सांज दाटते

Submitted by द्वैत on 14 May, 2022 - 00:37

सांज दाटते

सांज दाटते तशी जलात सावली बुडे
अशात आर्त हाक एक खेचते मला पुढे

दुःख पेरतो तमात नाद मंद मंदसा
विषण्ण शून्य चांदवा समीप राहतो जसा

पानपान स्तब्ध झाड प्रार्थनेत गोठते
अधीर पाखरू तिथे मिटून पंख थांबते

ही न शांतता खरी न ठाव घे मनातला
मलाच मी न सापडे अगम्य गूढ आतला

वादळात ह्या अश्या उगाच दीप लाविशी
नगण्य मी कुणीतरी असेच का तु सांगशी?

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह
>>झाड प्रार्थनेत गोठते<< सही
>>मलाच मी न सापडे अगम्य गूढ आतला<<< क्या बात