रम्य का आठव इतके?
कपारीस ये काळजातल्या बोलू आपण

प्रवासातली भेट तुझी अन् लाघव हसणे
सरी कशा ग्रिष्मात बरसल्या, बोलू आपण

प्रेम दावण्या ताजमहल का? शहाजहाँच्या
बेगमशी चल थडग्यामधल्या बोलू आपण

जळावयाचे शमा पुरे ना! कौतुक तुझिया
मी ज्या ज्या वेदना भोगल्या, बोलू आपण

नेत्रदान हे श्रेष्ठ कसे पटवून द्यावया
अंधांना डोळसातल्या बोलू आपण

संगत काळ्या रंगाची पण किती झळाळी?
हिरकणीसवे कोळश्यातल्या बोलू आपण

मावळतीचे दु:ख भयानक कळण्यासाठी
वृध्दांशी ये आश्रमातल्या बोलू आपण

दुसरी बाजू नाण्याला असतेच म्हणोनी
सापांशीही अस्तिनीतल्या बोलू आपण

"निशिकांता"चा प्रवास सरला, नवजन्मीच्या
नवीन आशा का पालवल्या? बोलू आपण

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
व्रूट्ट--अनलज्वाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users