व्यपोहनस्तवः

Submitted by सामो on 30 April, 2022 - 02:34

कुठे बरं येउन पडले आहे मी? किती शांत, प्रसन्न जागा आहे ही. ना कलकल, ना गोंगाट. सहजच वृत्ती अंतर्मुख होउन ध्यानपरायण व्हाव्या अशी जागा. कालच तर मी झोपले होते. म्हणजे मी अजुनही स्वप्नकोषात आहे की काय! समोर उत्तुंग पर्वतरांगा आणि बर्फशिखरे दिसत असुनही आपल्याला थंडी कशी वाजत नाही?
समोरुन कोणी येत आहे असे वाटते. यांना विचारतां येइल बहुतेक. अरे अरे पण हे काय तीन हात, शिंगे, हातात त्रिशूळ, द्विपाद, मानवसदृश कोण आहे हा? आणि त्याच्याबरोबर ही तरुण मुलगी? पळावं का इथून ! अहो आश्चर्य यांनी ओळखले माझे विचार आणि वायुवेगाने येउन पोचलेही. आता आलिया भोगासी असावे सादर.
“सुस्वागतम शिवलोकामधे तुझे स्वागत आहे सामो. “
“काय? शिवलोक? या जागेचे नाव शिवलोक आहे?”
“होय आणि प्रत्येक वेळा तू इथेच आलेली आहेस. “
“ प्रत्येक वेळा म्हणजे?”
“तुला नाही आठवणार इतक्यात. मात्र हळुहळू पूर्वीच्या प्रत्येक जन्माची आठवण येत जाइल. तू इतकी रमशील इथे की पूर्वजन्मीच्या आठवणी कस्पटासमान होतील तुझ्यासाठी”
आता आश्चर्याने आ वासण्याची पाळी माझी होती.
मला तीव्रतेने नवऱ्याची, मुलीची आठवण आली आणि रडूच कोसळलं. माझ्या नातीचा पापा घ्यायचा राहूनच गेले होते. नवऱ्याला महत्वाची पासवर्ड दिली नव्हती की निरोप घेतला नव्हता. उण्यापुऱ्या ४२ वर्षांच्या संसारात किती थॅंक्यु, सॅारी आलेगेले, ते सारे सारे मनातच राहिले. त्याला एकटी मागे सेडुन, बेपर्वा कशी आले मी पुढे! तो कसा सावरेल? माझ्या घशात उष्ण कढ दाटुन आला, डोळ्यातुन अश्रू वाहू लागले.
आता त्या गणप्रमुखाबरोबर आलेल्या स्त्रीने माझ्या पाठीवरुन हात फिरवण्यास व माझे सांत्वन करण्यास सुरुवात केली. “सामो वेडी आहेस का तू! एक संपूर्ण , कटुगोड पण छानसं आयुष्य जगल्याचे समाधान मानायचे की शोक करायचा? शिवाय त्यंच्याशी मन:प्रतलावर तू संवाद साधू शकतेसच.” नंतर बराच वेळ एका भावनाभारीत शांततेत गेल्यावर काही काळाने सावरुन मी विचारले “असे काय पुण्य होते माझे की मला या लोकात प्रवेश मिळाला?” या पृच्छेवर दोघांनीही हसुन, मला काही असे प्रसंग सांगितले जे फक्त मला माहीत होते, पैकी बरेचसे तर माझ्या खिजगणतीतही नव्हते मात्र एक मुद्दा सर्व प्रसंगात सामाईक होता तो होता निरलस भाव आणि बर्याच प्रसंगातील शरणागती की ईश्वरा हे माझ्या मर्यादित बुध्दीपलिकडचे आहे तेव्हा संपूर्ण: शरणागती की ईश्वरेच्छा बलीयसी. तू जे काही करशील ते मला मान्य आहे.
अजुन एक कारण होते - व्यपोहनस्तवः / पापव्यपोहनस्तवः स्तोत्राचे पठण

व्यपोह्य सर्वपापानि शिवलोके महीयते ॥

https://sanskritdocuments.org/doc_shiva/vyapohanastavaH.html

असो. हे प्रभावी स्तोत्र जरुर वाचनात, पठणात असू द्या. मी आज पहील्यंदा वाचले. फार आवडले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात, सामो! निरलस भाव (आळस न करणे) पण ईश्वरेच्छा बलियसी मानणे - हे दोन्ही एकाच वेळी साधणे भल्याभल्यांना जमत नाही. कधी वाहत्या धाग्यावर भेटलीस तर जेस्सी जे चा किस्सा सांगेन.