आसावरी काकडेंची कविता

Submitted by भारती.. on 24 March, 2022 - 13:00

आसावरी काकडेंची कविता

परमेश्वर , निसर्ग, स्त्रीत्व , अस्तित्व .. जगण्याच्या वाटेवर भूमिकांची आणि प्रश्नांची परिपक्वता सांभाळत ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचा कविता-प्रवास सुरू आहे. २००५ आणि २००६ मधले त्यांचे दोन कविता-संग्रह अनुक्रमे ‘रहाटाला पुन्हा गती दिलीय मी ‘’ आणि ‘स्त्री असण्याचा अर्थ’’ आणि अगदी अलिकडचा ‘भेटे नवी राई ‘’ , जे माझ्यासमोर आहेत, त्यापलिकडेही त्यांचा मोठा लेखनप्रपंच आहे. त्या सिद्धहस्त अनुवादिका आहेत, तत्त्वचिंतक , भाष्यकार आहेत.. त्यांचे ब्लॉग्स छायाचित्रांवरील कविता-कणिकांनी गजबजलेले आहेत.
ही बहुप्रसव प्रतिभा या तीन संग्रहांच्या आवारात थोडीशी अनुभवू या..
प्रथम ‘रहाटाला पुन्हा गती दिलीय मी ‘’.(सेतू प्रकाशन )
अशा खूप तऱ्हांनी व्यक्त होताना येणारं साचलेपण , निबरलेपण जलाशयाच्या रूपकातून सांगणाऱ्या या ओळी त्यांच्या ‘तो जलाशय ‘ या कवितेतून-
‘’अख्ख्या जगण्याचा,
जगावं लागण्याचा संताप
गाळला कुणी
त्याच्या काठावर बसून
तर थरथरतो तो
अंतर्बाह्य ढवळून निघतो..
पण लगेच काळाचे तंग पांघरूण
ओढून अंगावर
पडून राहातो शांत!
त्याच्या तळातून उगवलेली तरंगलय
सरसरून पोचेनाशी झालीय पृष्ठभागावर
..
की मलाच तसे वाटते आहे ?’’
जलाशय आणि जगण्याच्या आशयाचा प्रदीर्घ मागोवा घेताना येणारी क्लांतता शांततेत साठली आहे. वाट्याला आलेल्या काळाचे पांघरूण ‘तंग ‘ आहे , सीमित आहे याचीही सूक्ष्म नोंद आहे.
क्षीण झालेल्या क्षमतांना
हिस्टेरिक वाटतात
भोवतीचे हर्षोल्हास
हसणे खिदळणे ..सगळेच.

तरीही कवीला नेहमीच कवितेतून होणाऱ्या आशयाच्या साक्षात्काराची असोशी असते. कधीतरी मुहूर्त लागेल ही आशा असते.पण त्याची खात्री नसते. याउलट जनजीवनात आणि मंचीय कलाविष्कारात बऱ्यापैकी क्रमप्राप्त गोष्टी घडतात. मुहूर्त या कवितेत रस्त्यातला सिग्नल हिरवा होतो, रंगमंचावर तिसरी घंटा होते, नर्तिका तयारीत रहाते.. पण शब्दांच्या जगात ?

शब्दांच्या रिक्त ओंजळी पसरलेल्या
ओथंबलेला क्षण
बरसण्याच्या तयारीत
मुहूर्ताचे घटिकापात्र केव्हा बुडेल ?

आशयाचा शोध घेताना वारंवार शून्याच्या वेशीशी जाऊन थडकतो आपण.
कासावीस झाला जीव | तेव्हा उमगले सई | नसण्याला सुद्धा नाव| द्यावे लागतेच काही |
रडताना यावे जसे| भोळ्या डोळ्यातून पाणी | निराकाराला सावळे |रूप देऊ केले कोणी |
आस्तिकतेचा असा अलिप्त आलेख आसावरीताई रेखाटतात.
आसावरीताई अशी सतत विचारवलये उमटवत राहातात, त्यांचे शब्दांकन असोशीने करत राहातात. कविता ही त्यांची आत्मशोधाची साधना आहे. या टप्प्यावर तिला मुक्तछंद अधिक जवळचा आहे.तिला सूक्ष्म विराट असा द्वैतभाव नाही.
फुलाच्या उमलण्याची गती
आपल्याला समजत नाही
पृथ्वीच्या दुहेरी भ्रमणाची गतिही
आपल्याला जाणवत नाही

असे वैश्विक प्रश्न मनात स्पंदत असताना आसावरीताई आपले बाईपण, त्याची समकक्ष गहनता विसरत नाहीत. समकालीन स्वातंत्र्यातल्या आरक्षित लक्ष्मणरेषा त्या अधोरेखित करतात.
बाहेर पड़ आता
रेषेखालचे खंदक बुजवले आहेत
झालंच तर
आरक्षित केले आहेत
तुझ्यासाथी काही वॉर्ड्स
आता अड़खळू नकोस आत
स्वयंपाक झाला की बाहेर पड़ लगेच
वाटल्यास परत जा घरी सातच्या आत !
अशी मार्मिक टिप्पणी त्या करतात तेव्हा ते या काळावरचं भाष्यच असतं.

अतिशय नगण्य वाटणा-या क्षणात काही आकलनं साठलेली असतात.’’एक किडा ‘’ या कवितेत आसावरीताई औषधाच्या बाटलीवर फिरणा-या एका किड्याचंच निरीक्षण करून त्याच्या अस्तित्वभान रहित जगण्याची नोंद ठेवतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या कवीपणालाही कसलेच अडसर नाहीत हे जाणवतं.
‘’स्त्री असण्याचा अर्थ’’ (सेतू प्रकाशन ) या संग्रहात आसावरीताई एक वेगळा प्रयोग या कवीपणावर करतात. ‘’बोल माधवी’ हा डॉ.चंद्रप्रकाश देवलांच्या कवितांचा अनुवाद करताना तसंच ‘’मिळून सा-याजणी’’ या मासिकातून मिळालेली प्रेरणा अनुभवताना त्या सामान्य स्त्रीच्या अस्तित्वसंघर्षाच्या कहाण्यांबद्दल अधिक सजग झाल्या.या भावावस्थेचं हे शब्दांकन.मग त्यात आईवर केलेली दीर्घकविता येते, देखण्या मैत्रिणीचं देखणा संसार मांडताना हरवलेलं स्वत्व आहे, फसवणुकीतून आलेलं मातृत्त्व ताठ मानेने स्वीकारणारी आधुनिक कुमारीमाता आहे तशीच सवत्स परित्यक्ताही आहे. हताशा पचवून रोजचं उभं राहाणं ही जगण्याची रीत आहे.

तुकड्यात अशा चित्त विखुरते |तरीही सोसते रित्या खुणा
शोधक नजर चौफेर पाहते |नवे धुंडाळते मार्ग काही
अधांतरी होते मन थकलेले |तरी जुंपलेले कर्तव्याला ..
असा अगदी अनलंकृत ओवी छंद , या नव्या ‘’स्त्रियश्चरित्रां’’शी सुसंगत आहे .

चौकटी मोड़णं सोपं नसतं पण या खुल्या खेळात कधी उशिराने अनुकूल दानही पदरी पडू शकतं असाही कुण्या एकीचा अनुभव या कवितांमध्ये लखाखून जातो. कुणी असाच बिजवराशी समजुतीचा संसार मांडणारी प्रौढ़ कुमारिका .कितीतरी जीवनकथा .. -आणि त्यातून सिद्ध होणारे स्त्री-पुरुषाचे नवे सहजीवन .
तिला समजले मर्म सार्थ सहजीवनाचे
त्याला आवश्यक नाही फ़क्त बंधन लग्नाचे
हवी खोल समजूत आधी माणूसपणाची
दोघांमध्ये मुक्त हवा खेळायला हवी याची..
मग हे सहजीवन कधी दोन मैत्रिणींनी विचारपूर्वक स्वीकारलेलेही असू शकते , यावर आसावरीताई कविता-भाष्य करतात पण इथे त्या विशुद्ध मैत्रीच चितारत आहेत असं वाटतं. नात्याचे अधिक गुंतागुंतीचे पदर, जे नव-वास्तवाचा एक भाग आहेत, त्यात येत नाहीत.

सभोवतालचे हे स्त्रीजीवन आपल्यालाही दिसलेले असते पण आसावरीताई कवी-संवेदनांच्या भिंगातून ते न्याहाळतात, त्याची अ-पूर्वाई ठसवतात.

‘’भेटे नवी राई ‘’(सुखायन प्रकाशन )मध्ये भेटणा-या आसावरीताई तशा जुन्याच आहेत पण त्याच त्या नवोन्मेषी जिगिषेने जाणिवेच्या प्रत्येक पुढच्या टप्प्यावर काही प्रयोग करू पाहणा-या.आता हा पुढचा टप्पा अधिकाधिक उतरणीवरचा आहे.
प्रश्न निवलेत सारे |गुंता उरलेला नाही |कोलाहल मंदावला |डोळ्यांमध्ये अश्रू नाही -

-अशी अवस्था.आता अस्तित्वाच्या रिंगणाबाहेरचे रिंगण, तसेच रिंगणाआतलेही रिंगण दिसते आणि अजूनही काचतेही आहे पण
‘’यांच्या डोळ्यासमोर
यांना ओलांडून
बाहर पड़ेन मी एक दिवस
कुणाला कळणारही नाही ‘’ हे भान ठळकपणे आलं आहे.

या भानामुळे सततच्या आत्मसंवादाचा सूर आता काहीसा निभ्रांत झाला आहे.मर्यादांची जाणीव विलक्षण शांत करणारी आहे.
अता होउ दे बोलणे आतल्याशी |ज़रा बाजुला व्हा नको व्यर्थ माया
कुडी वृद्ध झालीय संपेल यात्रा| असे वेळ थोडाच गाडी सुटाया
याही संग्रहात’’नेक्स्ट’’सारखा हॉस्पिटलच्या वारीतला एखादा शरीर-शरण-अनुभव, ‘’ती एक भिल्लीण’’सारखी एखादी पौराणिक व्यक्तिरेखा, ‘’तो उभा आहे’’ सारखं एखादं क्षणचित्र , ‘’खोल आत काही हलले तर पत्र लिहावे ‘’ सारखी लाघव-गुंजन करणारी एखादी गझल या भोज्यांना ही कविता शिवते, पण पुन्हा पुन्हा एका पक्व समारोप-समेवर येते.
जवळ जवळ जाता शून्य हातात येते
अन मृगजळ सारे शेवटी जाण येते ..

या संग्रहात अनेक छंदोबद्ध वृत्तबद्ध आकृतिबंधांशी कवयित्री त्यांचा बाऊ न करता सहज खेळली आहे.मुक्त:छंद तर आहेच. काहीच परकं राहिलेलं नाही ही धारणा त्यातून अधोरेखित होते.
आयुष्यभर कवितेच्या माध्यमातून चाललेला शोध, लाभलेला बोध त्याच्या मर्यादेसहित विनम्र वृत्तीने पारदर्शीपणे इथे संपन्न झाला आहे.

-भारती..

Group content visibility: 
Use group defaults