विज्ञान कथा म्हणजे काय?

Submitted by केशवकूल on 21 March, 2022 - 23:13

संवाद सुबोध जावडेकरांशी
(यातील काही भाग )
प्रिया पाळंदे आणि
(प्रश्नांसाठी साहाय्य) - अस्चिग ह्यांनी सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक श्री सुबोध जावडेकरांची मायबोलीसाठी मुलाखत घेतली होती. माझ्याकडे ती फाईल आहे. पण माझ्याकडे लिंक नाहीये.
.ह्या मुलाखतीत विज्ञान कथा म्हणजे काय ह्यावर बराच उहापोह केला आहे.
तेव्हढाच भाग इथे पोस्ट केला आहे.लिंक असेल तर जरूर द्या.

सुबोध - थोडं-फार तसं म्हणता येईल, पण मला वाटतं तेवढंच पुरेसं नसतं. मुळात तुमची ती वृत्ती, आवड असायला लागते. शिक्षणाची-नोकरीची बॅकग्राऊंड होती, पण त्याचबरोबर मी आवडीने, शोधून-शोधून यासंबंधी सतत वाचत होतो हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
प्रिया - तुम्ही आत्ताच म्हणालात की मविपच्या कथास्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही लिहिते झालात. आज मराठीतले नावाजलेले किंवा भरपूर आणि दर्जेदार लेखन करणारे विज्ञानकथा लेखक जे आहेत त्या जवळपास सगळ्यांची सुरुवात या स्पर्धेच्या निमित्तानेच झाली ना?
सुबोध - हो, अगदी डॉ. नारळीकरांपासून ते निरंजन घाटे, डॉ. बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे वगैरे सगळ्या लेखकांची सुरुवात जवळपास तशीच झाली असं म्हणायला हरकत नाही.
प्रिया - डॉ. नारळीकरांसारखा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ इंग्लंडमधले संशोधन बंद करुन काही एक विचार करुन भारतात परत येतो आणि त्यानंतर थोड्या काळात कथेच्या रुपाने विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचं ठरवतो, त्या त्यांच्या विज्ञानकथेच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे? कारण सर्वसाधारण माणसाचा शालेय शिक्षणानंतर विज्ञानाशी तसा फारसा संबंध नसतो. मग विज्ञानाची गोडी लोकांना लागावी, त्यातल्या नव्या वाटांची त्यांना माहिती व्हावी यासाठी विज्ञानाची कडू गोळी कथेच्या गोड आवरणात सादर करणं हे त्या काळाचा विचार करता आणि आज विज्ञानकथा ज्या टप्प्यावर आहे त्या संदर्भात, अश्या दोन्ही भूमिकांतून विचार केला तर तुम्हाला स्वतःला त्याबद्दल काय वाटतं?
सुबोध - मला वाटतं त्यांच्या भूमिकेचा फायदा नक्कीच झाला. थोडा तोटाही झाला - कसा ते सांगतोच पुढे. नारळीकरांचं वेगळेपण काय होतं, त्यांच्या आधी खांबेटे, मोकाशी वगैरे लिहीत असत त्यापेक्षा? तर त्यांच्या कथा या स्वतंत्र होत्या. त्यांची कुठलीच कथा ही आधारित नाहीये. त्यामुळे त्याला आपोआप एक वेगळा दर्जा मिळाला. शिवाय नारळीकरांसारखा शास्त्रज्ञ हे लिहितोय याचा अर्थ या बालकथा किंवा अगदीच पोरकट प्रकार नाही हे वेगळं सांगायची गरजच पडली नाही. त्या लेखनाला आपसूकच प्रतिष्ठा मिळाली. नारळीकरांच्या कथांचा आणखी एक मला जाणवलेला विशेष भाग म्हणजे त्यांच्या कथा या भारतीय मानसिकतेवरच्या कथा आहेत. 'पुत्रवती भव।' किंवा 'धुमकेतू' सारखी कथा घ्या, भारतीय समाजमन कसा विचार करतं हे विज्ञानकथेत प्रथमच आलं. आणखी एक विशेष म्हणजे ते स्वतः शास्त्रज्ञ असल्यामुळे शास्त्रज्ञ कसा विचार करतो, हे ही त्यांच्या कथेतून दिसतं. या सगळ्या गोष्टींमुळे नारळीकरांच्या कथा या वेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या दर्जाच्या विज्ञानकथा आहेत असं मला वाटतं. या गोष्टी त्यांच्याआधीच्या लेखकांच्या लिखाणात जवळजवळ नव्हत्याच. त्या सरळसरळ दुसऱ्यांच्या कथांचा अनुवाद किंवा रुपांतर असत नाही तर ती मूळ कल्पना घेऊन नुसती नावं बदलून भारतीय केलेली असायची.
नारळीकरांच्या या सगळ्या वैशिष्टयांचा फायदा त्यांनाही झाला आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मराठी विज्ञानकथेला झाला. समीक्षकांचं लक्ष या प्रकाराकडे पहिल्यांदाच गेलं ते त्यांच्यामुळे. पूर्वी विज्ञानकथा ही त्यांच्या क्षितिजावरही नसायची, गूढकथा, रहस्यकथा असतात, त्यातलाच एक प्रकार विज्ञानकथा अशी साधारण मनोभावना असायची. वाचकांचं म्हणाल तर वाचकांना या कथाप्रकाराबद्दल कुतूहल निर्माण झालं. त्यातून कोणी विज्ञान शिकलं असेल असं मला वाटत नाही. पण कुतुहल निर्माण करण्याचं काम त्यांच्या कथांनी निश्चित केलं आणि ते खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. विज्ञान आणि विज्ञानकथा हा काय प्रकार आहे हे सर्वसामान्य वाचकाला बघावंसं वाटणं हे फार महत्त्वाचं साध्य त्यांच्या कथांनी साधलं.
तसाच तोटा थोडाफार झाला असंही मला वाटतं. एक म्हणजे, वाचकांची थोडी चुकीची समजूत झाली की विज्ञानकथा या विज्ञानाबद्दलच्या कथा आहेत. लेखकांचीही तशीच मनोधारणा झाली की विज्ञानकथा म्हणजे एक सिद्धांत घ्यायचा आणि तो कथारुपाने सादर करायचा. आणि मुख्य म्हणजे समीक्षकांनीही चुकीचे निकष लावायला सुरुवात केली. कारण विज्ञान शिकवण्यासाठी जर विज्ञानकथा आहे, तर मग अमुक एका कथेतून ते किती चांगल्या तर्हेवनी शिकवलं जातंय? त्यामुळे चांगली विज्ञानकथा कोणती, तर जी जास्त चांगल्या रितीने विज्ञान शिकवते ती चांगली विज्ञानकथा. पण हळूहळू लेखक या चौकटीतून बाहेर पडले आणि मग वाचकही आपोआप त्या समजुतीतून बाहेर पडले.
प्रिया - आता विज्ञानकथांच्या बाबतीत हळूहळू जो आग्रह धरला जातो की ती मुळात एक सशक्त कथा असली पाहिजे आणि डॉ. फोंडके जसं सांगतात तसं त्या कथेतलं विज्ञानाचं स्थान काय? तर त्यातलं विज्ञान काढून टाकलं तर ती कथा कोसळली पाहिजे, थोडक्यात तिचा आत्मा, त्यातलं नाट्य हे विज्ञानाधिष्ठीत असलं पाहिजे. तर मग नारळीकरांच्या सुरुवातीच्या कथा या नव्या निकषांवर उतरतात का?
सुबोध - त्यांच्या सगळ्याच कथा या निकषांवर उतरतात असं नाही म्हणता येणार - म्हणजे अश्या काही कथा आहेत ज्यांत भाव-भावनांचं नाट्य कमी असतं किंवा नैतिक पेच त्यात सापडत नाही. विशेषतः अगदी सुरुवातीच्या काळातील कथांच्या बाबतीत असं मला निश्चित वाटतं.
माझी स्वतःची विज्ञानकथेची व्याख्या अशी की विज्ञान आणि तंत्रज्ञान यातून जे विविध पेच माणसापुढे उभे राहतात - राहतील, त्यांना ती माणसं कशी सामोरी जातील त्याचा शोध घेणारी कथा म्हणजे विज्ञानकथा.
प्रिया - म्हणजे तुम्हाला त्यातून उत्तरं अपेक्षित आहेतच असं नाही.
सुबोध - नाही, अजिबातच नाही. तसं पाहिलं तर कुठलाच कथाकार अश्या प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही. पण प्रश्न उभे करायचे आणि मानवी नाट्य त्यातून रंगवायचं - एवढंच वाचकांपुढे ठेवायचं. अमुक एका प्रश्नाचं हे उत्तर असं कुठलाच कथाकार करु पाहणार नाही आणि श्रेष्ठ कथेचा तो निकषही नाही. अनिर्णायकता हाच श्रेष्ठ कथेचा निकष मानला जातो.
प्रिया - आणि नैतिकतेमधले बरेच पेच असे असतात की त्याला एकच असं उत्तर नसतंच. त्या परिस्थितीत, त्या व्यक्तीने आपापलं उत्तर शोधावं लागतं.
सुबोध - अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी म्हटलं की या बदलत्या परिस्थितीला माणसं कशी सामोरी जातात, त्याचा शोध घेणारी कथा, ती विज्ञानकथा. म्हणजे त्यात दोन्ही आलं की जे प्रश्न आहेत ते विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीने निर्माण झालेले प्रश्न आहेत - त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाली नाही किंवा नसती तर ते प्रश्नच उभे राहणार नाहीत, त्यामुळे त्यांचा सांगाडा हा विज्ञानाचाच आहे; पण ती कथा ही त्या माणसांची कथा आहे. त्या प्रश्नांना सामोरं जाण्याचा त्यांचा प्रवास त्या कथेतून पुढे येतो.
प्रिया - म्हणजे मग तुम्ही म्हणता की विज्ञानकथा म्हटल्यावर जो पारंपारिक अर्थ वाचकाच्या डोक्यात येतो त्याऐवजी विज्ञानकथा आणि ललित कथा यातला फरक हा फक्त जे नाट्य, जो प्रश्न कथेतून समोर येतो त्याच्या मुळात आहे. पुढे तो विषय कुठल्याही रुपाने फुलवला जाऊ शकतो.
सुबोध - बरोबर. माझा लेबलला विरोध नाही बरं का! किंबहुना विज्ञानकथा हे लेबल असावंच कारण ती इतर कथांपेक्षा वेगळी असतेच. तिचं स्वतःचं असं वैशिष्टय आहे, काही बलस्थानं आहेत, तश्या काही मर्यादाही आहेत. त्यामुळे या लेबलला माझा विरोध नाही - माझा विरोध आहे तो विज्ञानकथेवर 'विज्ञान शिकवायची' जबाबदारी टाकण्याला. कारण तसं केलं की मग तिचं कथा असणं हे दुय्यम ठरतं आणि विज्ञान हे कथेच्या पुढे येतं, तसं मला नकोय. जरी तिचा प्रकार विज्ञानकथा हा असला तरी ती विज्ञानाची कथा नको, ती माणसाचीच कथा असू दे.
प्रिया - पण एखादा लेखक एखादं विज्ञानातलं किंवा तंत्रज्ञानातलं एखादं तत्व डोळ्यासमोर ठेवून त्यावर कथा बांधतो, तेव्हा त्या तत्त्वाची, विषयाची चौकट आपोआपच त्या कथेभोवती निर्माण होत नाही का?
सुबोध - हो, तसं ते होतं आणि होणारच. पण मी स्वतः तसं काही डोक्यात घेऊन कथा लिहायला बसत नाही - म्हणजे अमुक एक समस्या आहे, ती कथारुपाने मांडू असं माझं स्वतःचं लेखन होत नाही. मला त्या समस्येबरोबरच त्याला सामोरी जाणारी माणसं, त्यांच्यापुढे पडणारे वेगळेच पेच हे सगळं एकत्रितपणे दिसतं, जाणवतं. त्यामुळे आपोआप त्याला एक एकसंधपणा येतो. त्यामुळे मला त्याची चौकट विज्ञानाची आहे असं वेगळं नाही काढता येणार.
प्रिया - म्हणजे गेल्या वर्षी जो तुमचा कथासंग्रह प्रकाशित झाला - 'पुढल्या हाका' - त्यात जशी वेगवेळ्या परिस्थितीतून जाणारी माणसं, त्यांच्या भावभावना, कधी अध्यात्म, कधी नैतिकता - हे सगळे विषय तुम्ही जेव्हा विज्ञानकथेच्या स्वरुपात मांडता, तेव्हा तुमच्या डोक्यात ती कथा रूप घेत असताना असं एकसंध रुप घेतच आकाराला येत असते.
सुबोध - हो, नैतिक पेच हा माझ्या कथेचा गाभा असतो असं म्हणायला हरकत नाही. माझा 'कुरुक्षेत्र' हा जो कथासंग्रह आहे, त्यातल्या कथा या फार तर विज्ञानाधिष्ठित कथा म्हणता येतील. पण तरी त्याही कथांमागची प्रेरणा ही तो पेच मांडणं हीच आहे. किंबहुना कुठेतरी तो नैतिक पेच दिसल्याशिवाय मी कथा लिहायलाच घेत नाही. थोडक्यात मला तश्याच प्रकारच्या कथा लिहीणं जमतं आणि आवडतंही. दुसऱ्या प्रकारे मला लिहिताच येणार नाही बहुधा. म्हटलं तर ती माझी मर्यादा आहे आणि म्हटलं तर बलस्थान. मुख्य म्हणजे मी जेव्हा म्हणतो की मी कथा लिहिली, तेव्हा मी तो पेच वाचकांपुढे मांडायचं, त्यांच्यासमोर एक प्रकारे आरसा धरायचं काम फक्त करतो. त्यातून कुणाला काही उत्तर मिळावं असा माझा हेतू नसतो आणि तसं रेडीमेड उत्तर मिळावं अशी अपेक्षाही मला चुकीची वाटते.
प्रिया - या अश्या प्रकारच्या ज्या विज्ञानकथा आहेत, किंवा आज वाचकाची विज्ञानकथेकडून जी अपेक्षा असते वा नवा लेखक जेव्हा प्रयत्न करु पाहतो की या नव्या दिशेनी जाणारी विज्ञानकथा मला जमावी, ती कथा एकदा लिहीली की तिच्या समीक्षणाचं काय? तसे समीक्षक आज मराठीत आहेत का? की जे विज्ञानकथेचं, त्यातलं विज्ञान आणि कथा या दोन्ही अंगांचं भान ठेवून समीक्षा करु शकतील?
सुबोध - प्रश्न अगदी टोकदार आहे, पण तुमच्या प्रश्नातच मला वाटतं तुम्ही उत्तरही दिलेलं आहे. जरा विस्तारानी बोलायचं, तर एक क्षणभर आपण त्यातला विज्ञानाचा भाग बाजूला ठेवूया. पण त्यातल्या कथाभागाचंही समीक्षण गंभीरपणे झालंय आजवर असं मला वाटत नाही. म्हणजे अगदी नारळीकरांच्या कथा जरी घेतल्या तरी त्यांची 'कथा' म्हणून समीक्षा नाही झालेली. आणि विज्ञान आणि त्यातला साहित्याचा भाग या दोन्हीचं समीक्षण करु शकणं ही तर फार पुढची पायरी झाली. आज ना उद्या परिस्थिती बदलेल अशी आपण फक्त आशा करु शकतो.
प्रिया - आजचा किंवा साहित्याचा समीक्षक त्यातल्या कथाभागाची समीक्षा एक वेळ करु शकेल, पण त्यातल्या विज्ञानाचं समीक्षण कोण करणार? म्हणजे त्यातलं विज्ञान हे अचूक किंवा संभाव्य आहे का हे ही तपासून बघायला हवंच ना?
सुबोध - प्रश्न अगदी बरोबर आहे, पण मला वाटतं आपण एक एक पायरी चढूया. आधी तिची कथा म्हणून तरी गांभिर्याने समीक्षा व्हायला लागू दे! कारण जर ती कथाच नसेल तर ती विज्ञानकथा असूच शकत नाही. त्यातल्या विज्ञानाच्या अचूकतेची जबाबदारी सध्यातरी लेखकावरच आहे. विज्ञान-कट्ट्याचा जो प्रयोग सुरू आहे, तिथे आपण एकमेकांच्या कथा वाचतो, सगळेचजण त्यावर आपलं मत मोकळेपणानी मांडतात, कदाचित या अश्या प्रयोगांतूनच उद्या काही घडेल. आणि मला वाटतं अचूकतेची अपेक्षा फक्त विज्ञानकथेकडूनच असते किंवा असावी असं नाही, कुठल्याही प्रकारचं लेखन असेल तरी त्यात अचूकता ही असलीच पाहिजे, ती लेखकाची जबाबदारी माझ्या मते असतेच. आणि ती तशी नसली तर जाणकार, चोखंदळ वाचकांच्या ते लक्षात येतंच. त्यामुळे अचूकता, वास्तवाचं भान हे असलंच पाहिजे, तरंच ती वाचकाला भावते. नाहीतर त्याची फँटसी होईल मग!
प्रिया - आपण समीक्षणाबद्दल बोलताना मघाशी तुम्ही निदर्शनाला आणून दिलंत तसं डॉ. नारळीकरांच्या कथांचंही कथा म्हणून गंभीरपणे समीक्षण झालंच नाही. तर असं होत असेल का की डॉ. नारळीकर, डॉ. फोंडके किंवा तुमच्यासारखे अगदी राज्यसरकारची पारितोषकं मिळालेले लेखक - यांची समीक्षा करताना नकळत दडपण येत असेल का?
सुबोध - तसं होता कामा नाही खरं तर! कारण ते मुळातच विज्ञानाच्या विरोधात जातं. विज्ञानाला हे असं दडपण मुळी मान्यच नाही. आईनस्टाईनसारख्या शास्त्रज्ञाचे जे सिद्धांत सगळ्या कसोट्यांना उतरले नाही ते बाजूला ठेवून दिले आणि विज्ञान पुढे गेलं. त्यामुळे तसं काही बंधन यायचं काही कारण नाही. आणि इतर साहित्याच्या बाबतीत जेव्हा समीक्षा होते तेव्हा लेखक कोण आहे किंवा किती मोठा आहे याचा विचार न करता परखडपणे समीक्षा होतेच. तेव्हा विज्ञानकथेला याबाबतीत वेगळी वागणूक देण्याचं काही कारण नाही आणि तशी अपेक्षाही नाही.
प्रिया - मग जोवर अशी समीक्षा गांभिर्याने होत नाही, तोवर तुमच्यासारखे नावाजलेले, या लेखनप्रकाराचं योग्य भान असलेले जे लेखक आहेत ते नवोदित लेखकांच्या कथांचं समीक्षण करु शकतील का? ती कदाचित रुढार्थाने समीक्षा असणार नाही, पण विज्ञानकथा वाचकाच्या आणि लेखकाच्या भूमिकेतून जी समीक्षा व्हायला हवी तशी तरी ती होऊ शकेल.
सुबोध - हो, तसं होऊ शकतं, म्हणजे असा प्रयोग करुन बघण्यासारखा आहे. म्हणजे वाचकाला निदान एक दिशा तरी मिळू शकेल की विज्ञानकथा कशी वाचावी, कसा त्याचा आनंद घ्यावा, हे करता येईल.
प्रिया - लेखकांच्या बाबतीत काय करता येईल? विज्ञान-कट्ट्यावर आमचा हात धरुन, वेळप्रसंगी कान पकडून आम्हाला मार्गदर्शन करायला तुम्ही सगळे आहात, पण कट्ट्यावर नसलेलेही लेखक आहेत, त्यांना हे मार्गदर्शन कसं करता येईल? त्यांच्या कथा वाचून तुमचं मत कुठेतरी नोंदवून त्याचा उपयोग होऊ शकेल.
सुबोध - हो, असे प्रयोग होतात ना! नुकताच एक प्रयोग असा 'कथाश्री' मासिकाने केला होता. त्यांनी एक कथास्पर्धा आयोजित केली, त्याला जवळपास साडेचारशे कथांचा प्रतिसाद मिळाला. त्यातल्या अठरा कथा त्यांनी निवडल्या, ज्या लेखकांत त्यांना चमक दिसली, ज्यांचं लेखन त्यांना आशादायी वाटलं असेल, त्या लेखकांना त्यांनी बोलवलं आणि महाराष्ट्रातल्या काही कथाकारांनाही बोलवलं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. त्यांत रंगनाथ पाठारे, राजन खान, मोनिका गजेंद्रगडकर होते, मी होतो, भारत सासणे होते - म्हणजे आजचे नावाजलेले कथाकार शक्यतो निवडले होते. तर तिथे प्रत्येकाने आपल्या तीन-तीन कथा वाचल्या आणि वन-ऑन-वन चर्चा झाल्या त्यावर. असे प्रयोग ठिकठिकाणी होतच असतात आणि व्हायलाच हवेत. आणि त्याचा उपयोग होतो असं मला वाटतं. असं म्हणतात की लेखक घडवता येत नाही, ते तसं खरंच आहे. मी तर असंही म्हणेन की लेखकच काय, कलाकारही असे घडवता येत नाहीत. पण तरी मार्गदर्शनाचा काही फायदा निश्चित होतो. म्हणजे चांगल्या कथेत काय टाळावं हे निश्चित सांगता येतं. त्यातली पात्रांची जी भाषा आहे, ती पात्रं बोलताहेत की पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे - या अश्या चुका सुरुवातीच्या काळात लेखकाच्या हातून घडून जातात. या अश्या गोष्टीत सुधारणा होऊ शकते - निदान एका मर्यादेपर्यंत तरी. अर्थात त्यासाठी मुळात काहीतरी असावं लागतं, मुळातच अंगी प्रतिभा नसली तर कितीही घासलं-पुसलं तरी काही होणार नाही.

============
प्रिया - आता परत थोडं विज्ञानकथा लेखनाकडे वळते. इंग्रजीमध्ये 'हार्ड सायन्स फिक्शन' म्हणून जो प्रकार आहे, तो मराठीत जवळपास नाहीच सापडत.
सुबोध - हो, खरंय. हार्ड सायन्स फिक्शन हा खूप अवघड प्रकार आहे. लिहायलाही खूप अवघड आहे, आणि बुद्धीगम्य आहे तो. त्यामुळे तशी कथा वाचताना कोडी सोडवताना जसा आनंद मिळतो ना, तसा आनंद मिळतो. त्यामुळे त्याचे चाहते तसे कमीच असतात. अगदी इंग्रजीतही पाहिलं तर एकूण वाचकांपैकी विज्ञानकथांचा चाहता किती असेल? माझा एक अंदाज फारतर ५ ते १० टक्के. आणि त्यातही हार्ड सायन्स फिक्शनचे रसिक संख्येने आणखीच कमी असतील. आणि ती कथा सगळ्यांनाच आवडावी अशी अपेक्षाही नाही धरता येणार.
प्रिया - मागे मी अॅसिमॉव्हच्या एका मुलाखतीत वाचलं होतं की 'हार्ड सायन्स फिक्शन मध्ये त्यातल्या कथेने थोडं दुय्यम स्थान घेतलं तरी चालेल, त्यातलं विज्ञान हे जास्त प्रकर्षाने पुढे यायला पाहिजे.' आत्तापर्यंत विज्ञानकथा कशी असावी याबद्दल जे आपण बोललो त्याच्याशी हे मत फारकत घेतं असं वाटतं का?
सुबोध - मला वाटतं, तसं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की हार्ड सायन्स फिक्शन आणि सॉफ्ट सायन्स फिक्शन असे दोन गट नाही करता येत. किंबहुना मी तर असं म्हणेन की फँटसी ते हार्ड सायन्स फिक्शन असा मोठा पट्टा आहे. म्हणजे फँटसीमध्ये काहीही होऊ शकतं आणि दुसऱ्या टोकाला तुम्ही जास्तीत जास्त तर्कशुद्ध असं लिहायचा प्रयत्न करत असता. या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी सॉफ्ट सायन्स फिक्शन येते. त्यात तर्कशुद्ध, निख्खळ विज्ञानापासून तुम्ही किती दूर जाता यावर तुमची कथा या दोन टोकांमध्ये कुठे बसते ते ठरतं आणि तुम्ही ते स्वातंत्र्य फारच घेतलंत तर ती फँटसीकडे झुकायला लागते आणि मग ती विज्ञानकथा उरत नाही. आता आणखी पुढे जाऊन तुम्ही फँटसीची व्याख्या काय करता यावर बरंच अवलंबून आहे. आज जे घडत नाही ती फँटसी असं जर तुम्ही म्हणालात तर विज्ञानकथा - अगदी सॉफ्ट सायन्स फिक्शनही त्यात मोडतील. पण सायन्स फिक्शन आणि फँटसीमध्ये फरक असा की आज जरी ते घडलं नसलं तरी उद्या घडू शकेल, निदान ते अशक्य नाही असं असलं की आपण त्याला सायन्स फिक्शन म्हणतो.
प्रिया - म्हणजे त्या त्या काळात मान्यताप्राप्त विज्ञान आहे त्यात कथेतलं विज्ञान बसायला पाहिजे का?
सुबोध - अगदी तसंच हवं असं नाही, थोडं पुढे जाऊन आजच्या विज्ञानावरुन पुढचा वेध घेतला असला तरी चालेल. पण त्याच्याशी विरोधात असलेलं असं काही असता कामा नये.
प्रिया - म्हणजे कथेत न्यूटनचे तिन्ही नियम मोडीत काढले…
सुबोध - तर ते नाही चालणार, मग ती फँटसी होईल.
प्रिया - तुम्ही हे म्हणालात की विज्ञानाचे नियम पाळून थोडा पुढचा वेध कथेने घेतला तरी योग्य आहे. त्यावरुन असं मनात आलं, की तुम्ही स्वतः ज्या प्रकारच्या विज्ञानकथा लिहिता, तिथे कधी कधी असा भविष्याचा वेध घेतला तर तुम्ही मांडू इच्छित असलेला पेच जास्त ठळकपणे पुढे यायला मदत होते का?
सुबोध - हो, निश्चितच. कारण आज जो प्रश्न लहानसा वाटू शकतो, तो पुढे जाऊन विज्ञानाची प्रगती अशीच राहिली तर मोठा नैतिक पेच आपल्यापुढे उभा करु शकतो. हे विज्ञानकथेचं एक बलस्थानच आहे की आपण असा पुढचा वेध घेऊ शकतो, तेही शक्यतेच्या मर्यादेत राहून. आणि त्याचा उपयोग करुन माणूस त्या परिस्थितीत कसा वागू शकेल हे मांडता आलं तर वाचकाला क्षणभर का होईना थांबून विचार करणं भाग पडतं की आपला समाज किंवा आपल्यासारखी कोणी व्यक्ती - कदाचित आपणच - कुठपर्यंत जाऊ शकतो.

सुबोध जावडेकरांशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, चिऊ-काऊ किंवा श्रीखंडाचे बोट - ही मुद्दाम टोकाची उदाहरणं दिली माझा मुद्दा पटवायला. ते वाचताना गंमत आली तरी मुद्दा मी खरंच मनापासून मांडला आहे.

किशोरचा खजाना दिल्याबद्दल धन्यवाद.
श्रीखंडाचे बोट काय कुठल्याच कथा लिंक ऊघडत नाहीये. मासिक ऊघडून चाळायला हवे..

श्रीखंडाचे बोट मी नाइंटीजच्या दशकात वाचली होती किशोर दिवाळी अंकात. ती कथा एवढी जुनी आहे हे माहीत नव्हतं. त्या धाग्यावर १९७५ की कायतरी आहे! पुनःप्रकाशित झाली असावी.

हल्ली किशोर असते का ?

एक वयम म्हणून जाहिरात दिसते , त्याचा पेटर्न मला किशोरसारखा दिसला

किशोरचे जुने अंक इथे मिळतील
https://kishor.balbharati.in/Archives/Index.aspx
ऑगस्ट् १९७५ इथे मिळेल.
https://kishor.balbharati.in/Archives/include/pdf/1975_08.pdf
pdf करताना थोडी गडबड झाली आहे. पण
श्रीखंडाचे बोट ही कथा मासिकाच्या शेवटी मिळेल

मस्त चर्चा सुरु आहे... सर्व पदार्थ अणु रेणू पासून असतात म्हणून प्रत्येक कथा विज्ञान कथा असा एक अँगल मारता येतो...

श्रीखंडाचे बोट फूड सायन्स कथा.. लोल ...

बादवे - वावे धन्यवाद .. तुम्हाला ते दिवा चिन्ह दिसले Happy

बोभाटा- चिल... धागे क्लीन करणे ऍडमिन यांचे कामच आहे... त्यात लेखकाला कशाला लाज वाटली पाहिजे...
हा चांगला विषय होऊ शकतो धाग्याचा... चर्चा झालीच पाहिजे...
कॉफी पिऊन येतोच...

केशवकूल ,
तुम्ही इथे मुलाखत दिलीत याबद्दल धन्यवाद.
मुलाखत देण्यात चूक किंवा सुबोधसरांची मतं चूक असं काहीही म्हणायचं नाही.
शीर्षक 'विज्ञान कथा म्हणजे काय' एवढ्यावर मीही माझी मतं दिली.
विज्ञान कथा यावर जावडेकरांची मुलाखत म्हटलं तर माझा प्रतिसाद अवांतर ठरतो.
यापुढे काळजी घेईन.

Srd
लेखाच्या विषयाला धरून नसलेले प्रतिसाद वाचण्यात वेळ वाया जातो आहे.>>>
ह्या बद्दल मी बोलत होतो.

Pages