पळून गेलेले शरीर -2

Submitted by केशवकूल on 21 March, 2022 - 06:31

“ती नोट मी येताना माझ्याबरोबर आणली नाहीये. तुम्हीच सांगा कशी आणणार? पण वाचून वाचून तोंड पाठ झाली आहे. म्हणून दाखवू?”
“अर्थातच! हुशार डिटेक्टीव कुठल्याही दुव्याकडे दुर्लक्ष करत नसतो. असे लहान सहान दुवे सांधून रहस्याचे जीग्सा पझल सुटत असते.”
“पण त्या आधी एक सैविधानिक इशारा. माझ्या शरीराने व्यक्त केलेल्या मतांशी मी सहमत असेलच असे नाही. आता सांगतो ती नोट काय होती.

'प्रिय मूर्खशिरोमणी
मी तुझ्या नीरस आणि कंटाळवाण्या जीवनशैलीला विटलो आहे. तू आणि तुझे मन! मी तरूणआहे, दिसायला बऱ्यापैकी आहे, जीवनाचा उपभोग घेण्यासाठी उत्सुक आहे. इतर शरीरांप्रमाणे मलाही कधीतरी ‘प्यावी’ असे वाटत नाही का? बकरीचे दूध पिऊन पिऊन कंटाळा येत असावा असे तुला वाटत नाही का? दूध तर दूध पण किमानपक्षी गाईचे तरी असावे कि नाही? आजूबाजूला बघतो तर इतर सर्व शरीरे छान छान ड्रेस करून पोरींवर इम्प्रेशन मारण्यासाठी सज्ज होऊन संध्याकाळी बागेत चकरा मारत असतात. आणि मी मात्र नामस्मरणात दंग होतो. तुला वाटत नाही की मला टॅक्सीमध्ये ललनांसोबत फिरायला आवडत असेल? तुला समजत नाही का कि मला सिगारेट, दारू, डान्स, तंदुरी चिकन खायला आवडेल? तुझ्या त्या शापित मनाकडे जितके लक्ष देतोस तेव्हढेच लक्ष माझ्याकडे द्यायला पाहिजेस? मला पण भावना आहेत? आयला -सॉरी- भावनांचा उद्रेक झाला की तोंडातून शिवी बाहेर पडणार की जात्यावरच्या ओव्या?.
ता. क. माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. '''
रामरावांना शरीराने केलेल्या तक्रारीत काही वावगे वाटले नाही. त्यांनी डोळे मिटून विचारात गढून गेल्याचे नाटक केले. अखेर त्यांनी डोळे आणि तोंड उघडले. “सराफ साहेब, तुम्ही तुमच्या शरीरावर अन्याय करत आहात अस तुम्हाला वाटत नाही?”
“पण मला ध्यान धारणा शिकवणारे गुरुजी, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी... “
“त्या गुरुजींना आपण थोडा वेळ विसरुया, तुम्हाला तुमचे शरीर परत पाहिजे आहे कि नको?”
रामरावांनी जोरात विचारले.
“अर्थातच! शरीर परत पाहिजे म्हणून तर मी इथे आलो आहे."
“तर मग, मिस्टर सराफ, मी काय सांगतोय ते ऐका. हे विपश्यना वगैरेचे फ्याड डोक्यातून काढून टाका. त्याने तुमची बॉडी परत येणार नाहीये. मी सांगतो तस वागलात तर थोडीफार आशा आहे.”
“तुम्ही माझी बॉडी परत आणू शकाल अशी तुमची खात्री आहे?” आवाजाने दुःखी आवाजाने विचारले.
रामरावांनी पेरी मॅसन स्टाइल त्याला उत्तर दिले, “हे पहा सराफ या बाबतीत मी तुम्हाला खोटी आश्वासने देणार नाहीये. ह्या बरोबर हे ही सांगतो की ह्या केसचा मी शेवटपर्यंत पाठपुरावा करेन. मला सांगा तुमचे शरीर कुठे असेल.काही अंदाज?”
“नाही, मला अजिबात कल्पना नाही.”
“परवा इल्ले. तुम्ही आता घरी जा, आणि आराम करा. तुमच्या डोक्यातल्या समाधि साधनाच्या कल्पनांना फाटा द्या अगदी केराची टोपली दाखवा. तो पर्यंत मी तुमची बॉडी शोधतो. पत्ता लागला कि लगेच तुम्हाला कॉल करेन. निश्चिंत रहा.”
“प्लीज, रामराव.” आवाज रडलेल्या आवाजात बोलला.
“चलो, गुड नाईट,” रामरावांनी त्याला जवळ जवळ बाहेर काढले.
“तुम्ही गेलात?” रामरावांनी विचारले.
त्यांना उत्तर मिळाले नाही. म्हणजे आवाज गेला होता.
आवाज ऑफिसच्या बंद दरवाज्यातून बाहेर कसा गेला हे त्याचे त्यालाच माहित!
रामरावांनी ओळखीच्या दोन तीन खबरींना फोन लावले. कुणालाही काम नव्हते. सगळे हातावर हात ठेऊन रिकामे बसले होते. पण रामरावांसाठी काम करण्यात कुणालाही उत्साह नव्हता. कारण रामरावांची सध्याची अवस्था मार्केट मध्ये माहित होती. त्यांची खात्री पटवताना रामरावांना थोडे कष्ट पडले पण शेवटी ते राजी झाले. (बिचारे ते तरी काय करणार. गाजराची पुंगी. वाजली तर वाजली, नाहीतर नाही.) रामरावांनी त्यांना काम सांगितले. शहर धुंडाळून अनिल सराफला शोधून काढायचे. त्याची “बॉडी” असे शब्द वापरले नाहीत नाहीतर ते बिथरून गेले असते. फाईव स्टार हॉटेल पासून ताडी माडी गावठीच्या गुत्त्यांपर्यंत कुठेही तो असू शकेल अशी टिप ही दिली.
रामरावांच्या खिशात पैसे खुळखुळत असल्याने त्यांना मोठ्या हॉटेलात जाऊन चापून जेवण्याची इच्छा झाली असल्यास नवल ते काय? शिवाय बिल सराफच्या नावावर फाडायची सोय होतीच “इनिशिअल एक्सपेन्सेस”! थोडे खाणे पिणे झाल्यावर रामरावांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली.
त्यांनी रोझीला फोन लावला.
रोझी दिसायला अत्यंत सुंदर तरुणी होती. केवळ दिसायला सुंदर नव्हती तर बुद्धीनेही सुपर होती. रामरावांच्या डोक्यातल्या प्लानला तीच न्याय देऊ शकणार होती. रामराम आणि ती एकाच वेळी महान डिटेक्टीव गुरुनाथकडे उमेदवारी करत होते. तिला आपली “पार्टनर” बनवण्याची रामरावांची इच्छा होती पण तिला डायरेक्ट विच्रायचे धैर्य त्यांच्यात नव्हते.
रामरावांनी रोझीला फोन केला.
“माय डिअर रामराव, आज म्या गरीबाची कशी काय आठवण झाली?” रोझीचा आवाज ऐकून रामरावांना अनामिक आनंद झाला. अंगावरून कुणीतरी मोरपीस फिरवत आहे अशी भावना झाली. पण हा बिझिनेस कॉल आहे ह्याची जाणीव होऊन त्यांनी स्वतःला सावरले. कंट्रोल रामराव, कंट्रोल युअरसेल्फ!
“काय चाललय, कस चाललय? माझ्याशी बोलायला वेळ आहे का?”
“अरे रामराव, मी थोडी बिझी होते. माझा कुत्रा सिम्बा आहे न,त्याला ट्रेन करायला शांताराम मानकापे नावाचा डॉग ट्रेनर ठेवला आहे. त्याला झाडत होते. माझ्या कुत्र्याला शेकहॅंड कर अस सांगितले तर तो भो भो करून अंगावर येतो. हे काय ट्रेनिंग झाले? ते जाऊ देत. तू सांग. तू कसा आहेस?” रोझी झपाझप बोलत गेली.
“रोझी, शांताराम मानकापे? . ते जाऊ दे. एक काम आहे. केवळ तूच करू शकशील असे.” रामराव मस्का मारत म्हणाले.
“हे बघ डायव्होर्स वगैरेची केस असेल तर मला इंटरेस्ट नाही. आणि पैश्याचे काय?”
रामरावांना थोडा राग आला. स्वतःला सावरुन ते म्हणाले, “पैशाची काळजी करू नकोस.”
रामरावांनी तिला केस समजावून सांगितली. तिला काय नाटक करायचे आहे त्याची कल्पना दिली.
बरेच काम झाले होते. रामरावांनी कित्येक दिवसानंतर सुखाची झोप घेतली.

रात्री नंबर १ खबरीचा--त्याचे नाव होते नानू काळुंद्रे--फोन आला. बातमी उत्साहवर्धक होती.
“डिटेक्टीव साहब, सापडला तुमचा सराफ. या इथे ‘ला धमाल’ हॉटेलात नटमोगऱ्यांवर पैसे उधळत आहे. लवकर या आणि त्याला तुमच्या ताब्यात घ्या. बाय द बाय येताना माझा मेहेनताना आणायला विसरू नका.”
रामरावांनी सराफच्या आवाजाला फोन केला आणि ‘ला धमाल’ हॉटेलात यायला सांगितले.
रामराव हॉटेलात पोहोचले बघतात तर काय, सराफची बॉडी दोन पेंटेड सेंटेड छमकछल्लोंच्या गराड्यात होती. दूर एका टेबलापाशी रामरावांचा खबरी नानू काळुंद्रे बसला होता. रामरावांनी जेव्हा कॅश देऊन त्याचा हिशेब चुकता केला तेव्हा त्याचा चेहरा उजळला.
“आणि माझे बिल तर तुम्ही द्यालच.”
“हो हो काळजी करू नकोस.” खबरीने एक कडक सॅल्यूट ठोकला आणि चालता झाला.
रामराव आवाजाची वाट बघत बसले.
“पी.रामराव बघता आहात न तुम्ही? पहा तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी पहा. काय फाजिलपणा चालला आहे तो. अरेरे काय हा माझ्या शरीराचा अधःपात.” आवाज विव्हळत बोलला.
“शू मोठ्याने बोलू नका. सावज सावध होईल. मला परिस्थिती हाताळू द्या.”
मी पुढे गेलो.
“मिस्टर सराफ, मला आपल्याशी काही बोलायचय.” सराफने प्रथम माझ्याकडे साफ दुर्लक्ष केले. मी घसा खाकरून पुन्हा त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
“कोण तुम्ही. घसा साफ करायचा असेल तर तिकडे वॉश बेसिन आहे. तिकडे जा.”
“मी तुमच्या जीवश्च कंठश्च मित्राचा मित्र आहे. तुमच्यात आणि तुमच्या मित्रांत गैरसमजनिर्माण झाले आहेत. त्या बद्दल मला थोडं बोलायचं होतं.”
“माझा जीवश्च कंठश्च मित्र? असा कोणी नाही.”
“आहे, तुमचे मन, तुमचे व्यक्तिमत्व! तुमच्या शरीरावर त्याचा हक्क आहे. तुम्ही त्याला सोडून पळून गेलात. त्याला आपली चूक उमगली आहे. ते आता सुधारले आहेत. त्यांना चार चौघांसारखे व्हायचे आहे. मी त्याच्या वतीने रदबदली करायला आलो आहे.”
हे ऐकून सराफचा चेहरा रागाने लालीलाल झाला. “हे पहा, मला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. मी त्याला नोट लिहिली होती. ती तुम्ही वाचली असणार. त्यात जे मी लिहिले आहे त्यावर मी ठाम आहे. माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका असं लिहिले असतानाही तुम्ही आलात. आता इथून निघा नाहीतर मी सिक्युरिटीला बोलावीन. उगीच शोभा होईल.”
रामरावांनी तेथून काढता पाय घेतला. हा राउंड आपण हरलो आहे याची जाणीव त्यांना झाली.
==============================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमश: आहे का?
बालसाहित्यात असल्याने नजरेस पडत नाही धागा चटकन..