नवीन चपला
एप्रिल महिना असल्यामुळे, आता ऊन चांगलंच रणरणायला लागलं होतं. बारा वाजायला आले असतील आता. अकरा वाजेपर्यंत तर परिक्षाच चालू होती शाळेत. मग दहा पंधरा मिनिटे इकडे तिकडे गेले. सूर्य अगदी डोक्यावर आलेला दिसत होता. त्यामुळे तिला पावलं चटाचट उचलावीच लागत होती. पण तिला अजिबात घरी जावसं वाटत नव्हत. घरी जाऊन नव्याने आईला तोंड द्यायची भीती वाटत होती तिला.
आई कालच किती चिडली होती. आज तर मग ती आणखिनच रागवेल. आई मारत नाही कधी, पण खूप चिडते. तिला भीतीच वाटत होती आईची. पण पाय भाजत होते, रस्त्याने सावलीही नव्हती कुठे. त्यामुळे तिला चालावच लागत होतं नाइलाजाने, इच्छा नसली तरीही.
आज परीक्षेचा जेमतेम दूसरा दिवस होता. अजून पाच दिवस चालणार होती परीक्षा. त्यामुळे घरी जाऊन अभ्यास पण करायचा होता. एरवी वर्षभर कधीच अभ्यास केलेला नसतो. मग परीक्षेच्या एक दिवस आधी, त्या त्या विषयाचा अभ्यास करावाच लागतो. पास तर व्हावंच लागतं नं..
परीक्षेत किती मार्कं पडले, ते कुणीच विचारत नाही कधी. फक्त पास झाली का एवढंच विचारतात. अभ्यासाला बस असंही कुणी म्हणत नाही कधी. उलट अभ्यासाचं अन् वाचत बसण्याचं कौतुक नाहीच घरी कुणाला. पुस्तकातला किडा म्हणतात मग सगळे. त्यापेक्षा घरकाम केलं, आईला मदत केली रोजच्या कामात, की खूप आवडतं मग सगळ्यांना. आणी आईला पण. मग ती पण रोज तेच करते. आणी उरलेल्या वेळात खेळते मग.
शाळेत फक्त पास झालं, म्हणजे झालं. पुढच्या वर्गात जायचं फक्त. दरवर्षी परीक्षेच्या वेळी भीती वाटते मग. ती दरवर्षी परीक्षेच्या वेळी ठरवायची की, आता पुढच्या वर्षापासून अगदी सुरवातीपासून रोज अभ्यास करायचा. पहिले चार पाच दिवस तसं पाळल्याही जातं होतं. पण मग केव्हा ते मागे पडतं, ते कळतच नाही दरवर्षी.
आता तर तिची सहावीची वार्षिक परीक्षा चालू होती. अभ्यासही खूप कठीण होता. ह्या वर्षी तर जास्तच भीती वाटत होती. आता घरी जाऊन उद्याच्या अभ्यासाला लागायचं होतं. पण घरी जायची तर भीती वाटत होती तिला.
परवाच्याच रविवारी आई बाबांना म्हणाली होती, “ऊन खूप वाढलं आता. उद्या पासून परीक्षा पण चालू व्हायच्याच. चपला आणायला पाइजे पोरीला..”
मग संध्याकाळी ते तिघं गेले होते बाजारात. तिला खरं तर चपलांच्या दुकानात जायचं होतं. इतर मुलींकडे कशा छान छान असतात चपला! नाही तर ते काळे बूट! किती भारी वाटत असेल ते घातल्यावर ! पण मग रस्त्याच्या कडेला, फुटपाथ वर बसलेल्या माणसाकडून स्लिपर घेतल्या तिच्या करता त्यांनी.
दुकानात खूप महाग असतात म्हणे चपला. आणी आई म्हणाली, “आता कुठे जास्त वापरल्या जाणार? सुट्याच तर लागणार आहे शाळेला. निभतील थोडे दिवस ह्याच्यावर. चांगल्या तर आहेत.....”
तशा चांगल्या होत्या स्लिपर. निळ्या पट्ट्याच्या. छान वाटलं मग तिला त्या घातल्यावर, गादीवर उभं राहिल्या सारखं. तिची शाळा घरापासून खूप लांब होती. खूप मुली तर बसने जायच्या शाळेत. बसचा पास काढला की स्वस्त पडतं म्हणे. पण आई म्हणते, “कशाला बस पाहिजे? उगाच खर्च. बस पण कधी येते, कधी नाही येते .... कधी उशिरा येते.. त्यापेक्षा जरा लवकर निघावं घरनं. चांगलं असते चालणं. व्यायाम होतो चांगला. आपलं आपलं पोचता येते मग शाळेत. पोरीच्या जातीला शरीर कसं हलकं पाहिजे..”
मग ती रोज पायीच जायची शाळेत. पण खूप ऊन असलं, की पाय भाजायचे. कारण पायात कधीच चपला नसायच्या. म्हणून तर मग परवा नवीन घेतल्या होत्या तिच्यासाठी चपला.
खूप दिवसांनी काल पहिल्यांदाच ती त्या निळ्या पट्ट्याच्या स्लिपर घालून शाळेत गेली होती. रोजच्या पेक्षा थोडा जास्तच वेळ लागला मग शाळेत पोचायला. पायात काहीतरी जड जड वाटत होतं. सवय नव्हती नं असं पायात काही घालून चालण्याची .....
तिची शाळा फक्त मुलींची शाळा होती. फक्त मुलींची शाळा असली, की शिवण, विणकाम वगैरे पण शिकवतात शाळेत, म्हणून तिला मुद्दाम हून इथे घातलं होतं.
ह्या वर्षी परीक्षे करता शाळेने एक नवीनच व्यवस्था चालू केली होती. आत्ता पर्यंत वार्षिक परीक्षा असली की, प्रत्येक बाकावर दोन दोन मुली बसायच्या. पण त्या दोघींच्याही इयत्ता वेगवेगळ्या असायच्या. म्हणजे पाचवीच्या शेजारी सातवीतली मुलगी असायची.
पण ह्या वर्षी मात्र परीक्षेकरता शाळाच बदलली सगळ्यांची. वेगळ्या वातावरणात परीक्षा देता यावी सगळ्यांना म्हणून. सगळ्या गोष्टींची सवय पाहिजे म्हणे. म्हणजे मग बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी त्रास होत नाही. ही दुसरी शाळा आधीच्या शाळेला लागूनच होती. पण ती फक्त मुलांची शाळा होती. दोन्ही शाळा एकच संस्थेच्या होत्या.
काल पहिल्यांदाच सगळ्या मुली त्या शाळेत गेल्या होत्या. शाळा नवीन, सूपरवायजर नवीन.. सगळ्यांनाच जरा दडपल्या सारखं झालं होतं. त्यातून पहिला पेपर इंग्रजीचा. म्हणजे तर अजूनच कठीण.
पेपर हातात घ्यायच्या आधीच तिने देवाला मनोमन नमस्कार केला. तसा घरून निघतांना घरातल्या देवांना अन् आई बाबांना केलाच होता नमस्कार. वार्षिक परीक्षेच्या दरम्यानच हनुमान जयंती पण असायची. त्या दिवशी तर घरून अजून थोडं लवकर निघून, हनुमानाचं पण दर्शन घ्यायला जायची ती.
तर, काल पेपर सुरू करायच्या आधी तिला आठवलं, एक मैत्रीण म्हणाली होती की, ‘पेपर म्हणजे पण देव असतो. त्याला नमस्कार करून तो सोडविला की चांगला जातो मग पेपर.’
मग काल तिने पण तसच करायचं ठरवलं होतं. पेपर ला नमस्कार करण्याच्या आधी पायातल्या चपला पण काढल्या होत्या तिनं. देवाला नमस्कार करतांना काढतोच ना आपण चपला पायातून! मग पेपरला नमस्कार करतानाच तिनं ठरवलं होतं, पेपर हातात असताना चपलांना पाय लावायचाच नाही. उगाच कोप नको देवाचा.
उत्तरपत्रिका लिहून झाल्यावर सरांच्या हातात दिली, अन् मग ती विसरूनच गेली होती चपलां बद्दल. मैत्रिणींशी बोलत बोलत ती वर्गाच्या बाहेर पडली, अन् तशीच घरी आली होती. इंग्रजीचा असून पण, पेपर बरा गेला होता. त्या आनंदाच्या भरात मग रस्त्यावरचे चटके जाणवलेच नाहीत काल.
घरी गेल्यावर पाय धुतांना एकदम चपलांची आठवण आली, अन् मग मात्र रडुच कोसळलं होतं तिला. रडतच आईला सांगितलं तर, आई एकदम चिडलीच. एवढ्या नवीन चपला.. कित्ती महाग होत्या म्हणाली. आता परत कुठून पैसे आणायचे म्हणे नवीन चपला विकत घ्यायला..
कालचा दिवस नीट अभ्यास झालाच नाही मग. तरी बरं आज मराठीचा पेपर होता. नाही अभ्यास केला तरी चालतो मराठीला. लिहिता येतच आपोआप.
मग आईच म्हणाली, “उद्या अशी बहयाडा सारखी तशीच परत नको येऊ. नीट सगळी कडे शोध. विचार सरांना नाही तर बाईंना.”
काल तिलाही मनात कुठे तरी वाटत होतं, आपल्या बेंच खाली सापडतील आपल्या चपला. कोण कशाला घेईल उगाच.. पण नाही. आज सकाळी ती घाई घाईनेच त्या वर्गात शिरली होती, तिच्या चपला बघायला. नव्हत्या त्या तिथे. मग आज पेपर झाल्यावर तिथल्या बाहेरच्या घंटा वाजवणाऱ्या दादाला पण विचारलं होतं तिनं. पण तो ‘माहीत नाही’ म्हणाला. आणखी कुणाला विचारणार मग? ह्या शाळेत कुणीच ओळखीचं नव्हतं तिच्या. तरी पण ती सगळी कडे.. अगदी दुसर्या वर्गांमधे पण एकदा बघून आली होती. कुठेच नाही सापडल्या तिला तिच्या चपला.
आता तिला चपला नं घेता, घरी जायची भीतीच वाटत होती. उन्हाचं काही वाटत नव्हत. बसतील अजून चार पाच दिवस चटके. पण आई खूप खूप रागवेल परत. नकोच जायला का घरी?
आता पुढची दोन वळणं घेतली की घर येईल. कोपर्यावर नेहमीचं चिंचेच झाड लागलं. एरवी ती तिथून पळत पळत जायची. भूत असतं म्हणे चिंचेच्या झाडावर दुपारी बारा वाजता. आज ती तिथेच झाडाखाली उभी राहिली, काय करावं या विचारात.....
***************
(समाप्त)
आज ती तिथेच झाडाखाली उभी
आज ती तिथेच झाडाखाली उभी राहिली, काय करावं या विचारात.....काय केले मग तिने ??
आज ती तिथेच झाडाखाली उभी
आज ती तिथेच झाडाखाली उभी राहिली, काय करावं या विचारात.....काय केले मग तिने ? >> Open ended story
गोष्ट खुलवता आली असती की.
गोष्ट खुलवता आली असती की. कथानक छान आहे. वाचुन वाईट वाटले त्या मुलीबद्दल. ( दुसर्याची सापडलेली किंवा घेतलेली वस्तु परत न करणार्या लोकांचा मला भयानक राग येतो. )
छान कथा!
छान कथा!
आवडली. तिला चपला सापडो.
आवडली. तिला चपला सापडो.
गोष्ट आवडली. मधे थोडी
गोष्ट आवडली. मधे थोडी रेंगाळली. गोष्टीतल्या मुलीचं वाईट वाटलं
छान आहे कथा. हे अनुभवले आहे
छान आहे कथा. हे अनुभवले आहे जस्सेच्या तसे. फक्त माझ्या कथेत छत्री होती
छान कथा!
छान कथा!
प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद
प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद अजनबी, रश्मी, आबा, सामो, धनुडी, ऋन्मेऽऽष, केशवकूल.
गोष्ट खुलवता आली असती >> हो.
गोष्ट खुलवता आली असती >> हो. पण तिच्याबरोबरच मीही विचारात पडले.. कुठल्या दिशेला पाठवावं तिला..?
तिला चपला सापडो.>> नाही
तिला चपला सापडो.>> नाही सापडणार आता त्या.. शोधल्या खूप.
हे अनुभवले आहे जस्सेच्या तसे.
हे अनुभवले आहे जस्सेच्या तसे. फक्त माझ्या कथेत छत्री होती.>> एकेकाळी गरीबी मुळे आईवडील कावलेले असायचे. मुलांना काही हरवण्याची मुभा नव्हती. आता त्या मानाने कूल आईबाप दिसतात. किंवा आपलं वर्तुळ थोडं बदललं आहे.
छान लिहिली आहे कथा..!
छान लिहिली आहे कथा..!
धन्यवाद रूपाली.
धन्यवाद रूपाली.
छान आहे कथा...कधी कधी ध्यानी
छान आहे कथा...कधी कधी ध्यानी मनी नसताना वस्तू हरवतात..खूप हळहळतो जीव...
प्रत्यक्षात कधी घडत नाहीत अशा
प्रत्यक्षात कधी घडत नाहीत अशा गोष्टी. निदान गोष्टीत तरी तिला चपला सापडूद्यात, खूप छान वाटेल ! तिला आणि आपल्याला सगळ्यांनाच .
अप्रतिम!
अप्रतिम!
धन्यवाद स्वान्तसुखाय, पशुपत.
धन्यवाद स्वान्तसुखाय, पशुपत.
खूप हळहळतो जीव...>> आणी लहान वयात भीती पण खूप असते.
प्रत्यक्षात कधी घडत नाहीत अशा गोष्टी. निदान गोष्टीत तरी तिला चपला सापडूद्यात, खूप छान वाटेल >> असं घडावं, असं खूप वाटत असत.. वस्तू हरवल्यावर.. परीक्षेत नापास झाल्यावर.. नोकरी गेल्यावर.. पण नाही होत तसं..
छान आहे कथा.
छान आहे कथा.
धन्यवाद कुमार.
धन्यवाद कुमार.
छान आहे कथा.
छान आहे कथा.
ही वस्तू हरवल्यानन्तरची तगमग अनुभवली आहे.
कॉलेजचा फॉर्म, फी भरायची होती, शेवटची तारीख होती की काय आता आठवत नाही. गर्दी होती खिडकीजवळ. पैसे भरताना 100 रु जास्त गेलेले. परत घेताना पैसे नीट मोजले नव्हते. जेव्हा लक्षात आलं आणि परत विचारलं होत जाऊन तेव्हा सांगितलं की सगळं कलेक्शन झाल्यावर कॅश मोजताना जास्त पैसे झाले तर परत मिळतील. मी त्यासाठी दुपारी दोन पर्यंत बाकावर बसून राहिलेले. मैत्रीण ही थांबलेली पण तिच्या क्लासची वेळ झाल्यावर तिला जा म्हणलेलं. पैसे काही परत मिळाले नाहीत. तेव्हाच नीट बघायचं होतं असं सांगितलं. अर्थात पैसे स्व कमाई चे होते त्यामुळं घरातून ओरडणं बसणार नव्हतं की घरात सांगायला ही लागणार नव्हतं. तिथून स्टॅण्ड पर्यंत जाताना डोळे भरून येत होते आणि पाऊस ही हलकासा सुरू होता तरी मी असून देखील छत्री उघडली नव्हती.
पैसे परत घेताना त्या व्यक्तीसमोरच नीट मोजून घ्यायला हवे होते म्हणून मी पुढचा महिना एसटी चा पास काढला नव्हता. जो 70 रु होता.
म्हणजे मी दोन पास काढायचे , एक एस टी चा आणि एक सरकारी कॉलनी ते शहर असा कॉलनीच्या बसचा नॉमिनल पास असायचा 5 रु की 10 रु महिना. पण या बसच्या फेऱ्या कमी असायकच्या. त्यामुळं 2 ,2 तास वेटिंग करायला लागायचं, ते ही बसायला जागा नाही अशा ठिकाणी .
वाईट वाटलं वाचून!
वाईट वाटलं वाचून!
अतिशय सुंदर गोष्ट
अतिशय सुंदर गोष्ट ओपन एंड सोडली ....फार मस्त
कथा चांगली कुर्ली आहे.
कथा चांगली फुलवली आहे.
मुन्शी प्रेमचंद यांची एक कथा आहे. एक माणूस सायकल विकत घेतो. ॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉ दुसऱ्या दिवशी सायकल घेऊन कामाला जाताना नेहमीच्या बसस्टॉपवरच्या ओळखीच्या माणसांशी गप्पा मारत उभा राहतो. सवयीप्रमाणे बसमध्ये चढतो. बस सुटल्यावर सायकल दिसते. पुढल्या स्टॉपवरून धावत धावत मागे येतो. सायकल असते.
देवाचे आभार मानायला देवळात जातो. देवळातून बाहेर पडतो तर सायकल गायब.
चांगली गोष्ट.
चांगली गोष्ट.
भरत यांनी सांगितलेली गोष्ट पण सुंदर.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद वर्णिता, वावे, रेव्यु, भरत, उपाशी बोका.
वर्णिता, तुमची तगमग पोहोचली. एकेकाळी १००/- खूप मोठी रक्कम होती. सरकारी कॉलनी ते शहर असा कॉलनीच्या बसचा वैतागवाणा अनुभव घेतलाय मी पण. रोजचे २/३ तास वाया जायचे. शिवाय उन्हातान्हात उभं रहायला लागायचं.
भरत, सुंदर गोष्ट.
छान आहे गोष्ट. साध्या-साध्या
छान आहे गोष्ट. साध्या-साध्या गोष्टींचं अप्रूप आणि वस्तू हरवल्यावर लागणारी रुखरुख.
ओपन-एन्डेड शेवट असला तरी तो आणखी छान करता येतो का विचार करून बघा. (अनाहूत सल्ला वाटला तर सोडून द्या.)
प्रेमचंद कथापरिचयही आवडला.
देवाचे आभार मानायला देवळात
देवाचे आभार मानायला देवळात जातो. देवळातून बाहेर पडतो तर सायकल गायब.
>>>
हा हा, हे भारी आहे. म्हणून प्रत्येक घरात एक तरी नास्तिक असावा. चपला सांभाळायला
धन्यवाद ललिता-प्रीति.
धन्यवाद ललिता-प्रीति.
ओपन-एन्डेड शेवट असला तरी तो आणखी छान करता येतो का विचार करून बघा. >> अनाहूत नाही. चांगला सल्ला आहे. काही शेवट सुचले.. पण शेवट करावासा नाही वाटला.
घरी जाऊन आईचा राग निवळे पर्यंत तिची थोडी बोलणी ऐकणं, हाच सामान्यपणे घडणारा पर्याय आहे.
पण कधीतरी खूप घाबरून, मुलं घरी जातच नाही.. किंवा चोरीचा पर्याय निवडतात.. तसं करणं नको वाटलं.
ऋन्मेऽऽष,
ऋन्मेऽऽष,
प्रत्येक घरात एक तरी नास्तिक असावा. चपला सांभाळायला .>> उपयोगी आहे.. हा.. हा..