सत्य - भाग १२

Submitted by अरिष्टनेमि on 3 May, 2022 - 20:50

पाटील सरांशी बोलणं झाल्यावर खानसाहेबांनी पहिल्यांदा काय केलं तर बिनॉयला फोन केला. बिनॉयची डिटेक्टिव्ह एजन्सी होती. तो खानसाहेबांना खूप मानायचा. त्यालाही जाणवलं खानसाहेबांसाठी हे प्रकरण जरा जास्तच महत्वाचं होतं. त्यानं आठ-दहा दिवसात प्राथमिक माहिती मिळवली आणि केस खानसाहेबांच्या पहिल्या चाचणीत तावून सुलाखून निघाली. केस त्यांनी घेतली.

रविवारी ते झीनतला भेटायला आले. पाटील सरांना फोन करून त्यांनी गावाकडून बोलावलं होतं. पाटील सर पोराच्या बापाला घेऊन आले. आबांच्या घरी आधी गेले. त्यांची ती विमनस्क अवस्था पाहून पाटील सरांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्याही कानावर गोष्ट टाकली. कसं बसं त्यांना तयार केलं. तासाभरात खान वकीलांची गाडी आबा पाटलांच्या घरापुढं उभी राहिली. खान वकीलांची या मंडळींशी पहिलीच भेट. फोनवर झालेलं बोलणं परत आमोरा-समोर झालं. काय बोलायचं ते गावकडचे पाटील सरच बोलले.

आबा नुसते नावाला बसून होते. अस्ताव्यस्त केस, वाढलेली दाढी, वर आलेली गालाची हाडं, स्वत:शी बोलणारे ओठ. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता. घरात होते ते सारे पैसे; असतील २-४ हजार, त्यांनी रुमालात बांधून घेतले आणि दिवसरात्र ते मोजत बसायचा त्यांना चाळा लागला. खिशात एक बॉलपेनची रिफिल आणि मिळेल तो कागदाचा एक तुकडा. त्यावर दिवसभर आकडेमोड करत बसणे. पाच लाखाला किती कमी याचा हिशोब करणे, रोजच. जणू त्यांच्यासमोर कोणी नव्हतंच.

खान वकीलांना आधी वाटलं हाच पोराचा बाप. पण नंतर त्यांना आबांचं आणि डिव्ह्याचं काहीच नातं नाही हे समजल्यावर खान वकील सुन्न होऊन गेले. आबांची ही अवस्था खानसाहेबांना खूप अस्वस्थ करून गेली.

पोराच्या बापाला अजून काय बोलावं सुचलं नाही. त्याच्या डोक्यात वेगळाच विचार. ‘बिनसळे वकिलापेक्षा मोठा वकील. म्हणजे आता किती पैसे सांगणार?’ शेवटी त्याला राहवलं नाही. पाटील सरांच्या कानी त्यानं शंका हळूच टाकली.’ पाटील सरांच्याही मनात होतं. आता निमित्त झालंच म्हणून त्यांनी चाचरत विचारलं, “साहेब, फीचं कसं म्हणता?” खानसाहेबांना हा प्रश्न अपेक्षित होता.

त्यांनी पोराच्या बापाकडं बघितलं. त्याची झडती घेतली असती तर कदाचित एखादा रुपयासुद्धा निघाला नसता. हाय खाल्लेल्या आबा पाटलांकडं पाहिलं. कदाचित ते यातून कधीच बाहेर पडू शकले नसते. खान वकीलांना त्यांनी उचललेल्या ओझ्याची जाणीव झाली. ते अजूनच गंभीर झाले. विचार करून बोलण्यासाठी एक एक शब्द ते शोधत होते. कदाचित काय बोलावं याबद्दल त्यांचाही निश्चय होत नव्हता. शब्द किती जड असू शकतो याचा ते अनुभव घेत होते. शेवटी त्यांनी त्यांची फी सांगितली.

“सर, आज नशिबानं माझं खूप चांगलं चाललं आहे. वकिली हा माझा धंदा नाही. आवड म्हणून मी करतो. माझी अशी काही ठरलेली फी नाही. माझ्याकडं येणारे अशील आपल्या इच्छेनं आणि ऐपतीनुसार देतात. पण मी कोणाचं काम फुकटही करत नाही. मी ही केस पाहिली. गेले दहा दिवस सारी माहिती घेतली. माझं मन मला जे सांगत आहे, त्यानुसार मी एक रुपया फी घेईन. रोख.”

पाटील सर आणि पोराच्या बापाचा विश्वास बसला नाही. सरांनी विचारलंच, “साहेब, आणि बाकीचा खर्च?”
खानसाहेब किंचित हसून बोलले, “सर, मी ही केस फुकटात लढू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे, झीनत इथं कॉलेजला आहे. हे पाटील सर तिला गुरुसमान आहेत. तुम्हीही प्राध्यापक आहात. तुमच्यासारखे गुरु मला आयुष्यात मिळाले. त्यांची पुण्याई म्हणून आज मी इथं या पोझिशनला पोहोचलो. कदाचित त्यात माझ्या नशिबाचा भाग किंचितसा असेलही. जे तुम्ही लोकांच्या पोरांना देता ते सर्वश्रेष्ठ दान आहे. गुरूला काही दान द्यावं इतका मोठा मी नाही. पण तुमची केस मी फुकट लढेन तर ते दान होईल. म्हणून मला तुम्ही फक्त एक रुपया द्या. राहिला प्रश्न बाकी खर्चाचा. ते मी पाहीन.” पोराच्या बापाकडं बोट दाखवून ते म्हणाले, “या गरिबाकडून पैसे घेऊन त्याचं पोर मी सोडवीन,तर माझ्या पोरांना ते भरून द्यावं लागेल. माझं कधीच चांगलं होणार नाही. तुम्ही बेफिकीर रहा. केस मी घेतली.”

पाटील सरांना एकदम ओझं उतरल्यासारखं झालं. त्या आनंदात त्यांनी विचारलं, “साहेब,पोरगं कधी सुटंल?”
खानसाहेब उत्तरले, “सर,मी आत्ताच ते सांगू शकत नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बस. एवढा विश्वास राहू द्या.”

दोन्ही पाटील आणि पोराच्या बापाच्या तोंडावर आज कितीतरी दिवसांनी हसू आलं होतं. पाटील सरांना त्यांच्या वडिलांच्या एका वाक्याचा अर्थ आज इतक्या वर्षानी लागला होता, “गरीबी गरीबीला उचलून घेऊ शकत नाही, पण पुण्य पुण्याला खांद्यावर घेऊ शकतं.”

खानसाहेबांनी फटाफट चक्रं फिरवली. पहिला त्यांनी जमानतीसाठी अर्ज केला. तारखेवर ते उभे राहिले. फक्त त्यांच्या उभं राहण्यानं अर्धं काम झालं होतं. सरकारी वकिल भयंकर दडपणाखाली होते. खानसाहेबांना ओळखत नाही असं कोर्ट कोणतंच नव्हतं. त्यातून त्यांनी मुद्देसूद मांडलेली बाजू खोडून काढणं म्हणजे अशक्य गोष्ट. केसची सुरुवात उत्तम झाली होती. पण तरीही जामीन नाकारला. बिनसळे वकील मुद्दाम कोर्ट रुममध्ये आले होते. नाही म्हटलं तरी थोड्या गुदगुल्या झाल्याच. मनातच त्यांना वाटलं, ‘बरं झालं. माझी किंमत आता कळेल.’ पण तरीही त्यांनी मनातले भाव चेह-यावर येऊ दिले नाहीत.

आता खान साहेब इरेला पडले. कोणताही थेट पुरावा नाही. आहेत ते सारे परिस्थितीजन्य. बरं पोरगं सांगतंय त्याही दिशेनं पाहिलं तर न पटण्यासारखं काहीच नाही. सारी साखळी जुळते. ‘एक तिकीट जास्त का काढलं? कोल्ड्रींक का दिलं? पंचा का दिला?’ हे सारं खान वकील समजू शकत होते. वेळ पडली तर डीव्ह्याची मानसशास्त्रीय परीक्षा करावी लागणार होती.

पोलीसांकडून म्हणावं असं सहकार्य नव्हतं. खरं तर केस उभी राहिली नव्हती, उभी केली होती. मूळ गुन्हेगार सापडत नाही. केस सनसनाटी आहे. अशा वेळी जो सापडला त्याला अडकवलं. आरोपी अटकेत आहे म्हटलं की जनप्रक्षोभ थंडावतो. ब-या-वाईटाचा, ख-या-खोट्याचा विचार माणूस करतो, समूह नाही. खटला चालत राहतो. नवीन प्रकरण उद्भवतं. लोक जुनं विसरतात.

तपास करायला होतंच काय? पण चार्जशीट दाखल केलं तर जामीन मिळेल या भीतीनं पोलीस चार्जशीट दाखल करायला तयार नव्हते. ठाणेदार ऐकायला तयार नव्हता. कारणंसुद्धा तयार होती. अफूची गोळी डिव्ह्यानं कुठून आणली तो तपास बाकी होता. पोरगी कोण तो तपास बाकी होता. तिचा नवरा किंवा जो कोणी असेल त्याला शोधायचं होतं. चाकू कुठून आला तो तपास करायचा होता. खरं तर या गोष्टी ठाणेदारानं खान वकीलांना सांगून स्वत:च्या बुद्धीचं दिवाळं काढलं. खरं बोलायलासुद्धा हिंमत लागते. खान वकीलांनी त्याचा नाद सोडला. ते पोलीस स्टेशनमधून उठले. तरी जाता-जाता ठाणेदाराला प्रेमानं सांगितलं, “साहेब, मी काय बोलणार आता? तुम्हाला अधिकार आहेत. पण आरोपीलाही घटनेनं अधिकार दिलेत. तुम्हाला लोकांच्या भल्यासाठी बसवलं आहे साहेब. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. तुम्ही जे सांगताय ते एकदा तपासून पहा अशी विनंती आहे हात जोडून. या केसमध्ये तुम्ही चार्जशीट दाखल करा एवढीच विनंती. मी आठ दिवस वाट पाहतो.”

खान वकीलांच्या गाडीनं पोलीस स्टेशन सोडलं. ठाणेदारानं समाधानाचा निश्वास सोडला.
आठ दिवस उलटले. चार्जशीट जैसे थे.
खान वकीलांनी एस.पी.कडून भेटायला वेळ घेतली. फार नाही, पण दहा मिनिटं ते भेटून बोलले. पुन्हा बोलायची गरज पडलीच नाही. चार्जशीट दाखल झालं.

पुन्हा जामीनासाठी अर्ज करुन खान वकील आज पेटून बोलले. पण नेहमीप्रमाणे संयत, मोजक्या शब्दांत. आज सहा आठवड्यांनी डीव्ह्या घरी आला.
पाटील सर खानसाहेबांच्या पायावर पडले. खानसाहेब अवघडून गेले.

खानसाहेबांनी वरिष्ठ अधिका-यांशी बोलून प्रकरण कोर्टात लवकरच दाखल करून घेतलं. खरं तर अशा भानगडीत ते पडत नसत. कधी क्वचित एखाद्या प्रकरणात. पण या वेळी त्यांनी प्रयत्न केले. डीव्ह्याचं वर्ष वाया चाललं होतं. प्रकरण दाखल झालं आणि बोर्डावर आणलंसुद्धा. तारखा पडू लागल्या. साक्षी पुरावे सुरू झाले. नवशिक्या वकीलांची कोर्टात तोबा गर्दी होऊ लागली.

पोरगं मोठ्या हिमतीनं पुन्हा कॉलेजला गेलं होतं. पोटच्या पोरासारखं त्याला उरी धरून आबा पाटील रडले होते. आता त्याचं होस्टेल बंद करून आबा पाटलांनी स्वत:च्या घरी एक खोली त्याला देऊन टाकली. त्याला अवघडल्यासारखं झालं, आपलं किती ओझं या माणसानं उचलावं? तो खोलीत एकटा बसून राही. रिकाम्या वेळात असा उदास बसण्यापेक्षा आबा पाटलांनी इकडून तिकडून कळालं म्हणून त्याच्या मागं लागून ऑनलाईन जर्मन भाषा शिकायला लावली आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्याच्याशेजारी बसून ते स्वत:ही जर्मन शिकू लागले. गमती गमतीत बाईंना ‘लीबा फ्राऊ’म्हणू लागले. कितीतरी वर्षांनी घराला घरपण आलं होतं.

तिसरं वर्ष कसंतरी चोरासारखं पूर्ण केलं. वर्ष संपलं. निकाल बरा होता पण घसरला. या वर्षी मेरीटमध्ये नाव नव्हतं. स्कॉलरशिप गेली होती. चौथ्या वर्षाचं कसं? पण दोन्ही पाटील होतेच.

डीव्ह्याच्या सायकलच्या मडगार्डनं पोरीच्या दंडाला कापलं होतं. हा पुरावा पोलीसांनी घेतलाच नव्हता. खान वकीलांनी मडगार्ड प्रयोगशाळेत पाठवायला लावलं. अहवाल येईपर्यंत वाट पाहणे होतं. दरम्यान खान वकीलांनी सरकारी साक्षीदार तपासायला घेतले. उलट तपासणी सुरु झाली.

भुर्जीवाल्याच्या साक्षीत फार दम नव्हता. सरबतवाल्याला तर गुगली टाकली खान वकीलांनी. त्यांनी सरबतवाल्याच्या साक्षीची चिरफाड करुन टाकली त्या दिवशी कोर्टात.

“आरोपी मयत पोरीला घेऊन आला नाही का तुमच्या दुकानात त्या दिवशी?”
“हो.”
“तुम्ही नक्की पाहिलं आणि ओळखलं.”
“हो.”
“बरं. तुम्ही अफूची नशा केली का कधी?”
घाबरुन न्यायाधीशांकडं पहात सरबतवाला म्हणाला “नाही, नाही साहेब. काहीही काय विचारता?”
“बरं. असू द्या. मला जरा अफूची गोळी कशी असते सांगता का?”
“साहेब. मला कसं माहिती असणार?”
“तुम्ही पाहिली असेल ना कधी?”
“नाही साहेब. आयुष्यात नाही पाहिली अफू काय असते? गोळी असते का अजून काय ते?”
“ते त्या दिवशी या पोरानं पाण्यात टाकली ती गोळी तुम्ही पाहिली ना? म्हणून म्हटलं तुम्हाला माहित असेल अफूची गोळी”
“नाही साहेब. मला काय माहित कशाची गोळी टाकली का काय टाकलं ते?
“नक्की तुम्हाला माहित नाही?”
“नक्की साहेब. नाही माहित”

“बरं. आरोपी मुलीला सायकलवर घेऊन गेला हे तुम्ही किती वाजता पाहिलंत?”
“एक वाजला असेल.”
“दुपारचा की रात्रीचा?”
“रात्रीचा.”
“उजेड होता की अंधार?”
“उजेड होता साहेब.”
“रात्री एक वाजता? उजेड? तुम्हाला दुपारचा एक म्हणायचं आहे का? विचार करुन सांगा बरं.”
“अंधार होता साहेब.”
“अंधार की उजेड? नक्की सांगा.”
“साहेब अंधार होता. पण रस्त्यावर लाईट सुरु होते.”
“कोणते लाईट होते? ट्यूबलाईट की मोठे चौकात असतात तसे?”
“ट्यूबलाईट साहेब.”

“तुम्ही चष्मा वापरता का?”
“हो. वापरतो ना साहेब. हा काय लावूनच तर आहे.”
“कधीपासून?”
“झाले दोन-तीन वर्षं साहेब.”
“लांबचा की जवळचा.”
“जवळचा. चाळीशीचा.”
“म्हणजे आता जो लावलेला आहे तोच ना?”
“हो.”
“नेहमी वापरता?”
“हो. म्हणजे लिखापढी करताना.”
“दुकानात काढून ठेवता की लावून ठेवता?”
“लावून ठेवतो साहेब.”
“आणि एखाद्या वेळी विसरल्यावर?”
“नाही साहेब. मला मग त्रास होतो डोळ्याला.”
“खूप चांगली सवय आहे. नंबर लागला की चष्मा नेहमी वापरावा. तुम्ही फार काळजी घेता डोळ्यांची. तुम्ही कोणत्या दुकानातून चष्मा घेतलाय? जरा नाव सांगता येईल का?”
“तीनेक वर्षं झाली साहेब. आता नाव नाही सांगता येणार.”
“तीन वर्षापासून तोच चष्मा वापरताय म्हणजे. नाही का?”
“हो.”
“कोणत्या डॉक्टरांकडं डोळे तपासले होते?”
“नाही. डॉक्टरांकडं नाही गेलो कधी.”
“अरेच्च्या. पण तुम्हाला बी.पी. आहे. हाय बी.पी. तुम्ही गोळ्या घेता ना? शिवाय शुगरसुद्धा. आणि डॉक्टरांकडं नाही गेलो म्हणता? तुम्ही बिहाणी चौकातल्या अमृत क्लिनीकमध्ये घेताय ना ट्रीटमेंट?”

इथं सरकारी वकील उठले. त्यांना समजलं की आता गाडी रुतत चालली. “ऑब्जेक्शन. विद्वान वकीलांनी या गुन्ह्याशी संबंधित दिलेल्या साक्षीची उलटतपासणी घ्यावी फक्त. ते साक्षीदाराच्या खाजगी आयुष्यात घुसत चालले आहेत. वैयक्तिक मेडीकल प्रॉब्लेम इतक्या लोकांसमोर विचारु नयेत.”

खान वकील खमके होते. “सर, प्रश्न अशीलाच्या जीवन-मरणाचा आहे. त्यामुळं मी विचारलेले प्रश्न केससाठी महत्वाचे आहेत. हे प्रश्न असंबद्ध असतील तर माननीय न्यायालय माझ्यावर कारवाई करु शकतं. पण माझा उलटतपासणीचा अधिकार डावलू नये अशी विनंती आहे.”
कोर्टाच्या ओठावर मिश्किल हसू फुटलं. आक्षेप फेटाळला. खान वकीलांना उलट तपासणी पुढं सुरु करायला परवानगी दिली.

खान वकील बोलू लागले, “तर तुम्ही बी.पी. आणि शुगरची ट्रीटमेंट घेताय. पण डोळ्याच्या डॉक्टरांकडं गेला नाहीत असंच ना?”
“हो साहेब.”

दुकानापासून आरोपी आणि मयत मुलीला सायकलवर जाताना तुम्ही किती अंतरावरुन पाहिलं?”
“असेल की साहेब ५० मीटर.”
“म्हणजे ते खिडकीतून बाहेर पहा बरं. समोर तो बोर्ड आहे ना! तो पांढरा बोर्ड. आज मी चष्मा विसरलो बघा घाई-घाईत. काय लिहीलंय मला वाचता येईना.”
“नाही साहेब, स्पष्ट दिसेना मला.”
“बरं. ठीक आहे जाऊ द्या. बोर्ड दिसला ना? मग झालं तर. पण तितकं अंतर असेल ना? असं मला म्हणायचं होतं.”
“हो, हो साहेब. असेल नक्कीच.”

“ बरं. रात्री एक वाजता तुम्ही दुकानात होतात ना नक्की?”
“हो.”
“दुकानात लाईट होते की अंधार.”
“लाईट सुरु होते ना साहेब.”
“हो ना? तुमचं प्रसिद्ध आहे दुकान तिथं. तुमची क्वालिटीपण चांगली असते. शिवाय छान इंटेरिअर केलंय तुम्ही. किती लाईट असतील हो?”
“आठ एलीडी आहेत. चांगलं दिसलं पाहिजे तेंव्हाच गि-हाईक येईल साहेब.”

“अगदी खरं. हा पोरगा त्या पोरीला घेऊन गेला तेंव्हा तुम्ही काय करत होतात? पोरगा म्हणतो, तुम्ही नाही पाहिलं त्याला. तुम्ही खोटं बोलताय.”
“मी कशाला खोटं बोलू साहेब? मी तोंडातली सुपारी थुंकायला दाराशी आलो तेंव्हा मी पाहिलं ना त्याला. ती पोरगी मागं बसलेली आणि पोरगा सायकल चालवत होता.”
“म्हणजे तुम्ही चष्मा काढला. चष्म्याच्या बॉक्समध्ये ठेवला. तुम्ही सुपारी थुंकायला गेले आणि परत चष्मा काढून पुसून घातला. हा असा. नाही का? खान वकीलांनी अभिनयासह हा प्रश्न विचारला आणि आणि कोर्टात लोक हसू लागले. खुद्द साक्षीदाराला हसू आलं.

“नाही साहेब. सुपारी थुंकायला कशाला चष्मा काढावा लागतो?”
“काय बोलता? तुम्ही चष्मा घालून थुंकता?”
कोर्टात हसू उफाळलं.

“बरं ठीक आहे. असू द्या. तुम्ही कशाला खोटं बोलाल? तुमचा चेहराच एकदम सात्विक आहे. मग तो पोरगा तर त्यानं तुम्हाला पाहिलंच नाही म्हणतोय. असं कसं काय?”
“तो कसा पाहिल मला? मी पाहिलं तर ही जोडी पुढं निघून गेली होती. मी मागून पाहिलं त्याला.”
“अच्छा. अच्छा. म्हणजे तो निघून गेला आणि तुम्ही मागून पाहिलं नाही का?”
“हो साहेब.”

“बरं, बरं. आता शेवटचा प्रश्न. बघा हे चार वकीलसाहेब आहेत काळा कोट घालून बसलेले या पहिल्या लाईनीत. तुमच्या दुकानासमोरुन रात्री एक वाजता गेले फिरत फिरत असे. बरं का? आणि तुम्ही आलात मागून तर त्यांना तुम्ही ओळखाल नाही का?”
“नाही ना साहेब. असं कसं? सारेच काळा कोट घालून राहतील तर असं कसं सांगणार कोण कोण आहेत?”
“खरं आहे. मग समजा कोट काढून ठेवला आणि काळी पॅंट, पांढरा शर्ट घालून गेले तर?”
“कसं सांगणार साहेब नुसत्या शर्टाच्या रंगावरुन?”
“का बरं? पांढरा शर्ट घालणारे लोक क्वचित असतात ना?”
“नाही साहेब. दिवसभरात दुकानात शंभरातले पन्नास लोक तर पांढराच शर्ट घातलेले पाहतो मी.”
“ठीक ठीक. काही हरकत नाही. धन्यवाद”

सरकारी वकीलांना घाम आणि कोर्टाला हसू का येत होतं देव जाणे.

खान वकीलांनी कोर्टाच्या परवानगीनं साक्षीदाराला सरकारी हॉस्पीटलला पाठवून डोळे तपासून रिपोर्ट मागवला.
पुढच्या तारखेला त्या डॉक्टरांची साक्ष ठेवली.

“नमस्कार डॉक्टरसाहेब.”
“नमस्कार.”
“तुम्ही या साक्षीदाराचे डोळे तपासले ना?”
“हो.”
“त्यांना जवळचा नंबर आहे. चष्मा पण आहे त्यासाठी. लांबचं त्यांना व्यवस्थित दिसतंय की नाही? तुमचा रिपोर्ट काय आहे?”
“साहेब. त्यांचा चष्मा जुना आहे. नंबर वाढलाय आता. हे इथं लिहिलाय बघा नवीन नंबर. आणि लांबचाही नंबर आहेच. तोही इथं खाली दिलाय.”
“बरं मला सांगा, हा जवळच्या नंबरचा चष्मा घातला तर लांबचं दिसेल का एकदम स्पष्ट? दिसलं तर किती अंतरापर्यंत? ५० मीटर वगैरे?”
“नाही साहेब. जवळचा चष्मा पुस्तक वगैरे वाचण्यापुरताच असतो. लांबचं त्यातून स्पष्ट नाही दिसणार. ५० मीटरवर तर नक्कीच नाही.”

“बरं मला सांगा, प्रखर प्रकाशातून कमी प्रकाशात आल्यावर डोळ्याला स्पष्ट दिसेल की वेळ लागेल थोडाफार ॲडजस्ट व्हायला?”
“असं नेमकं नाही सांगता येणार. ते प्रकाशाच्या प्रखरतेवर आणि माणसाच्या वयावर, डोळ्यांच्या आरोग्यावर अवलंबून आहे.”
“ओके. ठीक आहे. या साक्षीदाराचं वय ५३ वर्षं आहे. डोळ्यांचं आरोग्य तुम्ही तपासलंच आहे. या वयाच्या व्यक्तीसाठी आणि अशा डोळ्यांसाठी सायन्सचा नियम मी सांगतो तसा आहे की नाही एवढं तुम्ही सांगितलंत तरी पुरेसं आहे. प्रखर प्रकाशात बाहुल्या आकुंचन पावतात आणि कमी प्रकाशात गेल्यावर बाहुल्या मोठ्या होतात पण त्यासाठी थोडा वेळ लागतो. तोपर्यंत दृश्यता कमी असते. बरोबर?”
“हो.”

"आता शेवटचा प्रश्न. हाय बी.पी. आणि मधुमेह यामुळं नजरेवर परिणाम होतो आणि अशा रुग्णानं डोळे नेहमी तपासावेत. हे बरोबर आहे का?"
"हो साहेब, बरोबर आहे."
“धन्यवाद डॉक्टरसाहेब.”

सरकारी वकील कसनुसं हसले.
तारखा पडत गेल्या.
पण........
या सा-या साक्षी उलथून लावल्या तर डीव्ह्याला संशयाचा फायदा मिळून सुटला असता. एकदम स्पष्ट खणखणीत सन्मानपूर्वक 'बाईज्जत बरी' नाही. तो डाग आयुष्यभर राहिलाच असता; डीव्ह्यावर आणि खान वकीलांवर.

म्हणूनच खान वकील ज्याची वाट पहात होते तो अपेक्षित अमोघ बाण अजून हाती लागत नव्हता. केस हाती घेतल्यावर खान वकिलांना एक गोष्ट पक्की ध्यानात आली होती, ‘साक्षी-पुराव्यात त्रुटी आहेत ते खरंच, पण पोराला यातून बाहेर काढणार पारशी बावाजी; अगदी ते वारले असले तरी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त…. बावाजीची चोपडी की आहे प्रकरणातील.. पण तेव्ढेच पुरेल का माहित नाही.. त्यानी वेळ लिहुन ठेवली तर फायदा होइल…. पण डिव्ह्या बाहेर आला व वर्ष फुकट गेले नाही यातच समाढान.

वरील सर्व प्रतिसादांना अनुमोदन..
खूप दिवसांनी असे उत्कंठावर्धक लिखाण वाचायला मिळतेय.

फायनली एकच प्रतिसाद द्यायचा विचार होता पण...........
तुम्ही उत्कंठा इतकी वाढीला लावली ही हा छोटासा प्रतिसाद देण्यापासुन स्वतःला रोखु शकलो नाही.
पुढचा भाग लवकर टाका. (म्हणजे एका दिवसात दोन दोन भाग टाका नां.)

भारी सुरु आहे. कथा एकदम मस्त खुलवत आहात.

सरबतवाल्याची उलटतपासणी वाचून एका सिनेमाची आठवण झाली पण इथे ते मस्त चपखल बसत आहे.

Jitki utkantha vadhat ahe titka ch vaiit vatat ahe dv, tyachi family ani patil family baddal. Ase kiti nishpap lokanch ayushy barbad hot asel aplya system mule....
Lavkar liha pudhcha bhag. Vat baghat ahot.

पुढे काय झालं ?
ओ अरिष्टनेमी, लिहा की लवकर पुढचा भाग... कुठे गायब झालाय... Happy
आम्हाला का बरं असं चक्क्य्यासारखं टांगुन ठेवलंय Wink

प्रतिसादांसाठी धन्यवाद. विलंबासाठी माफ करा.

मी प्रवासात होतो. मग मित्रांच्या आग्रहामुळं मेळघाटात गेलो. तिथं नेटवर्क नव्हतं. म्हणून उशीर झाला.
पुढचा भाग (अंतिम) टाकला आहे.