बरसात भोवताली

Submitted by निशिकांत on 17 April, 2022 - 12:53

सुकल्याच आसवांची बरसात भोवताली
समजावतो मनाला "मी मस्त भाग्यशाली"

मी धुंद फुंद जगलो हिरवळ, वसंत नसुनी
ऋतुराजची हरवली गर्विष्ठ मस्तवाली

मुर्दाड लोक असता क्रांती कशी घडावी?
गेले कुठे निखारे? विझल्या कशा मशाली?

रेंगाळलेत खटले, न्यायालयांस सांगा
प्रतिमाह वाद इतके, काढायचे निकाली

बाळास खुष कराया, खोटीच फोनवरती
दु:खी, तरी कळवतो नसतेच जी खुशाली

पाहून अंधश्रध्दा, सारे तुझे पुजारी
नावे तुझ्याच देवा! करतात रे दलाली

जातात वाममार्गे श्रीमंत ते यशस्वी
करतात सत्त्यवादी आयुष्यभर हमाली

रुजतेय संस्कृती का लोकात मुखवट्यांची?
सभ्यात, प्रश्न पडतो, दडलेत का मवाली?

"निशिकांत" गोठलेले अश्रू कसे वितळले?
जपल्यात आठवांच्या उबदारशा दुशाली

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--आनंदकंद
लगावली--( गागाल गाल गागा) X२

Group content visibility: 
Public - accessible to all site users