हरवलेले गवसेल काय? अंतिम

Submitted by संजय पाटिल on 15 March, 2022 - 08:20

चाचांचे मनोगत मागील भागापासून पुढे सुरू....

वेड्या वाकड्या झालेल्या बांगड्या हातात खेळवत खिडकीतून बाहेर शून्यात नजर लावून विचार करत बसलो होतो. कामगार काम उरकून निघून गेले होते. बेगम खाना बनवण्यात व्यस्त होती. कुणाच्या असतील बरं? कामगारानां खोदून खोदून विचारलं तरी सांगता येईन की नेमका कुठला कापूस किंवा कुठल्या गादीतून ह्या आल्या असतील. ज्याचा माल त्याला पोहोचवल्या शिवाय मला चैन पडणार नव्हती.

" चलो, खाना खाके सो जावो. सुबह को देखेंगे क्या करना है इसका." माझ्या हातातून बांगड्या अलगद काढून घेत अलमारीत ठेवत बेगम बोलली.

" आणि ज्याच्या असतील त्याला पण काळजी असेलच ना? येईल विचारत ज्याच्या असतील तो, तुम्ही जास्त परेशान नका होऊ." जेवण वाढत वाढत बेगम बोलली. " बेटा, आजा खाना लगाया है."

तिघे जेवत होतो पण बोलत कोणीच नव्हतं. त्यांच्या पण डोक्यात माझ्या सारखेच विचार चालू असणार हे मी ओळखून होतो. एक तर चार पाच जणांच्या गाद्या होत्या. समजा, एखाद्याला जाऊन विचारलं आणि त्यानं होय, आमच्याच आहेत म्हणून ठेवून घेतल्या, आणि त्याच्या नसल्या तर? आणि नंतर ज्याच्या आहेत तो आला आणि आमच्या बांगड्या अश्या कश्या कुणाला पण देता? म्हणू लागला तर? समजा बेगम म्हणते तसं ज्याच्या असतील तो येईल म्हणून बसलो, आणि नंतर मिळाल्या होत्या तर आधीच का सांगितलं नाही? हडपायचा विचार होता वाटतं? असं चार लोकात बोलला तर? जिंदगीभर नेक काम केलं. प्रामाणिकपणे काम करून पोट भरलं. आता या वयात असा दाग अंगावर घ्यायची वेळ तर येणार नाही ना?

जेवण आवरून अंथरुणात पडलो. पण झोप काही येत नव्हती. हजार विचार डोक्यात गर्दी करत होते. सारखं या कुशीवरून त्या कुशीवर चाललं होतं. बेगम पण बहुतेक जागीच असणार. तिला पण कशी झोप लागणार कुणा अनजान माणसाचा किमती ऐवज असा आपल्या घरात असताना?

" देखो, आपने कोइ चोरी नही की है, जीसकी चीज है उनको परवाह नही, अश्या साडेतीन- चार तोळ्यांच्या पाटल्या कोणी गादीत ठेवतं काय? आणी ठेवल्या तर ठेवल्या, पण गादी देताना काढून नाही घ्यायच्या? सो जावो अभी. कल देखेंगे." बेगम बोलली.

" अरे तुम सोइ नही अभीतक? " मी विचारलं
" नही. नींद नही आ रही. आप भी तो सोये नही?"
" बेगम, मी काय म्हणतो, आपण सरळ पोलिसां कडे नेऊन देऊ त्या बांगड्या, म्हणजे आपली जबाबदारी संपली, ते बघतील कोणाच्या असतील ते."

"ठीक आहे बघू सकाळी काय ते. अभी सो जाओ." असं म्हणत तिनं कूस बदलली. मी पण झोपायचा प्रयत्न करू लागलो.

सकाळी उठल्यावर पोलिसांकडे जातो बोललो तर बेगम म्हणाली की " थांबा जरा, लगेच पोलिस नको. बघू एखादा दिवस, मग ठरवू काय ते." आता ही असं म्हणाल्यावर मी काय करणार? बाकी बेगम माझ्यापेक्षा फार हुशार! व्यवहार तिला चांगला कळायचा. त्यामुळे कारखान्याचे सगळे पैशांचे व्यवहार तीच बघायची. कामगाराचे पगार, त्यांची हजेरी, अ‍ॅड्व्हांस, सगळं तीच्या डोक्यात असायचं. गादी बघून सांगायची मजुरी किती, कापूस किती भरेल ते. आता त्या बांगड्या नुसत्या हातात तोलून साडेतीन- चार तोळ्याच्या आहेत हे बोलली होती ती. हां आता बायकांना या गोष्टींचं ज्ञान उपजतच असतं का काय कोण जाणे.

तो दिवस माझा फारच बेचैनीत गेला. सारखा कोणी येतोय का चौकशी करत, वाट बघत होतो. कामगार पण एक दोनदा बोलले " चाचा, काय कुनाचा ऐवज हाय काय कळलं?"

" नाही रे बाबा. कधी एकदा ज्याची चीज त्याच्या ताब्यात देतो असं झालंय. पण कोणी येतच नाही विचारत. किती वेळ दुसर्‍यांची अमानत सांभाळत बसू?" वैतागून बोललो.

त्या दिवशी कोणीच आलं नाही.

पुन्हा बेचैन रात, तीच बेचैन नींद नशिबी आली. दुसर्‍या दिवशी सकाळी, आज दुपार पर्यंत वाट बघून पोलिसात जाणार असं सगळ्यांसमोर जाहीर करून टाकलं. बेगमनं मना केलं!

आता कामगारांत पण कुजबूज चालू झाली होती. दुपारी जेवायला सगळे एकत्रच बसायचे. जेवत असताना बायका आणि पुरुष मिळून सारखे आमच्या कडे बघत हलक्या आवाजात काहीतरी बोलत असलेले मला जाणवलं. बहुतेक त्यांना वाटत असावं की आता कोण आलं नाही तर त्या बांगड्या यांनी पचवल्या.

हे बघून मी पुन्हा काळजीत पडलो. सरळ उठून त्यांच्याजवळ गेलो. " का रे बाबांनो, माझ्या नियत वर शक करताय काय? काय बोलणं चाललंय? " मी त्यांना विचारून टाकलं.

" आवो काय बी काय बोलताय चाचा? आमी तसलं काय बी बोलत नव्हतो. जीभ झडनार नाय का आमची तुमच्यावर शक केलातर? तुमास्नी काय आज वळखतो व्हय आमी? " एक स्त्री कामगार बोलली.
" मग काय कुजबूज चालू आहे?"
" न्हाई, म्हणलं दोन दीस झालं, पर आजून कसं काय कोण ईना? काय चोरीचा बीरीचा माल कुणी दाबून ठिवला आसल, आनि आता ईचारायला कसं जायाचं? आसं तर नसल? हेच बोलत हुतो आमी."

या त्यांच्या बोलण्याने मी पुन्हा काळजीत पडलो. खरंच असं पण असू शकतं. आता मात्र लवकरात लवकर पोलिसांकडेच जावं हेच बरं. मी आत गेलो आणि बेगमला कामगारांबरोबर झालेलं बोलणं सांगितलं. ती पण विचारात पडली. " आज शाम तक देखेंगे, नही तो सुबह उठतेही चले जाना." ती गंभीर होत बोलली.

संध्याकाळी साडे पाच सहा च्या सुमारास एक तरुण जोडपं दबकत दबकत, इकडे तिकडे बघत आत आलं.

कोण आहे बघायला मी पुढे झालो. " या, काय पाहिजे?" मी विचारलं.
" मालक तुमीच काय?" तरुणानं विचारलं.
" हो मीच. बोला काय खिदमत करू?" मी विचारलं
" नाही, जरा बोलायचं होतं तुमच्याशी"
"मग बोला की"
" जरा खाजगी होतं" मला थोडाफार अंदाज आला. म्हटलं बहुतेक बांगड्यांचा मालक सापडला.
" बरं, या आत बसूया" मी त्यांना घेऊन आत आलो.
" बोला, काय बोलायचं होतं? " मी म्हणालो. बेगम पण जवळ येऊन उभी राहिली.
"तुम्हाला काय बांगड्या सापडलेत काय गादीत?" तरुण.
" आमच्याच आहेत त्या. परवा जुनी गादी तुमचा माणूस घेऊन आला. त्यांतून आल्या आहेत त्या." त्याच्या सोबतची तरुणी प्रथमच बोलली. माझा मनावरचे ओझे क्षणांत उतरल्यासारखे झाले.

मी बेगमकडे बघून 'घेऊन ये बांगड्या' असा इशारा केला. पण बेगम त्या लोकांकडे बारीक नजरेने बघत होती. तिने मला नजरेनेच ' थांबा जरा' असं बजावलं.

" बेटा किसके कंगन है?" असं त्या मुलीला विचारलं.
" मेरे ही है. और किसके होंगे?" त्या मुलीने उलट विचारलं.
" कैसे है जरा ठीकसे बताना?"
" आता बांगड्या सारख्या बांगड्या होत्या. ठीकसे काय बोलू?" तिनं चिडत विचारलं.
" नही, मतलब किती वजनाच्या होत्या? उसका डिझाइन कैसा है? कुछ तो बोलो?"
आता त्यांच्या चेहर्‍यावर चलबिचल दिसायला लागली. मला पण थोडा संशय येऊ लागला. " बेगम, तुम बच्चोको बीनावजह डरा रही हो. जरा शांतीसे पुछो. बोलो बेटा, तुम्हारे कंगन है तो घबराते क्यू हो? बतादो ना?" मी बोललो.

" तो, वो तीन तोळेके थे, और...." बस यापुढे काय ती बोलेना.
" तुम्हारे माँ ने दीये थे क्या बिलवर?" बेगमच्या या प्रश्नावर मी पण चमकून तिच्याकडे बघू लागलो. परवा तर पाटल्या म्हणत होती. आता बिलवर म्हणाली.
" हां चाची, शादीमे मेरी माँ ने दिये थे." नक्कीच खोटं बोलत होती ती.
" अच्छा! सुनीयेजी, वो बाजूवाली गलीमे आपके दोस्त है ना? वो पुलिसवाले?, उनको बुलाके लाना, उनके सामने इनके कंगन इनको दे देंगे." माझ्याकडे बघत बेगम बोलली. मी काय ते समजलो. हे नक्कीच कोणीतरी बनावट लोक होते.
" अभी बुलाता हूं" मी असे म्हणे पर्यंत " नाही, राहू दे आम्ही परत येतो." असं बोलत ते दोघे उठून उभे राहिले.
" रुको, किधर जाते हो? " असं म्हणे पर्यंत जे दोघे उठून पळत सुटले ते मी बाहेर येऊन " अरे रोको रोको उन्हे" म्हणेपर्यंत गेट च्या बाहेर पडून दिसेनासे झाले होते.

कामगार पण काय झालं बघायला उठून गेट्च्या बाहेर आले. मी तिघांना तीन दिशेला पिटाळलं. म्हटलं बघा कुठे दिसतात काय.

१५-२० मिनटात तिघे हात हालवतं परत आले. " कुठं दिसलं न्हाइत. कुठं गेलं कायकी. पर झालं तरी काय?" एकानं विचारलं. "चलो अंदर. सब बताता हूं" म्हणत त्यांना घेऊन आत आलो. तोपर्यंत बेगम पण दोन्ही बायकांना गोळा करून उभी होती.

सगळ्यांना एका बाजूला उभे केले आणि शांतपणे विचारलं, " कंगन की बात बाहर किस किसको और किसने बताई है सच सच बतओ."

सगळे एकमेकाकडे बघायला लागले. मी सगळ्यांकडे बारकाईने बघत होतो. यांच्या पैकी कोणीतरी बांगड्यांची गोष्ट बाहेर बोलला असणार. आणि त्यावरून फायदा उठवायला ते जोडपं आलेलं असणार हे मी ओळखलं होतं. " सांगा लवकर नाहीतर आज कुणालाच घरी सोडणार नाही." मी पुन्हा म्हणालो.

बेगम पण बायकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होती. अर्धा तास आम्ही दोघांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे विचारले पण कोण कबूल होत नव्हतं. तेवढ्यात मुलगा आला. सगळ्यांना असं उभारलेलं बघून त्यानं विचारलं " क्या हुवा ?"

मी त्याला घडलेला प्रकार सांगितला. आणि रागानं म्हटलं " और अभी कोइ भी कबूल नही कर रहा"

हे ऐकून मुलगा घाबरत म्हणाला " अब्बू, वो क्या है की.. मैने ही ये बात मेरे कुछ दोस्तोंके सामने बोली थी. अब उन लोगोने और कितने लोगोको बोली है क्या पता " झालं. मी एकदम थंड पडलो.

बेगम मात्र चिडुन बोलली " और हम लोग इन बेचारो पर शक कर रहे थे. माफ करना भाई हमको."

" नाही हो भाभी, माफी काय मागता, जाउदे." असं बोलत ते सगळे घरी निघून गेले. मी मात्र जड मनाने विचार करत बसून राहिलो.

दुसर्‍या दिवशी कोणीच कुणाशी जास्त बोलत नव्हतं. सगळे आपापल्या कामात लागले होते. साधारण १० वाजता मी त्या बांगड्या घेऊन पोलिसांकडे जायचं नक्की केलं होतं. कालचा प्रकार बघून माझी खात्री पटली होती अजून कोणतरी बनावट माणूस आला तर उगाच आपल्यावर जबाबदारी नको. पोलीस आणि त्या बांगड्या, बघून घेतील कायते. बेगमला पण ते पटलं होतं. मी बाहेर पाडणार त्याच वेळेला मिरजेची मुलगी आणि दामाद आले.

त्यांच्या समोर पुन्हा सगळी चर्चा नको म्हणून सगळे निमूट बसलो. दुपारी जेवण वगैरे आवरून ते लोक गेले. मग दुपारची नमाज अदा करायला दोघे गेलो. त्या नंतर एका मित्राकडे गेलो. त्याच्या पोलिसांत भरपूर ओळखी होत्या. त्यामुळे त्याला सोबत घेऊन जाऊ अश्या विचाराने.. म्हटलं ओळखी मुळे आपल्याला जास्ती त्रास नं देता ते लोक लवकर मोकळं करतील तर तो परगावी गेला होता.

आतां परत घरी जाऊ आणि संध्याकाळी पोलिसांकडे जाऊ असे मुलगा बोलला. म्हटलं चला. अजून दोन तास, तर ठीक है.

कारखान्यात आल्या आल्या एक कामगार बोलला " कोनतर दोघं आलं हुतं. तुमास्नीच इचारत हुते."
"मग? कुठे गेले ते? काय सांगितलंस त्यांना?" मी विचारलं. पुन्हा मनावर दडपण आलं. आपोआप हात छातीवर गेला.
" नमाज पढायला गेलाय आनी अर्ध्या पाउन तासात येशीला आसं सांगीतलं"
" अब्बा आप आराम करो मै देखता कोइ आया तो." असं मुलगा बोलला म्हणून आत गेलो म्हणलं बेगमला पण सांगावं काय झालं ते. तेच बोलत बसलो होतो तेवढ्यात मुलगा आला आणि म्हणाला " अब्बा, वो गॅरेज वाले पाटिल मिस्त्री आये है. उनकी गादीया बन रही है, शामतक डिलिव्हरी दे देंगे. साथमे शायद उनके पिताजी है."
उठून बाहेर आलो.

*********************************************************************************

पुन्हा मी...

चाची उठून आत गेल्यावर चाचांनी वरील सगळी कथा मला ऐकवली.
" बेटा, आम्हाला जो अनुभव आला त्यामुळे मी तुला उलट सुलट प्रश्न विचारत होते. आता तूला मी चांगलं ओळखते पण खात्री केलेली बरी ना?" बांगड्या माझ्या हातात देत चाची बोलली.

मी त्या वाकड्या तीकड्या झालेल्या बांगड्या कडे प्रश्नार्थक चेहर्‍याने बघत होतो.

" देखो बेटा ये सोना है. इसको ठीक करवाओ या नया बनवाओ, तुम्हारी मर्जी मगर शुकर है खुदा का मेरी जान छुट गई." चाचा बोलला

पाटल्या हरवल्या हे कळल्या पासून चौथ्या तासात पाटल्या माझ्या हातात होत्या. पण ज्याला त्या सापडल्या त्या चाचाला तीन दिवस काय अवस्थेतून जावे लागले हे ऐकून मनात अपराधी भाव घेऊन आम्ही घरी परतलो.

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या पॅरा मध्ये चार दिवस हवे आहे का चार तासा ऐवजी ?>>
चार दिवसच बरोबर असावं.
आपल्याला भाग मिळायला चार दिवस लागले. पण कथेतल्या माणसांना पाटल्या हरवल्या हे कळल्यापासून चार तासातच मिळाल्या.

शेवटच्या पॅरा मध्ये चार दिवस हवे आहे का चार तासा ऐवजी ?>>>
चार तासच आहे ते!
मला जेव्हा कळलं की पाटल्या हरवल्या आहेत तेव्हापासून चार तासातच मला मिळाल्या होत्या.....
सर्व वाचकांचे आभार... __/\__

शेवटच्या पॅरा मध्ये चार दिवस हवे आहे का चार तासा ऐवजी ?>>
चार दिवसच बरोबर असावं.
आपल्याला भाग मिळायला चार दिवस लागले. पण कथेतल्या माणसांना पाटल्या हरवल्या हे कळल्यापासून चार तासातच मिळाल्या.>>

मला चार तास म्हणायचं होतं. चुकून दिवस लिहिलं.