कोलियांचा देस

Submitted by writetonikhil on 12 April, 2022 - 23:18

निळ्या सावळ्या सागरतीरी
मऊ रुपेरी कोमल माती
स्निग्ध हवेवर स्वार होउनी
शुभ्रतुऱ्यांच्या लाटा बिलगती

विरळ सुरूच्या बनी केशरी
किरणे अडती आणि बिखरती
अडुन, बिखरुन मऊ रेतीवर
किरणांची सुंदर नक्षी कोरती

भरतार पहाटे घेउन होडी
पकडुन आणि ताजी मासोळी
अबोल फुलांची माळुन वेणी
कोळिण निघे म्हावरं घेऊनी

नारळी पुनवेचा आला सण
दाही दीशा गेल्या बहरून
ग्राम देवाची पालखी सजुन
दारोदारी नाचे दंगून

ऐसा कोलियांचा देस
लाल मातीच्या कुशीत
भाळी घामाच्या धारांस
थोर बाशिंगसम मिरवीत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख लिहिलंय !
((भाळी घामाच्या धारांस
थोर बाशिंगसम मिरवीत)) हे तर खूपच खास !