झळा उन्हाच्या

Submitted by दत्तात्रय साळुंके on 2 April, 2022 - 00:32

झळा उन्हाच्या सोसण्या
दिला वसंता बहर
लूस कोवळी पालवी
सजे आंब्याचा मोहर

जरी कहर उन्हाचा
सजे ताटवा फुलांचा
गंध झाला रानभैरी
आला मनाला मोहर

धुंद फुलं, मधमाशी
मधुघट मधुकोषी
अशा भर उन्हातही
पेरल्यात सौख्य राशी

दिस माथ्यावर आला
पानोपानी पाखरझुला
फळ चाखता चाखता
कंठ गाता की रे झाला

अरे माणसा माणसा
बघ जरा डोळा भरूनी
होऊ नको रडवेसा
जन्म दु:खद म्हणूनी
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ भुईकमळ.... खूप दिवसांनी... प्रतिसादासाठी धन्यवाद...
@ अस्मिता... तुमचेही खूप आभार
@ हरचंद पालव...तुमचा प्रतिसादही विशेष आहे... खूप धन्यवाद

मला दोन कडवी, खरं म्हणजे खूप आवडली - अर्थाच्या दृष्टीने; पण यमक जुळावे म्हणून काही छोटे बदल सुचवू इच्छितो. लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, क्षमा असावी.
----------------------
जरी कहर उन्हाचा
सजे ताटवा फुलांचा
गंध झाला रानभैरी
आला मनाला मोहर

इथे खालील बदल

जरी कहर उन्हाचा
परि फुले सभोवार
गंध झाला रानभैरी
आला मनाला मोहर
--------------
आणि

दिस माथ्यावर आला
पानोपानी पाखरझुला
फळ चाखता चाखता
कंठ झाला की रे गाता

इथे तुमचेच शब्द थोडे इकडे-तिकडे करून -

दिस माथ्यावर आला
पानोपानी पाखरझुला
फळ चाखता चाखता
कंठ गाता की रे झाला

हरचंदजी धन्यवाद
चाखता आणि गाता हा यमक जुळतो तरी मला तुम्ही सुचवलेला बदल आवडला. त्याप्रमाणे दुरुस्त करतो.
परी फुले सभोवार आणि सजे ताटवा फुलांचा यात सजे ताटवा फुलांचा या ओळींची नजाकत परी फुले सभोवार या पेक्षा वेगळी आहे....

परी फुले सभोवार आणि सजे ताटवा फुलांचा यात सजे ताटवा फुलांचा या ओळींची नजाकत परी फुले सभोवार या पेक्षा वेगळी आहे >> सहमत. तुमची ओळ अर्थाच्या दृष्टीने जास्त छान आहे.

चाखता आणि गाता हा यमक जुळतो >> हो, तरी मी बदल सुचवला कारण तुमच्या बाकीच्या कवितेत यमक दुसर्‍या आणि चवथ्या ओळीत आहे. त्याला अनुसरून हे सुचवलं. बदल केल्याबद्दल मनापासून आभार.

>>>> तरी मी बदल सुचवला कारण तुमच्या बाकीच्या कवितेत यमक दुसर्‍या आणि चवथ्या ओळीत आहे. >>>
सहमत...
एकसमानता असणं कधींही चांगलं.