एक वार सखे

Submitted by काव्यधुंद on 9 May, 2022 - 09:22

एक वार फक्त सखे मागे वळून पाहशील का?
वाऱ्याच्या झुळूकेमध्ये सुगंध बनून राहशील का?

स्पर्श तुझा होतो जेव्हा सावरी सुद्धा शहारून जाते
एक झलक मिळताच तुझी चंद्रकोर लाजून चूर होते
मखमली पावलांनी तुझ्या स्वप्न होऊन येशील का?

रूप तुझे वर्णन करता शब्दही पडतात फिके
तुझा गोडवा गाता गाता सूर सारे होती मुके
मुकेपणी मनात शिरून गाणे होऊन जाशील का?

मंद स्मित केलेस जेव्हा त्याच क्षणी तुझा झालो
हृदय वगैरे कशाला? सगळंच तुला देऊन गेलो
एकदा, फक्त एकदा ते स्मित मला देशील का?

खूप काही सांगत राहावे असे आता वाटत नाही
आठवणींचा झरा मात्र काही केल्या आटत नाही
नदी होऊन या झऱ्याला पूर्णत्वाला नेशील का?

Group content visibility: 
Use group defaults