हीच का ती माणसे?

Submitted by निशिकांत on 21 April, 2022 - 23:07

राम भजनी रंगणारी हीच का ती माणसे?
एकतारी छेडणारी हीच का ती मणसे?

साद देण्या द्रौपदीला आज ना उरला कुणी
कृष्ण महिमा वाचणारी हीच का ती माणसे?

जाळती नवरीस नवख्या स्त्री-भ्रुणाला मारती
स्त्रीस देवी मानणारी हीच का ती माणसे?

जो मिळे न्यायालयातुन तोच असतो न्याय का?
न्याय हरता पेटणारी हीच का ती माणसे?

श्वापदे दिसती न कोठे वाहती जखमा कशा
माणसांना चावणारी हीच का ती माणसे?

कावळे शिवती न पिंडा मुक्त ते आत्मे कसे?
पुनर्जन्मा भोगणारी हीच का ती माणसे?

पाच सालाबाद येती मागण्या माझ्या मता
भीक ग्रहणी मागणारी हीच का ती माणसे?

मातले धर्मांध आता यादवी चोहीकडे
धर्म ग्रंथा समजणारी हीच का ती माणसे?

दोन धर्मातील दंगे बाब नित्त्याची असे
व्हा सहिष्णू सांगणारी हीच का ती माणसे?

बाटला इतिहास भावी वागलो सारे असे
संस्कृतीला मिरवणारी हीच का ती माणसे?

ऐक तू "निशिकांत" गोदा प्रश्न करते आज ही
नाथ जाता थुंकणारी हीच का ती माणसे?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.न. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवप्रिया
लगावली--{गालगागा) X३ +गालगा

Group content visibility: 
Public - accessible to all site users