"इश्काचा खटाटोप अर्थातच तेरा लुंगी बदला"

Submitted by सखा on 13 April, 2022 - 22:28

...........मी लगेच रडवेला चेहरा करून म्हणालो - "बाबुलाल आपली कोमलबाला गेली होssss"
"काय बाई मेली??" बोकडेसर आणि दाबे एकदमच ओरडले.
"नाही मेली नाही. तिच्या उंटाच्या शेपटीला उंदीर चावल्याने बिचारी दुबईला परत गेली............."

(फार पूर्वी तीन भागात लिहिलेली ही कथा रसिकांच्या सोयीसाठी एकाच वाहत्या पानावर पुन्हा सादर)

आता आपण जर नाट्यप्रेमी असाल तर आपल्याला बोकलवाडीच्या एका अज्ञात पण महान लेखकाने लिहिलेले तुफान विनोदी वगनाट्य "इश्काचा खटाटोप अर्थातच तेरा लुंगी बदला" नक्कीच माहित असेल. नाही?? नसू देत काहीच हरकत नाही कारण अजून काही हे वगनाट्य रसिका पर्यंत आलेलं नाहीये. या महान कलाकृतीचा लेखक मीच असल्याचे मीच नम्रपणे इथे आपल्याला सांगू इच्छितो. आमच्या गावातील काही सत्य घटनांवरून मला स्फुरलेले हे धत्तिंन्ग वगनाट्य नाकात वारे गेलेल्या सांडा प्रमाणे रसिकांच्या मनात धुडघूस घालेल अशी मला खात्री आहे. याची स्टोरी थोडक्यात अशी:
एका गावातील गरीब मास्तर अनिलचे एका धिनचाक नृत्यांगना लोला लुंगीवालावर एकतर्फी प्रेम असते पण लोलाचे शाळेच्या रंगेल पण विवाहित हेडमास्तरवर श्री. ढोरे यांच्यावर प्रेम असते आणि तसेच त्याच शाळेतील रासवट बद्रीनाथ शिपायांवर देखील प्रेम असते. त्यातच लोला फार दुख्खी पण असते कारण तिने पैशासाठी एका लुंग्या विकणाऱ्या मिस्टर लुंगीवाला या म्हाताऱ्या लुंग्यासुंग्या व्यापाऱ्यांशी लग्न केलेले असते. आता तुम्ही म्हणाल व्हिलन कोण तर तिचा एक मित्र गावातील पाटील जालीम सिंग याचा सुध्दा तिच्यावर डोळा असतो आणि एकदा तो नराधम एका दिलखेचक डान्स नंतर दुर्योधना सारखा तिचे वस्त्रहरणाचा प्रयत्न करतो तेव्हा दैवी चमत्कार (ट्रिक सिन) होऊन आकाशातून तेरा लुंग्यांचा सप्लाय होतो. आता लक्षात आले ना की नाटकाचे नाव "इश्काचा खटाटोप अर्थातच तेरा लुंगी बदला" असे का आहे?
थोडक्यात काय तर प्रेमाचा त्रिकोण-चौकोन-पंचकोन, दुःख, नाच, गाणी, क्रूरता, कोमलता, रोमांस, लुंगी बदलाचा ट्रिक सिन आणि सर्वात महत्वाचा म्हणजे अशक्य चावटपणा हे सर्व काही या नाटकात ठासून भरल्याने हे सुपर हिट होणार यात मला काहीच शंका नव्हती. या मधले डायलॉग्स सुध्दा मी एव्हढे जबरदस्त लिहिले होते की पैशा टाळयांचा पाऊस पडणारच याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. उदाहरणार्थ ह्या दोन सीन्स मधले डायलॉग्ज पहा:
सिन ८:
(अनिल कोणीच नाही बघून लबाड मिसेस लोलाला बागेत लिंबाच्या झाडा खाली प्रपोज करतो. ती नाही नाही अशी मान हलवते)
अनिल: लोला मी प्रेमाच्या झाडावरील एक लोचट लिंबू आहे मला टिनपाट टीम्बु समजून नकार देऊ नका.
लोला लुंगीवाला: नाही नाही नाही ... प्यारे अनिल बाबू मै वो बेकार कार हू जिसके प्रेमके चारो टायर पंक्चर है.
अनिल: मै तो स्टेफनी हू, लोलाजी!
(लोला लाजेने चूर होते)

सिन १२:
(लोला आणि जालीमसिंग त्याच्या हवेलीवर दारू पीत बसले आहेत)
लोला लुंगीवाला: या अर्ध्या रिकाम्या दारूच्या ग्लासची शप्पथ जालीम सिंग खरे प्रेम तुम्हाला समजूच शकत नाही.
जालीम सिंग : (विक्राळ हसत) हा हा हा हा मग तूच सांग ना लोला.
लोला: जालीमसिंग खरे प्रेम असते "पवित्रा" लुंगी सारखे (पवित्रा हे लुंगीवालाच्या लुंगीच्या ब्रँडचे नाव). ते असते कधी चौकडा, कधी प्लेन तर कधी रंगीत आणि हो कधी कधी हृदया सारखी लुंगीला पण पडतात दुख्खाची भोके ... मग मारावी लागतात तडजोडीची ठिगळे. मी लुंगीवालाशी लग्न त्यांचे पैसे पाहून - आपले हे - कर्तृत्व पाहून केले. लुंगीवाला मेल्यावर मी लग्न करेन तर एक तर बद्रीशी नाही तर हेडमास्तरशी. माफ कर जालीम (दारूचा घुटका घेते) तुला मी कधीच आपला पती मानू शकत नाही. आपण फक्त दारू पार्टनर्स आहोत बस्स!
जालीम सिंग: (रागाने दारूचा ग्लास फोडत) वा म्हणजे दारू माझी आणि नशा दुसऱ्याला? ठीक आहे बेवफा औरत नाच या फुटलेल्या काचेवर.
(लोला फुटलेल्या काचेवर मदहोश नाच करते. जालीम मिशा पिळीत नाच बघतो)

घरी बसून सुद्धा टाळ्या शिट्या वाजवल्या बद्दल धन्यवाद रसिक मित्रहो. तुमचे कौतुक हेच मला मिळालेले पारितोषिक. मला ठाऊक आहे आपल्या सारखे रसिक मोठ्या आतुरतेने या नाटकाची वाट पाहत आहेत. आता फक्त प्रोड्युसर मिळाला की कामाला सुरवात करणे एव्हडेच बाकी आहे.
म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी. माझ्या नाटकाचा जन्म होण्याची वेळ जवळ आली होती हे मला पेपरात एक बातमी वाचून कळाले. अमेरिकेत शिकागोला म्हणे महाराष्ट्राची लोकधारा का काय कार्यक्रम होता आणि त्यात लोकनाट्य सादर करण्याची संधी होती. मी ऍप्लिकेशन पाठवून दिली. अजरामर कलाकृती ही पारखी नजरेला कितीही लांबून दिसते म्हणे. मला शिकागोवरून महाराष्ट्र मंडळाचे ताबडतोब पत्र आले की एकमेव ऍप्लिकेशन आल्याने अर्थात आमचे वगनाट्य निवडले गेले आहे आणि महिनाभरात सादर करायचे आहे! व्हिसा तिकीट वगैरे महाराष्ट्र मंडळ करणार होते म्हणे. ढेण टे ढेणssss!!!

मी आमचे परम मित्र बाबुलाल साडीवाले यांच्या साडीच्या दुकानात जाऊन माझी समस्या सांगितली. बाबुलाल म्हणजे लोकसंग्रह असलेला इरसाल गडी त्यांनी दुकानातच खटाखट कास्टिंग करून टाकले. आता शिकागोला जायचे म्हंटल्यावर गावातल्या ऍक्टर लोकांनी पण फार काही आढेवेढे घेतले नाहीत. बाबुलाल स्वतःच प्रोड्युसर झाले.
कास्टिंग असे झाले:

निर्माता: बाबुलाल साडी सेंटर, बोकलवाडी
लेखक आणि दिग्दर्शक: मी
संगीत: न्यू महाराजा ब्रास बॅण्ड, स्टेशन रोड, बोकलवाडी.
मेकप/लाईट्स/नेपथ्य: राम के भरोसे - म्हणजेच ऐनवेळी बघू

१) जालीमसिंग: भैरू पैलवान
२) मिस्टर लुंगीवाला: बाबुलाल साडीवाले
३) अनिल : सेंट परशु शाळेतील बोकडे मास्तर
४) बद्रीनाथ: सेंट परशु शाळेतील चपराशी बद्री
५) हेडमास्तर: सेंट परशु शाळेतील दाबे सर

आता सर्वात महत्वाचे म्हणजे हिरोईन कोण घायची? सुरवातीला मुंबईवरून कतरीना कैफला हिरोईन म्हणून आणावी म्हणून चपराशी बद्रीनी फार आग्रह धरला तर तमाशाफेम नृत्यांगना सुंदराबाई उर्फ फटाकडीलाच घ्यावे असे भैरू पैलवानाचे मत पडले. चित्रकलेच्या नयन बाई असतील तर बोकडे मास्तरना कामात विशेष उत्साह येणार हे स्पष्ट दिसत होते. दाबे सरांचे विशेष असे काही मत नव्हते फक्त बाई सुंदर असावी म्हणजे लव्ह सीन चांगला होईल एव्हढेच त्यांचे म्हणणे होते.
आठवडा उलटून गेला तरी हिरोईनचे काही निश्चित ठरतच नव्हते त्यामुळे मला काळजी वाटू लागली एक दिवस बाबुलालच्या दुकानात मी आणि बाबुलाल चिंतेत बसलेले असताना बाबुलालचा गोरा गोमटा गुबगुबीत नौकर गणू गिऱ्हाईकाला साड्याचा पदर बाई प्रमाणे अंगावर घेऊन दाखवीत होता. गणूला त्या अवस्थेत पाहताच माझे दिग्दर्शकीय डोळे एकदम चमकलेच. दोन ज्ञानी मनुष्याचे विचार मिळते जुळते असतात असे म्हणतात त्या मुळे बाबुलालना पण माझा विचार पूर्णपणे पटला. गणू नौकरी जाण्याच्या भीती पोटी नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. बाकीच्या नटांचा नाटकापेक्षा नटी मध्ये असलेला इंटरेस्ट पाहता गणू म्हणजेच लोला लुंगीवाला हे ज्ञान गुप्त ठेवलेलेलच योग्य असा सुज्ञ विचार मी आणि बाबुलालने न केला तरच नवल. एकूणच काय तर या हिट नाटकातील हॉट नटी कोण हा ज्वलंत प्रश्न एकदाचा सुटला!
कुठल्याही नामवन्त दिग्दर्शका प्रमाणे "गण्या लेका हेरॉईनचे काम करणार आहेस तेव्हा जरा वजन कमी कर!" असा दम देत मी गणूचे नामकरण केले "कोमलबाला". अर्थातच गणू हा कुठल्याही मापाने कोमल वाटत नव्हता तरी त्याच्या मिशाविरहित गुबगुबीत चेहऱ्यावर एक लबाड गोडवा असल्याने तो खपून गेला. म्हणतात ना उपासाला केळे आणि वनवासाला रताळे!
दुसऱ्या दिवशी बाबुलाल साडी सेंटर मध्ये सात वाजता मुहूर्ताचा कार्यक्रम झाला. दुबईची हिरोईन कोमल बाला येणार असे मी आणि बाबुलालने सर्वांना खोटे सांगितल्या मुळे बाकीची पात्रे वेळे आधीच अंघोळ बिंघोळ करून हजर होती. ठरल्या प्रमाणे सात वाजता बाबुलालने दिलेली भरजरी साडी घालून मिस कोमलबाला ठुमकत हजर झाली आणि नाटकात तिच्या बरोबर लव्हसीन असलेल्या सगळ्याच पात्रांचे डोळे चमकले आणि हे पाहून माझ्या आणि बाबुलालच्या छातीत धस्सच झाले!
"च्यामारी गण्यासाठी वेगळी सेक्युरिटी ठेवावी लागती की काय?" बाबुलाल माझ्या कानात कुजबुजले.
नटीला पाहताच हेकट हेडमास्तर दाबे यांनी ताबडतोब शाळेचे थेटर प्रॅक्टिस साठी देऊन आपले सामाजिक वजन वाढवले. मग काय रोज संध्याकाळी शाळेच्या थेटरात प्रॅक्टिसेस सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी भैरू पैलवान आणि दाबेसर दोघेही दिगदर्शकाने न सांगताच कोमल बालाशी जास्त लगट करतात अशी तक्रार बोकडे सरानी मला खाजगीत केली. आठ दिवसा नंतर सुध्दा डायलॉग्स पाठांतराच्या बाबतीत देखील सर्वांची बोंबा बोंबच होती.
लोला रागा रागात जालीम सिंगला म्हणते.
"जालीमसिंग तू नुसता नालायकच नाहीस तर पाजी हलकट आहेस"
हे वाक्य कोमलबाला उर्फ गणू असा म्हणत असे.
"जालीमसिंग तू नुसता नंदी बैल नाहीस तर हाजीपालकट हायेस."
आता मी गण्याला डोके फोडून सांगितले की भूमिका करताना पर्सनल घ्यायचे नाही तरी तो मूर्ख माणूस कायम नंदीबैल आणि हाजीपालकटच म्हणत असे. आता मी एक दुसरा एव्हडा सुन्दर लव्ह सिन लिहिला होता की ज्याचे नाव ते.
त्या सिन मध्ये लोला लुंगीवाला बागेत झुल्यावर बसून एक विरह गीत गात असते आणि बद्री तिला झोका देत असतो.
तेवढ्यात जालीम सिंगचा प्रवेश होतो आणि लोलाला बद्री झोका देत आहे हे पाहून त्याचा जळफळाट होतो आणि मग बद्री झोका थांबवतो आणि दोघांची तुफान मारामारी होते. आम्ही वर आढ्याला छान पैकी झोका बांधला वजनदार कोमलबाला त्या वर मजेत झोके घेऊ लागली. आढे कुर कुरु लागले. मागून बद्री महाराज मिटक्या मारीत तिला झोके देऊ लागले. जालीम सिंगचा प्रवेश झाला. बद्रीला काय जोर आला कुणास ठाऊक जालीम सिंग जसा तिच्या समोर येऊन कमरेवर हात ठेवून ऐटीत उभा राहिला तसा बद्रीने अधिकच जोरात झोका दिला. पाय लांब केलेल्या कोमलबालाने बेसावध भैरू पैलवानाला अशी काय दणकावून लाथ मारली की भैरू पैलवान त्या जोरदार धडकेने "बक्क" असा आवाज करून एखाद्या रॉकेट सारखा आम्हा दोनचार प्रेक्षकांच्या डोक्यावरून उड्डाण करून हॉलच्या मागच्या भिंतीला धडक मारून मग जमिनीवर पालथा लँड झाला. इकडे झोक्याच्या मागे उभा असलेला बद्री भैरूच्या उड्डाणाचे अपूर्व दृश्य पाहण्यात एव्हडा गुंग झाला की झोक्यावर परत आलेल्या कोमलबालाने त्याला पण कधी धडक मारली हे त्याचे त्यालाच कळले नाही. मला आणि बाबुलालला एवढेच दिसले की तो देखील त्या जबरदस्त दणक्याने स्टेजच्या मागच्या खिडकीतून मेलो मेलो असे बोंबलत रिव्हर्स उड्डाण करून गडप झाला मग दोन एक क्षणांनी धप्प असा आवाज येऊन बद्रीच्या हाडे मोडल्यागत केकाटण्याचा आवाज आला.
शाळेच्या मागच्या कचराकुंडीत जेव्हा आम्हाला एकदाचा बद्री सापडला तेव्हा बेशुध्ध व्हायच्या आधी तो मला एव्हडेच म्हणाला:
"काही म्हणा सर पण आपली हिरोईन लै भक्कम हाये."
बुके घेऊन भैरू पैलवानाला भेटायला जेव्हा मी, बाबुलाल आणि गणू हॉस्पिटलला गेलो. तेव्हा सर्वत्र प्लास्टर बांधलेला भैरू अभिमानाने म्हणाला:
"बाबुलाल म्या लै कुस्त्या खेळलो पण असा दणका कधीच नाही खाल्ला. ती दुबईची माउली लै स्ट्रॉंग हाये."
हे ऐकून गणू उगाच लाजू लागला मग मी त्याला नजरेनेच जरब दिली तेव्हढ्यात मग गण्या कडे बघून भैरू म्हणतो.
"काय रे गण्या लेका फोकलीच्या मिशा का बरं भादरल्यास?"
"त्याचे चुलते खुडकले." मी पटकन म्हणालो
"आं?? अर्रर्र, कशाने गेले?"
"ते झोक्यावरून पडले” मी पुस्ती जोडली.
"मायला हा झोका वंगाळच गड्या नुसती पनौती बरगड्या मोडल्या माझ्या." भैरू पैलवान उसासा सोडत बोलला
भैरूला भेटून मग बद्रीला भेटायला मी, बाबुलाल आणि गणू गावातल्या वेड्याच्या हॉस्पिटलला गेलो. तेव्हा डोक्याला मार लागलेला बद्री गणूला पाहून म्हणाला:
"आजा मेरी कोमल डार्लिंग. मला माहिती होते तू मला भेटायला येणारच."
ते ऐकून मी आणि बाबुलाल घाबरलोच आम्हाला वाटले बद्रीने कोमल म्हणजेच गण्या हे ओळखलेच मग नंतर लगेच बद्री सध्या वेड्याच्या दवाखान्यात आहे आणि डोक्याला मार लागल्याने तो टेम्पररी काही बाही बोलतो हे लक्षात येऊन आम्हाला जरा बरे वाटले.
मग अचानकच बद्री पलंगावरून उठून गणूला “पारू पप्पी दे पारू पप्पी दे" असे म्हणत त्याच्या कडे साठी धावला तेव्हा गण्याने ओरडत जिवाच्या आकांताने धूम ठोकली बद्री सुद्धा एखाद्या व्हिलन सारखा त्याच्या मागे पळाला. सुरक्षा सेवकांनी जेव्हा पंधरा मिनिटांनी बद्रीला धरून आणले तेव्हा तो एखाद्या विजयी वीरा सारखा हसत परत आला आणि म्हणाला:
"जय हो महिष्मती, पारूची पप्पी घेतलीच!"
आता शाळेच्या हॉलमध्ये मी आणि बाबुलाल गण्याची समजूत घालत बसलो होतो. त्याच काय झालं की गणू जिवाच्या आकांताने पळत बाबुलालच्या दुकानात जाऊन लपला आणि तिथे अंगावर साडी घेऊन म्यानिकेन सारखी कथकली पोज घेऊन उभा राहीला. वेडा बद्री मागोमाग तिथे दुकानात आला आणि पारू त्याला न दिसल्याने आता रिकाम्या हाताने काय जायचे असा विचार करून त्याने साडी घातलेल्या गुबगुबीत म्यानिकेनचेच दोनचार मुके घेतले . तेव्हढ्यात हॉस्पिटलचे सुरक्षा कर्मचारी पोहोचल्याने पुढचा अतिप्रसंग टळला मात्र आपल्या कडे ते विचित्र नजरेने पाहात आहेत हे काही साडी घातलेल्या गणूच्या नजरेतून सुटले नाही. झालेल्या फजितीने आता मी नाटकात काम करणारच नाही असा हट्ट करून गण्या बसला होता.
"अरे ते बद्री येडं झालंय त्याचं काय एव्हढं." मी गणूला समजावणीच्या स्वरात म्हंटल.
"वा जी वा म्हणे काय हुतंय, तुमचा मुका घेतला तर कळतंय तुम्हाला" - गणू
त्यावर बाबुलाल वडीलधाऱ्या व्यक्तीच्या समजावणीच्या स्वरात म्हणाले.
"अरे बाबा गालावर तर घेतला मुका तुझ्या हे पहा आता नट म्हंटल्यावर करावं लागतंय एव्हढं. फॉरेनच्या नट नट्या बघ बरं कशा पटापट मुके घेतात. ते थोडीच तुझ्या सारखे रडत बसतात." आता या युक्तिवादावर गणू कडे फारसा काही डिफेन्स नव्हता तरी तो भूण भूण करीत बसला शेवटी नाही हो म्हणता येत्या दिवाळीपासून पगार वाढवण्याच्या बोलीवर गणू पुन्हा राजी झाला.
भैरू आणि बद्री दोघेपण दहापंधरा दिवस जायबंदी झाल्याने लोला, लुंगीवाला, अनिल आणि हेडमास्तर यांच्याच सिनची प्रॅक्टिस घ्यायची असे ठरले. बाबुलालला फारसे वाक्य नव्हतेंच त्यामुळे बाकीच्यांचेच सीन्स घेताना ते बिचारे प्रॉम्पटिंगचे काम करत असत.
हेडमास्तरनी कुठे तरी वाचले होते की बरेच मोठे नट म्हणे चार घुटके घेतल्या शिवाय भूमीकेसाठी उभेच राहात नाहीत त्यामुळे हेडमास्तर साहेब रोज मस्त पैकी पिऊन झोकांड्या खात येऊ लागले आणि स्टेजवर उभे राहण्या पेक्षा जास्त आडवेच पडूच लागले.
संकटे किती पण येवोत पण नाटक होणारच हा प्रण करून आम्ही सर्वांनी पुढच्या सिनची प्रॅक्टिस सुरू केली.
या सिन मध्ये अनिलला एक दु:स्वप्न पडते की त्याचा पत्ता कट झाला आहे आणि त्याचे रायव्हल हेडमास्तर आणि कोमल हवेत सुपरमॅन प्रमाणे मजेत विहारत आहेत आणि मग तो एक दुख्खी गीत म्हणतो. या ड्रीम सिक्वेन्सला आम्ही चार शक्तिमान माणसांना वर आढ्यावर बसवले आणि दाबे सर आणि गण्याच्या कमरेला काळे मजबूत बारीक दोर बांधले. आता अनिल सरचे करुण गाणे सुरु झाले की वरच्या दोन दोन लोकांनी दोर ओढायचे म्हणजे मास्तर आणि कोमल हवेत तरंगताना दिसतील. स्टेजवर धूर सोडला की स्वप्न दृश्य मस्त दिसेल असा आमचा कयास होता.
अनिल सरनी दर्द भरे गाणे सुरवात केली. मी धुराचे मशीन ऑन करण्याची खूण केली. लाईट वाल्यानी लाल हिरवे लाईट सोडले. वरच्या गडी लोकांनी आडातून पाणी काढावे तसे खपाखप दोऱ्या ओढल्या.
सुरवातीला आम्हाला दाबेसर आणि कोमल दोघेही उलटे पालटे होत वर जाताना दिसले. एक क्षणभर दोघेही स्थिरावले आणि आपले डायलॉग म्हणणार तोच दोघेही लंबका प्रमाणे हेलकावे खात एकमेकांना जोरात धडका मारू लागले मग अचानकच सात आठ फुटांवरून आधी कोमलबाला दोरी तुटून धप्पकन खाली पडली पडताना तिने दाबेसरांचे पाय धरल्याने तिच्यावर दाबेसर पडले आणि मग दोऱ्याच्या हिसड्याने मग एका मागे एक चार लोक वरून धपा धप खाली पडले.
स्टेजवर एकच कल्लोळ उडाला. धूर जरा कमी झाल्यावर जो मानवी मनोरा दिसला त्यात सर्वात खाली अर्थातच बोकडेसर होते. त्यांच्यावर आरूढ झालेले हेडमास्तर दाबे त्यांच्यावर कोमलबाला आणि मग इतर. खूपच विनोदी दृश्य दिसत होते परंतु ही हसण्याची वेळ नव्हती मदतीला धावण्याची होती आणि हो जाता जाता एक सांगायलाच हवे चेंगरलेल्या दाबे सरांच्या हातात दोन मोसंब्या होत्या.
सरकारी इस्पितळात बोकडेसर आणि हेडमास्तर दाबेसरानां बाजू बाजूला खाटा होत्या आणि त्यांची प्लास्टरमय अवस्था पाहून माझ्या आणि बाबुलालच्या लक्षात आले की आपल्या नाटकाचे आता बारा वाजले आहेत. त्याही अवस्थेत दाबे सर मला आणि बाबुलालला दरडावून हातातील काल पासून जपून ठेवलेल्या मोसंब्या दाखवीत म्हणाले
"हे काय आहे? आं??"
"मोसम्ब्या आहेत प्रकृतीला छान." मी
"पण मी म्हणतो या स्टेजवर आल्या कश्या?" दाबे रागात ओरडले
"म्हणजे मला कळालेलं नाहीये दाबे सर " मी साळसूदपणे म्हणालो
"हेडमास्तर साहेब विचारत आहेत की ती कोमलबाला आहे का, कोमलबाबा?" बोकडेसर बोलले
एव्हढ्यात गणू ठरल्या प्रमाणे रडत आला आणि माझ्या कानात कुजबुजला.
मी लगेच रडवेला चेहरा करून म्हणालो - "बाबुलाल आपली कोमलबाला गेली होssss"
"काय बाई मेली??" बोकडेसर आणि दाबे एकदमच ओरडले.
"नाही मेली नाही. तिच्या उंटाच्या शेपटीला उंदीर चावल्याने बिचारी दुबईला परत गेली."
"बरच झालं ती बाई म्हणजे पनौतीच होती आपले अर्धे कलाकार तिच्यामुळे दवाखान्यात आहेत. अरेरे काय ही दयनीय अवस्था दाबेसरची आणि अनिल मास्तरची " बाबुलाल रागात म्हणाले. बिचारा गणू गोरामोरा झाला पण त्याकडे मी साफ दुर्लक्ष केले आणि मी पण दात ओठ खात म्हणालो.
"बरोबर आहे. बरे झाले ती बाई परत गेली"
"अरे पण ही फळं स्टेजवर माझ्या हातात पडलीच कुठून?" दाबेसर अजूनही न्यूटनच्या उत्सुकतेने म्हणाले.
आता मात्र मी एक नामवंत नाट्य लेखक असल्या प्रमाणे म्हणालो:
"दाबेसर काही चमत्कार हे आम्हा सामान्य माणसाच्या बुद्धीच्या बाहेरचे असतात. ज्या प्रमाणे अपशकुनाची वीज नेमकी कधी आणि कुणाच्या बोडक्यात पडेल हे कुणालाच सांगता येत नाही तदवत जगात सगळ्याच का? ला उत्तरे नसतात.
आता हेच बघाना, दोरी का तुटली? उंटाला उंदीर आत्ताच का चावला? बद्री का बरं वेडा झाला? मी लेखक कसा झालो? आणि ही फळं कुठून आली असल्या फालतू प्रश्नांची उत्तरं शहाण्या माणसांनी शोधायची नसतात.
जीवनातील काही अनाकलनीय गोष्टी या दैवाचा कौल मानून थर्डक्लास प्रश्न अज्जीबात न विचारता विनम्रतेने स्वीकारायच्या असतात." असे म्हणत मी बोलता बोलता दाबेच्या हातातील मोसम्ब्या काढून गणूच्या हातातील पिशवीत टाकल्या आणि मग मात्र विशेष वेळ न दवडता बाबुलाल, गणू आणि मी त्वरित त्या खोलीतून नाहीसे झालो. (समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users