अबोली...!! ( भाग-१ )

Submitted by रूपाली विशे - पाटील on 3 May, 2022 - 06:04

अबोली...!! ( भाग -१ )
_____________________________________

मला ठाऊक आहे की, माझ्या ह्या हकीकतीवर सहजपणे कुणीही विश्वास ठेवणार नाही. एका लेखकाच्या कल्पनेतून साकारलेली ही एखादी चित्तथरारक कथा असावी असा तुम्ही विचार कराल, पण मी हे सगळं कुठल्या परिस्थितीत लिहितोय् ह्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत , अश्या विलक्षण चमत्कारिक परिस्थितीच्या विळख्यात मी ह्या जागी अडकून पडलोय्...!

मी जो अनुभव घेतोय् तो कुणाला खरा वा खोटा वाटू दे पण जे घडलंय् आणि जसं घडतंय् ते मी ह्या डायरीत लिहिणार आहे , जोपर्यंत माझ्या हातात लेखणी धरण्याचे बळ आहे तोपर्यंतच..!!

पहिल्यांदा मी माझी ओळख तुम्हांला करून देतो. मी अंबर सिनाळकर एक नवोदित कथा लेखक आणि चित्रपट, टिव्ही मालिका यांसारख्या मनोरंजनाच्या दुनियेतील उदयोन्मुख संवाद आणि पटकथा लेखक..!

तुम्ही मला ओळखत असाल कदाचित आणि नसाल ओळखत तर 'प्रेमाचा भुलभुलैय्या ' हा सुपरहिट सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या सिनेमाची कथा मी स्वतः लिहिलेली आहे. बऱ्याच टीव्ही मालिकांच्या संवाद लेखनाचे कामसुद्धा मी केले आहे. चित्रपट - मालिकांच्या चंदेरी सृष्टीत मी तसा थोडाबहुत प्रसिद्ध आहे.

__ पण आमच्या ह्या चंदेरी दुनियेत अफाट स्पर्धा आहे. तुम्हाला इथे काम मिळेल , पण ते टिकवून ठेवणं मात्र अतिशय अवघड...! जर तुम्हांला ह्या स्पर्धेत घट्ट पाय रोवून उभं राहायचं असेल तर, तुमच्या अथक प्रयत्नांना आणि मेहनतीला नशिबाची जोड पाहिजे. त्यात गेल्या दहा-पंधरा वर्षात सोशल मीडियाचा झालेला उदय म्हणजे आम्हां सिनेमा आणि मालिकावाल्यांच्या मेहनतीची, त्यांच्या कलाकारीची पिसे काढण्यासाठी प्रेक्षकांना मिळालेलं आयतं कोलीतच्..!!

मायबाप रसिकांना तेवढा अधिकार असायला पाहिजे, तेही खरंच् म्हणा..!! रसिक प्रेक्षकच नसतील तर आमची कलाकृती पाहणार कोण..?? त्यांचं प्रोत्साहन आम्हांला कसं मिळणार ..?? आमचं कौतुक त्यांच्याशिवाय करणार तरी कोण..??

तर त्याच काय आहे , रसिक मायबाप प्रेक्षक आम्हां कलाकारांना , आमच्या कलेला जेवढ्या वेगाने डोक्यावर घेतात, त्याच्या दुप्पट वेगाने खाली आपटूनसुद्धा देतात.

आमच्या क्षेत्रात हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी येतोच, तो कुणालाही टाळता येत नाही.

तर सांगायचा मुद्दा असा की, तो नकोसा वाटणारा अनुभव सध्याच्या घडीला माझ्या वाट्याला आला होता. माझ्या पत्रिकेतल्या ग्रह - ताऱ्यांना अपयशाचे ग्रहण लागण्यास सुरुवात झाली होती.

सध्या माझ्याकडे काहीही काम नव्हते. माझ्या हाती संवाद लेखनाचं काम असलेल्या दोन टिव्ही मालिका अचानक अर्धवट बंद पडल्या होत्या.

शेवटी काय तर , दर्शकांना काहीतरी स्वारस्य वाटायला पाहिजे तर काहीतरी रंगतदार , चटकदार लिहायला हवं, पण मागील काही दिवसांपासून माझ्या हातून तसं लेखन काही होत नव्हते. त्याची सल मनाला सारखी टोचत होती. मनात कुठेतरी अस्वस्थता, नैराश्य दाटून आलं होतं.

चित्रपटसृष्टीसारख्या बेभरवश्याच्या क्षेत्रात येऊन आपण चूक तर केली नाही ना , ह्या विचाराने आणि भविष्याच्या चिंतेने रात्रीची झोप माझ्यापासून दुरावली होती. आयुष्य आनंदाने जगण्याची उमेद हळूहळू खचू लागली होती.

ह्या चंदेरी दुनियेत माझे मित्र तसे कमीच आहेत, पण जे आहेत ते खरोखरच संकटात हात देणारे आहेत.

त्यातला एक म्हणजे ' देवराजन'..!!

आपल्या अफाट बुद्धीमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेला एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता ... !!

माझ्या पडत्या काळात माझ्यासाठी तो देवासारखा धावून आला. त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये नव्या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू होती.

माझ्यावर विश्वास दाखवत त्याने मला त्याच्या नव्या चित्रपटासाठी कथा लिहिण्याचे काम दिले. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याचं स्वतःच असणार होतं.

पहिल्यांदा तर त्याने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचे मला विलक्षण आश्चर्य वाटले. चित्रपटसृष्टीतले मोठ- मोठे नावाजलेले कथालेखक सोडून माझ्यासारख्या नवोदित लेखकासोबत काम करण्यास कसा बरं तयार झाला असावा देवराजन..??

मी जरी त्याचा मित्र असलो , आपल्या मित्राच्या पडत्या काळात एक मित्र म्हणून आपण मदत करावी असं त्याला वाटणं साहजिक जरी असलं , तरी धंद्याचीसुद्धा काही गणितं असतात , नफा - तोटा असतो.

मोठ्या विश्वासाने त्याने माझ्या शिरावर टाकलेली जबाबदारी आपल्याला पेलवेल की नाही याचे मला प्रचंड दडपण आले होते.

मी विचारात पडलो.

" विचार काय करत बसला आहेस तू अंबर, देवराजनला अपेक्षित असलेली कथा तू लिहू शकतोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुझ्या लेखणीत तेवढी ताकत आहे. जा पुत्र जा, यशस्वी भव...!!' असं म्हणत वैदेहीने खोडकरपणे मला आशीर्वाद दिला.

' वैदेही' माझी प्रिय मैत्रीण. आमच्यात फक्त आणि फक्त मैत्री नाही. मैत्रीपलीकडले तरल भावबंध आमच्यात आताशी निर्माण झालेत.

काही नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथा वाचून , माझ्या लिखाणाच्या , माझ्यातल्या लेखकाच्या प्रेमात पडलेली वैदेही हळूहळू प्रत्यक्षात माझ्या प्रेमात पडली.

सतारीच्या तारा छेडल्या जाव्यात तश्या आमच्या दोन्ही हदयाच्या तारा छेडल्या जाऊन त्यातून प्रेमाचे तरल, सुरेख असे सप्तसूर निघू पाहत होते.

वैदेही म्हणजे माझ्या आयुष्यातलं गोड स्वप्न होतं. समंजस आणि गोड तेवढीच खेळकर स्वभावाची वैदेही मला नेहमीच हवी - हवीशी वाटे. आतासुद्धा माझ्या मनावरचं दडपण दूर करण्यासाठी वातावरणात तिने एक प्रकारचा खेळकरपणा आणला होता.

तिच्या बोलण्याने मला खूप मोकळं वाटलं. मनावरचा ताण हलका झाला.

___ तर चित्रपटासाठी मी एखादी भावोत्कट , हलकी-फुलकी, सुंदर अशी प्रेमकथा लिहावी असं देवराजनने मला सुचवलं.

रहस्यकथा ,गूढकथा लिहिण्यात मला विशेष स्वारस्य होते.
तसं पाहायला गेल्यास प्रेमकथा लिहायला मला फार काही अवघड जाणार नव्हते, कारण प्रेमात पडलेल्या माझ्यासारख्या लेखकाला प्रेमाच्या अचाट कल्पना सुचणार होत्या आणि रसिकांना मी माझ्या कल्पनेतल्या प्रेमनगरीत चित्रपटाच्या निमित्ताने सैर घडवून आणणार होतो. प्रेक्षकांच्या मनाला घडीभर आनंद मिळेल अशी कथा आपण लिहायची असं मी मनोमन ठरवले.

__पण लेखनासाठी मला शांतता हवी होती आणि ती मुंबईसारख्या गडबडीच्या शहरात राहून लाभणं अशक्यप्राय होती. एखाद्या शांत , निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आपल्या हातून एखादी सुंदर प्रेमकथा लिहिली जावी असं मला वाटू लागलं. एरव्ही मला तसं वाटलंही नसतं, पण माझ्या थकलेल्या शरीरासोबत थकलेल्या मनाला जरासा थंडावा हवा होता. मन आणि मेंदूला दोहोंनाही शांतता हवी होती. एखाद्या शांत जागी पंधरा-वीस दिवस राहून लेखनासोबतच बऱ्याच दिवसांपासून मनात दाटलेले नैराश्याचे मळभ दूर व्हायला त्याने मदत झाली असती, हा माझा तिथे जाण्यामागचा दुहेरी हेतू होता.

मी लागलीच विक्याला फोन लावला. विक्या म्हणजे विकास भेरे..!! माझा बालमित्र. खरं तर 'लंगोटी यार' म्हणायला हवं त्याला..!!

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूरजवळच्या तानसा अभयारण्याच्या आसपास त्याची बागायत होती. उद्यमशील बागायतदार म्हणून त्याच्या नावाचा त्या भागात दबदबा होता.

मला खात्री होती की , मला हव्या असलेल्या शांततेच्या ठिकाणी माझ्या राहण्याची सोय तो नक्कीच करू शकेल.

" तू कधीही ये रे मित्रा , तुझ्या सेवेला मी नेहमीच हाजिर असेन..!"

मित्र असावा तर विक्यासारखा. निव्वळ शब्दांनीच मनावरचे दडपण दूर करणारा..!

मी विक्याकडे जाण्याच्या तयारीला लागलो

" तू सुद्धा कमाल करतोस अंबर, इथे मुंबईत राहून तुला कथा लिहायला जमणार नाहीये का..?? कथा लिहायला एवढ्या लांब खेड्यात कशाला जायला हवं ..?? " वैदेही एकावर एक प्रश्न मला विचारू लागली.

" वैदेही, यावेळेस मी अशी कथा लिहिणार आहे की, चित्रपट सुपरहिट व्हायलाच पाहीजे. माझ्या टीकाकारांची तोंडं एका झटक्यात बंद होतील. बघच तू..!!" मी प्रचंड उत्साहात होतो. माझा आत्मविश्वास ओसंडून वाहत चालला होता.

" मग मी पण येते ना तुझ्यासोबत तिथे..!!" तिचा स्वर कातर झाला.

" तू सोबत आली तर झालंच् मग कथेचं कल्याण..! तू जवळ असली तर कथा लिहिता येईल का बरं मला ??" मी तिच्या दंडाला हलकेच चिमटा घेत म्हणालो.

" थट्टा पूरे अंबर, मला ना खूप भीती वाटते रे ..!"

" भीती..?? कसली भीती ..??" माझा बेफिकीर प्रश्न.

" माहित नाही , पण मला खूप मनातून वाटतंय् की, तू जाऊ नये तिथे..!" तिने हलकेच आपल्या चेहऱ्यावरून रुमाल फिरवला.

डोळ्यातली आसवे मला दिसू नये म्हणून तिने तसं केलं असावं हे मला जाणवलं.

"आणि पुन्हा मोबाईल घेऊन जाणार नाहीयेसं तिथे..!" मघासपासून तिच्या गळ्यात दाटून आलेला हुंदका शेवटी बाहेर पडलाच्.

" वैदेही, अगं, मोबाईल तिथे नेऊन काही उपयोग नाही. मोबाईलला रेंज सुद्धा नसते त्या डोंगराळ भागात आणि हे बघ, देवराजनसारख्या एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मला सार्थ करायला हवा. त्यासाठी थोडी कळ आपल्याला सोसायला हवीच. पण ही कथा लिहून पूर्ण करून आल्यावर मात्र आपण पटकन् साखरपुडा उरकून घ्यायचा बरं... नंतर सनई - चौघडे तयार ठेवायचे.. .. काय..?? चट मँगनी पट ब्याह..!" मी तिला जवळ घेत ताणावलेले वातावरण हलके करण्याचा प्रयत्न करू लागलो.

वैदेही माझ्यापासून थोडीशी दूर झाली. माझ्या डोळ्यात पाहत मंद हसत तिने स्मित केले.

"खरं म्हणतोस ..??" थोडंस् लाजून, थोडंस् लाडावून ती म्हणाली.

तिच्या लालबुंद झालेल्या चेहर्‍यावर विलक्षण बावरे भाव तरळले आणि ते भाव पाहून माझा कलेजा खल्लास झाला. वैदेहीच्या ह्या अदांवरच तर मी भाळलो होतो.

"खोटं वाटतेय् का तुला..?? तयारीला लाग तू आतापासूनच...!" मी सिगारेट शिलगावू लागलो.

" ह्या सटवीला जर सोबतीला नेणार असशील ना तर मीसुद्धा येईन तुझ्यासोबत तिथे, समजलं तुला..??" माझ्या हातातली सिगारेट खेचून घेत, दूर भिरकावत काहीशी चिडून ती मला दटावू लागली.

आता झाली ना पंचाईत..!!

विक्याकडे शहापूरला निघण्याआधी सामानाची बॅग भरताना व्हिस्कीची बाटली आणि सिगारेटचे पाकीट मी बॅगेच्या तळाला अगदी जपून लपवून ठेवले. ह्या दोन वस्तू वैदेहीच्या नजरेस पडल्या असत्या तर माझी नक्कीच खैर नव्हती.

विक्याकडे जाण्याच्या दिवशी वैदेहीचा निरोप घेताना कधी नव्हे ते माझ्या डोळ्यात पाणी तरळलं.

का..??

विरह मलाही सहन होणार नव्हता म्हणून ..!

कथा पूर्ण करून शहापूरहून परतल्यावर साखरपुडा लागलीच उरकून घ्यायचा आहे हे सगळं मी आणि वैदेही हजारवेळा एकमेकांशी बोललो. तिनेही ते नीट पटवून घेतल्यासारखे दाखवलं आणि तरीही तिथे जाण्याआधी एकमेकांचा निरोप घेणं दोघांनाही इतकं कठीण गेलं..!!

कथा लिहून पूर्ण झाल्यावर विक्याच्या घरून आधी तुला फोन करीन असं वचन तिला मी दिलं. तसं वचन मी तिला दिलं नसतं तर मला तिने पुढे पाऊलही टाकू दिलं नसतं. गाडी सुटली तरी तिने माझा हात घट्ट धरून ठेवला होता आणि एखाद्या शिक्का उठल्यासारखा माझ्या हातावरची तिची पकड पक्की झाली होती.

पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत आम्ही निरोप घेतला. एकमेकांच्या नजरेआड होईपर्यंत आम्ही हात हलवित होतो.

हा पंधरा- वीस दिवसांचा विरह आम्हां दोघांनाही सोसणं कठीण जाणार होतं. प्रेमात पडल्या नंतरच्या विरह भावना काय असतात ते मला आता उमगू लागलं होतं.

प्रेम, विरह, ताटातूट हे सगळं चित्रपट, कथा- कांदबऱ्यात लिहणं सोप्पं होतं माझ्यासाठी, पण प्रत्यक्षात अनुभवणं म्हणजे प्रेमभावनेने फुलारलेल्या हृदयावर मणा - मणाचे ओझे ठेवल्यासारखे नव्हते काय..??

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला असंच होत असेल का..??

हे पंधरा-वीस दिवस झटक्यात निघून जातीलच, कथालेखनाची मोहीम फत्ते करून आल्यानंतर मात्र वैदेहीशी लागलीच् साखरपुडा उरकून घ्यायचा असं डोक्यात घोळवत मी मार्गस्थ झालो.

भविष्याच्या सुखद चाहुलीने माझे तन- मन रोमांचित झाले.

आपण आपल्या भविष्याविषयी नेहमीच काही ना काही आडाखे मनात बांधत असतो, सुंदर - सुंदर स्वप्ने पाहत असतो, पण आपल्याला अपेक्षित असतं तसंच पुढील आयुष्यात खरोखरंच घडत जातं का..??

दैवाला आपली सगळी स्वप्नं एवढया सहजासहजी मान्य असतातच का ..??

आज मी उत्तरे शोधण्याचा दुबळा प्रयत्न करतोयं , पण ह्या प्रश्नांची उत्तरे काही केल्या मला सापडत नाहीयेत.

वैदेही आणि माझी पुर्नभेट घडणं दैवाला खरंच मान्य आहे का..?

कदाचित आमची निरोपाची भेट ही अखेरची भेट तर ठरणार नाही ना...??

ह्या घडीला विचार कर - करून माझ्या मेंदूच्या अक्षरशः ठिकर्‍या - ठिकऱ्या उडताहेत.

क्रमश:

रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com

__________________ XXX_______________

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कादंबरी ची सुरूवात उत्कंठावर्धक आहे. पुढचे भाग कधी वाचेन असे झाले आहे. Happy
पण लिहायला काय काय दिव्य करावी लागतात त्याची कल्पना असल्याने निवांतपणे लिही असेच म्हणेन.

शर्मिलाजी, आबा, लावण्या, निलेश, जाई, मनस्विता, च्रप्स, रानभुली.. धन्यवाद ..!!

पण लिहायला काय काय दिव्य करावी लागतात त्याची कल्पना असल्याने निवांतपणे लिही असेच म्हणेन.>>
रानभुली, अगदी खरं आहे ..! शक्यतो मी पूर्ण कथा लिहूनच मग त्यात थोडे बदल करून एक - एक भाग पोस्ट करते ..
शक्यतो आजच टाकेन पुढचा भाग..!

सामो धन्यवाद..!!

आणि तू मला एकेरी नावाने हाक दिलीस तरी आवडेल मला..!