सत्य - भाग ११

Submitted by अरिष्टनेमि on 1 May, 2022 - 13:44

“झीनत! बोल ना. मला सांग. मी सांगते.”
“मॅडम, माझे वडील वकील आहेत हायकोर्टात. त्यांच्याशी मी बोलले. त्यांना पाटील सरांशी बोलायचं होतं.”

आता पेच प्रसंग होता. आबा या स्थितीत बायकोला पाणी नीट मागू शकत नव्हते. ते वकीलाशी काय बोलणार? पण बाईंना पटकन उत्तर सापडलं. त्या म्हणाल्या, “अगं यांची तब्येत बरी नाही. दोन मिन्टं थांब. मी तुला एक नंबर देते. लिहून घे. त्यांचं नाव पाटीलच आहे. आमचे नातेवाईकच आहेत. त्यांना सारी केस माहित आहे. त्यांच्याशी बोलायला सांग.”
नंबर घेऊन झीनत परतली.

झीनत म्हणजे ॲडव्होकेट खानसाहेबांचं शेंडेफळ. बापाची लाडकी. आई एकवेळ चिडेल, ओरडेल. पण खानसाहेब? आजपावेतो खानसाहेबांनी तिच्याकडं कधी डोळे मोठे करुनसुद्धा पाहिलं नसेल. अशा लाड करणा-या बापाचा जो काही गैरफायदा एखादं पोर घेईल. तो सारा झीनतनं घेतला होता. खाऊ, खेळणी, कपडे, अभ्यासाला सुट्टी, शाळेला बुट्टी. पण पोरीची जात. समज लवकर येते. मोठ्या भावाच्या आधी ही पोर शहाणी झाली अन् ‘बापाच्या लाडानं ही पोरगी वाया जाणार’ असं म्हणणा-या प्रत्येकानं आश्चर्यानं बोट तोंडात घातलं.

खानसाहेब मूळचे हैदराबादचे. गर्भश्रीमंत. संस्थानिकाच्या घराण्यातले. तोंडातून शब्द बाहेर निघण्याचा अवकाश की वस्तू पुढ्यात हजर. पहिलीला शाळेत गेले तेच वडीलांच्या रोल्सरॉईसमध्ये बसून. अजून काय सांगावं? पण खानसाहेबांना ही श्रीमंती कधी चढली नाही. त्यांचे पाय कायम जमीनीवर राहिले. श्रीमंती कधी त्यांनी मिरविली नाही.

मेहनतीनं एल.एल.बी. केलं. वडीलांच्या मोठ-मोठ्या ओळखी होत्या. त्यांच्या ओळखीनं कोणत्याही पट्टीच्या वकीलानं यांना घेतलं असतं. पण त्यांनी ते टाळलं. गाव सोडून चुलत काकाकडं मुंबईला गेले. स्वत:च्या वडीलांची ओळख न सांगता स्वत:च्या डिग्रीच्या बळावर एका वकिलाकडं नोकरी सुरु केली. कधी कोणाच्या शिफारशीची पायरी चढले नाहीत. त्यांचं तल्लख डोकं, अजब आकलनक्षमता, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, नम्र आणि साधा स्वभाव त्यांना लवकरच पुढं घेऊन गेला. त्यांना चांगल्या चांगल्या वकीलांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली अन प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलं.

पुढं त्यांनी स्वतंत्रपणे वकिली सुरु केली. हायकोर्टात त्यांच्या नावाला एक वेगळंच वलय प्राप्त झालं. खानसाहेबांनी वकीलपत्र घेणं म्हणजे कठीण काम. खानसाहेब आधी अशीलाची उलटतपासणी घेत. केसची पूर्ण माहिती काढत. त्यानंतर जर त्यांना वाटलं की त्यांची बाजू सत्य आहे, तर ते वकीलपत्र घेत. अतिहुशार माणसाचा एक दुर्गुण त्यांच्यामध्येपण नक्कीच होता. ‘विचित्रपणा.’ एकदा वकीलपत्र घेतल्यावर अशील त्यांची फी देवो की न देवो. ते केस लढत. याची त्यांना नशा येई. पण त्यांची पत्नी व्यवहारी होती. ती नेहमी म्हणे, “अजी, आप वकालत करनेसे अच्छा कुंवारे रहकर समाजसेवक बनते.” पण खानसाहेब एका कानानं ऐकून दुस-या कानानं सोडून देत.

खानसाहेबांच्या वकीलीचं आयुष्यातलं एकमेव ध्येय होतं ‘सत्याला न्याय मिळवून देणे’. बस. ते नेहमी पत्नीला, मुला बाळांना सांगत, “बसून खाल्लं तरी माझ्या दहा पिढ्या पुरेल इतकं कमवून ठेवलं आहे बापजाद्यांनी. यापेक्षा जास्त कमावण्यासारखं काही नाही. एकच गोष्ट मी भरपूर कमवू शकतो ‘माणूसकी.’ म्हणून मी ते करतो आहे. कितीही कमवलं तरी माणूस शेवटी फक्त चार हात जमिनीचा मालक असतो. खाली हाथ आया हूं, खाली हाथ जाउंगा.”
नेहमी ‘आप भले तो दुनिया भली’ या न्यायानं ते चालत आणि हाच गुण त्यांच्या पोरीनं तंतोतंत उचलला.

एकंदरीत हे सगळं असं असल्यानं खानसाहेब हे नाव अत्यंत अदबीनं घेतलं जाई; विशेषत: त्या गाजलेल्या दुहेरी खून खटल्यानंतर. यात त्यांनी सारी प्राथमिक चौकशी पूर्ण करुन समाधान झाल्यावर वकीलपत्र घेतलं होतं. पण एके दिवशी सरकार पक्षानं समोर आणलेला पुरावा पाहून चाणाक्ष खानसाहेबांच्या ध्यानात आलं, त्यांचा अशील गुन्हेगार होता. त्यांनी त्याच क्षणी ती केस सोडली. पार्टी मोठी होती. अशीलानं मध्यस्थाकरवी खानसाहेबांना फी म्हणून सही केलेला कोरा चेक हातात दिला. खानसाहेबांनी चेक घेतला. मध्यस्थाला बसवलं. जेवू घातलं. त्याला त्या अशीलाचं नाव लिहिलेलं एक पाकिट दिलं. त्यानं आणलेल्या स्वत:च्या नावाच्या को-या चेकवर आकडा लिहून एका पाकीटात चेक टाकला आणि त्याला विनंती केली, “साहेब, तुमच्या चेकला पेइन स्लिप लावून यात टाकलाय. जाता जाता हा चेक बॅंकेत देऊन याल का प्लीज? आणि हे एक पाकीट तुमच्या साहेबांना द्या प्लीज.” खानसाहेबांनी चेक घेतल्याचा धक्का एवढा मोठा होता की त्या आनंदात तो मध्यस्थ आनंदाने उड्या मारत बॅंकेत गेला.

बॅंकेत पाकीटातून खान साहेबांच्या नावाचा चेक काढून त्यांच्या खात्यावर भरण्यासाठी त्यानं कॅशिअरला दिला. कॅशिअर त्याच्या तोंडाकडं पहायला लागला, “काय मीच सापडलो का साहेब? काय उगीच मस्करी करता राव?”

कॅशियरनं परत केलेला चेक त्यानं पाहिला. त्याच्यावर रक्कम लिहिली होती ‘शून्य रुपये’. असं का? हे विचारायला परत खान वकीलांकडं जाण्याची त्याची हिंमत नव्हती.

तो गुपचूप अशीलाकडं गेला अन घडली घटना सांगून खानसाहेबांनी त्याच्यासाठी दिलेलं पाकिट त्याच्या हातात दिलं. अशीलानं उत्सुकतेनं ते फोडलं. त्यात त्याच्या नावाने लिहिलेला एक लाख रुपयांचा खानसाहेबांच्या सहीचा चेक होता. तो धावत पळत खानसाहेबांकडं गेला. “गलती हो गयी साब. मुझे माफ कर देना.” पण खानसाहेबांना विकत घेईल असा माणूस जन्माला यायचा होता. खानसाहेबांनी ती केस सोडली ती सोडली. परत त्याचं काय झालं हेसुद्धा त्यांनी पाहिलं नाही.

खानसाहेबांचा दरारा अजून वाढला. याला जोडून त्यांच्या विक्षिप्तपणाचे कपोलकल्पित किस्सेसुद्धा लोकांमध्ये प्रसिद्ध झाले.

असे हे खानसाहेब झुकत एकाच व्यक्तीपुढं; झीनत.
अठराव्या वर्षी पोरीला इंजिनिअरींगला घालायला खानसाहेबांचा जीव वरखाली होऊ लागला. बायकोला म्हणत, “माझी एवढीशी पोर कशी एकटी राहील? त्यापेक्षा तिला राहू दे दोन वर्षं घरीच. मीच एक कॉलेज काढतो इथंच. इथंच शिकेल माझ्याजवळ राहून.” बायकोला नवल वाटे. शेवटी हो ना करता करता खानसाहेबांचं मन झीनतनं वळवलं आणि ती इकडं आली. पण खानसाहेबांच्या दोन अटींवर. रोज रात्री त्यांना फोन करायचा आणि दर महिन्याला दोन वेळा ते तिला भेटायला येणार.

अशाच एका फोनवर झीनतनं त्यांना घडलेली घटना सांगितली होती. खानसाहेबांना त्यात फारसं काही वाटलं नाही. रोज फौजदारी खटले चालवणारा तो माणूस, एखाद्या खुनाचं काय अप्रूप? फक्त त्यांनी त्या दिवशी तिला फोन ठेवायच्या आधी दोन दोन वेळा बजावलं, “स्वत:ची काळजी घे.”

झीनत होती बापासारखी हळवी अन सत्याच्या बाजूनं राहणारी. तिला नक्की अगदी मनापासून वाटे की या खून प्रकरणात डीव्हीला विनाकारण गोवलं आहे. एका गरीब, निरपराध पोराचा हकनाक बळी जातो आहे याचं तिला फार वाईट वाटलं. शेवटी तिनं न राहवून खानसाहेबांना म्हटलंच, “तुम्ही एकदा यात लक्ष घाला.”

आता झीनतचं वाक्य म्हणजे खानसाहेबांसाठी साक्षात आज्ञाच. त्यांनी तिला अशा माणसाचा फोन नंबर मागितला की जो याबाबत सविस्तर सांगू शकेल. झीनतला साहजिकच आबा पाटील आठवले. आता ते आजारी असल्यानं त्यांनी दिलेला दुस-या पाटील सरांचा नंबर तिनं खानसाहेबांना दिला. पाटील सरांनी त्यांना माहित असणा-या सा-या गोष्टी खान वकीलांना सांगितल्या. शेवटी खानसाहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की केस पाहून ते निर्णय कळवतील.

पाटील सर बुचकळ्यात पडले होते. ‘हा कोण खान? खरंच काही उपयोग होणार आहे का? बिनसळे साहेबांना काय सांगायचं?’ त्यांचं डोकं चालेना. त्यांना आठवले राजन वकील. त्यांना फोन केला. खान साहेबांचं नाव ऐकल्यावर राजन वकील चाट पडले. ‘ते यात कसे आले?’

त्यांनी पाटील सरांना सांगितलं, “बघा सर, खानसाहेब म्हणजे अतिशय हुशार माणूस. थोडा विक्षिप्त आहे. पण जर खरंच केस त्यांनी घेतली तर चांगलंच. बिनसळे साहेबांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. ते मी पाहतो. पण खान साहेबांनी केस हातात घेतल्यावर त्यांना स्वतःला पटली बाजू तर ठीक, पण जर त्यांनी केस सोडली तर कोणी हात लावत नाही सहसा. जेवढा माणूस चांगला तेवढा धोकासुद्धा आहे.”

"कसं करुयात? बिनसळे साहेबसुद्धा नावाजलेले वकील आहेत. एकदा केस त्यांच्याकडून काढली तर तेही परत घेणार नाहीत. मला वाटतं सर एकदा तुम्ही पोराच्या घरी कल्पना द्या, बोला, ठरवा. मग पुढं त्याच्या नशीबात जे असेल ते होईल."

डोक्यावर मणाचं ओझं घेऊन पाटील सर खुर्चीत बसले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults